पालकत्वाचा 'प्रसन्न' दृष्टीकोन!

काही कुटुंबं अशी असतात की, त्यांच्याकडे गेल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्या घरात थोडा वेळ रमल्यावर आपल्याला खूप बरं वाटतं. काहीतरी नवं शिकायला मिळतं.
Parenting
ParentingSakal
Summary

काही कुटुंबं अशी असतात की, त्यांच्याकडे गेल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्या घरात थोडा वेळ रमल्यावर आपल्याला खूप बरं वाटतं. काहीतरी नवं शिकायला मिळतं.

काही कुटुंबं अशी असतात की, त्यांच्याकडे गेल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्या घरात थोडा वेळ रमल्यावर आपल्याला खूप बरं वाटतं. काहीतरी नवं शिकायला मिळतं. विचार फ्रेश होतात. मोकळेपणाने चर्चा होते आणि कुटुंबाला, पालकांना समजून घेता येतं. प्रसन्नचं घर त्यापैकीच एक होय.

प्रसन्न हा खरंतर माझ्या मित्राचा धाकटा भाऊ; पण काही दिवसांतच तो माझा जवळचा मित्रच झाला. वयाचं अंतर आम्ही केव्हाच पार केलं आणि एकमेकांशी खूप जवळकीच्या नात्याने बोलू लागलो. प्रसन्न खूप वेगळ्या पद्धतीने विचार करत असे. मुलांच्या संगोपनाबद्दल त्याची स्वतःची अशी मतं होती. आपल्या मुलीला नीट वाढवावं, समजूतदार करावं, स्मार्ट घडवावं यासाठी तो डोळसपणे अनेक प्रयत्न करत असे. त्यासाठीचे त्याचे काही उपक्रम मी खूप जवळून बघितले आहेत. त्याचं जगण्याचं म्हणूनही एक स्वतःचं तत्त्वज्ञान होतं, दृष्टिकोन होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार तो वेगळेपणाने करे. सगळे करतायेत म्हणून आपण केलं, असं तो कधीच करत नसे. अमुक गोष्ट आपण का करायची, याची तो चिकित्सा करे आणि मनापासून पटली तरच ती करे. तो झापडबंद अनुनय करणारा नव्हताच.

प्रसन्नची पत्नी वनिता ही समविचारीच होती. प्रसन्न आणि वनिता हे दाम्पत्य म्हणजे अनेक बाबतीत आदर्श म्हणावं लागेल. ते आदर्श पती-पत्नी होतेच, पण आदर्श पालकही होते. आणि मी त्यांना आदर्श म्हणतो याचं त्यांना नेहमी आश्चर्य वाटायचं. त्यांचं म्हणणं असं, की आम्ही आदर्श नसून जे आहे, ते सहजपणे जगतोय इतकंच.

ऋतिका त्यांची मुलगी. तिची इयत्ता पाचवी. (सर्व नावं बदलली आहेत...) आमचं एका रविवारी सकाळी भेटायचं ठरलं, म्हणून मी प्रसन्नकडे पोहोचलो. मी गेलो तेव्हा प्रसन्न आणि ऋतिका नुकतेच बाहेरून जाऊन आलेले दिसत होते. मी गमतीने म्हटलं, ‘‘अरे वा! मी अगदी वेळेवर आलोय...’’

प्रसन्न हसून म्हणाला, ‘‘अरे आम्हाला थोडा उशीर झाला... नाही तर आम्ही आधीच येणार होतो... बस!’’

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर ऋतिका आली आणि तिनं प्रसन्नच्या हातात एक पत्र ठेवलं. प्रसन्न ते पत्र वाचून म्हणाला, ‘‘व्हेरी गुड! छान पत्र लिहिलेस... उद्या आपण हे बँकेत देऊ...’’

माझं कुतूहल जागं झालं. म्हणून मी विचारलं, ‘‘ऋतिकाने पत्र लिहिलंय? बँकेसाठी?’’

प्रसन्न त्यावर हसला आणि ऋतिकाला म्हणाला, ‘‘सांग काकांना आपली स्टोरी.’’

प्रसन्ननं सांगताच ऋतिकाच्या अंगात उत्साह संचारला. काय सांगू आणि काय नको, अशा आविर्भावात ती घडलेली गोष्ट सांगू लागली. वनिताही आतून बाहेर आली आणि ऋतिकाचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकू लागली...

‘‘आज सकाळी आम्ही लवकर उठलो. बाबा मला म्हणाले की, चल आज आपण बाजारहाट करायला जाऊ...’’ ऋतिका सांगू लागली.

ऋतिका नुकतीच पाचव्या इयत्तेत गेलेली. तिच्या तोंडून शॉपिंगऐवजी बाजारहाट हा देशी शब्द ऐकून मला आश्चर्य वाटलं! मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, ‘‘बाजारहाट?’’

मला हा शब्द माहिती नसावा अशा समजुतीने ती म्हणाली, ‘‘काका बाजारहाट म्हणजे शॉपिंग; पण प्रत्यक्षात बाजार आणि हाट या दोन्हीचा अर्थ एकच आहे. बाजारात जाणे या गोष्टीला बाजारहाट असेही म्हणतात. बाबांनीच मला मागे हे सांगितलंय...’’

ऋतिकाच्या भाषेकडे प्रसन्नने पहिल्यापासूनच मुद्दाम लक्ष दिलं आहे. ऋतिकाची शब्दसंपदा चांगली होती. तिचा व्याकरणाचा अभ्यासही दांडगा होता. त्यामुळे स्वतःला व्यक्त करायला तिला कधीच अडचण येत नसे. ती उत्तमप्रकारे पेपर सोडवी. त्यामुळे मार्कही चांगले मिळत. तितक्याच उत्तमप्रकारे ती बोलत असे. भाषेच्या अस्खलित एक्सप्रेशनमुळे तिला मूळात आवड असलेले, तिचे सर्व विषय उदाहरणार्थ इतिहास, भाषा, भूगोल, विज्ञान हे तिला सहजपणे अवगत होत गेले.

लोकलमधून घरी परतताना प्रसन्न कधीच पत्त्यांच्या खेळात रमला नाही. त्याचा ग्रुप होता, पण प्रसन्न शांतपणे वाचत बसलेला असे. प्रवासात तो गोष्टींची पुस्तके वाचे आणि आज रात्री ऋतिकाला कोणती गोष्ट सांगायची, ते मनातल्या मनात ठरवत असे. त्यातले शब्द, त्या शब्दांचे अर्थ याचा तो स्वतंत्रपणे अभ्यास करी. मला या गोष्टीचं प्रचंड कौतुक होतं. कारण मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा जाणीवपूर्वक विचार करणारे आणि त्यासाठी जाणीवपूर्वक मेहनत घेणारे फार कमी पालक मी पाहिले आहेत. प्रसन्न हा त्यातला एक होता!

ऋतिका पुढची हकीगत सांगू लागली... ‘‘बाबांकडची कॅश संपली होती. बाबा म्हणाले, आधी एटीएममध्ये जाऊ... एटीएम म्हणजे ऑटोमेटेड टेलरिंग मशीन... त्यात कार्ड घातलं की पैसे मिळतात, ते मशीन! मग बाबांनी मला समजावून सांगितलं की कार्ड कसं घालायचं, कुठलं बटन दाबायचं, पिन नंबर कसा टाकायचा, मग पैसे कसे येतात... मी म्हटलं, मी करून बघू का? बाबा म्हणाले, कर की... सगळं नीट झालं... पण त्यातून पैसे काही आले नाहीत आणि कार्ड तर अडकूनच बसलं,’’ ऋतिकाने मोठ्या माणसासारखा कपाळावर हात मारला.

‘तुझा पिन क्रमांक चुकला असेल!’’, मी म्हटलं.

‘चुकेल कसा? बाबा बाजूला उभे होते ना! त्यांनी पाहिल्यावरच मी नंबर ओके केला...’’, ती तत्परतेने म्हणाली.

‘पिन नंबर काय आहे? एकदा सांग मला...’’, मी असं म्हटल्यावर तिचे डोळे मोठे झाले आणि ती म्हणाली, ‘‘आई आणि बाबांशिवाय कुणालाही पिन नंबर सांगायचा नसतो, माहिती आहे?’’

तिच्या उत्तरावर मी खो-खो हसलो आणि तिच्या हुशारीला दाद दिली.

एटीएम मशीनमध्ये अडकलेलं कार्ड परत करावं, यासाठी ऋतिकाने बँक मॅनेजरला लिहिलेलं पत्र अतिशय सुवाच्य आणि आकर्षक शब्दांत लिहिलेलं होतं. ते पत्र, त्यावरचं सुंदर अक्षर, सोपी सुटसुटीत वाक्यरचना मी पाहत राहिलो. प्रसन्नाने अर्थातच तिला कोणतीही मदत केलेली नव्हती. त्यात एक-दोन नगण्य चुका होत्या; परंतु प्रसन्नने त्याखाली ना रेष ओढली, ना गोळे काढले. तिला फक्त समजावून दिलं आणि सांगितलं की पुढल्या वेळेला तू जास्त अचूक लिही. ते पत्र प्रसन्नाने माझ्यासमोर सही करून फायनल केलं, एनव्हलपमध्ये भरलं आणि उद्या शाळेला जाताना बँकेच्या मॅनेजर कडे दे, असं ऋतिकालाच सांगितलं...

ऋतिका खेळायला गेल्यावर मी प्रसन्नला म्हटलं,

‘तुझ्या जागी कुणी दुसरा पालक असता तर, एक तर असं कार्ड आणि पिन नंबर दिला नसता आणि कार्ड अडकल्यावर तर तिने किंवा त्याने ओरडाच खाल्ला असता...’’ माझ्या बोलण्यावर प्रसन्नने डोळे मिचकावले आणि नेहमीप्रमाणेच इतर पालकांपेक्षा वेगळं उत्तर मला हसत हसत दिलं...

प्रसन्न म्हणाला, ‘‘अरे चांगलं झालं ना! पैसे कसे काढायचे ते ऋतिकाला समजलं आणि पैसे काढायला गेल्यावर कार्ड अडकू शकतं, हेही समजलं. कार्ड अडकल्यावर ते परत मिळवण्यासाठी बँक मॅनेजरला पत्र लिहावं लागतं, तेही समजलं... सहज पैसे निघाले असते तर तिचं केवढं तरी शिक्षण राहून गेलं असतं... एका भेटीत तिला अनेक गोष्टी समजल्या, हे खूप चांगलं झालं नाही का?’’

पालकत्व हे दृष्टिकोनात असतं, हा माझा समज प्रसन्नच्या बोलण्यातून दृढ झाला. प्रसन्नने पालक म्हणून आज मलाही समृद्ध केलं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com