शिस्त आणि सुसंवाद

जेवणातल्या मिठाप्रमाणे जीवनात शिस्तीचं महत्त्व आहे. मीठ म्हणजे जेवण नव्हे, तसंच शिस्त म्हणजे जीवन नव्हे. जीवन सुकर होण्यासाठी शिस्त असते.
Discipline and harmony
Discipline and harmonysakal
Summary

जेवणातल्या मिठाप्रमाणे जीवनात शिस्तीचं महत्त्व आहे. मीठ म्हणजे जेवण नव्हे, तसंच शिस्त म्हणजे जीवन नव्हे. जीवन सुकर होण्यासाठी शिस्त असते.

जेवणातल्या मिठाप्रमाणे जीवनात शिस्तीचं महत्त्व आहे. मीठ म्हणजे जेवण नव्हे, तसंच शिस्त म्हणजे जीवन नव्हे. जीवन सुकर होण्यासाठी शिस्त असते. पालकत्व म्हणजे केवळ मुलांना वाढवण्याची प्रक्रिया नसून मुलांबरोबर स्वतःलाही वाढवण्याची प्रक्रिया आहे. आधी पालक म्हणून आपला विकास झाला तरच मुलांचा मूल म्हणून विकास होणार आहे. त्यामुळे आपल्या मुलांची आपण घुसमट तर करत नाही ना, हे तपासायला हवं.

प्रत्येक कुटुंबाचा म्हणून एक स्वभाव असतो. कुटुंबातल्या सर्व व्यक्तींच्या स्वभावाचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते किंवा त्यांच्या स्वभावाची सरमिसळ कुटुंबाच्या स्वभावात झालेली असते. म्हणजे अमुक एका विषयावर कशी मतं व्यक्त करायची, कोणती मतं बाळगायची, विचार कसा करायचा, विचार कसा करायचा नाही, एखाद्या घटनेवर आपली प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद कसा द्यायचा, भावना कशा व्यक्त करायच्या, भाषा कशी आणि कशा प्रकारे वापरायची, प्रतिमा कशा व्यक्त करायच्या, राग आणि प्रेम कसं व्यक्त करायचं, आदर कसा राखायचा आणि कसा दाखवायचा, शिस्त कशी पाळायची हे आणि यासारखं बरंच काही कुटुंबातल्या व्यक्तींवर, विशेषतः पालकांवर अवलंबून असतं. त्यामुळेच प्रत्येक कुटुंबाचा स्वभाव आणि वैशिष्ट्य वेगवेगळं असतं. कुटुंबाच्या स्वभावाचा परिणाम हा मुलांच्या स्वभावावर, मुलांच्या करिअरवर, मुलांच्या अभ्यासावर आणि मुलांच्या भवितव्यावर होतोच होतो. कुटुंबातली करती सवरती माणसं, म्हणजे पालक, कुटुंबाच्या स्वभावाला पैलू पाडत असतात.

कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये आई आणि बाबा या दोघांचाही वाटा तितकाच महत्त्वाचा असतो. साहजिकच आई-बाबा हे पालक म्हणून जेवढे प्रगल्भ होतील, समंजस होतील, सखोल होतील, तेवढ्या स्तरावर कुटुंबाचा स्वभाव हा उंचावत जातो आणि तीच उंची मुलांच्या विचारांना आणि भावनेला प्राप्त होते. मुलांना विचार करण्याची दिशा द्यावी लागते आणि विवेक कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शिकवावा लागतो. हा विवेक मुलं पालकांच्या स्वभावातून उचलतात. पालक तोंडाने काहीही म्हणत असले आणि कितीही महत्त्वाचा उपदेश करत असले, तरी मुलांचं लक्ष मात्र पालकांच्या कृतीकडे असतं आणि स्वभावाचं प्रतिबिंब हे कृतीतूनच व्यक्त होतं. माणसाच्या स्वभावाचे दर्शन त्याच्या कृतीतून होते. विचार हे कृतीशिवाय अधांतरी असतात. म्हणूनच काही पालक हे जेव्हा त्यांचे उच्च विचार मुलांना उपदेशामृत म्हणून पाजत असतात, तेव्हा मुलं मात्र पालक नेमके कसे वागतात, पालकांचा स्वभाव कसा आहे याकडे लक्ष ठेवून असतात.

पालकांचा स्वभाव किंवा पालकांपैकी कोणाही एकाचा स्वभाव हा बंदिस्त, आत कुढणारा, संतापी, शीघ्रकोपी अविचाराने कृती करणारा, समोरच्याचा अनादर करणारा, समोरच्याचे ऐकून न घेणारा, अनुदार वृत्तीचा असेल, तर त्याचे प्रतिबिंब कुटुंबाच्या स्वभावात पडते आणि मुलं एका भीतीच्या छायेत सतत वावरत असतात. कारण अशा स्वभावाचे पालक हे सुसंवादाला खुले नसतात. संवादासाठी आवश्यक असणारा मोकळेपणा त्यांच्याकडे नसतो. अशा पालकांचा संवाद हा बहुतेकदा एकतर्फी घडत असतो. म्हणजे पालकांना जे म्हणायचे आहे ते पालकांनी मुलांना सांगायचं आणि तो आदेश मुलांनी पाळायचा. पालकांनी आदेश दिला की संवाद संपतो. मुलांच्या मताला, मुलांच्या भावनेला, मुलांच्या अभिव्यक्तीला अशा घरात महत्त्व नसतं.

अनेक घरांमध्ये शिस्तीला प्रचंड महत्त्व असते. म्हणजे मुलांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, मुलांना त्यांच्या विश्वात रमू द्यावं यासाठी पालकांमध्ये एक औदार्य लागतं. मुलं चुका करणारच आहेत, त्या समजून घेण्याची मानसिकता लागते. पण करड्या शिस्तीचे पालक हे इतके काटेकोर असतात, की त्यांचा शिस्तीचा आग्रह ते कधीच सोडत नाहीत. त्यांना शिस्त म्हणजेच पालकत्व वाटतं आणि येता-जाता ते मुलांमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न करत असतात. शिस्त हवीच, पण ती एका प्रमाणात हवी. जेवणातल्या मिठाप्रमाणे जीवनात शिस्तीचे महत्त्व आहे. मीठ म्हणजे जेवण नव्हे, तसंच शिस्त म्हणजे जीवन नव्हे. जीवन सुकर होण्यासाठी शिस्त असते, पण काही पालकांचा शिस्तीवर आणि म्हणूनच शिक्षा करण्यावर जास्त भर असतो. मुलांना शिक्षा केली म्हणजे आपण आपलं कर्तव्य पार पाडलं असं काही पालकांना वाटतं. असे पालक मुलांच्या स्वभावात कधीच डोकावून बघत नाहीत. खरं सांगायचं तर अशा कुटुंबांत पालकांचाच परस्परांशी सुसंवाद घडत नसतो. ते मुलांच्या सोडा पण स्वतःच्या स्वभावातसुद्धा कधी डोकावून बघत नाहीत. ते आत्मपरीक्षणही करत नाहीत. त्यामुळे खूपदा पालकांमध्ये खटके उडताना दिसतात. त्यामुळेच अशा कुटुंबाचा स्वभाव हा कोंदट होतो. तिथे मुलांची घुसमट होण्याची शक्यता असते. अशा घुसमटीमुळे मुलांची प्रगती खुंटू शकते.

ज्या घरात मुलांना मोकळेपणा मिळतो, चुका करण्याची आणि चुका सुधारण्याची मुभा मिळते, आपल्या चुका आपले पालक पोटात घेतील याची हमी मिळते, ज्या घरात मुलांना पुन:पुन्हा यावंसं वाटतं. घरात प्रेम आणि माया मिळत असल्यामुळे मुलं निश्चिंत असतात. ज्या घरात पालक मुलांवर विना अट प्रेम करतात, ज्या घरात मुलांना बागडायला आवडतं, त्यांना कोणी टोकत नाही, टोमणे मारत नाही, त्यांचा सतत पाणउतारा करत नाहीत, त्यांची सतत कोणाशी तरी तुलना करत नाहीत, त्यांच्यातले दोष किंवा कमीपणा यावर वारंवार बोट ठेवलं जात नाही, योग्य वेळेला त्यांचं कौतुक होतं, त्यांच्यातल्या चांगल्या गुणांबद्दल त्यांची स्तुती होते... पालक परस्परांवर प्रेम करतातच, परंतु पालक परस्परांचा आणि कुटुंबातल्या सर्वांचा आदर राखतात... असं घर मुलांना आवडतं. अशा घरातल्या पालकांमध्ये खूप चांगला समंजसपणा असतो. आपल्या स्वतःच्या पालकांनी केलेल्या चुका असे पालक टाळतात. आजूबाजूला काय चाललं आहे याचं त्यांना उत्तम भान असतं. मुलांमधले चांगले गुण असे पालक सहज हेरू शकतात. त्यांच्या गुणांची जोपासना करतात. असे पालक स्वतःला पुन:पुन्हा तपासतात. स्वतःमधलं पालकत्वाचं ज्ञान आणि माहिती वाढवण्याचा ते प्रयत्न करतात आणि कधी कधी असे पालक मुलांकडूनसुद्धा खूप सारं शिकतात. असं कुटुंब हे मुलांसाठी कोंदण असतं. अशा वातावरणात वाढलेली मुलं चमकदार कामगिरी करू शकतात.

पालकत्व म्हणजे केवळ मुलांना वाढवण्याची प्रक्रिया नसून मुलांबरोबर स्वतःलाही वाढवण्याची प्रक्रिया आहे. आपण वाढलोच नाही आणि केवळ मुलांच्या संगोपनाचा प्रयत्न केला, केवळ मुलांना वाढवण्याचा प्रयत्न केला, तर तो अपुरा ठरणार हे नक्की! आधी पालक म्हणून आपला विकास झाला तरच मुलांचा मूल म्हणून विकास होणार आहे. त्याआधी आपल्या कुटुंबाचा स्वभाव कसा आहे हे तपासायला हवं. आपल्या मुलांची आपण घुसमट तर करत नाही ना, हे तपासायला हवं आणि आपलं कुटुंब म्हणजे मुलांसाठी कोंदण व्हावं यासाठी डोळस आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत!

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com