घराणी : संस्थानांची आणि नाट्यक्षेत्रांतली...

House-of-Jaipur
House-of-Jaipur

साहित्यसृष्टीमध्ये मानाचं स्थान असणाऱ्या जयपूर साहित्य मेळ्याच्या शेवटच्या दहा दिवसांत वाचकांना एक मोठी वैचारिक मेजवानी मिळाली. नोबेल विजेते, मॅन बुकरचे मानकरी, पुलित्झर, राष्ट्रकुल आणि युरोपियन महासंघाच्या पुरस्कार विजेत्या लेखकांनी त्यांच्या लेखन विश्‍वाच्या विविध छटा मांडतानाच स्वतःचं भावविश्‍व देखील उलगडून दाखविलं. यात पर्यावरण, अपारंपरिक ऊर्जास्रोत, जगाच्या राज्यघटना, महिला कादंबरी, कविता आणि गरिबीपर्यंत सगळं काही होतं. या साहित्य महोत्सवामुळे काही नव्या साहित्यकृतींची देखील ओळख झाली. त्यांची ठळकपणे नोंद घेणे गरजेचे ठरते.

दि हाउस ऑफ जयपूर : लेखक : जॉन झुब्राझस्की (प्रकाशक :जग्गरनॉट) जॉन यांची ही साहित्यकृती म्हणजे झगमगाट, सौंदर्याची चमक, ओसंडून वाहणारी आर्थिक संपन्नता आणि असंख्य कारस्थानांच्या डोहामध्ये खोलवर घेतलेली उडी होय. या कादंबरीच्या केंद्रस्थानी दोन पात्रे आहेत. एक म्हणजे उच्चकोटीच्या श्रीमंतीमध्ये जगणाऱ्या महाराणी गायत्रीदेवी ज्यांना कधी काळी आयेशा या नावानंही संबोधलं जाई. दुसऱ्या म्हणजे तितक्याच कणखर आणि चतुरस्र अशा त्यांच्या मातुःश्री आणि कुचबिहारच्या महाराणी इंदिरा. इंदिरादेवींना त्यांच्या धुंदीत जगायला आवडतं, यामुळेच त्यांनी अनेक परंपरा झुगारून लावल्या. ‘हाउस ऑफ जयपूर’ तुम्हाला भूतकाळामध्येही घेऊन जातं. जेव्हा मिर्झा राजे मानसिंह आणि मिर्झाराजे जयसिंह यांची अंबरच्या किल्ल्यावर हुकूमत चालत होती. दिल्लीचे तत्कालीन शासक अकबराच्या दरबारामध्येही त्यांना मानाचं स्थान होतं. मोगल न्यायालयांमध्ये त्यांच्या शब्दाला वजन होतं. झुब्राझस्की यांनी या साहित्यकृतीमध्ये स्वतःला वेळेचं बंधन घालून घेतलं आहे. हा सगळा घटनाक्रम सुरू होतो तो मोर्मुकूट यांचा सवाई मानसिंह (द्वितीय) म्हणून स्वीकार होण्यापासून, पुढे तो महाराजा माधोसिंह यांच्यापर्यंत येऊन पोचतो. 

केवळ ज्येष्ठतेचा आणि मानसन्मानाचा विचार केला तर ब्रिटिश राजवटीमध्ये जयपूरच्या शाही घराण्याला दिली जाणारी सतरा बंदुकांची सलामी हा देखील काही फार मोठा सन्मान नव्हता. हैदराबादचा निजाम, बडोदा नरेश, काश्‍मीर, ग्वाल्हेर आणि म्हैसूर संस्थानच्या सत्ताधीशानंतर जयपूरच्या घराण्याचा क्रमांक लागतो. या सगळ्या मंडळींना २१ फेरींची सलामी मिळत असे. काही औपचारिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या अधिकृत दर्जामध्ये एक कमतरता होती पण ती ब्रिटिश सरकारसोबत असलेल्या संबंधांच्या पातळीवर होती. सामाजिक संबंध आणि मैत्रीच्याबाबतीत ही मंडळी काकणभर सरसच होती.

केनेडींचे हाउस ऑफ विंडसर आणि माउंटबॅटन यांच्या युरोप आशियातील राज वर्तुळाशीही त्यांचे संबंध होते. झुब्राझस्की यांनी राजघराण्याची ही गोष्ट सांगण्यासाठी हजारो कागदपत्रे, पत्रव्यवहार अक्षरशः पालथा घातला आहे. शेकोटोभोवती व्हिस्की आणि ब्रँडी यांचा आस्वाद घेत ब्रिटिश नागरिकांशी केलेल्या चर्चेतून हाती लागलेला तपशील देखील या ग्रंथात वाचायला मिळतो. जयपूरच्या संपन्न राजघराण्याची साक्ष देणारे पॅव्हेलियन, राजवाडे, घरे, बगीचे सगळं काही या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. याच बरोबर या ग्रंथाच्या पानांत सापडतं ते म्हणजे प्रेम आणि कारस्थान, महत्त्वाकांक्षा, छळ आणि कायदेशीर वाद. या राजघराण्याचं हे आत्ताचं दुर्दैव म्हणावं लागेल.

गायत्रीदेवींचे राजकारण आणि स्वतंत्र पक्ष, मुलगा जगत, तीन सावत्र मुले आणि सून पद्मिनीदेवी यांच्याशी त्यांच्या असलेल्या ऋणानुबंधांवर देखील हा ग्रंथ प्रकाश टाकतो. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर वादाच्या पार्श्वभूमीवर हे संबंध त्यांनी जपले होते. श्रीमंतीचा भपका, बड्यांची रेलचेल, शॅम्पेनचे फवारे आणि रत्नजडित कोंदणामध्ये सामावलेले अनेकांचे जीवन या ग्रंथामध्ये  शब्दबद्ध झाले आहे. हा ग्रंथ तिथेच थांबत नाही यापुढे जाऊन त्यानं तळघरातील वास्तव उघड केलं आहे. ज्यात शोकांतिका, मालमत्तांचे वाद आणि अंतिम सत्य असणाऱ्या मृत्यूचाही संदर्भ सापडतो. 

‘एंटर स्टेज राइट, अल्काझी-पदमसी कुलवृत्तांत’ (लेखक : फैजल अल्काझी, प्रकाशक : स्पिकिंग टायगर) या स्मरणग्रंथानं भारतीय थिएटरला सर्वस्व देणाऱ्या पहिल्या कुटुंबाची ‘अंदर की बात’ मांडली आहे. दक्षिण मुंबईतील अभिजनाचं एक वेगळं रूप मांडणाऱ्या या ग्रंथामध्ये इब्राहिम अल्काझी यांच्या नेतृत्वाखाली थिएटर कसं बहरत गेलं याचा प्रवास वाचायला मिळतो. दिल्लीमध्ये नाट्यसृष्टीला कलेची चौकट देण्यात अल्काझी यांचे मोठे योगदान आहे. पदमसी कुलवृत्तांतामध्ये संपन्न अशा जाफ्फेरभाई आणि कुलसूम दांपत्याचा समावेश आहे. या दोघांनी चौदा मुलांना जन्म दिल्यानंतर शेवटी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. कुलसूम यांनी नंतर एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये स्वतःचं वेगळं विश्‍व निर्माण केलं. पुढे येथे बसूनच त्यांनी त्यांचा वंश बहरताना पाहिला. जाफ्फेरभाईंची सगळी मालमत्ती काचेची झुंबर आणि अन्य मौल्यवान वस्तू होत्या. जाफ्फेरभाईंनी त्यांच्या शेवटच्या मुलाचा विवाह होईपर्यंत वाट पाहिली नंतरच हे जग सोडलं. वयाच्या सत्तरीमध्ये पोचल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी आपल्या अनेक प्रेयसींपैकी एकीच्या घरी राहणं पसंत केलं. आधी प्रेम आणि नंतर विभक्त होणं ही परंपरा त्यांनीही पुढे तशीच चालविली. सुलतान बॉबी पदमसी यांच्या वाट्याला मात्र शोकांतिकाच आली. हा माणूस जितका देखणा तितकाच हुशार देखील होता. पुढे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. या सगळ्या ग्रंथाची आधारशिला ही फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम. अलेक पदमसी आणि इब्राहिम अल्काझी यांच्या आयुष्यामध्ये डोकावल्यानंतर देखील हीच बाब दिसून येते. वैवाहिक बंधनात अडकलेले असताना देखील ही मंडळी बाहेर आपले प्रेम शोधत होती. कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये याच गोष्टीची कमतरता असावी.

इब्राहिम अल्काझी यांच्या अनेक पात्रांची वेशभूषा करणाऱ्या रोशेन अल्काझी असो की उमा आनंद किंवा पर्ल पदमसी. ही सगळी पात्रं त्यांच्या भोवती घुटमळताना दिसतात. अलेक यांच्या निधनानंतर पर्ल यांनी नाट्य संस्थेची धुरा सांभाळली होती. यात फैजलची गोष्ट मात्र सगळ्यापेक्षा वेगळी होती. या कुटुंबाचं आठवड्यातून एकदा होणारे स्नेहभोजन ही एक मोठी पर्वणीच असायची. या मेजवानीला अलेक यांचे अनेक शिष्य हजर असायचे त्यामध्ये नसिरुद्दीन शाह, नीलम मानसिंग, आलोकनाथ आणि अनुपम खेर यांचा समावेश असे. ही सगळी मंडळी रोशेन यांच्या घरी एकत्र जमायची. इब्राहिम यांनी अशाच एके रात्री एक नवा पार्टनर जाहीर केल्यानंतर फैजल यांनी त्याला घरी येण्यास मज्जाव केला.

प्रोग्रेसिव्ह नाट्य चळवळ आणि तिचा कलेच्या जगाशी असणारा संबंधही यात वाचायला मिळतो. त्यामध्ये अकबर पदमसी, एम.एफ.हुसैन अशा दिग्गज मंडळींचा समावेश आहे. इब्राहिम अल्काझी हे खरोखरच हुकूमशाही प्रवृत्तीचे होते का? पूर्णत्वाच्या ध्यासामुळे त्यांची कलात्मक दृष्टी विकसित झाली असे म्हणता येईल का? यातूनच समांतर रंगभूमी आणि चित्रपट चळवळीचा जन्म झाला का ? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रतिष्ठेची पायाभरणी येथेच झाली का? या प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. कलेवरील प्रेमाचा शोध आणि समकालीन नाट्यसृष्टीच्या इतिहास अभ्यासण्यासाठी या पुस्तकाची पानं चाळायलाच हवी. 
(लेखक जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन करणाऱ्या टीमवर्क्स आर्टस् चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com