अखेर महत्त्वाचा ठरतो विश्वास

A-Matter-of-Trust
A-Matter-of-Trust

काही दशकांपूर्वीची गोष्ट. माझे वडील एम. के. रॉय हे नुकतेच रशियाला जाऊन आले होते. रॉय हे नौदलातील वैमानिक आणि पुढं भारताच्या आण्विक पाणबुडी कार्यक्रमाचे प्रणेते. डार्टमाउथ येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. रशियाचे अॅडमिरल गोर्शकोव यांच्याबरोबर एका करारावर सह्या करून ते परतले होते. रशियाविषयी भारावलेल्या स्वरात बोलत होते. `रशिया हा भारताचा सर्वात चांगला मित्र आहे` हे त्यांचे पालुपद. अर्थातच अमेरिका आणि त्या देशाची धोरणे याविषयी त्यांची नाराजी लपत नव्हती. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मला आणि माझ्या भावाला त्यांची अमेरिकेविषयीची नाराजी बुचकळ्यात टाकत होती. त्यांना अमेरिकेचा एवढा राग का, असा प्रश्न आमच्या मनात येत असे.आम्ही तो त्यांना विचारला. ते म्हणाले, `हा विश्वासाचा मुद्दा आहे`.( मॅटर ऑफ ट्रस्ट). ज्या ज्या वेळी हा प्रश्न उपस्थित होई, त्यावेळी त्यांचे हेच उत्तर असे.

मीनाक्षी अहमद यांचे भारत –अमेरिका संबंधांवरील  प्रस्तुत पुस्तक वाचताना ही आठवण मनात जागी झाली. पूर्ण वाचल्याशिवाय  खाली ठेवावेसं वाटणार नाही, असं हे पुस्तक. ट्रुमन यांच्यापासून ट्रम्प यांच्यापर्यंतच्या अध्यक्षांची कारकीर्द यात येते. या काळातील भारत आणि अमेरिका या दोन मोठ्या लोकशाही राष्ट्रांमधील गुंतागुंतीचे संबंध अतिशय विस्ताराने लेखिकेने मांडले आहेत. भारत-अमेरिका संबंधांत कायमच जाणवत आलेल्या परस्पर विश्वासाच्या अभावाविषयी हे पुस्तक भाष्य करतं. याची कारणं ही सांस्कृतिक भिन्नतेत तर आहेतच, त्याचबरोबर परस्परांच्या धोरणात्मक आणि देशांतर्गत गरजांविषयीच्या सहसंवेदनेचा आणि  सामंजस्याचा अभावही  त्यामागं आहे. त्याचा वेध ऐतिहासिक दृष्टिकोन ठेवून घेतल्यानं हे या विषयावरील एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक झालं आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठ वर्ष खपून हा ग्रंथ लेखिकेनं सिद्ध केला. या दोन देशातील संबंधांची सुरुवातच कशी अडखळत झाली, याचं विवेचन लेखिका करते. पंडित नेहरूंनी अमेरिकेत विजयालक्ष्मी पंडित यांची राजदूत म्हणून नेमणूक करणं, त्यावेळचं पुरुषी वर्चस्व असलेलं आणि एकूणच महासत्तेचा टेंभा मिरवणारं काहीसं बेदरकार असं अमेरिकी परराष्ट्र खातं, त्या देशाच्या डोळ्यांना खुपणारं नेहरूंचं अलिप्तता धोरण, अन्नधान्यासाठी आपल्या देशावर अवलंबून असतानाही भारताकडून द्विपक्षीय संबंधांबाबत कोरडेपणा दाखवला जात असल्याची अमेरिकेची नाराजी, अध्यक्ष केनेडी यांच्याशी  भेट झाली, त्यावेळेस नेहरूंची खालावलेली  प्रकृती आणि पुढच्या काळात इंदिरा गांधी आणि निक्सन प्रशासनाचे कमालीचे ताणलेले संबंध ( निक्सन खासगीत बोलताना इंदिरा गांधींचा असभ्य भाषेत उल्लेख करीत.) या सगळ्या घटनाक्रमाचा आढावा मीनाक्षी अहमद यांनी घेतला आहे.

या सगळ्याला शीतयुद्धाचा, विसाव्या शतकातील भू-राजकीय परिस्थितीचा संदर्भ होता. पाकिस्तानच्या माध्यमातून चीनशी मैत्री जुळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरु होता. पाकिस्तानचे अध्यक्ष याह्याखान यांचा अमेरिकी जीवनशैलीकडे असलेला ओढा आणि त्यांचे अमेरिकी नेत्यांशी जुळलेले सूत , `पेगन` हिंदू धर्मापेक्षा `किताबी` धर्म मानणाऱ्या समाजांमध्ये जास्त साधर्म्य असल्याचा पाश्चात्यांचा त्यावेळचा  विशिष्ट दृष्टिकोन आणि हे सगळं कमी म्हणूनच की काय, पण मुत्सद्देगिरीचा अभाव असलेल्या कृष्ण मेनन यांच्यावर सोपवण्यात आलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, अशा सगळ्या घडामोडींवर नजर टाकत द्विपक्षीय संबंधांतील ताणेबाणे वाचकांच्या लक्षात मीनाक्षी अहमद आणून देतात. ज्या काळात भारताला जास्तीतजास्त मित्रदेश मिळवणे गरजेचे होते, त्याच काळात मेनन यांनी राजनैतिक पातळीवर केलेल्या चुका भारताला कशा भोवल्या, याकडेही हे लेखन लक्ष वेधतं.

कोलकाता येथे जन्मलेल्या मीनाक्षी नरूला अहमद यांनी जॉन हॉपकीन्स संस्थेतून आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास केला व तेथूनच एम.ए. पदवी संपादन केली. आधी `वर्ल्ड बँके`त नोकरी केली. नंतर एनडीटीव्हीच्या लंडनमधील प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. त्यांची पत्रकारितेची दृष्टी हे पुस्तक लिहिताना बरीच उपयोगी पडली आहे, असं ते वाचताना जाणवतं. भरपूर तपशील त्यांनी गोळा केला आहे . अमेरिका आणि भारताचा दीर्घ दौरा केला. अनेक जणांना भेटल्या. अमेरिकेचे अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यातील पत्रव्यवहार अभ्यासला. राजनैतिक अधिकाऱ्यांची कागदपत्रेही नजरेखालून घातली. या विस्तृत अभ्यासमंथनातून जे गवसलं, ते वाचकांपुढे मांडलं. परिश्रमपूर्वक उत्ख्नननानंतर सोनं गवसावं तसं.

जागतिक राजकारणात कोणते  घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात,  त्याच्या मुळाशी कोणते तत्त्व असते, याचा ऊहापोह करीत मीनाक्षी यांनी अमेरिका-भारत-पाकिस्तान या त्रिपेडी संबंधांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. संबंधित देशांच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये शीतयुद्धाचा प्रभाव कसा होता हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यावेळी नव्याने साकारत असलेला अमेरिका-चीन हा नवा कोन हाही निर्णयप्रक्रियेवर कसा प्रभाव पाडत होता,याकडं लक्ष वेधलं आहे. हे करत असताना तत्कालीन जागतिक परिस्थितीचे संदर्भ त्या नेमकेपणानं देतात. कोरिया, कंबोडिया, व्हिएतनाम येथील संघर्ष ,हंगेरी आणि अफगाणिस्तानातील रशियाचे आक्रमण क्युबातील पेच, बांगला  देशात स्वातंत्र्यासाठी झालेला उठाव, स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती, त्याला असलेला अमेरिकेचा विरोध आणि त्यापायी भारताला धमकावण्यासाठी अमेरिकेने धाडलेले सातवे आरमार हे सगळे वातावरण वाचकांच्या डोळ्यापुढे उभे करत वाचकाचा या विषयातील आवाका वाढवण्याचा लेखिका प्रयत्न करते. भारताच्या सरहद्दीवर संघर्ष निर्माण करावा म्हणून अमेरिका त्यावेळी चीनला चिथावण्याचा कसा प्रयत्न करीत होती, याचीही कल्पना या विवेचनातून येते.   

या घटनांबरोबरच ज्या व्यक्ती जागतिक राजकारण आणि सत्तासंघर्षाच्या या  महानाट्याचा भाग होत्या, त्यांचंही यथातथ्य चित्रण यात आहे. गालब्रेथ, डॅनियल मॉयनिहन, चेस्टर बोल्स ,गालब्रेथ यांच्यासारखे राजदूत, ट्रुमन, आयसेनहॉवर ,केनेडी, जॉन्सन, निक्सन, फोर्ड, कार्टर हे अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर, करिष्मा असलेले पण भाबडे नेहरू या सगळ्या व्यक्ती आणि त्यांची वैशिष्ट्ये लिखाणाच्या ओघात उलगडली जातात. भारताच्या पंतप्रधानांचेही नेमके मूल्यमापन यात केले आहे. अमेरिकेविषयी काही चुकीच्या धारणा बाळगणारे नेहरू, संबंध सुधारण्याचा प्रयत्न करू इच्छिणारे पण त्याआधीच निवर्तलेले लालबहादूर शास्त्री, अमेरिकेकडून अपमानित झाल्याची बोच लागून राहिलेल्या इंदिरा गांधी, अमेरिकेकडे झुकू पाहणारे पण आघाडीच्या राजकारणाला येणाऱ्या मर्यादांमुळे काही ठोस घडवू न शकलेले मोरारजीभाई या सगळ्यांची कहाणी हे पुस्तक सांगते.

निव्वळ अभ्यासात्मक आढावा असा दृष्टीकोन बाळगून आंतरराष्ट्रीय संबंधांचा घेतलेला लेखाजोखा असं याचं स्वरूप नाही. आण्विक युद्धाची उग्रभीषण सावली,  विविध ठिकाणी झालेली क्रांती, जगातील नेतृत्वात या काळात होत असणारे खांदेपालट, लंडनकडून  वॉशिंग्टनकडे होत असलेले सत्तेचे स्थानांतरण हे सगळे जागतिक प्रवाह लेखिकेने टिपले आहेत. आजी,माजी आणि भावी राजदूत, दावोसच्या उच्चभ्रू वर्तुळात वावरणारे तज्ञ, अधिकारी , परदेशातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या सगळ्यांनी वाचायलाच हवं, असं हे पुस्तक आहे.     

माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे `डार्टमाउथ`शिक्षित आणि `रॉयल नेव्ही`त  घडलेले माझे वडील रशियाबरोबरच्या मैत्रीविषयी एवढा उत्साह का दाखवत होते, याचे उत्तर पुस्तक वाचल्यानंतर सहजच मिळून गेले ! कारण शेवटी महत्त्वाचा प्रश्न असतो तो ‘विश्वासा’ चा.

(लेखक जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन करणाऱ्या ‘टीमवर्क्स आर्टस्‌’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com