रायगडासंबंधीचा शिलालेख असाही!

दुर्गराज रायगडावर असलेले शिलालेख आपल्याला माहीत असतात. गडावर मंदिराजवळचा संस्कृतमधला शिलालेख आपण बघितलेला असतो.
Raigad Inscription
Raigad InscriptionSakal
Summary

दुर्गराज रायगडावर असलेले शिलालेख आपल्याला माहीत असतात. गडावर मंदिराजवळचा संस्कृतमधला शिलालेख आपण बघितलेला असतो.

दुर्गराज रायगडावर असलेले शिलालेख आपल्याला माहीत असतात. गडावर मंदिराजवळचा संस्कृतमधला शिलालेख आपण बघितलेला असतो. पायरीवरचा ‘सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर’ हा शिलालेख आपण वाचलेला असतो. आज जाणून घेऊयात आणखी एका शिलालेखाबद्दल - जो फारसी भाषेत आहे; पण ज्याबद्दल फारशी कुणास माहिती नाही - जो रायगडाबद्दलचा आहे आणि जो रायगडावर बसवायचा होता - पण ते झालं नाही. काय लिहिलं आहे त्या शिलालेखात? हे समजून घ्यायच्या आधी त्यावेळचा घटनाक्रम बघूयात.

औरंगजेबाची दख्खन दिग्विजय मोहीम जोरात सुरू होती. २५ मार्च १६८९ रोजी इतिकदखानाचा वेढा रायगडाभोवती पडायला सुरुवात झाली. सुमारे सात-सव्वासात महिने किल्लेदार चांगोजी काटकर आणि सोबत येसाजी कंकांनी तो लढवला. पण, पुढे ३ नोव्हेंबर १६८९ रोजी इतिकदखानाने रायगड जिंकला. रायगड जिंकल्यावर सूरसिंग ह्याची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली. गडाखाली पाचाडची व्यवस्था फत्तेजंगखान पाहू लागला, तर रायगडवाडीची व्यवस्था खैर्यतखान पाहू लागला.

जिंकलेल्या किल्ल्यांची नामांतरं करणं हा किल्ला जिंकल्यानंतरचा एक मुख्य प्रघात होता. सिंहगड (बक्षिंदाबक्ष), राजगड (शहानबीगड), तोरणा (फुतुहुल्घैब), विशाळगड (सक्करलाना) वगैरेंची नावं बदलल्यानंतर रायगडाचं नाव करायचं ठरलं ‘इस्लामगड’. ह्या नावाचा शिलालेख कोरायची आज्ञा झाली. सोबतच्या फोटोत तो पहाता येईल.

शिलालेखावर फारसीत लिहिलंय -

‘बा अहदे शाहे आलमगीर गाजी सिकंदर शान हाजी अब्दुर्रज्जाक दिझी दर उर्फे राहिरी बिना कर्द के शुद इस्लामगड मशहुरे अफाक जे मुअजिज कर्दम इस्तफ सारे तारीख कलम बिगिरफ्त आँ फरजान-ए-ताक बि गुत्फा बहरे याजूजे हवादिश बगो सद्दे नवी बर वस्ता रजाक’

भावार्थ : ‘विजेत्या सिकंदराप्रमाणे मदत करणाऱ्या मुहियुद्दीन आलमगिराच्या राजवटीत, पूर्वी रायरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्याचा पाया घातला गेला तेव्हा तो आता दाही दिशांत इस्लामगड नावाने ओळखला जाऊ लागला. दिनांकाबद्दल विचारलं, जो हुशार आहे, त्याने हातात लेखणी घेऊन सांगितलं की, एवढ्या संकटात असताना हे बांधकाम झालं, ते रज्जाकने (परमेश्वराने किंवा अब्दुर्रझाक ह्या व्यक्तीने!) हिजरी सन ११०७ मध्ये केलं.’

हिजरी ११०७ म्हणजे साधारण १६९५ चा सुमार. पण, हा शिलालेख गडावर कधी बसवला गेला किंवा नाही याची नोंद नाही. बराच काळ तो पाचाडात भंगलेल्या अवस्थेत पडलेला होता. तिथून पुढे तो कुठे गायब झाला हेही माहीत नाही.

अनेक गोष्टी स्वतः न बांधता फक्त त्यावर शिलालेख बसवून टाकायचा आणि त्याच्या निर्मितीचं श्रेय स्वतःकडे घ्यायचं हा मुघलांचा आवडता छंद होता. कालांतराने लोकांना खऱ्या गोष्टींचा विसर पडतो. मग पुढच्या पिढ्यांमधले मुघलधार्जिणे ‘धडाडीचे इतिहास संशोधक’ ह्याच बनवेगिरीला ‘अस्सल’ पुरावा मानतात आणि तेच सत्य म्हणून जनमानसात पसरवून देतात. आपलं नशीब की, हा शिलालेख रायगडावर बसवला गेला नव्हता, नाहीतर रायगड - नव्हे याचं नाव ‘इस्लामगड’च म्हणा - आणि तो औरंगजेबाने बांधला म्हणून ‘पुरावा’ दाखवणाऱ्यांचीही काही कमी नसती!

यातून आपण काय शिकायचं ते ज्या त्या नेत्याने आपापलं ठरवावं. आपण सगळे सुज्ञ आहोतच. इत्यलम्!

टीप : आता ह्या फोटोविषयी. ह्या शिलालेखाचा फोटो आणि माहिती मला कै. वासुदेव शंकर गोडबोलेंच्या कागदपत्रांत मिळाली. हा फोटो छापील वाटतोय, त्यामुळे प्रकाशित असावा. फोटोचा मूळ स्रोत मलाही माहीत नाही. १९९२ या वर्षानंतर तो शिलालेख पाचाडमध्ये नसल्याची नोंदही त्यांनी त्यांच्या कागदपत्रांत करून ठेवलेली आहे. असाच एक फोटो प्र. के. घाणेकरांच्या ‘दुर्गदुर्गेश्वर रायगड’ पुस्तकात आहे. त्यातील ऋणनिर्देश निनादराव बेडेकर आणि जगन्नाथराव चव्हाणांचा आहे. हा तोच फोटोही असू शकतो. त्यात दिलेलं मराठी भाषांतरही गोडबोल्यांच्या नोट्सशी जुळतंय. कदाचित एकच स्रोत असावा. मला निश्चित सांगता येत नाही. घाणेकरांच्या पुस्तकात ही माहिती शोधून ती पुरवल्याबद्दल आमचे मित्र तुषार मानेंचे खास आभार!

(सदराचे लेखक लंडनस्थित असून इतिहासाचे अभ्यासक व अर्थशास्त्राचे जाणकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com