चांगल्या कागदाचा जनक!

जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये फिल्टरिंग वगैरेसाठी ‘व्हॉटमन’ कागद आजही बऱ्याच ठिकाणी वापरला जातो; पण त्याची सुरुवात कशी आणि कुठून झाली, त्याच्या इतिहासाबद्दल थोडंसं.
vartman paper
vartman papersakal
Summary

जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये फिल्टरिंग वगैरेसाठी ‘व्हॉटमन’ कागद आजही बऱ्याच ठिकाणी वापरला जातो; पण त्याची सुरुवात कशी आणि कुठून झाली, त्याच्या इतिहासाबद्दल थोडंसं.

जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये फिल्टरिंग वगैरेसाठी ‘व्हॉटमन’ कागद आजही बऱ्याच ठिकाणी वापरला जातो; पण त्याची सुरुवात कशी आणि कुठून झाली, त्याच्या इतिहासाबद्दल थोडंसं.

‘व्हॉटमन’ कागद बनवणाऱ्या जेम्स व्हॉटमनचा जन्म १७०२ मध्ये इंग्लंडमध्ये केंट इथं झाला. केंटमधल्याच ‘टर्की मिल’ इथं तो कागद बनवायला शिकला. पुढं १७३३ मध्ये जेम्सने ‘ओल्ड मिल हॉलिंगबर्न’ इथं स्वतःचा कागद बनवायचा कारखाना काढला; पण तो काही खास चालला नाही. जेम्स जिथं कागद बनवायला शिकला, त्या ‘टर्की मिल’चे मालक होते हॅरिस कुटुंब. हॅरिस आणि व्हॉटमन कुटुंबांचा पूर्वीपासून घरोबा होता. १७४० मध्ये रिचर्ड हॅरिसचा मृत्यू झाल्यावर जेम्सने ॲना हॅरिसशी लग्न केलं आणि ‘टर्की मिल’ त्याच्या मालकीची झाली.

आता त्या वेळी इंग्लंडमधली परिस्थिती काय होती हे पाहूयात. इंग्लंड आपला बराचसा कागद त्या वेळी फ्रान्स आणि हॉलंडमधून आयात करत असे. त्याकाळात कागद हाताने बनवत असत. धातूच्या तारांच्या मोल्डवर कागदाचा लगदा हाताने टाकून त्याचा कागद बनत असे. या कागदाला ‘लेड पेपर’ (Laid Paper) म्हणत असत. तारांच्या मोल्डमुळे या कागदावर त्या तारांचे छाप येत असत. हा कागद वापरायलापण बराच खरखरीत असे. मशिन प्रिंटिंगमध्ये नवनवीन शोध लागत होते; पण कागद बनवायच्या पद्धतीत म्हणावी तशी सुधारणा होत नव्हती. नेमक्या याच गोष्टीसाठी जेम्स व्हॉटमन प्रयत्नशील होता. लेड कागदाऐवजी दुसरा चांगल्या प्रतीचा कागद बनवायचा तो सतत प्रयत्न करत होता. १७५४ ते १७५७ च्या दरम्यान विल्यम बॅस्करव्हील नावाच्या एका माणसाच्या प्रेरणेने त्याने कागद बनवायची एक नवीन पद्धत शोधून काढली. या पद्धतीत तारांचे मोल्ड अजिबात वापरले नव्हते. त्याऐवजी त्याने एक पटल (स्क्रीन) वापरलं होतं, ज्यायोगे कागदाच्या लगद्यावर कोणत्याही प्रकारे तारांचे छाप उठणार नव्हते. सुबक आणि चांगल्या प्रतीचा कागद मशिनने मोठ्या प्रमाणात बनवता येणार होता. या नवीन पद्धतीने बनवलेल्या कागदाला त्याने नाव दिलं ‘वोव्ह पेपर’ (Wove Paper).

या नवीन वोव्ह कागदाला सगळीकडून भरपूर मागणी येऊ लागली. जेम्स व्हॉटमनची मिल हे कागद अत्युत्कृष्ट बनवत असे, त्यामुळे त्याचं नाव उत्तम प्रतीच्या कागदासाठी जगभरात प्रसिद्ध झालं. याचवेळी ईस्ट इंडिया कंपनीने आपले हातपाय भारतात पसरायला सुरुवात केलेली होती. कंपनीचं कामकाज आणि पत्रव्यवहार करण्यासाठी त्यांना भरपूर कागद लागत असे. सुरुवातीला ते फ्रेंचांकडून कागद विकत घेत असत; पण नंतर ‘स्वदेशी’ आणि उच्च प्रतीचा कागद खुद्द इंग्लंडमध्ये तयार होऊ लागल्याने त्यांनी जेम्स व्हॉटमनच्या कंपनीला त्याचं कंत्राट देऊन टाकलं. जेम्स व्हॉटमनची कंपनी त्यांच्या नावाचा ‘वॉटरमार्क’ असणारा खास कागद बनवत असे. ईस्ट इंडिया कंपनीच्या कागदपत्रांसाठी तर ते विशेष कागद बनवत असत - ज्यावर कंपनीचा लोगो, जेम्स व्हॉटमनचा लोगो आणि ज्या वर्षी तो कागद बनवला, ते वर्ष असे. हे खास वॉटरमार्क असणारे कागद जेम्स व्हॉटमन फक्त कंपनीसाठी बनवत असल्याने नकली कागदपत्रांना बऱ्याच अंशी आळा बसला होता. आधी ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश सरकार या दोघांनी दीडशेपेक्षा जास्त वर्षं जगभरात जेम्स व्हॉटमनने बनवलेला हा खास कागद वापरला आहे. जेम्स व्हॉटमनने शोधलेली ही कागद बनवायची पद्धत इतकी आधुनिक होती की, आजही जगातला ९९ टक्के कागद हा वोव्ह कागद पद्धतीने बनतो (उरलेला एक टक्का हा काही खास कारणांसाठीच फक्त वेगळ्या विशेष पद्धतींनी बनवतात), यावरून त्या पद्धतीची गुणवत्ता लक्षात यावी!

ब्रिटिश लायब्ररीत असलेल्या एका व्हॉटमन कागदाचा वॉटरमार्क दिसण्यासाठी काढलेला हा खास फोटो सोबत दिलेला आहे. यातल्या वेगळ्या प्रकाशयोजनेमुळे कागदाचा मूळ रंग दिसत नसून, वॉटरमार्क दिसावा हा उद्देश आहे. बदामाच्या आकारात आतमध्ये लिहिलेले VEIC आणि वर ४ हा युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी (V)nited (E)ast (I)ndia (C)ompany] चा वॉटरमार्क आहे. जुन्या इंग्रजीत U हे मुळाक्षर V सारखं लिहीत असत म्हणून V. वर दिसणारा ४ हा आकडा हे ख्रिश्चन चिन्ह आहे. हे ख्रिश्चन चिन्ह कसं काय? तर ''Christus'' हे ग्रीकमध्ये लिहिताना त्याची ग्रीक अद्याक्षरं -----‘ची’----- आणि -----‘रो’----- एकत्र केल्यास ४ सारखं दिसतं आणि म्हणून ते कंपनीच्या ट्रेडमार्कवर वापरलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनीचं अगदी सुरुवातीचं ब्रीदवाक्य होतं, ‘DEO DUCENTE NIL NOCET’ - म्हणजे ‘जेव्हा देव रस्ता दाखवतो तेव्हा कसलेही अडथळे येत नाहीत’ - किती ‘देवताधिष्ठित’ होती कंपनी पहा. त्याखाली J WHATMAN हा जेम्स व्हॉटमनचा वॉटरमार्क आणि त्याखाली ‘१८२३’ (हा कागद १८२३ मधला आहे हे दाखविणारा आकडा) आहे.

आता शेवटचा प्रश्न की, काय लिहिलंय या १८२३ च्या कागदावर? होय, हा कागद मराठा इतिहासाशीच संबंधित आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांनी १८१८ मध्ये पकडलं. १८१९ मध्ये कलकत्त्यात चौकशी पूर्ण होऊन त्यांना चुनारच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवलेलं होतं. ९ मे १८२३ ला बंगालला पाठवलेल्या या वृत्तांतात (बनारसमधल्या एजंटने) लिहिलेलं आहे की, ‘...१४ एप्रिलला आम्ही तुमच्याकडे त्रिंबकजी डेंगळ्यांनी लिहिलेला सुटकेचा अर्ज पाठवला होता, जो स्पष्ट कारणांमुळे नाकारला गेला. बंदी (त्रिंबकजी) तुरुंगावरच्या पहारेकऱ्यांशी संगनमत करून काहीतरी संधान साधायच्या तयारीत आहे.’ एजंटाला ह्याबाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी त्याच वेळी बोलावणं पाठविलेलं आहे.

(सदराचे लेखक इतिहासाचे लंडनस्थित अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com