लोकहिताच्या राजकारणाची संघर्षकथा (संतोष शेणई)

संतोष शेणई
रविवार, 21 एप्रिल 2019

लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई संपतराव पवार यांनी सांगली जिल्ह्यात स्वकर्तृत्वानं समोर ठेवलं आहे. प्राधान्यानं पाण्याच्या समस्येवर शाश्वत उपायांची उदाहरणं समोर ठेवणाऱ्या या लोकसेवकाचं "मी लोकांचा सांगाती' हे आत्मचरित्र महाराष्ट्राला विचारप्रवृत्त करणारं आहे.

लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई संपतराव पवार यांनी सांगली जिल्ह्यात स्वकर्तृत्वानं समोर ठेवलं आहे. प्राधान्यानं पाण्याच्या समस्येवर शाश्वत उपायांची उदाहरणं समोर ठेवणाऱ्या या लोकसेवकाचं "मी लोकांचा सांगाती' हे आत्मचरित्र महाराष्ट्राला विचारप्रवृत्त करणारं आहे. विद्यार्थिदशेपासून गेली तब्बल पाच तपं शेतकऱ्यांचा निर्भीड वाली आणि खंबीर वकील म्हणून सातत्यानं संघर्षरत असलेल्या संपतरावांचं हे आत्मकथन अनेक प्रश्‍न आपल्यासमोर ठेवत असल्यानं, लोकहिताच्या राजकारणाच्या अपयशाची मुळं कशात आहे, हे सुचवत असल्यानं, राजकीय पक्षांचं भूमीपासूनचं तुटणं अधोरेखित करत असल्यानं लक्षवेधी ठरतं.

खरं तर संपतरावांचं कार्य मोठं आणि मोलाचं आहे; पण ते फार प्रसार पावलेलं नाही. दुष्काळ, नापिकी, पाण्याची कमतरता, वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न अशा समस्यांवर शाश्वत उपायाची उदाहरणं संपतरावांनी आपल्या समोर ठेवली आहेत. सांगली परिसरात या कार्याचा बोलबाला असला, तरी इतकं मोठं कार्य महाराष्ट्राच्या नजरेत भरेल असं पुढं आलेलं नाही. लोकचळवळीतल्या कार्यकर्त्यांना या कामाची माहिती जरूर होती; पण महाराष्ट्रातल्या आम जनतेसमोर ते प्रथमच या पुस्तकाच्या रूपानं आलं. या पुढच्या काळात या कार्याचं मोल वाढत जाणारं असल्यानं या पुस्तकाला अधिक महत्त्व आहे. एकूण सहा प्रकरणांत विभागलेलं हे लेखन एका अंत:सूत्रात बांधलेलं आहे. शेतीचं अर्थशास्त्र, चारा-पाण्याचं न्याय्य नियोजन, गावकीचे तिढे, प्रस्थापितांचे मुखवटे, धनदांडग्यांची सत्तालोलुपता, पुढाऱ्यांची दिखाऊगिरी, प्रशासनांची ढिम्म वृत्ती, तत्त्वनिष्ठा गुंडाळून रंग बदलणारे पक्षश्रेष्ठी, दुष्काळामुळे होणारी गुराढोरांची परवड असा ग्रामीण भारत या पुस्तकातून आपल्यासमोर उभा राहतो.

संपतराव मुळात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते. तिशी उलटण्याआधी त्यांनी पक्षातर्फे विधानसभेची निवडणूकही एकदा लढवली होती; पण त्यांची नाळ लोकचळवळीत गुंतलेली होती. खरं तर त्यांच्या पक्षानं लोकप्रश्न हातात घ्यायला हवे होते. ग्रामीण भागात समाजवादी विचार नेण्याचा या पक्षाचा विचार होता; पण ते प्रत्यक्षात घडलं नाहीच, उलट संपतरावांनी हाती घेतलेल्या प्रश्नांनाही पक्षीय पाठबळ मिळालं नाही. लोकचळवळींच्या अयशस्वी प्रयत्नांची कारणं शोधताना या पक्षीय भूमिकांचा विचार करावा लागेल. संपतराव थांबले नाहीत. ते शाश्वत विकासाच्या पर्यायांची मालिका उभी करून युवकांना विकासकार्यात गुंतवत राहिले. त्यांचे हे कार्य कष्टप्रद होते. त्यासाठी मान, अपमान स्वीकारावे लागत होते, खांद्याला झोळी बांधून फिरावं लागत होतं आणि आपल्या कार्याचं श्रेय हे तुमचंच आहे, तुम्ही लोक एकत्र आला म्हणून हे घडू शकलं असं सांगून लोकसहभाग वाढवत पुढं जावं लागत होतं. संपतरावांनी हे कसं साधलं याची ही कथा आहे.

सत्तरच्या दशकातल्या दुष्काळांमुळे महाराष्ट्रात अनेक प्रयोग झाले. त्यातलाच एक बळीराजा धरण हा समान पाणीवाटपाचा प्रयोग होता. संपतराव पवार या धरणाच्या कामातून समाजापुढे आले. शासकीय मदतीविना लोकशक्तीच्या बळावर धरण बांधण्याचं कार्य संपतरावांनी केलं. दुष्काळाचं आव्हान पेलण्यासाठी सुकाळी आणि कमी पावसाच्या भागात विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वैरण उत्पादन, दुष्काळी शेतकऱ्यांची जनावरं सुकाळी शेतकऱ्यांना संकटकाळापुरती दत्तक देऊन जगवणं, "मैत्र जिवा चारा' अशा प्रयोगांनी संपतरावांनी सरकारवर अवलंबून न राहता, लोकांनी स्वत:च स्वत:च्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचे यशस्वी पर्याय पुढं ठेवले. उपसा जलसिंचनच्या कोटयवधीच्या खर्चाला आणि अवैज्ञानिक सरकारी उपक्रमांना पर्याय म्हणून त्यांनी दुष्काळी भागात बंधाऱ्यांची माळ लावली. कालौघात लुप्त झालेल्या अग्रणी नदीवर काठाच्याच दुष्काळी शेतकऱ्यांना राबायला लावून सरकारी खर्चाच्या तरतुदीच्या निम्म्याहून निम्म्या इतक्‍या कमी स्वखर्चात जनतेनं उभारलेल्या या बंधाऱ्यांनी शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर संपलाच; पण लुप्त झालेली अग्रणी नदी जिवंत झाली. शिराळ्यात पावसाची मुसळधार वाहून जात होती. पेठ गावात जुन्या टायरपासून बंधारा बांधून तिळगंगा नदीही जिवंत केली. दुष्काळी हिवतडसारख्या कुठूनच पाणी मिळणार नाही अशा गावात फक्त बावीस हजार लिटर पाण्याच्या साठ्‌यावर वर्षभर डाळींब बाग जगवण्याचा प्रयोग यशस्वी करतात. पंधरा हजारांत वर्षभर राबणाऱ्या रामोशी कुटुंबांना स्वत:च्या शेतीत बागायतदार बनवतात. टेंडरधार्जिण्या शासनाला लाजवणारे हे सारे प्रयोग आहेत. ते केवळ वाचण्यासाठी नाहीत, तर राज्यातल्या विविध प्रदेशांच्या गरजेनुसार धोरण म्हणून या प्रयोगांची अंमलबजावणी झाली पाहिजे; पण या लोकचळवळीला पक्षीय आणि सरकारी पातळीवर धोरणात्मक पाठिंबा का मिळाला नाही, याचा विचार झाला पाहिजे.
या पुस्तकात एन. डी. पाटील, अप्पासाहेब शिंदे, मुकुंदराव किर्लोस्कर, भारत पाटणकर, बाबुराव गुरव, आई-वडील यांची संपतरावांनी चितारलेली चित्रं सूक्ष्मतेनं काही वेगळं सुचवणारी आहेत. शासन-प्रशासनातल्या भल्याबुऱ्या घटना-प्रसंगांचं रोखठोक वर्णन, विश्‍लेषण मोठं मार्मिक आणि समतोल आहे. भारतीय आणि जागतिक राजकारणातले संपतरावांनी दिलेले संदर्भ यातून त्यांचा अभ्यासूपणा दिसतो. या कहाणीचं, त्यांच्या जगण्याचं एक सूत्र त्यांनी प्रस्तावनेत सांगितलं आहे : "राबणाऱ्यांचे गर्वगीत मी गात राहिलो आणि महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात जगाकडे पाठ करून काम करत राहिलो.'

आता, या कार्यकथनानं समोर ठेवलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करण्याची आणि राजकारणाला पुन्हा लोकचळवळीचं अधिष्ठान मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे.

पुस्तकाचं नाव : मी लोकांचा सांगाती
लेखक : भाई संपतराव पवार
प्रकाशक : समकालीन प्रकाशन, पुणे (020-24470896)
पानं : 192, किंमत : 250 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh shenai write book review in saptarang