
आधुनिक अशा म्हणजे सोशल मिडीयाच्या काळात पॉडकास्ट हे संपर्काचं महत्वाचं साधन झालंय. कॅलिफोर्नियातल्या एका तरुणानं केवळ मराठी भाषेचं पॉडकास्ट सुरू करून त्यावरून विधायक आणि रचनात्मक काम करणाऱ्या मंडळींची माहिती जगभर पोहचवली. तीन वर्षात या पॉडकास्टनं पन्नाशीचा टप्पा गाठलाय. पॉडकास्टचा चाहता ते निर्माता असा प्रवास करत ‘विश्वसंवाद’ करणाऱ्या या उपक्रमावषयी...
आधुनिक अशा म्हणजे सोशल मिडीयाच्या काळात पॉडकास्ट हे संपर्काचं महत्वाचं साधन झालंय. कॅलिफोर्नियातल्या एका तरुणानं केवळ मराठी भाषेचं पॉडकास्ट सुरू करून त्यावरून विधायक आणि रचनात्मक काम करणाऱ्या मंडळींची माहिती जगभर पोहचवली. तीन वर्षात या पॉडकास्टनं पन्नाशीचा टप्पा गाठलाय. पॉडकास्टचा चाहता ते निर्माता असा प्रवास करत ‘विश्वसंवाद’ करणाऱ्या या उपक्रमावषयी...
काही काही माणसं अशी असतात की जी कधी स्वस्थ बसू शकत नाहीत. नेहेमी नवनवीन शिकायची, निर्माण करायची, काही घडवायची उर्मी आणि ऊर्जा त्यांच्यात असते. एखाद्या कामाचा त्यांनी ध्यास घेणं आणि त्यात स्वतःला झोकून देणं हे पाहून आपल्याला अचंबित व्हायला होतं. आमचा मित्र मंदार कुलकर्णी अशा मंडळींपेकी एक ! या माणसाची नवीन शिकण्याची, प्रयोग करण्याची, एखाद्या कामात स्वतःला आणि आपल्या बरोबरीनं अजून चार लोकांना सामील करुन घेऊन नेटानं वाटचाल करण्याची वृत्ती आणि क्षमता पाहून थक्क व्हायला होतं. मंदारनं आजवर केलेल्या प्रयोगांची, यशस्वी प्रकल्पाची यादी मोठी आहे, पण या यादीतला एक महत्त्वाचं आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तो म्हणजे त्यानं सुरु केलेला ‘ विश्वसंवाद’ हा मराठी भाषेतला पहिला पॉडकास्ट ! २०१७ मध्ये वर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थातच १ जानेवारीला सुरु झालेल्या या पॉडकास्टचा पन्नासावा एपिसोड नुकताच या वर्षी ३० जुलैला म्हणजे रविवारी प्रसारित झाला. हा प्रवास सोपा नव्हता.
आमचा हा मित्र मंदार गेली तेवीस वर्षे अमेरिकेत, कॅलिफोर्निया इथं वास्तव्य करतोय. पण हा आहे जगमित्र! भौगोलिक ठिकाण, अंतरं, वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे टाईमझोन या गोष्टी मंदारला जगभरातल्या विविध लोकांशी मैत्री करण्यापासून, नातं जोडण्यापासून, संवाद साधण्यापासून रोखू शकलेल्या नाहीत. त्याच्या पॉडकास्टचं ‘विश्वसंवाद’ हे नावच याची ग्वाही द्यायला पुरेसं आहे. ‘विश्वसंवाद ’ बद्दल लिहिताना मुळात ‘पॉडकास्ट’ म्हणजे काय, त्याची सुरुवात कधी, कशी झाली, ही पार्श्वभूमी जाणून घेणं मनोरंजक ठरेल. त्याचबरोबर मंदार या सरधोपट रस्त्यापेक्षा वेगळ्या वाटेकडं कसा वळला' या प्रश्नाचं उत्तर देखील सामावलेलं आहे.
अॅडम करी (Adam Curry) हे एमटीव्हीवरचे व्हिडीओ जॉकी आणि डेव्ह वायनर ( Dave Winer) हे सॉफ्टवेअर डेव्हलपर यांनी २००४ मध्ये पॉडकास्टींग या माध्यमाचा पाया घातला. मात्र, त्याच वर्षी ‘पॉडकास्टींग’ हा शब्द एका पत्रकारानं पहिल्यांदा वापरला. आता, या वर्षी एप्रिलमध्ये केलेल्या पाहणीनुसार एक दशलक्षहून अधिक वेगवेगळे पॉडकास्टस उपलब्ध आहेत आणि त्यांच्या एपिसोडसची संख्या दशलक्षांहून अधिक आहे. विषयांचं वैविध्य आणि आपल्याला रुचेल त्या क्षेत्रातील माहिती/चर्चा हव्या त्या वेळी ऐकू शकण्याचा सोयीस्करपणा त्यामुळे ते अतिशय वेगानं आवडतं असं समाजमाध्यम झालं आहे.
मंदारची पॉडकास्टच्या जगाशी ओळख झाली ती २०१४ मध्ये. त्यानं ऐकलेला पहिला पॉडकास्ट होता, सारा कोनिग या अमेरिकन महिला पत्रकर्तीनं सादर केलेला. सत्य घटनेवर हा पॉडकास्ट आधारलेला होता. तेव्हापासून पॉडकास्ट या माध्यमानं, त्यात सादर केल्या जाणाऱ्या विविध विषयांनी मंदारचं लक्ष वेधून घेतलं आणि दर आठवड्याला विविध विषयांवरचे आठ ते दहा वेगवेगळे पॉडकास्टस तो ऐकायला लागला. मोबाईल फोनवरून, आणि इंटरनेटवरूनही, कधीही, कुठेही ऐकता येणारं हे माध्यम. त्याचा अनुभव घेत असतानाच, आपल्या मराठी भाषेमध्ये असं काही पॉडकास्टस कोणी केलं आहे का, याचा इंटरनेटवर शोध घेतल्यानंतर त्याचं उत्तर ‘नाही’ असंच आलं. मग वाटलं की आपणच जर असं काही मराठीमध्ये करायचा प्रयत्न करुन पाहिला तर ? स्वतः पॉडकास्ट करण्याचा विचार मनात आल्यावर त्या दृष्टीनं पॉडकास्टींगसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींचा शोध घ्यायला त्यानं सुरुवात केली. ऑडिओ- व्हिडिओ क्षेत्रात तीस वर्षांहून जास्त अनुभव असलेले त्याचे मित्र अतुल वैद्य यांच्याशी त्यानं अनेक वेळा चर्चा केल्या. २०१६ हे वर्ष अनेक गोष्टी करून बघण्यात आणि आपल्याला नेमकं काय करता येईल, हे ठरवण्यात गेलं.
अतुल वैद्य यांच्या ई-प्रसारण म्हणजे इंटरनेट रेडिओसाठी कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव मंदारजवळ होता. मात्र, या पॉडकास्टसाठी प्रसिद्ध नसलेले पण नेहमीपेक्षा आगळं-वेगळं काही तरी करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घ्याव्या असा विचार त्याच्या मनात पक्का झाला. हा पॉडकास्ट मराठीतूनच करायचा, असं ठरवलं असल्यानं पाहुण्यांची निवड करताना त्यांना मराठी बोलता येणं हा निकष आपोआपच ठरला. इंटरनेटमुळं जगात कुठंही बसलेल्या पाहुण्यांशी बोलता येणार होतं आणि त्यातूनच ‘विश्वसंवाद’ हे नाव सुचलं.
समाजात अनेकजण विधायक बदल करण्यासाठी सिद्ध झालेले असतात. काहीजण एखादं वेड, कशाचा तरी ध्यास मनात घेऊन त्याचा पाठपुरावा करत राहतात. अनेकदा अशा व्यक्ती प्रसिद्धीपासून लांब असतात आणि स्वतःच्या कृतीबद्दल त्यांना कोणताच अभिनिवेश नसतो. अशा व्यक्तीच्या अंतःप्रेरणेचा शोध घेण्याचा, त्यांच्या कलागुणांना, किंवा प्रयत्नांना व्यासपीठ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मंदार त्याच्या ‘विश्वसंवाद’ या पॉडकास्टद्वारे करतो. अर्थातच हा सगळा त्याचा ‘स्वान्तसुखाय’ उपद् व्याप आहे कारण या सगळ्यांतून त्याला स्वतःला काहीही आर्थिक लाभ नाही. किंबहुना पॉडकास्टच्या तांत्रिक बाबींसाठी तो स्वतःचे पदरचेच पैसे खर्च करतो. सर्वसामान्य मराठी व्यक्तींना जागतिक व्यासपीठ देण्यासाठी पॉडकास्टसारख्या आधुनिक माध्यमाचा वापर करणारा हा एक महत्त्वाचा उपक्रम. मंदारचा हा प्रयत्न गेली साडेतीन वर्ष सातत्याने सुरु आहे.
केवळ ‘ पॉडकास्ट ऐकणारा एक श्रोता’ आणि ‘पहिला मराठी पॉडकास्ट सुरु करण्याचं स्वप्न’ या भांडवलावर मंदारनं स्वतःचा पॉडकास्ट करायला सुरुवात केली. त्यामुळं अर्थातच ‘पॉडकास्ट ऐकणं ’ सोडून कोणतीही तांत्रिक बाब त्याला माहिती नव्हती. पण कुतूहल, चिकाटी आणि अखंड शिकण्याची तयारी या सगळ्यांतून त्यानं ‘पॉडकास्टचं तंत्र’ आत्मसात केलं. पॉडकास्टवरच्या एका मुलाखतीसाठी काय - काय करावं लागतं ? आधी पॉडकास्टवर मुलाखत घेण्यासाठी योग्य पाहुणे शोधणं, त्यांना या नवीन माध्यमाचा परिचय करून देणं, त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत त्यांचा परिचय, त्यांच्या कामाची माहिती करून घेणं ही सगळी कामं सुरुवातीला होतात. मुलाखतीसाठी प्रश्न काढणं, मुलाखतीचं आयोजन करताना अमेरिकन टाईमझोन आणि पाहुण्यांचा टाईमझोन यांचा मेळ घालणं आणि प्रत्यक्ष मुलाखत रेकॉर्ड करणं हा दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यात ऑडिओ एडिटींग आणि ऑडिओ प्रोसेसिंग होतं आणि शेवटी ही मुलाखत प्रसारित करून त्याबद्दल सोशल मीडियामध्ये लिहिणं हा चौथा टप्पा. एकानंतर एक कामांची न संपणारी यादी... पण स्वतःची पूर्णवेळाची नोकरी सांभाळून तो हा सगळा व्याप सांभाळत असतो. न कंटाळता, तक्रार न करता, हसत हसत, आवडीनं !
‘विश्वसंवाद’ हा त्या अर्थी एकखांबी तंबूच म्हणायला हवा. इतकं सगळं काम करायला ऊर्जा कुठून येते असा प्रश्न आम्हा मित्रमंडळींना अनेकदा पडतो आणि मंदारकडं पाहूनच, त्याच्या स्वभावातून आम्हाला त्याचं उत्तरही मिळतं. ते असं, की मंदार हा माणसात रमणारा माणूस आहे. माणसांशी संवाद साधणं, त्यांच्याशी मनमोकळं बोलणं, एखाद्या अभिनव कल्पनेचं, कुणाच्या सातत्यपूर्ण कष्टांचं कौतुक करणं आणि कोणत्याही आगळ्या-वेगळ्या कामाला जगापुढं आणणं हाच त्याचा जगण्यातला खरा आनंद आहे, आणि त्याच्या उत्साहाचं गुपित देखील. माणसातला माणूस शोधण्याची व जगातील चांगल्या प्रवृत्तींना दाद देण्याची निकड ज्यांना वाटते अशा माणसातला एक माणूस म्हणजे मंदार. ‘विश्वसंवाद' मध्ये भाग घेतलेली माणसं ही एका प्रकारे चारचौघांसारखी सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना कुठलंही प्रसिद्धीचं वलय नाही. मात्र त्याच वेळी ही माणसं काहीतरी वेगळं, चांगलं आणि अनेकदा समाजाला उपयोगी असं काम करण्याच्या प्रयत्नात असलेली असामान्य माणसं देखील आहेत.
‘विश्वसंवाद’चे सगळे म्हणजे ५० भाग आता आंतरजालावर उपलब्ध आहेत. www.vishwasamwaad.com ही त्याची वेबसाइट. शिवाय मोबाइल फोन्सवरूनही हे सगळे भाग ऐकता येतात. यामध्ये सहभागी झालेले लोकंही समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि नानाविध काम करणारे आहेत. त्यात गणिताचे शिक्षक आहेत, अस्स्खलित मराठी बोलणारा आणि कीर्तन या विषयात डॉक्टरेट केलेला फ्रेंच माणूस आहे आणि अमेरिकेतील सैन्यात काम करणारा मराठी युवकही आहे !
या सगळ्या पाहुण्यांमधून तुझ्या कायम लक्षात राहतील काही पाहुण्यांची नावं सांगशील का, असं विचारल्यावर वानगीदाखल त्यानं सांगितलेली काही उदाहरणं एंजल मेन्टॉरिंग हे एक नवं क्षेत्रच निर्माण करणारे नागपूरचे अतुल-प्राजक्ता. अनेक तरुण मंडळी समाजासाठी काही वेगळं करावं अशी स्वप्नं पाहत असतात. अशा मंडळींना पहिल्या एक-दोन वर्षांसाठी, त्यांच्या मूलभूत गरजांची काळजी घेतली जाईल इतकं मासिक विद्यावेतन ही मंडळी पुरवितात. हे करताना कोणत्याही प्रकारच्या परताव्याची ते अपेक्षा ठेवत नाहीत. या उपक्रमातून जे काही चांगलं काम निर्माण होईल, त्या कामामुळे सगळ्या समाजाला जो काही लाभ होईल, तोच आमचा लाभ, अशा प्रकारची वेगळी भूमिका अतुल-प्राजक्ता यांनी घेतली आहे.
सुनील खांडबहाले हा नाशिक जवळच्या खेड्यात राहणारा गरीब, शेतकरी कुटुंबातला मुलगा. दहावीनंतर इंजिनीरिंगच्या डिप्लोमाचा फॉर्म भरताना मेल आणि फीमेल हा फरकही त्याला माहिती नव्हता, इतकं त्याचं इंग्लिश कच्च होत.. तिथून आज सुनील यांनी आपली ओळख निर्माण केली आहे ती सगळ्या भारतीय भाषांमधल्या ऑनलाईन डिक्शनरीचा निर्माता म्हणून. नाशिकमध्ये एक सॉफ्टवेअर उद्योजक म्हणून तो काम करीत आहे. महाराष्ट्रातल्या एका लहानशा गावात राहणारा काशीराज कोळी यानं ध्यास घेतलाय तो ‘ घर तिथे वाचक ’ घडविण्याचा. आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत, मुलांपर्यंत पुस्तकं पोचावीत म्हणून हा तरुण चक्क बैलगाडीतून फिरतं ग्रंथालय चालवतो. आपल्या गावात एक सुसज्ज ग्रंथालय आणि सांस्कृतिक केंद्र उभं करण्याचं त्याचं स्वप्न आहे.
‘विश्वसंवाद’ च्या ५० भागांतून विविध क्षेत्रात विविध कामगिरी करणार्या माणसांशी घडलेला संवाद हा खऱ्या अर्थाने वैश्विक, बहुरंगी आणि बहुढंगी आहे ! ‘ विश्वसंवाद’ च्या सगळ्या भागातून लोकांना बोलतं करण्याची मंदारची विलक्षण हातोटी जाणवते. प्रत्येक भाग अधिक मनोरंजक आणि उद् बोधक कसा होईल यासाठी त्याचा प्रयत्न दिसून येतो. सुरुवातीच्या काही भागांपेक्षा नंतरचे भाग अधिक सफाईदार असले, तरी त्याचा आणि मुलाखतकर्त्यांचा सळसळता उत्साह अगदी पहिल्या एपिसोडपासून प्रत्येक एपिसोडमध्ये जाणवत राहतो. अनेकदा या सगळ्या खटपटीला लाभलेल्या तांत्रिक मदतीबद्दल मंदार आपल्या मित्राचे अतुल वैद्य यांची खूप मोठी मदत असल्याचं आवर्जून नमूद करतो.
मला वाटतं आपण एखाद झाड पाहतो, त्याची फळ चाखतो, तेंव्हा ते कुणी लावलं असेल, त्याला खतपाणी कुणी दिलं असेल असा फारसा विचारही करत नाही. ही विश्वसंवाद मधली मंडळी आयुष्याच्या या प्रवासात जाताजाता काहीतरी छोटंसं झुडूप लावणारी आहेत आणि त्यांच्या ह्या कृतीला कौतुकाची थाप देण्याचा मंदार कुलकर्णी याचा ‘विश्वसंवाद’ उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. 'विश्वसंवाद' हा मराठी भाषेतला पहिला मराठी पॉडकास्ट ५० एपिसोडस प्रसारित करण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. भारताबरोबरच अमेरिका, कॅनडा, अनेक युरोपिअन देश, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि यू ए ई या देशांमध्ये विश्वसंवाद ऐकला जातो. तसंच ब्राझील, मादागास्कर आणि उरुग्वे या देशांमध्येही या मराठी पॉडकास्टचे श्रोते आहेत. आजपर्यंत १५ हजारवेळा विश्वसंवादचे एपिसोडस डाउनलोड झाले आहेत.
‘‘ ५० एपिसोडस तर झाले, आता पुढे ?’’, असं विचारल्यावर मंदारनं सांगितलं त्यानुसार १५ ऑगस्टपासून ‘विश्वसंवाद’चा यू ट्युब चॅनेल सुरु झाला आहे आणि आजपर्यंतचे सगळे एपिसोडस दार आठवड्याला तिथे प्रसिद्ध होणार आहेत. शिवाय, यातील निवडक मुलाखतींवर आधारित पुस्तक प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीनं मंदारची तयारी सुरू आहे. साधारणपणे जानेवारी २०२१ मध्ये हे पुस्तक छापील आणि ई-बुक स्वरूपात तयार व्हावं, असं त्याचं नियोजन आहे. इंटरनेट वेबसाईट आणि मोबाइलला फोन्सबरोबरच पॉडकास्ट आता ॲमेझॉन ॲलेक्सा या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध झाला आहे. ॲलेक्सा डिव्हाईस किंवा ॲलेक्सा ॲप वापरून ‘विश्वसंवाद’चे एपिसोडस तुम्हाला ऐकता येणार आहेत.