आंब्याची कोय (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

राघूअप्पा संगीतावर खवळला : ‘‘म्या काय धरमशाळा खोल्लीया काय? येक तं तुह्या नवऱ्याला माह्याकडलं काम काय ग्वाड लागलं न्हाई. डंगर बैल तरी शेणाच्या उपेगाचा असतो; पर तुहा नवरा कायच उपेगाचा नव्हता. वरून माह्याच येहिरीत पाय घसरून पडला आन् मेला. माह्यावरच जल्माचा टोपरा ठिवून गेला.’’

आंब्याच्या कोयींचा डाव लहानपणी आम्ही पोरांनी कैकदा मांडला. आमरसाच्या दिवसांत या खेळाला कोण ऊत यायचा! ज्याच्या घरी आमरसाचा बेत असायचा त्याच्या दाराशी आम्ही पोरं घुलताया घालायचो. रस निपळून कधी एकदा त्यांच्या ओट्याच्या कोपऱ्याला ते कोयी आणून टाकतात याची डोळ्यात तेल घालून वाट पाहायचो. एकदा का कोयी आणून टाकल्या की आम्हा पोरांची त्यावर लवकंड उडायची. जेवढ्या कोयी हस्तगत झाल्या तेवढ्या राखेत माखून घ्यायच्या अन् उन्हात वाळत घालायच्या. त्या वाळल्या की कोयीच्या खेळासाठी आमच्याकडे स्वत:च्या घामावर कमावलेले ‘डॉलर’ तयार व्हायचे! ज्याच्याकडे जास्त पैसे तो काही आमच्या दृष्टीनं श्रीमंत नव्हता. ज्याच्याकडे जास्त कोयी तो मात्र श्रीमंत. अशी श्रीमंतीची आमची साधी-सोपी व्याख्या. कोयीच्या खेळापायी अनेकदा शाळा बुडवली आहे मी. आईचा किती मार खाल्ला, काही विचारू नका! मात्र, एक दिवस आईनं आंब्याच्या कोयीची गोष्ट सांगितली...
वैभव शाळेतून आला. दप्तर खाली न ठेवता एवढंसं तोंड करत आईला म्हणाला : ‘‘आई, शाळंची फी जर का न्हाई भरली तं तुही शाळा बंद व्हनार, असं माहे सर म्हन्ले मला आज.’’
‘‘वैभव, तुही शाळा बंद न्हाई झाली पाह्यजे.’’
‘‘ती व्हनारच नं आई, फी न्हाई म्हनल्यावर.’’
‘‘तुहा बाप वारला असंल बबड्या; पर तुही आई जित्ती हाये. म्या इकडचा डोंगुर तिकडं करीन; पर तुही शाळा न्हाई बंद व्हऊ द्यायाची.’’
‘‘काय करशीन आई तू? कुढून भरशीन फी? सरीच्या दवखान्यासाठी तू तुहं मंगळसूत्र मोडलं.’’
‘‘करील म्या कायतरी, आईवर इस्वास ठिव. डागिन्यांचं काय घिऊन बसलायंसा? तुमी दोघंच माह्यासाठी लाखमोलाचं डागिनं हायेत.’’
दुसऱ्या दिवशी वैभवला घेऊन संगीता तिच्या मालकाकडे गेली. या मालकाचं नाव राघूअप्पा. या राघूअप्पाच्या मळ्यात तिचा नवरा सालगडी म्हणून काम करत असे. तिला वाटलं, आता राघूअप्पाच आपला तिढा सोडवू शकेल.
दुसरा काही पर्यायही तिच्याकडे नव्हताच म्हणा. अडीनडीला सोन्याचा एक दागिना होता, तोही मोडला. आता एकमेव आधार होता तो राघूअप्पाचा. अप्पा झोपाळ्यावर आंबा खात होता. संगीता त्याच्यासमोर खाली मान घालून उभी राहिली. आंबा खाता खाता आंबचट मस्तीत राघूअप्पा म्हणाला : ‘‘काय म्हन्ते, संगीता?’’
‘‘अप्पा, हा माझा पोरगाय. वैभव. लई हुशारंय शाळंत. मास्तर गुन घ्येत्यात त्येचं.’’
‘‘ठाऊकंय मला. त्याचं काय?’’ गुरकावल्यागत राघूअप्पा म्हणाला.
‘‘येक नड हाये. तुमी भागवशाल अशी आस घिऊन आलेया मी तुमच्याकं’’
‘‘नड काय सांगशील का न्हाई?’’
‘‘पोराची फी भरायची हाये. ती न्हाई भरली तं शाळंत न्हाई बसू देनार असं मास्तर म्हन्लेत त्येला.’’
‘‘बरं मंग, म्या काय करू?’’
‘‘तुमी मदत केली तं त्यो शाळा शिकंल; न्हाई तं अप्पा, त्येची शाळा जानार. पोराचं लई लुसकान हुईल.’’
‘‘झालं तं व्हऊं दी की लुसकान, न्हाई तरी शाळा शिकून काय दिवं लावनाराय त्यो? त्यापरीस मजुरीच्या कामाला धाड त्येला इथं मळ्यात.’’
‘‘त्याचा बा मजुरी करूनच मातीत गेला. म्या हाये की मातीत जायाला; पर माह्या पोराची माती न्हाई व्हऊं द्यायाची म्या.’’
चोखत असलेला आंबा पुन्हा एकदा तोंडाला लावून राघूअप्पानं त्याच्या रसाचा गाल मध्ये घेत मोठाच्या मोठा सुरका घेतला. जणू आता आंब्यात थेंबभरही रस शिल्लक राहिला नसावा. ओठावरून ओघळणारा रस जवळच्या उपरण्यानं पुसत राघूअप्पा म्हणाला :
‘‘तुमा गरिबायला वळ लई! उपाशी मरशाल पर तत्त्व का काय म्हंत्यात ना त्येच्याशी आडून बसशाल!’’
‘‘अप्पा, काय बी करा; पर मदत करा. रित्या हाती धाडू नका,’’ संगीता अजीजीनं म्हणाली. वैभवला वाटलं, नको ती शाळा...आपल्या आईला दुसऱ्यापुढं असे भिकाऱ्यासारखे हात पसरावे लागत आहेत.
राघूअप्पा संगीतावर खवळला : ‘‘म्या काय धरमशाळा खोल्लीया काय? येक तं तुह्या नवऱ्याला काम काय ग्वाड लागलं न्हाई. डंगर बैल तरी शेणाच्या उपेगाचा असतो; पर तुहा नवरा कायच उपेगाचा नव्हता. वरून माह्याच येहिरीत पाय घसरून पडला आन् मेला. माह्यावरच जल्माचा टोपरा ठिवून गेला.’’
‘‘अप्पा, आता नका काढू ते दु:खाचं दीस. आता या पोरावरच सारी मदार हाये माही. त्येवढं फीचं धकतं का बघा.’’
‘‘म्या का दिऊ?’’ आंब्यातला राहिलासाहिला रस चोखता चोखता अप्पा म्हणाला.
‘‘अप्पा, कर्जाऊ तरी द्या.’’
‘‘आधीचं तुमचं कर्ज उभ्या जल्मात फिटणार न्हाई; चालली वर कर्ज मागाया!’’
‘‘अप्पा, आयुक्षभर तुमच्या मळ्यात म्या मजुरी करीन; पर न्हाई नका म्हनू.’’
‘‘तुला मदत कराया माह्याकं कवडी बी न्हाई.’’
तेवढ्यात वैभवच्या बरोबरीचा, त्याच्याच वर्गात असणारा अप्पाचा मुलगा सनी तिथं येतो.
‘‘अप्पा, मला पैसं पाह्यजेल व्हते.’’
‘‘आरं, काल तं तुला देले नं म्या.’’
‘‘ते खर्च झाले. माह्या वाढदिवसाची पार्टी पाह्यजेल माह्या दोस्तान्ला.’’
अप्पानं आंब्याच्या रसाचा हात उपरण्याला पुसला अन् खिशात हात घालत शंभराच्या कोऱ्या करकरीत तीन नोटा बाहेर काढल्या. सनीच्या हातावर ठेवत म्हणाला : ‘‘बास का? का आजूक पाह्यजेल?’’
‘‘अप्पा, आजूक दोनशे रुपये पाह्यजेल.’’
त्यानं शंभराच्या आणखी दोन नोटा त्याला दिल्या अन् मिजाशीत म्हणाला : ‘‘जाय, मज्या कर.’’
वैभव सगळं पाहत होता. अप्पा तर आधी म्हणाले की त्यांच्याकडे पैसे नाहीत...मग हे कसं...तो विचार करू लागला.
आपल्याला तर फक्त दोनशेच रुपये पाहिजे होते. ते मिळाले की आपल्याला शाळा सोडावी लागणार नव्हती.
वैभव म्हणाला : ‘‘अप्पा, तुमी तं म्हन्ले की माह्याकं पैसं न्हाईत, मग सनीला कसं दिलं?’’
‘‘सनी पोरगाय माहा. माह्या कामी त्योच येनार. तुहा काय उपेग?’’
‘‘अप्पा, म्या बी उपेगी पडन की तुमच्या.’’
‘‘तू काय उपेगी पडशीन रं? मला काय पोरंसोरं न्हाईत? तू काय दिवं लावनार?’’
संगीताच्या काळजाला या शब्दांच्या इंगळ्या डसत होत्या; पण ती आतल्या आत राग गिळून घेत होती. तिला माहीत होतं की आपल्याला मदत करील तो राघूअप्पाच.
तिनं पुन्हा एकदा अप्पापुढं पदर पसरला.
‘‘आसं कसं अप्पा? म्या मोठी आस ठिवून आले व्हते; न्हाई नका म्हनू, रिकाम्या हाती नका धाडू, काहीतरी ठिवा हातावर.’’
‘‘असं म्हनतेस? कर हात पुढं! ही येवढी कोय हाये.’’
राघूअप्पानं चोखून झालेली आंब्याची कोय संगीताच्या हातावर निलाजऱ्यासारखी ठेवली. दोघंही माय-लेक निघाले. वैभवला आईचा खूप राग आला. आईनं खुशाल भिकाऱ्यासारखा हात पुढं करत कोय घेतली. तीही उष्टी! त्याला तर एक वेळ असंही वाटलं की आईच्या हातून कोय घेऊन अप्पाच्या टकुऱ्यात मारावी. रस्त्यानं चालता चालता तो आईला म्हणालाही चिडून : ‘‘आई, का घितली त्वा ती चोखलेली कोय?’’
‘‘वैभव, आरं दान हाय त्ये. वाया जानार न्हाई.’’
‘‘काय पन आई तुहं.’’
‘‘दान देनाऱ्याची नीयत कुढली बी असूं दे, ते आपन कुढल्या मनानं घेतो त्येला म्हत्त्व असतंय रं लेका.’’
‘‘पर माह्या फीचा प्रश्न या दानानं सुटनार न्हाई, आई.’’
‘‘आरं, समद्याच गोष्टीतला झटपट फायदा न्हाई बघायचा राजा. तू काळजी करू नको. तुह्या फीचा प्रश्न म्या सोडविनार. तुही शाळा म्या थांबू देनार न्हाई.’’
संगीतानं ती उष्टी आंब्याची कोय फेकून दिली नाही. तिनं ती उकिरड्यात पुरली. काही दिवसांत छान डीर फुटून आला अन् ते आंब्याचं झाड तिनं मळ्यात बांधावर जाऊन लावलं.
***

पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा हा सगळा प्रसंग डॉ. वैभवच्या डोळ्यांसमोर आज पुन्हा उभा राहिला...त्याला कारणही तसंच होतं.
‘‘डॉक्टर, जनरल वॉर्डच्या पेशंटला डिस्चार्ज द्यायचाय, तर त्याचे कुणीच नातेवाईक त्याला घ्यायला आलेले नाहीत. शिवाय, हॉस्पिटलचं बिलही तीन लाख रुपये झालं आहे,’’ असा निरोप घेऊन
वॉर्ड बॉय वैभवकडं आला.
‘‘चल, मी येतो,’’ असं म्हणत डॉ. वैभव जनरल वॉर्डमध्ये येऊन त्या रुग्णाला भेटला आणि त्याला तो सगळा जुना प्रसंग आठवला...
कारण, तो रुग्ण दुसरा-तिसरा कुणी नसून राघूअप्पाच होता!
‘‘अप्पा, मला ओळखलं का?’’
‘‘तुम्ही डाक्टर हाये.’’
‘‘होय, मी डॉक्टरच आहे. मात्र, तुमच्या मळ्यात जिनं मजुरी केली त्या संगीताबाईचा मी मुलगा! माझ्या दहावीच्या फीसाठी मी तुमच्याकडे आलो होतो,’’ असं वैभवनं सांगताच राघूअप्पाच्या काळजाची फांदी हलली. त्याच्या डोळ्यासमोर आंब्याची उष्टी कोय आली. खूप खजील झाल्यासारखं झालं त्याला. पश्चात्तापाचे अश्रू त्याच्या डोळ्यांतून ओघळले. तेवढ्यात नर्स आली व वैभवला म्हणाली : ‘‘डॉक्टर, यांचं बिल कोण भरणार? यांच्या घरचे त्यांना इथंच टाकून निघून गेले आहेत. आम्ही फोन करत आहोत तर फोनही उचलत नाहीत ते.’’
‘‘मी फी भरतो. काळजी करू नका. माझ्या घरचाच पेशंट आहे हा.’’
‘‘आधी सांगितलं नाहीत तुम्ही आम्हाला!’’
‘‘अगं, मला तरी कुठं माहीत होतं?’’
अप्पांकडे वळून डॉ. वैभव म्हणाला : ‘‘अप्पा, तुमच्या त्या एका कोयीनं आईनं मळ्यात आमराई उभी केली. माझं शिक्षण आईनं त्या आमराईच्याच जोरावर केलं.’’
‘‘आरं, ज्येंच्यासाठी म्या आमराई जपली त्ये आज मला दवखान्याच्या दारी असं बेवारस टाकून गेल्यात. आंबा चोखून कोय फेकून दिली जाती लेकरा; पर त्या कोयीचं तू असं उपकार फेडलंस.’’
वैभवनं राघूअप्पाच्या हाती भाड्यासाठीचे जास्तीचे काही पैसे दिले व त्यानं त्याला गावच्या बसमध्ये बसून दिलं. बस निघाली, राघूअप्पानं हात हलवला. मात्र, पायात जसा काटा ठसठसावा; तशी आंब्याची कोय राघूअप्पाच्या काळजात ठसठसून आली...!
एवढं खरं की त्या कोयीला डीर फुटणार नव्हते, म्हणून तिचं झाडही होऊ शकणार नव्हतं अन् आमराईही उभी राहू शकणार नव्हती. ती कोय आतल्या आत कुजत राघूअप्पाच्या काळजावर कुरूप कोरणार होती...!
***

आईची गोष्ट सांगून संपायच्या आधीच मी दप्तर उचललं. पाठीवर टाकलं अन् शाळेच्या दिशेनं निघालो. आंब्याची उष्टी कोय माझ्या मनाला जरा जास्तच लागली होती. तेव्हापासून कोयीचा डाव बंद म्हणजे बंद! गोष्ट जरी आईची असली तरी तीत मी माझंही काही कालवलेलं आहेच...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com