शेवंताई (ऐश्वर्य पाटेकर)

ऐश्वर्य पाटेकर oviasishpate@gmail.com
रविवार, 12 जुलै 2020

‘‘मला वाटलं व्हतं, कुसुम काई तिच्या भावायसारखी निकरट काळजाची न्हाई.’’
‘‘तर! तिची आईवरची माया काय लपून ऱ्हायलेली न्हाई; लई माया!’’
‘‘आपुन उगाच तिला बोल लावला बाई, तिला निरोपच मिळाला न्हवता. तिला का सपान पडलं आईच्या आजारपनाचं? आता पाह्य कशी दौडत यिईल.’’

‘‘मला वाटलं व्हतं, कुसुम काई तिच्या भावायसारखी निकरट काळजाची न्हाई.’’
‘‘तर! तिची आईवरची माया काय लपून ऱ्हायलेली न्हाई; लई माया!’’
‘‘आपुन उगाच तिला बोल लावला बाई, तिला निरोपच मिळाला न्हवता. तिला का सपान पडलं आईच्या आजारपनाचं? आता पाह्य कशी दौडत यिईल.’’

गावात कुणाला सुई लागली तरी शेवंताईचं घर... कुणाला बैलाची आवश्यकता असली तरी शेवंताईचं घर...कुणाला दोन भाकरींपुरतं पीठ हवं असलं तरी शेवंताईचं घर...शेवंताई कधीच कुणाला कशाला नाही म्हणाली नाही. तिच्या दारावरून कुणीच रिकाम्या हाती जात नसे. तिच्या कणग्या सदाच्याच भरलेल्या. शेवंताईचा नवरा काही आमदार नव्हता. मात्र, त्याला सारेच आमदार म्हणत असत. त्यामुळे साहजिकच शेवंताईकडे ‘आमदारीण’ ही पदवी चालून आली. सारं गाव तिला आमदारीणच म्हणायचं. तिच्या मळ्यात रोजगारीवर साऱ्या गावाचं पोट. शेवंताईनंही कशातच हात बिलकूलही आखडता घेतला नाही.
अशी ही साऱ्या गावची आमदारीण आज मरणाच्या दारी एकटी पडली होती. जिनं साऱ्या गावाची गोधडी शिवली होती तिच्याच गोधडीला आज धस गेला होता अन्‌ टाका मारत शिवण्यासाठी कुणीच उरलं नव्हतं. शेवंताईच्या तिन्ही लेकांनी तिला वाळीत टाकलं होतं. आया-बायांच्या हळहळीला एवढं कारण पुरेसं होतं. बाया बाया जमून उस्करू लागल्या गोधडीचं आतलं पुरण...
‘‘गंज तीन लेक; पन हाये का त्यायचा उपेग?’’
‘‘असे लेक का चाटायचे का मंग?’’
‘‘कशी मायवरची माया आटून गेली...’’
‘‘नऊ महिने गर्भात ऱ्हायले; त्याचं तरी व्याज फेडा म्हनावा...’’
‘‘कलीचा वारा...बाई. दुसरं काय!’’
‘‘हावं नं बाई, खुशाल मायला मरानदारी सोडून देलं.’’
‘‘लई जाड काळजाचेय, बाई.’’
‘‘यांच्या परीस मवाली बरे.’’
‘‘आमदारनीची लेक कुसुम लई गुनाचीय बाई.’’
‘‘पाठी-पोटी यक तरी लेक असावी!’’
‘‘कुनी निरोप धाडलाया का कुसुमला?’’
‘‘धाडला म्हन्त्या बाई.’’
‘‘बरं केलं बाई, तिला कळताच पायाला भिंगरी लावून पळत यिईल! आईवं लई जीव तिचा.’’
‘‘ती आईला मरनाच्या दाढंतून वढून काढीन!’’
‘‘आता तिचीच वाट पघायची; दुसरं काय! पोरं तं म्येले पक्के कसाई निंगाले. माय मेली काय अन्‌ जगली काय, याच्याशी त्यायला काय बी घेनं-देनं न्हाई. नगं नगं वं माय आशे पोरं.’’
***

गावाचे डोळे कुसुमच्या वाटेकडे लागले होते...एक-दोन दिवस म्हणता म्हणता गावानं आठ दिवस वाट पाहिली; पण एकुलत्या एका लेकीचाही पत्ता नव्हता. गाव अंगणात बसून होतं. गावानं शेवंताईचं दवापाणीही सुरू केलं होतं. मात्र, शेवंताईच्या तब्येतीत कुठलीही सुधारणा नव्हती. गाव त्याच्या परीनं सत्त्वाला जागत होतं. गोमताई पुंडलिकाला म्हणाली :
‘‘पुंडलिका, आसं साऱ्या गावानं काही बसून भागायचं न्हाई. पेरण्यावैरणीचा काळ हाये ह्यो. म्या घेऊन जाते आमदारनीला माह्या घरी. तिचं लई उपकारंय माह्यावं. ते फेडायचं थोडंबहु पुन्य तरी लाभूं दे.’’
‘‘काकू, तू म्हनतीस ते खरं हाये; पर तिचे लेक लई उलट्या काळजाचेय; उद्या काई करता काई झालं म्हंजी? तुह्यावर नाहक टोपरा! तू कह्याला म्हतारपनी कोर्ट-कचेऱ्यांची झंझट लावून घेतीयास?’’
‘‘काकू, पुंडलिक म्हनतोय ते सोळा आणे खरं हाय.‘शेती हडप करायसाठीच आमच्या आईला ही घेऊन गेली,’ असा आरोप करायला बी चुकायचे न्हाईत ते!’’
‘‘मला बी असंच वाटतंया मोठ्याई!’’ म्हसोबाच्या मळ्यातल्या रंगनाथनंही पुंडलिकाच्याच म्हणण्याला दुजोरा दिला.
‘‘आरं, पर आसं मरू द्यायाचं का? हे काय मला बरं दिसत न्हाई बाबा,’’ गोमताई काठी सावरत म्हणाली.
‘‘काकू, हे बी खरं हाये; पर नाइलाजच हाये.’’
‘‘जिनं गावाच्या मुखात चार दानं भरलं ती आज अशी बेवारश्यासारखी पडूनंय,’’ गोमताईच्या डोळ्यात पाणी आलं.
‘एवढे दिवस वाट पाहिली तिच्या लेकांची अन् लेकीची; अजून एक दिवस वाट पाहावी...जर ते आज आले नाहीत तर शेवंताईला गोमताईच्या घरी न्यावं...तालुक्याचा चांगला डॉक्टर बोलावून पुढचा काही इलाज करता येईल का असा डॉक्टरांचाच सल्ला घेऊन, अगदी जिल्ह्याच्या इस्पितळात हलवायची गरज पडली तर तसं करावं...सारा खर्च गाव करील; पण गावच्या या आमदारणीला असं बेवारस मरू देऊ नये...असं गावाचं एकमतानं ठरलं. ते साऱ्यांना मान्य झालं. गोमताईच्या जिवाला हायसं वाटलं. ती उठली. तरातरा वाड्याच्या पायऱ्या चढून शेवंताईच्या पलंगाजवळ येऊन उभी राहिली. पुंडलिकाची सून गोजर ही शेवंताईला पेज भरवण्याचा प्रयत्न करत होती; पण शेवंताईनं ओठ घट्ट मिटले होते.
‘‘आसं काय करता आमदारीन? दोन चमचे पेज घ्या बरं; गोळ्या-औषधं पचवाया ताकद नगं का अंगात?’’
शेवंताई डोळ्यांनीच काही सांगू पाहत होती. तिची वाचाच गेली होती, मग तोंडातून शब्द कसा फुटावा? गोमताईला तिची भाषा उमगली.
‘‘ह्ये बघा! मला माहितंय, तुम्ही तुमच्या पोरायची वाट बघात्या. तुम्ही वनवाशी न्हाईये; सारं गावच तुमचंच हाये ह्ये ध्यानात घ्या; नगा येड्यावानी करू. गोजर, आन गं त्यो वाटी-चमच्या माह्याकडं, म्या भरवते माह्या जाऊबाईला.’’
पण शेवंताई काही केल्या हट्ट सोडीना. कसा सोडील? तिच्या आजारापेक्षाही तिच्या जिवाला झालेलं दु:ख मोठं होतं. गोमताईपासून किंवा गावापासून शेवंताईचं दु:ख काही लपून राहिलेलं नव्हतं. त्याचं गावालाही दु:खच होतं. गोमताईनं पुन्हा एकदा निष्फळ प्रयत्न केला शेवंताईचं मन वळवण्याचा.
‘‘जाऊबाई, नगा असा हट करू. काही कुनी इसरलं न्हाई बाई तुम्हाला.’’
‘‘मग काय, असं चालतं का? घ्या बरं ती पेज,’’ गोजर म्हणाली.
तेवढ्यात पुंडलिकही तिथं आला.
‘‘पुंडलिका, तूच सांग बाबा आता तुझ्या मोठ्याईला, तुझं आयकलं त आयकलं.’’
‘‘मोठ्याई, ऐक बरं. म्या बी तुहाच लेक हाये नं!’’
साऱ्या गावानं मनधरणी केली. घोटभर पेज पिण्यासाठी तिला विनवलं..
शेवंताईनं ओठ जणू शिवून टाकले होते.
शेवंताईच्या हट्टापुढं आता गावानंही गुडघे टेकले होते. शेवंताईचा आशय लोकांना थोडक्यात कळला, ‘माझी पोरं जरी येणार नसली तरी माझी लेक येईल. तिला तुम्ही नीट निरोप धाडला नसावा; नाही तर माझी हरणी आईसाठी धावत-पळत आली असती.’
लोकांना असं वाटून गेलं, की आपण म्हणतो तिला निरोप मिळाला असेल; पण तिला निरोपच गेला नसावा. नाहीतर खरंच पोरीचे पाय धरणीला टेकले नसते, म्हणून पुन्हा एकदा कुसुमला निरोप धाडण्यात आला. कुसुम खूप दूर मुलखाला राहत होती असं काही नाही; पण काय झालं काही कळेना!

गाव पुन्हा कुसुमच्या वाटेकडं डोळे लावून बसलं. या खेपेला मात्र कुसुम येणार होती. कारण, रावश्याकरवी गेलेला आधीचा निरोप तिला मिळालाच नव्हता. बाया-बायांचं सुरू झालं वाड्याच्या अंगण्यात :
‘‘पाह्य बाई, आपुन बसलो रावश्याच्या भरुशावर का त्यानं कुसुमला निरोप देला!’’
‘‘म्या तुला म्हन्ले व्हते नं, सुमन, का कुसुमला आईचं कळलं तं तिचा पाय ठैरनार न्हाई म्हनून.’’
‘‘ह्या रावश्याला चांगला झोडायला पाह्यजे! गाडीचं भाडं म्हनून दिल्याल्या पैशाची दारू प्येला!’’
‘‘त्या मेल्यानं आसं का करावा म्हन्ते म्या?’’
‘‘निकरट काळजाचा म्येला.’’
‘‘मला वाटलं व्हतं, कुसुम काई तिच्या भावायसारखी निकरट काळजाची न्हाई.’’
‘‘तर! तिची आईवरची माया काय लपून ऱ्हायलेली न्हाई; लई माया!’’
‘‘आपुन उगाच तिला बोल लावला बाई, तिला निरोपच मिळाला न्हवता. तिला का सपान पडलं आईच्या आजारपनाचं? आता पाह्य कशी दौडत यिईल.’’
एवढ्यात कचकन् ब्रेक दाबत दारापुढं चारचाकी गाडी थांबली. आयाबाया आशेनं पाहू लागल्या. कुसुम गाडीतून उतरली. लोकांना खूप आनंद झाला. बायांनी तर तिला गराडाच घातला.
‘‘बरं झालं बाई तू आली.’’
‘‘शेवंताईला लई आनंद व्हईल तुला पाह्यल्यावं.’’
‘‘आईचं डोळं सारखं तुह्या वाटंला लागलं व्हतं!’’
‘‘तुह्या आईला आता तूच वाली. तुह्या भावांनी तं देलं मोकलून.’’
‘‘शेवंताईनं लई लावा घेतला व्हता बघ.’’
‘‘ऐ हरणे, तुझ्या मायचा लई जीव तुह्यावं. डोळंच हातरून बसली व्हती तुह्या वाटंवं!’’
‘‘आल्यासरशी तुह्या घरीच घिऊन जाय आता. चांगला दवाखाना कर.’’
गर्दी बाजूला सारत, वाट काढत कुसुम आईच्या उशाशी येऊन बसली. गोमताई, जिजाई, पुंडलिकची आई अन्‌ इतर बायांनी घर भरलं होतं. अंगणातही बायामाणसं होती; पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. कुसुम आपल्या आईला घेऊन जाईल...तिचं दवापाणी करील...शेवंताई पुन्हा आजारातून उठून उभी राहील....
शेवंताईचा श्वास आस्ते आस्ते सुरू होता. गोमताई म्हणाली :
‘‘बाई, डोळं उघडा. बघा तुमची हरणी आलीया.’’
शेवंताईनं डोळे उघडले. लेकीला पाहताच तिच्या अंगात बळ आलं. गेल्या पंधरा दिवसांपासून शेवंताईची वाचा गेली होती. डोळे उघडे ठेवून ती नुस्ती भिटीभिटी पाहत राहायची. तिच्या तोंडून ‘कुसुऽऽम’ शब्द निघाला. आयाबायांनं तर इतका आनंद झाला!
‘‘माया कशाला केली!’’
‘‘रक्ताच्या नात्यासाठी असं धाव घेतं मन.’’
‘‘व्हट जनू शिवलं गेलं व्हतं इतक्या दीस. डोळ्यात काई आस न्हवती.’’
‘‘पाह्य बाई, वाळून चाल्ल्यालं झाड कसं हिरवळून आलंया!’’
कुसुमनं पर्स सावरली. ती उघडली. बायांना वाटलं, लेकीनं काही खायलाच आणलंय... तिनं त्यातून कागद बाहेर काढले अन्‌ आईला म्हणाली :
‘‘बय, माहे भाऊ तुला ठाऊकैत. तुह्या माघारी मला इथला सुतळीचा तोडा बी उचलू द्यायाचं न्हाईत. तुहं डोळं उघडं हायेत तोपत्तूर अंगठा दी या कागदावं!’’
बाया काय समजायचं ते समजल्या. सगळ्यांच्या भावना उसवल्या गेल्या होत्या. टाका मारायलाही अवसर मिळाला नाही. भावनेच्या आभाळाच्या चिंध्या चिंध्या झाल्या. चिरगुटं वाऱ्यावर फडफडू लागली. कुसुमनं कागदावर आपल्या आईचा अंगठा घेतला. शेवंताईचा अंगठा साधासुधा नव्हता. तो चाळीस एकरभर वावराचा अंगठा होता. कुसुम कागद उचलून आपल्या चारचाकी गाडीत जाऊन बसली. आया-बाया डोळे विस्फारून पाहत होत्या. त्यांच्या मनात मोठा खड्डा पडला होता. तो आता कशानंच बुजणार नव्हता!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang aishwarya patekar write gawakadchya gosti article