उधारी (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

दादू अडूनच बसला होता. काल त्याचा शाळेचा पहिला दिवस अन् कालच त्याला वर्गातून हुसकावून दिलं गेलं होतं. ‘शाळेचा गणवेश असेल तरच वर्गात बसायचं,’ अशी तंबीच त्याला मास्तरांनी दिली होती. कुठून आणायचा? किती स्वप्नं पाहिली होती दादूनं; पण स्वप्न पेरलेली माती कलाकला उलली होती. भेगाच पडल्या होत्या तिला मोठ्या मोठ्या. वडिलांना गणवेशाचं सांगितलं तर शाळाच बंद होणार, म्हणून मग तो काहीच बोलला नाही. आतल्या आत कुढत राहिला.

मुक्ताई काठी टेकत टेकत आली अन् दादूच्या समोर बसली. त्याच्या तोंडावरून मायेनं हात फिरवत म्हणाली : ‘‘दादू...बबड्या, जेवान करून घी. राती बी तू काई खाल्लं न्हाईस.’’
‘‘आजी, मला गणवेश पाह्यजी.’’
‘‘दादू, नगं हट करू; न्हाई तं तुहा बाप तुही शाळाच बंद करून टाकीन.’’
तेवढ्यात तानाजी आला. दादूचा बाप. तो दादूला म्हणाला : ‘‘काय रं, शाळंत न्हाई का जायाचं?’’
‘‘गणवेश घालूनच यायाला सांगितलंय सरांनी.’’
‘‘कुढून द्यायाचा रं तुला गनवेश? ऱ्हा आपला घरीच.’’
‘‘न्हाई. मला शाळा शिकायचीया.’’
‘‘मंग तुह्या गनवेशासाठी म्या काय कुढं गहान ऱ्हाऊ का?’’
‘‘गहान ऱ्हा न्हाई तं काई बी करा. मला गणवेश पाह्यजी.’’
तानाजीचं आधीच डोकं तापलं होतं. पेरणी-वैरणीचा काळ. सावकाराकडून पोरीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज अजूनही फिटलं नव्हतं. त्याचा तगादा सुरू झालाच होता. त्यात दादूचं हे गणवेशाचं!
तानाजी आणखीच तापला. दादूला शिव्या घालत आणि त्याला मारायला धावत तानाजी म्हणाला : ‘‘गहान ऱ्हाय म्हनतो व्हय रं...?’’
दादूची आजी मुक्ताई मध्ये पडली अन् तानाजीवर ओरडत म्हणाली :
‘‘आरं, काय लहानलव लेकरावं हात टाकून ऱ्हायलाय, उगाच्या उगं...’’
‘‘त्यो काय म्हनतोय पाह्य की...’’
‘‘आरं, कापडं तं मांगितले, हात्ती-घोडा तं न्हाई मांगितला! समजून सांगायचं ती दिलं सोडून आन् का ऱ्हायलाय मारून...?’’
‘‘न्हाई तं काय...ह्येंचं ही आसंच आसतंया,’’ दादूची आई निमा चूल फुंकता फुंकता म्हणाली.

‘‘आरं, म्या तरी काय करू? इथं बी-बियानं घ्यायाला पैसा न्हाई. सावकार बसलाय गळ्याजवळ सुरी परजून...फाशी घिऊ का मंग? त्यात या पोराचं ह्ये पिंगानं. नगं करू शाळा. बस आपला गपचिप घरी.’’
‘‘घरी बसाया सांगंतोय. आसं काय कमून ठिवलंय त्येला?’’ मुक्ताई म्हणाली.
‘‘तुमीच काय कमून ठिवलंय माह्यासाठी?’’
‘‘सहा बिघं जिमिन काय कमी झाली का? त्याच्यावर जगतंच आलो नं आम्ही...’’
‘‘त्येला का जगनंं म्हनायचं का, आई?’’
लेकाचं हे बोलणं मुक्ताईच्या मनाला खूप लागलं. ती मुकाट कोपऱ्यात जाऊन बसली. आपल्या आजीला अन् आईला बोलणी खावी लागली याचं दादूला वाईट वाटलं.
शाळेची पुस्तकं अन् प्रवेश फीचे पैसे त्यानं आईबरोबर मजुरीच्या कामाला जाऊन मिळवले होते; पण आता गणवेशावाचून अडलं होतं. शाळा आपल्या नशिबातच नाही असं त्याला वाटू लागलं; पण शाळा तर शिकायचीच होती त्याला.
दादू अंगणातल्या दगडावर येऊन बसला अन् विचार करू लागला...कुणी काढला आसंल हा गणवेश? त्यो दुष्ट राक्षसावानी माह्या आन् शाळंच्या आड आलाय...मग त्याच्या लक्षात आलं की गणवेशाशिवाय इथं कुणालाच महत्त्व नसतं. माती नाही का, पाऊस आल्यावर हिरवा गणवेश घालते! झाडं पानांचा गणवेश घालतात अन् आभाळालाही पावसाचा गणवेश असतोच. आपल्यालाच तेवढा गणवेश नाही!
तेवढ्यात गावाकडच्या रस्त्यानं दोन-चार चारचाकी गाड्या हॉर्न वाजवत येताना दिसल्या. पहिली गाडी त्याच्याजवळ येऊन थांबली. ड्रायव्हरनं गाडीची काच अर्धीशी खाली करत त्याला विचारलं : ‘‘ऐ पोऱ्या, हरी वाघाचं घर कुढंय?’’
‘‘ती काय फुडं. चिंचीचं झाड दिसतंय नं तिथं.’’

गाड्या गेल्या एका मागोमाग. हरी वाघाचा जन्या दादूच्या वर्गात होता. हरी वाघानं पंधरा दिवसांपूर्वी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. दु:खाचा डोंगरच त्याच्या घरावर कोसळला होता. दादूला वाटलं होतं की आता काही जन्या शाळा शिकू शकणार नाही. जन्याबद्दल त्याला फारंच वाईट वाटायचं. आता मात्र स्वत:साठी वाईट वाटायला लागलं. म्हणजे कीवच आली स्वत:ची. गणवेश त्याला खिजवत होता. तेवढ्यात अंगणात शेजारच्या मळ्यातले भीमा, नऱ्यातात्या, भागू साताडे आले. दादूच्या बापाला नऱ्यातात्यानं हाक घातली :
‘‘ऐ तानाजी, काय करून ऱ्हायलाय रं?’’
‘‘काई न्हाई बा.’’
‘‘वहाना घाल पायात.’’
‘‘कुढं जायाचंय?’’
‘‘हरीच्या मळ्याकड जाऊन यिऊ. त्येला काई मदत मिळतीया म्हनं. आमदारबी आलंत.’’
‘‘बरं व्हईल लका.’’
दादू कशाला मागं राहील? तोही पोहोचलाच त्यांच्याबरोबर. हरी वाघाचं घर तसं छोटसंच. वावरात कसंबसं अंग आकसून बसलेलं. त्या घरात माणसं राहायची म्हणून त्याला घर म्हणायचं! अंगणात बारदान अंथरून त्यावर लोक बसले. जन्याची आई अन् आजी, त्याच्या दोन बहिणी दारातच उदास चेहऱ्यानं बसल्या होत्या. हरीच्या थोरल्या पोरीचं, मनीषाचं लग्न आठ दिवसांपूर्वीच झालं असतं. तिच्या अंगाला हळद लागायच्या आधीच असं दु:खानं तिचं तोंड भरून गेलं होतं. जन्याचे आजोबा, नरहरीबाबा पांगळे झाले होते. दोन वर्षांपूर्वी चाऱ्याची गाडी आणायला गेले तेव्हा तोल जाऊन पडले. बैलगाडीचं चाक गेलं त्यांच्या पायावरून, तेव्हापासून त्यानं खाट काही सोडली नाही. आमदारसाहेब मोडक्या खुर्चीवर जीव मुठीत धरून बसले होते. त्यांचे कार्यकर्ते, कुणी गाडीला टेकून उभे, तर कुणी बॉनेटवर बसलेले. त्यांनी ग्रामसेवकाला खुणावलं.
सरकारी मदतीचा एक लाखाचा चेक ग्रामसेवकानं नरहरीबाबांच्या हाती दिला. आमदारांनी पन्नास हजारांची रक्कम दिली. त्याचा फोटो घेण्यात आला. ते सगळ्यांचं सांत्वन करत निघून गेले. गावच्या सरपंचानं मनीषाच्या लग्नाचा भार उचलला. दुःखी चेहऱ्यांवर एक समाधान झळकलं. ग्रामस्थांनी, कुणी दहा हजार तर कुणी पंधरा अशा मदत केली. गर्दीत उभ्या असलेल्या तानाजीला वाटलं, आपण जर आत्महत्या केली तर आपल्या कुटुंबालाही अशीच मदत मिळेल! शाळेच्या गणवेश नसल्यामुळे आपल्या पोराला शाळा सोडावी लागणार नाही. ...कसला विचार करतो आहोत आपण हे जाणवून त्याचं त्यालाच नंतर वाईट वाटलं. गोमाशी झटकावी तसे त्यानं मनातले विचार झटकून टाकले.

वकिलानं किराणा माल भरून आणला होता. दादू हे सारं पाहत होता. जन्याच्या वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे केवढी मदत त्याच्या घरच्यांना मिळाली होती...आत्महत्या करणं हे वाईट असूनही लोक किती मदत करत होते याचं दादूला कोडं पडलं. खरं तर ते सुटण्याची सुतराम शक्यता नव्हती.
गावातले काळे डॉक्टर उठले. ‘जन्याच्या शिक्षणाचा सारा खर्च मी उचलीन’ असं जाहीर केलं. त्यांनी वह्या-पुस्तकांचा नवा कोरा संच लगेचच जन्याच्या हातात दिला. त्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास दादूपर्यंत तवताक पोहोचला. त्याचे डोळे लकाकले. अजूनपर्यंत त्याला नवी पुस्तकं कधी मिळाली नव्हती. अर्ध्या किमतीत जुनी पुस्तकं त्याच्या आधीच्या वर्गात शिकणाऱ्या शिंद्यांच्या शकूची तो विकत घ्यायचा. जन्याला मात्र नवी कोरी पुस्तकं! शिवाय, शाळेत जाण्यासाठी कोराकाटा सायकलही देण्यात आली जन्याला.
जन्याचं नशीबच फळफळलं की! शाळेचा गणवेशही डॉक्टरांनी जन्याच्या हातात ठेवला अन् सांगितलं, ‘उद्यापासून शाळेत जायचं.’

दादूला आता रडूच फुटलं. त्याला तिथं काही बसवलं नाही. तो आपला रडतच घराकडे निघाला. बांधाच्या रस्त्यातून चालायचं सोडून तो भर पिकातून चालू लागला. मातीचा हिरवा गणवेश पायाखाली तडातडा तुडवत निघाला.
दुसऱ्या दिवशी दादूच्या दाराशी सायकलची घंटी वाजली म्हणून तो दारात येऊन उभा राहिला. पाहतो तर, जन्या शाळेत निघाला होता. दादूला खिजवण्यासाठी ऐटीत सायकल चालवत होता. अंगात नवाकोरा गणवेश. जन्या दिमाखात म्हणाला : ‘‘काय रं दादू, शाळंत न्हाई यायाचं का?’’
‘‘न्हाई,’’ चिडक्या आवाजात दादू उत्तरला.
‘‘आरं, काय नाहक शाळा बुडीवतोय?’’
दादूला त्याचा असा काही राग आला नं... आतापर्यंत त्याच्या मनाला हे सगळं फारच लागलं होतं अन् जन्यानं असा विस्तव फुंकला होता...मग जाळ होणारंच!
‘‘जाय रं भो, जन्या...जास्त फुशारकी नको गाजवूस. तुह्या बापासारखी माह्या बापानं आत्महत्या न्हाई केली. केली असती तर मी बी असाच नवा गणवेश घालून, नव्या सायकलीवर ऐटीत शाळेत गेलो असतो!’’

हे ऐकून मुक्ताईचं काळीज चरकलं. तानाजीनं जेवत्या ताटातच हात धुतला अन् पायात वहाणा सरकवून तो बाहेर निघून गेला. दादूच्या आईचा, निमाचा राग अस्मानाला पोचला होता. चूल फुंकायची फुंकणी घेऊन ती दादूला मार मार मारू लागली.
‘‘तुह्या गनवेशासाठी बापाला आतमहत्या कराया लावंतो व्हय रं म्येल्या? कसा रं उलट्या काळजाचा तू...’’ निमा स्वत:ही रडत होती; पण तिचा मार काही थांबत नव्हता. मात्र, मुक्ताई मध्ये पडली.
‘‘निमा, नगं गं यवढा रागबोस करत मारू लेकराला.’’
‘‘पाहा नं आत्याबाई, मंग त्यो काय म्हनून ऱ्हायलाय त्ये...’’
‘‘त्येला गं काय कळतंय? लानलव तं हाये...’’
निमा रडतच राहिली. सुनेला कसं समजावून सांगावं हे मुक्ताईलाही कळेना. तिनंही डोळ्याला पदर लावला. मग मात्र फुंदत फुंदत दादू रडायचा थांबला. आईला बिलगला अन् म्हणाला : ‘‘चुकलं आई, माहं. मला न्हाई करायची शाळा. नगं त्यो गणवेश मला...’’

निमानं त्याला खसकन् कुशीत ओढलं अन् ती आणखीच रडत बसली. मुक्ताईसुद्धा! आता घरालाही हुंदका फुटेल की काय असं वाटत असतानाच तानाजी आला. त्यानं दादूच्या हातात गणवेश ठेवला. रडणाऱ्या घराच्या चेहऱ्यावर हसू फुटलं...!
तानाजीनं आतापर्यंत अनेक वेळा दुकानदाराकडून उधारीवर काहीबाही आणलं होतं. मात्र, गणवेशाची ही उधारी त्याला ओझं न वाटता, त्याचं मन हलकं हलकं करून गेली...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com