कुंकवाचा करंडा (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

प्रत्यक्ष जत्रेचा दिवस उगवायचा तेव्हा आम्हा दोघांकडे एक छदामही उरलेला नसायचा. जत्रेच्या दिवशी आई आम्हा दोघांच्या मिळून हातावर खर्ची म्हणून एक रुपयाचा चंद्र ठेवायची. काय खरेदी करणार तेवढ्या एक रुपयाच्या ठोकळ्यात? एक तर पमीची मोठी यादी तयारच असायची आणि माझी तर तिच्याहूनही मोठी! आम्ही जत्रेत भरपूर हिंडायचो. पमीला ज्या ज्या वस्तू घ्यायच्या असायच्या त्या त्या ती हातात घेऊन कितीतरी वेळ न्याहाळत बसायची...

मी अन् माझी बहीण पमी पीरसायबाबाच्या जत्रेची तयारी
चार-सहा महिने आधीच करत असू. कुणी पाहुणे घरी आले की त्यांनी निघताना एखादा रुपया हातावर टेकवला की मी तो जत्रेत खर्चण्यासाठी ‘गुल्लक’मध्ये साठवून ठेवत असे. पमीही असे पैसे तिला मिळाले की जपून ठेवायची अन् मला सांगायची : ‘‘भावड्या, माह्याकड चार रुपैची चिल्लर जमा झालीया.’’
माझ्याकडे जमा झालेली दोन-अडीच रुपयांची चिल्लर मग मीही तिला तवताक नेऊन दाखवत असे.
‘‘बघ, माह्याकड बी लई जमल्यात.’’
‘‘आपुन न भो, मस पैसं जमा करू...जत्रंला तं आजुक लई म्हैनं बाकी हायेत.’’
‘‘पमे, या टायमाला लई म्हंजी लईच पैसं जमा करायचं बरं का...आपल्या गावच्या यका बी पोरापोरीकड यवढी खर्ची नसल!’’
‘‘आईला सांगू नगं पन.’’
‘‘म्या का येडाय का आईला सांगाया!’’
‘‘तू हायेसच फाटक्या त्वांडाचा, आईकड पचकशीनच.’’
‘‘न्हाई गं, आता न्हाई पचकायचो.’’
पमीनं मला असं बजावण्यामागं कारण होतं. घरात कधी तेल-मिठाचं नसलं अन् आईकडेही कवडी नसली की आई मला विचारायची अन् मी माझ्याकडची असलेली-नसलेली शिल्लक तिला देऊन टाकायचो.
‘‘बबड्या, तुह्या गल्ल्यात हाये का रं यखांदा रुपाया?’’
‘‘हाये नं आई.’’
‘‘दे मंग.’’
‘‘पन आई, ती माही पीरसायबाबाच्या जत्रंची खर्ची हाये.’’
‘‘आरं, तव्हाईन नं म्या चांगलं पाच रुपै दिईन माह्या लेकराला.’’
‘‘नक्की दी बरं का आई...न्हाई तं तव्हा म्हनशीन, ‘आत्ता न्हाईत रं माह्या लेकरा...’ ’’
‘‘नक्की दिईन.’’

मी आईकडून वचन घ्यायचो. वचनाला पैसे पडत नव्हते; त्यामुळे आईही बिनधास्त वचन द्यायची. मी जड अंत:करणानं दोन-अडीच रुपयांची चिल्लर आईच्या हातावर टेकवायचो. आई ती पुन्हा माझ्या मुठीत ठेवायची अन् खंडूबाबाच्या दुकानातून तेवढ्या पैशांची चहापावडर आणायला लावायची. हे झालं माझं. मात्र, जेव्हा साखर नसायची तेव्हा मी पमीची झोळी आईकरवी रिकामी करून टाकायचो!
जत्रा जसजशी जवळ येऊ लागायची तसतशी आम्हा दोघांची यादी तयार व्हायची.
‘‘भावड्या, या बारी म्या चमकीच्या बांगड्या घेनारंय.’’
‘‘म्या शिनीमाची डबी घेनारंय.’’
‘‘आन् बरं का, वरवाड्यातल्या शीलीनं घेतला व्हता तसा च्याप पन घेनारंय मी.’’
‘‘नैताळ्याच्या जत्रंतून आनल्याली त्वा ती झिंग्याची बंदूक पाह्यलीया का? म्या तशीच घेनारंय...’’
‘‘डाक्टरच्या पक्याचा चावीचा टॅक्टर भारी हाये, तसा घी.’’
‘‘मंग बंदूक कॅन्सल... टॅक्टरच घिईन. मला बी लई आवडलाय त्यो.’’
‘‘आजुक यक ऱ्हायलंच...’’
‘‘काय गं, काय?’’
‘‘आईसाठी कुकवाचा करांडा घ्यायाचाय. शोभावैनीनं आनलाय तिच्या माहेरावून तसा.’’
हे झालं वस्तूंचं. खाऊच्या पदार्थांविषयीही आम्ही ठरवलेलं असायचं. राजू हलवायाची जिलेबी कशी चवदार असते; तीच घ्यायची...चांगुणाबाईच्या गोडीशेवेची सर दुसऱ्या कशालाच येणारी नसते यावर माझं न् पमीचं एकमत असायचं...मंजाबाईचे चांदवडी पेढे जगात इतर ठिकाणी कुठं मिळतील तरी काय? तेही घ्यायचे...असं काय न् काय आमचं ठरत असयाचं. जत्रा येईपर्यंत आम्ही पुरते जत्रामय होऊन गेलेलो असायचो. हे म्हणजे एक प्रकारचं ‘जत्रापिसे’च लागलेलं असायचं आम्हाला. कल्पनेच्या पातळीवर आमचं सारं काही खरेदी करून झालेलं असायचं अन् पदार्थही खाऊन झालेले असायचे!

प्रत्यक्ष जत्रेचा दिवस उगवायचा तेव्हा आम्हा दोघांकडे एक छदामही उरलेला नसायचा. जत्रेच्या दिवशी आई आम्हा दोघांच्या मिळून हातावर खर्ची म्हणून एक रुपयाचा चंद्र ठेवायची. काय खरेदी करणार तेवढ्या एक रुपयाच्या ठोकळ्यात? एक तर पमीची मोठी यादी तयारच असायची आणि माझी तर तिच्याहूनही मोठी! आम्ही जत्रेत भरपूर हिंडायचो. पमीला ज्या ज्या वस्तू घ्यायच्या असायच्या त्या त्या ती हातात घेऊन कितीतरी वेळ न्याहाळत बसायची. त्या घेतल्याचं समाधान ती त्या न्याहाळण्यातून मिळवत असायची की काय माहीत नाही; पण मीसुद्धा तसंच करायचो! सिनेमाची काडेपेटीएवढी डबी हातात घेऊन तिच्या कागदी रिळाचं बटण मी फिरवत राहायचो. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, हेमामालिनी...असे एकामागून एक यायचे... तेवढ्यात खेळणीवाला ओरडायचा :
‘‘ऐ पोऱ्या, निस्ताच काय बघून ऱ्हायला? घ्यायाची नसंन तं ठू खाली!’’
मग मी इवलंसं तोंड करायचं...पण तेवढ्यापुरतंच. परत खेळण्यांच्या दुकानात चेहरा फुलवून पाहत बसायचं. हे तेव्हा कसं जमत होतं मला माहीत नाही; पण आधीच्या दुकानात झालेल्या अपमानाचा जराही मागमूस राहत नव्हता. मध्येच गावातलं कुणी कुणी भेटायचं. यदूबाबाची चंदा, झापडी उषी, बांगुरी कमळी, भिलआटीतली चंद्रकली, गंगाईची मावडी, सुताराची संगी अशी पमीच्या मैत्रिणींची फौज जमा व्हायची.
चंदा म्हणायची : ‘‘पमे, म्या बांगड्या घितल्या... बघ की किती भारी हैत.’’
‘‘दाव, दाव! आय्योव, लईच भारी हैत गं! म्या बी घितीया...’’
‘‘म्हंजी? त्वा काईच घेतलं न्हाई व्हय आजुक?’’
‘‘आगं, आमी आत्ताच तं आलोय जत्रंत!’’
‘‘माह्या आईनं दहा रुपै खर्ची दिलीया.’’
‘‘आमाला बी दहा रुपै दिल्यात आमच्या आईनी. न्हाई का रं भावड्या?’’
‘‘हा नं! आमी तं काय काय घेनारंय माह्यतीई का? चावीचा टॅक्टर, चमकीच्या बांगड्या, शिनीमाची डबी...हाय ना पमे?’’
माझी यादी जरा जास्तच वाढत चालली की पमी माझ्या पाठीला बारीकसा चिमकुटा घ्यायची, तेव्हा कुठं माझी सुसाट मेल थांबायची! सुताराच्या संगीनं केवढ्या तरी टिकल्या नि बांगड्या घेतलेल्या असायच्या. तिला त्या आम्हाला दाखवायची घाई झालेली असायची. चंद्रकलीनं तर काहीच घेतलेलं नसायचं. ती तर येडबंगूच. बर्फाचा गोळा चोखताना सगळा फ्रॉक भरून टाकायची. झापड्या उषीनं लाकडी फणी घेतलेली असायची...तसं तिच्या डोक्यात उवा-लिखांचं पीक होतंच...डोकं ‘नांगरायला’ फणी कामी येईल...! गलका करत सगळ्या जणी निघून जायच्या.

मग संत्या, पग्या, दिवड्या, गौत्या कुठून तरी उगवायचे. संत्या माझ्या कानाजवळ पिपाणीचा मोठा आवाज काढत राहायचा. दिवड्याचं भिरकं भिंगतच राहायचं. नित्या त्याचा ट्रक माझ्याभोवतीच्या जमिनीवर फिरवत राहायचा...
संतूची कॉमेंट्री सुरू व्हायची...
‘‘भावड्या, तू दुपारी पाह्यजेल व्हता रं...टांग्याच्या काय शर्रेती झाल्या!’’
‘‘कावण्याखोऱ्यातल्या दत्तूचा टांगा काय पळालाय...पार घोड्याच्या तोंडाला फेस आनला व्हता. घोडं असं जीव काढीत, असं जीव काढीत पळालं भो त्या दत्तूला घिऊन.. पार निंबाळकराच्या वावरातून धोधाट!’’
‘‘तव्हा तं लई बेकार मज्या आली भो...टांगा यक्या बाजूला आन् दत्तू जाऊन पडला ढेकळात. बूड शेकून निंगालं पार त्येचं!’’
‘‘हा नं पऱ्या, आवरंनाच त्येला.’’
‘‘ऐ संत्या, चलंय... येच्या काय नादी लागून ऱ्हायलाय? तिकडं कुस्त्या बी सुरू झाल्या असत्यान...’’
संतूची पिपाणी गेली. दिवड्याचं भिरकं गेलं, नित्याचा ट्रक गेला....

पमीची अन् माझी जत्रा पुन्हा सुरू झाली. आम्ही पुन्हा आमच्या आवडत्या खेळण्यांजवळ यायचो. दुकानदारांना एव्हाना कळून चुकलेलं असायचं की ही भावंडं घेत काहीच नाहीत, नुसतीच पाहत बसतात. त्यामुळे दुकानदार आता आम्हाला डोळे वटारायला लागलेले असायचे. मला असं वाटायचं की पैसे कमी असल्यानं आपल्याला ट्रॅक्टर काही घेता येणार नाहीच, तेव्हा पमीला बांगड्या तरी घ्याव्यात; पण बांगड्यांना लागायचे दोन रुपये. आमच्याकडे तर एकच रुपया. नेहमीप्रमाणे याही जत्रेत आपली आवडती वस्तू घेता येणार नाही म्हणून खूप वाईट वाटायचं. जत्रेत दिवसभर फिरूनही आम्ही काहीच घेतलेलं नसायचं. दिवस बुडायला यायचा अन् आम्हाला आठवायचं की आता आम्हाला लाडू खायचे आहेत, गोडीशेव खायची आहे, जिलेबी खायची आहे...आम्ही राजू हलवायापाशी जाऊन उभे राहायचो, मग मांजाईच्या पेढ्यांच्या मोठ्या परातीजवळ जवळ. गोडीशेव राहिलीच की! ती कोण सोडणार?
आमची जत्रा आटोपली! आम्ही निघालो...
रस्त्यानं चालता चालता पमी म्हणाली :‘‘भावड्या, जिलबी लई छान लागली!’’
‘‘म्या तं पोटभर हाणली!’’
‘‘सगुणाईची शेव थोडी आळनी व्हती!’’
‘‘गोडीशेव गं, गोडीशेव?’’
‘‘ती तं लईच मस्त!’’
न खाताही सगळ्या पदार्थांची चव जिभेवर नाचवत आम्ही ती पोटापर्यंत नेली. पमीच्या बांगड्या, माझा ट्रॅक्टर, सिनेमाची डबी, प्लॅस्टिकच्या गोळ्या उडवणारी बंदूक...सगळं जागेवरच राहिलं...त्या त्या दुकानात!

रुपयाचा चंद्र मी मुठीत घट्ट दाबून ठेवला आणि आम्ही पाटेगाव्ह्याचा रस्त्याला लागलो.
गावात आलो. मारुतीच्या देवळाजवळ डॉक्टरांचा पक्या त्याच्या सिमेंटच्या चिकणओट्यावर खेळण्यातला किल्लीचा ट्रॅक्टर पोरांना फिरवून दाखवत होता. संत्या, हणत्या, म्हल्ल्या त्या पळणाऱ्या ट्रॅक्टरचं कौतुक करत होते. मीही गेलो.
पक्याला लाडीगोडी लावत मी म्हटलं :
‘‘पकू, मला बगूं दी नं यक बार चालवून.’’
‘‘काय रं, आमाला तं लई शायनिंगमधी सांगत व्हता, मला टॅक्टर घ्यायाचाय म्हून. कुढंय तुहा टॅक्टर?’’
‘‘घ्यायचा व्हता रं...पन म्या जाईपत्तूर समदे टॅक्टर इकले गेलते!’’ ट्रॅक्टरची किल्ली फिरवता फिरवता मी म्हणालो.
‘‘काई बी भपाऱ्या नगं मारू. खर्ची व्हती का तुह्याकड?’’
संतूचं ऐकलं न ऐकलं करत मी ट्रॅक्टर जमिनीवर अलगद सोडला...तो पार पक्याच्या ओट्याखाली गेला. उलटापालटा झाला!
घरी आलो. आईनं गोडधोड जेवण केलं होतं. आईनं न विचारताही मी तिला जत्रेतली दिवसभराची सगळी हकीकत सांगितली. जत्रा तिच्या डोळ्यात उतरून तिचे डोळे ओले झाले होते की आपण आपल्या लेकरांना खर्ची देऊ शकलो नाही म्हणून? नेमकं तिच्या मनात काय होतं हे शोधायला वेळ कुठं होता? पमीचं जेवण झाल्यावर मी आईला हात पुढं करायला सांगितला अन् आईच्या हातावर कुंकवाचा करंडा ठेवला.
‘‘आरं! ह्यो तं लई मोलाम्हागाचा दिसतुया...यवढं पैसे तुह्याकड आलं कुढून?’’
तेवढ्यात पमी घरात आली. आईच्या हातातला करंडा पाहून तिचे डोळे चमकले अन् तिनं मला दरडावून विचारलं : ‘‘भावड्या, कसा घ्येतला त्वा हा करांडा?’’
‘‘म्या गपचित खिशात घातला!’’

आईचे डोळे पाणावले. मला जवळ घेत कुरवाळत ती म्हणाली : ‘‘ल्येका, आपली ऐपत न्हाई अशा गोष्टीचा आपेग करायचा न्हाई. तू जव्हा कमाई कराया लागशीन तव्हा माह्यासाठी करांडा घी! चोरी चांगली नसंती, बाळा!’’
मी उभा राहिलो आणि कौशाआत्याच्या चिंचेकडच्या गचपणात करंडा दूर भिरकावून दिला.
आतापर्यंत जपून ठेवलेला एक रुपयाचा चंद्रही पुन्हा आईच्या स्वाधीन केला...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com