aishwarya patekar
aishwarya patekar

‘बालभारती’चं पुस्तक (ऐश्वर्य पाटेकर)

तेवढ्यात सुखदेवच्या नजरेसमोरच्या मेरावरल्या बाभळीवरून कावळ्यांचा भलामोठा कावकावीचा थवा उठला अन् आबगीच कुठून धुळीची भोवरी गरगरत वेटाळून गेली. भोवरी अशी की छोटे छोटे दगड-खडेही तिच्यात भिरभिरू लागले. सुखदेव भोवरीत सापडला. तो हेलपाटून गणपततात्याच्या वावरात पडला. गणपततात्या धावला. त्यानं सुखदेवला सावरलं.

सुखदेव हे फक्त निमित्त, ही गोष्ट खरं तर दु:खाला हरवणाऱ्या माणसाची आहे. तो माणूस फेसबुक, व्हाट्सॲप, इन्स्टाग्रामवर नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही, म्हणून ती सांगण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली! वास्तवाची गोष्ट सांगताना लेखक आपल्याकडचं बरचसं कपोलकल्पित त्यात ओतत असतो. मी तसं केलं नाही.

सुखदेवच्या कुटुंबावर अवकाळी पावसाची कुऱ्हाड कोसळली. चार एकरभर हरभऱ्याचं पीक मातीमेळवण झालं. काढणीला आलेला हरभरा सोंगायचं काम आदल्या दिवशीच त्यानं दिलं होतं. मात्र, मजूर वावरात पोचायच्या आधीच काळानं निर्दयी होऊन त्याच्या अन् त्याच्या तीन उलीउली लेकरांचा घास हिरावून नेला होता. माणसानं काही चूक केली तर आपण त्याला कोर्टात खेचण्याची धमकी देतो. पावसाला कुठल्या कोर्टात खेचणार?
माणूस चिंतितो काय अन् होतं काय! या हरभऱ्याच्या उत्पन्नावर सुखदेवच्या तुटपुंज्या संसाराची सारी मदार; पण तीच अशी कोसळून पडल्यावर सुखदेवचं अवसानच गेलं. आता पै-पैसाठी कुणाकडे हात पसरायचे? जर आपल्याकडे काही नसलं तर लोकांचेही खिसे रिकामेच असतात हे सुखदेवला पूर्वानुभवानं कळून चुकलं होतं. संपूर्ण वर्ष कशाच्या आधारावर काढायचं? शेतीशिवाय दुसरं काही उत्पन्नाचं साधन नाही.
गेले आठ दिवस सुखदेवच्या डोक्यात विचारांचं नुसतं भणकं उठलं होतं. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. आज सकाळी झोपेतून उठल्यापासून तो अंथरुणातच गुडघ्यात मान खाली घालून बसला होता. त्याचं घर, त्याचा मळासुद्धा गुडघ्यात मान घालून बसला आहे असं त्याला वाटलं! गुडघ्यात मान गेली नव्हती ती तेवढी उषाची. उषा त्याची बायको. उषानं कोरा चहा उकळला. तो सुखदेवच्या पुढं ठेवत ती म्हणाली : ‘‘च्या घ्या वं. आसं किती दिस भुई धरून बसनारैत? गेलं त्येच्या मागं न्हाई जाता येत. पुन्ना कंबर कसू; पर आसं नगा आवसान घिऊ कुनी मेल्यावानी!’’
‘‘.................................’’
‘‘म्या काय म्हन्ते, नगा बाई आसं त्वांड सोडून बसू. मरानघरी आल्यागत वाटतंय!’’
‘‘मरानघरच न्हाई तं काय? देवानं ह्ये बरं केलं न्हाई, उषा!’’
‘‘देवाला का मधी वढता? त्येनं काय केलं? काय तरी बोलून ऱ्हायला...’’
चौथीत शिकणारा त्याचा मुलगा आरू आला अन् म्हणाला : ‘‘बाबा, मला ‘बालभारती’चं पुस्तक न्हाईये.’’
‘‘नसलं तं नसूं दी, त्यानं काय व्हनारंय?’’ चिडचिड करत सुखदेव म्हणाला.
‘‘बाबा, मला त्ये काय म्हायती न्हाई. मला पुस्ताक हावं म्हंजी हावं!’’ आरूही अडून बसला.
‘‘कुढून द्यायाचं रं! इथं काय वाढून ठुलंय त्याचं तुला काई न्हाई, त्वांडचा घास पळालाय, आन-पानी ग्वाड लागंना. तुहं वर पुस्तकाचं पिंगानं. न्हाई मिळायचं पुस्ताक. शाळा करू वाटली तं कर न्हाई तं बस घरी!’’
‘‘मला पुस्ताक पाह्यजी म्हंजी पाह्यजी,’’ हात-पाय आपटत आरूनं हट्ट कायम ठेवला.
आधीच गारपिटीनं सुखदेवचं डोकं अर्धं खलास झालं होतं, त्यात पोरानं भर घातली. राग अनावर होऊन सुखदेवनं आरूच्या तोंडात लगावली. आरू रडू-ओरडू लागला. सुखदेवचा सारा राग आरूवर निघाला. तो थांबायलाच तयार नव्हता. ‘पाह्यजी तुला पुस्ताक, पाह्यजी?’ असं म्हणत त्याला लाथा-बुक्क्या घालू लागला. पोरगंही हट्टाला पेटलेलं. एवढा मार बसल्यावर मुकाट्यानं बसावं की नाही; पण नाहीच...त्याचा हेका सुरूच राहिला...‘हा, मला पुस्ताक पाह्यजी म्हंजी पाह्यजी.’
शेवटी उषा मध्ये पडली.
‘‘काम्हून लानलव लेकरावं हात उचलून ऱ्हायला? गारपिटीला आवतान त्येनं धाडलं व्हतं का? समद्या जगावरच ती पडली. आपुन यकटेच सापाडलो का तीत?’’
‘‘जगात आन् आपल्यात मोप फरकंय, उषा.’’
‘‘मंग काय, गळ्याला फास लावून घ्येता का काय आता? ह्ये बी दिस जात्याल...ते का बसून ऱ्हानारैत का?’’
‘‘दिस काय आपसूक जात्यान का?’’
‘‘जात्यान न्हाय तं काय! तशेच ऱ्हात्यान व्हय?’’
‘‘तवर काय दगुड-माती खाऊन जगायचं का? सावकाराला मला त्वांड द्यायाला लागंतय.’’
‘‘आपुन काय जाते-पळते न्हाई!’’
‘‘हे तुहं झालं. त्येला कोन सांगनार?’’
‘‘त्याचं डोळं काय फुटलं न्हाईत. समदी अवखदा त्येच्या डोळ्यानिराळीय का?’’
‘‘उषा, आसं वाटतंय, तोंड लपून कुढं तरी पळून जावा या साऱ्यापून!’’
‘‘आसं करून चालतंय व्हय? नगं बाई, आसा काई इच्यार नगा करू. तेला-मिठाचं सपलंय, त्येची बी काय तरी तजवीज कराया पाह्यजेन.’’
‘‘दादा, मला फी भरायचीया बरं का. उद्या शेवटची मुदतंय...,’’ थोरली मुलगी ज्ञानेश्वरी म्हणाली.
‘‘आन् माही पन,’’ धाकली श्रावणी म्हणाली.
एकामागून एक मागण्या झाल्यावर सुखदेवच्या रागाचा भूकंपच झाला! तो थरथरत, चवताळून म्हणाला :‘‘माह्या डोक्यात दगुड घाला अन् मिळवा तुमाला काय पाह्यजी ती.’’
पोरांवर दात-ओठ खाऊन सुखदेव वैतागानं घराबाहेर पडला. रामू सहादूच्या वावराकडून म्हसोबाच्या रानाकडे निघाला.

सुखदेवच्या मनात विचार सुरू झाले...‘पोरांच्या मागन्या तशा लई न्हाईतच. एरवी, आपुन त्या लागलाच पुरावल्या आसत्या. पर, आता येळच अशी आलीया आन् समदा राग पोरांवर काहाडला आपुन. पोरानं ‘बालभारती’चं पुस्तक तं मागितलं, हत्ती-घोडं थोडंच मागितल्यात? आपुन त्येला जरा जास्तच मारलं. त्यात दोन्ही पोरींनी बी फीचं तुनतुनं लावलं. लेकरं माह्याकड नाई मागायची तं कुनाकड? आपुन त्येंच्या एवढुशा गरजा बी नाई पुऱ्या करू शकत.. आपुन मंग बाप म्हनून घ्यायला लायक नाही. काय आपलं जिनं कुत्र्याच्या निपतरी...किती धावा भराभर, दोन्ही पाय बराबर! या फाटक्या परपंचाला किती टाकं घाला, त्यो फाटतुयाच. आता टाकं घालायची आपली ऐपत न्हाई राहिली. उमेद खचलीया. आपलं आयुक्ष गळाभर गाळात रुतलंया. ते वर काढायचं कसं? अन् कुनी? शेतकरी म्हनून जन्माला आलोय ह्योच शाप आपुन भोगतुया. या शापातून आपली सुटका न्हाईच का?’
सुखदेव निराशेच्या गर्तेत गेला अन् म्हसोबाची विहीर त्याला दिसू लागली. तो त्याच्याही नकळत तिकडे जाऊ लागला. विचार सुरूच होते...‘गौतम चांगला म्हनत व्हता, नाशिकला कंपनीत चल माह्याबरूबर; पर आपुन त्येचं ऐकलं नाही. ऐकलं आसतं तं आयुक्षाचं आसं मातेरं नसतं झालं. आपुन बसलो मातीला कवटाळून...जीवच न्हाई राह्यला तं संकट आपसूक खतम! एकच उडी आपल्याला संपवील समद्या जाचातून.’
गणपततात्या बसला होता आपल्या वावरात. त्याचाही तीन एकर हरभरा गारपिटीनं मातीमेळवण केला होता. त्यानं सुखदेवला पाहिलं अन् कपाळाला आडवा हात लावून त्याला हाक घातली.

‘‘सुकदेवा, ऐ पोरा, आयकतो का? न्हाई, कुढं निंगाला?’’ गणपततात्याची हाक सुखदेवपर्यंत काही पोचली नाही. त्याला कशी ऐकू जाईल हाक? त्याला तर मरणाच्या हाका ऐकू येऊ लागल्या होत्या. त्याला आता बायको दिसत नव्हती, पोरं दिसत नव्हती, पोराचं ‘बालभारती’चं पुस्तक दिसत नव्हतं. त्याला दिसत होती ती फक्त म्हसोबाची विहीर. गणपततात्याच्या हाका सुरूच होत्या. तेवढ्यात सुखदेवच्या नजरेसमोरच्या मेरावरल्या बाभळीवरून कावळ्यांचा भलामोठा कावकावीचा थवा उठला अन् आबगीच कुठून धुळीची भोवरी गरगरत वेटाळून गेली. भोवरी अशी की छोटे छोटे दगड-खडेही तिच्यात भिरभिरू लागले. सुखदेव भोवरीत सापडला. तो हेलपाटून गणपततात्याच्या वावरात पडला. गणपततात्या धावला. त्यानं सुखदेवला सावरलं.
‘‘काय रं गड्या, भोवरीत घावला व्हता...तुहं नशीब बळजोर म्हनून वाचलायसा. ही काय सादीसुदी भवरी न्हवती!’’
‘‘.........................!’’
‘‘सुकदेवा, उठून बस लेका...,’’ सुखदेवला उठवून बसण्याला मदत करता करता गणपततात्या म्हणाला.
सुखदेव डोळे चोळत उठून बसला. जरा सावरल्यासारखा झाला, असं पाहून गणपततात्या म्हणाला:
‘‘काय रं गड्या, वाचला बरं का तू.’’
‘‘तसा बी भवरीत अडकलू हायेच की. ही भवरी तं गेली निंगून, दुसरी बोकांडी बसलीया...’’
‘‘तुह्याच यकट्याच्या का बोकांडीय ती? ती सोड बिट्या, तू कुढं निंगाला व्हतास ती सांग आदुगर...’’
‘‘काय न्हाई तात्या, आसंच निंगालो हुतो.’’
‘‘काय सांगंतोस गड्या? उगा उन्हानं का माहं क्यास काळ्याचं ढवळं झाल्यात? आरं, आल्याल्या संकटाला पाठ दिऊन का कुढं पळून जाता येतं? तुह्यापरास मोप दुख म्या पाह्यलंय, पर हारलो न्हाई कंदी. झाडागत मुळ्या खोल रुतून उभाच ऱ्हायलो! पळालो न्हाई!’’
‘‘न्हाई तात्या, आरं गाईसाठी काय निळावल्ला चारा घावतो का कुढं ती बघाया निंगालो हुतो.’’
‘‘माह्याकून घिऊन जाय. इकड तिकडं धुंडन्यापरास!’’
‘‘बरं व्हईल, माही पायपीट तरी वाचंल!’’
असं जरी सुखदेव म्हणाला असला तरी म्हसोबाची विहीर काही तो विसरला नव्हता. तो उठला अन् म्हसोबाच्या विहिरीकडे निघाला. चालता चालता म्हणाला : ‘‘तात्या, नांगरून टाकायचं ना वावर... काय अवखदा न्याहाळत बसलाय?’’
‘‘ल्येका, आपल्या त्वांडातला घास तं त्यानं हिसकिवला! चिमनीपाखरांच्या त्वांडात जाऊं दी चार दानं. त्यायच्या तोंडचा घास आपुन का हिसकून घ्यायाचा?’’
या वाक्यासरशी सुखदेवच्या डोक्यात काय आलं ते माहीत नाही. तो गरकन् वळला. त्याच्या डोक्यात पोराचं ‘बालभारती’चं पुस्तक घोळू लागलं. म्हसोबाची विहीर मागं पडली अन् घर जवळ येऊ लागलं. ते इतकं जवळ आलं की ‘बालभारती’च्या पुस्तकातले धडे त्याला टवटाळ ऐकू येऊ लागले! वावरातल्या काशा वेचून बांधावर टाकाव्यात तसे कडू-काळे विचार त्यानं डोक्यातून उपटून फेकून दिले.
दु:खाला हरवण्याची गणपततात्याची गोष्ट ‘बालभारती’च्या पुस्तकातून आरू वाचून दाखवत होता अन् सुखदेव ती मन लावून ऐकत होता...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com