लाल पाण्याची बावडी (ऐश्वर्य पाटेकर)

aishwarya patekar
aishwarya patekar

सुली कुणालाच काही उत्तर द्यायची नाही. नुस्ती हसायची. मात्र आतून उदास व्हायची. बसल्या जागी बोटानं माती टोकरीत राहायची. माती टोकरता टोकरता स्वस्तिकाची नक्षी.. कमळाचं फूल.. बदामाची फुली मातीत उमटून यायचं.. याचा काय अर्थ लावणार?

दोघी मैतरणी
दोघी यकाच जीवाच्या
यक फांदी यक फूल
दोघी यकाच रूपाच्या

दोघी मैतरणी
यक आभाळ गोंदून
वाटच्या गा वाटसरा
डोळे जाशी का मोडून?

दोघी मैतरणी
दोघी पाणीया निघाल्या
गेल्या पाण्याच्या व्हऊन
नाही घरी परतल्या...

सुली मुकी झाली. म्हणजे ती बोलतच नव्हती असं नाही; ती गावाबाहेरच्या बावडीवर म्हणजे विहिरीवर तासन्‌तास बसायची. बावडीच्या तळाशी काहीतरी बोलायची! पण तिचं बोलणं हे फक्त तिलाच ऐकू येणारं! हातात सुंदर पाचूच्या खड्यांनी मढवलेला नक्षीदार कुंकवाचा करंडा. तो तिच्यापासून जसा कुणी हिसकावून घेणार होतं. त्याला साडीच्या पदराआड लपवायची. साडीच्या पदराच्या चिंध्या झालेल्या. त्या चिरगुटातून तो करंडा मुद्दामच चमकून उठायचा. करंडा लपवल्याचं समाधान तिच्यापासून कुणी हिसकावून घेत नव्हतं. सुली सकाळ-संध्याकाळ बावडीच्या काठावरच बसून असायची. तिचा हा नित्यक्रम कधीच चुकला नाही.. ती काय बोलत होती बावडीच्या तळाशी? असं काय पुरून ठेवलं होतं बावडीच्या तळात? ही गोष्ट मी सांगतोय; म्हणजे मला ते ठाऊकय. सुली अन्‌ रुख्मी या दोन जिवलग मैत्रिणींची ही गोष्ट... अगदी सुरुवातीपासून सांगतो...

“ये रुख्मीऽऽ आवरलं का न्हायी बाई तुहं? बावडीवर तं चाललो आपण; फार अप्पाचोप्पा करून ऱ्हायलीय ! तिथं तुला कुणी जसं पाह्यलाच येणारंय! ज्यानं पाह्यचं, त्यानं तुला पसंत बी केलंय!” सुली एक घागर डोक्‍यावर अन्‌ एक कंबरेवर घेऊन रुख्मीच्या दारी उभी राहिली.
“सुले येना गं घरात! तुला मेकअपचं सामान दाखवायचंय!”
“संवसाजी निवांत येईन बाई!”
“आसं गं काय सुले?”
“ये बाईऽऽ तिकडं बावडीवर टँकर येऊन रिकामाबी व्हऊन जाईन; आपल्याला कपभर पाणी मिळायचं नाही. मग बसा हरीराम इठ्ठल करीत!”
“येगं कुडं आजून टँकर आलाय?”
“आला मंग?”
“तुला त काही माह्या लग्नाची हौसच न्हायी बाई!”
“ये बाई नको गाल फुगू!”

सुलीनं दारच्या ओट्यावर घागरी ठेवल्या; अन्‌ चुंबळ हातात घेऊन घरात आली. पाच दिवसांवर तर आलं होतं रुख्मीचं लग्न. सुलीला तिच्या मैत्रिणीचा शब्द काही मोडता आला नाही. खरंतर रुख्मीचं लग्न व्हावं ही तिची मनोमन इच्छा; पण आता आपली ही मैत्रीण आपल्याला सोडून जाणार; म्हणून तिच्या काळजात मोठा खड्डा पडला होता. रुख्मीचं लग्न दूर ठेवून, तो खड्डा बुजवण्याचा सुली खूप प्रयत्न करायची; पण वास्तव असं कशाच्याही रूपानं धपकन तिच्यासमोर उभं राहायचं. म्हणजे सुलीला असं वाटत नव्हतं, की आपल्या मैत्रिणीचं लग्न होऊच नये. दोघींनी एकमेकींच्या लग्नाची केवढी स्वप्नं पाहिली होती. एकमेकींना करवल्या जाणार होत्या त्या. मग असं काय झालं, की ती रुख्मीचं लग्न दूर ठेवू पहात होती?
सुली अन्‌ रुख्मीच्या मैत्रीचं गावभर अप्रूप. रानात शेण्या वेचायला, पाणवठ्यावर पाणी आणायला; शेळीला गवत घ्यायला, नदीवर धुणं धुवायला, शेतात निंदणी-खुरपणी करायला, काश्‍या वेचायला... एवढंच काय, शाळेतही बरोबर अन्‌ बेंचवरही एकाच. आयाबाया तर रुख्मीचं लग्न ठरल्यापासून सुलीला म्हणायलाही लागल्या होत्या,
“ये सुल्याबाई तुही जोडीदारीन तर चालली! तुला सोडून... तुहं कसं व्हावं?”
“तुला गमंल का तिच्याबिगर?”
“आमाला त वाटलं, तूही जाते की काय तिच्यासंगं!”
“तुहे गं हात कधी पिवळं व्हनार?”
“एका आईच्या गर्भातून नळकल्या जशा; एकमेकींना घासाला इसरती न्हायी!”
“एका आईच्या गर्भातून नळकलेल्याबी एकमेकींवर जीव टाकत न्हायी, एवढ्या जिवाच्या हायेत त्या!”
“तुम्च्या मैत्रीला दृष्ट लागू नये म्हण्जे झालं!”
सुली कुणालाच काही उत्तर द्यायची नाही. नुस्ती हसायची. मात्र आतून उदास व्हायची. बसल्या जागी माती बोटानं टोकरीत राहायची. माती टोकरता टोकरता स्वस्तिकाची नक्षी... कमळाचं फूल... बदामाची फुली मातीत उमटून यायचं... याचा काय अर्थ लावणार?
सुली पहात राहिली, चमक भरल्या डोळ्यांनी रुख्मीचं मेकअपचं सामानं. कुंकवाचा करंडा तिच्या हाताला लागला. आनंदानं उचंबळून सुली म्हणाली,
“ये बाईऽऽ करंडा तर कित्ती छानय न्हायी!”
“होन नं, गौरीलाबी फार आवडला!”
“अगं हायेच तसा!”
“पाचूच्या खड्यात मढवलेला असा करंडा कुणाकडंच न्हायी. नशीबवानंय रुख्मी तू! तुला त्‌ लई हौशी माणसं मिळाले बाई!”
“सुले मला त्‌ बाई तुह्याबिगर करमायचं न्हायी!”
सुलीच्या तर गाई पाण्यावर आल्याच होत्या. तिला हुंदका फुटला. मग दोघीही जिवाचं अस्तर बराच वेळ उस्तरीत बसल्या!! जरा वेळानं उसासून सुली म्हणाली,
“रुख्मी म्या येनार बायी तुह्याबरोबर!”
“अगं दोन दिवसांची करवली म्हणून येता येईन, कायमचं थोडंच!”
“का न्हायी येता येनार गं!”
“यडबंगू रीतंय ती!”
“अशी कशी रीत गं ? झाडाच्या फांदीला कुऱ्हाडीचा तडाखा देऊन दोन भाग करनारी! रुख्मी ऱ्हावू नं आपण एकाच घरात!”
“कसं ऱ्हाता येईन?”
“का ऱ्हाता येणार न्हायी; जगात का सवत नसते का?”
“ये बाई, तू सवत बनणार का माही?”
“मग काय झालं? आपली मैत्री त्‌ तुटणार न्हायी!”
“चल मनचंदी कुणीकडंची! असं चालतं का?”
“का चालणार न्हायी!”
“सुले मैत्री वेगळी आन संसार वेगळा!”
“आपण सगळ्याच गोष्टी वाटल्या!”
“मग नवरा वाटते का? तुला चालणार असेल पण मला न्हायी!”
सुलीला खट्टू झालं. हातातली चुंबळ चुरगळली. काळजात काहीतरी दुभंगून गेल्यासारखं झालं. उदासीनं तिला घेरून टाकलं..
जरा वेळानं दोघीही बावडीवर आल्या. बायाच बाया अन्‌ बापेच बापे. ही गर्दी पाण्यासाठी. हंडेच हंडे, बादल्याच बादल्या! घागरीच घागरी! जत्राच! दोघींनी घागरी खाली ठेवल्या अन्‌ बायांच्या घोळक्‍यात जाऊन बसल्या. पाण्याचा टँकर अजून काही आला नव्हता. रिकाम्यारानी रुख्मीची खोड हंसा वहिनीनं काढलीच,
“अग्गोबाईऽऽ नवी नवरी बी पाण्याला आली!”
रुख्मी लाजली. सुलीच्या छातीवर डोकं ठेवून, तोंड लपवलं.
“बाईऽऽ बाईऽऽ अजून तर हळदही लागली न्हायी; तरी चेहरा बगा कसा पिवळा दिस्तोय!”
“हंसा येडी का खुळी? ती का आपल्यात ऱ्हायली का? ती जाऊन बी पोचली तिच्या माणसाकडं!”
“वैनी कायी पण बोलून ऱ्हायल्या बाई तुमी!” मुरका मारत रुख्मी म्हणाली.
“नको काही लटकं बोलायला बरं का! आम्हाला कळून ऱ्हायलंय मनात लाडू फुटून ऱ्हायलेय!”
“वैनी, म्या जातेच कशी!”
“पाहिलं का हंसा!”
“काय ग दुर्गा?”
“रुख्मी आताच जाते म्हणतेय!”
“कुडं गं?”
“तिच्या नवऱ्याला भेटायला!”
आता मात्र रुख्मी खरंच निघाली. दुर्गा वहिनीनं तिचा हात धरला अन् खाली बसवलं.
“सुले, तुहं कसं व्हावं, जोडीदारीन सोडून चालली नं बायी तुला!”
“रुख्मी हिला बी तुझ्या गावातला एकांदा नवरा बघ, म्हणजे दुरावा काही तुमच्यात ऱ्हाणार न्हायी!”
“ये, गपा गं मेल्यांनो, का चेष्टा करून ऱ्हायलाय लेकरायची!”
“मोठ्याई त्यांना एकमेकींशिवाय भाकरतुकडा काही गोड लागणार न्हायी!''
“गंज मैतरणी पाह्यल्या, पण यायच्या खालीच!”
“आत्या मी खरंच जाणारंय रुख्मीबरोबर!”
“कलवरी म्हणून ती तुलाच घेऊन जाईल!”
“आत्या कलवरी म्हणून न्हायी!”
“मंग ग?”
“.....................”


“तिची सवत म्हणून जाणार की काय तू?”
सुली काही बोलणार तोच पाण्याचा टँकर आला. असा गलका झाला, की कोण घागरी घेऊन धावलं, तर कोण हंडे घेऊन; बावडीला गराडा पडला. कडंच कडं माणसाबायांचं. ते कडं भेदण्यासाठी रेटारेटी ! टँकरचं पाणी पाइपातून बावडीत सोडलं नाही तोच बादल्या खणखणू लागल्या. त्यात एक बादली सुलीची; एक रुख्मीची! घडू नये ते घडलं! रुख्मीला कुणाचा तरी धक्का लागला. तोल गेला! बावडीच्या खडकावर रुख्मी आपटली. एकच हलकल्लोळ! पाणी रक्ताचं झालं. काळजात धस्सं झालं. लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. रुख्मीला वरती काढलं; पण ती कुठं राहिली होती. बावडीचा तळ शोधण्यातच तिनं मृत्यूचा ठाव घेतला होता. बावडीत उरलं होतं रक्ताचं लालजर्द पाणी. ते सांगू पहात होतं रुख्मीची कहाणी...
सुली डोळं विस्फारून नुस्तीच पहात राहिली. आपलीच का दृष्ट लागली आपल्या मैत्रिणीच्या कुंकवाच्या करंड्याला? आता कसं भरणार रुख्मी कुंकू भांगात? आपण कसं राहणार तिच्याशिवाय? एकाएकी सर्व गर्दीतून सुली पळत सुटली. कुठं गेली...? सुली रुख्मीच्या घरी आली. मेकअपच्या सामानातून तो मोत्याच्या खड्याखड्यांचा नक्षीदार कुंकवाचा करंडा हातात घेतला अन्‌ पायांना वाटा बांधून पळत सुटली ! बोलत राहिली करंड्याशी...

अन्‌ नंतर लोक बोलायला लागले की सुली वेडी झाली. तेव्हापासून ती बावडी तिच्या जिव्हाळ्याची झाली... किती दिवस, किती महिने, किती वर्षं उलटून गेली असली, तरी नियम बदलला नाही... त्यानंतर त्या बावडीत कितीदा तरी पाणी टाकलं गेलं; पण शेवटपर्यंत पाणी शुभ्र झालंच नाही. ते आणखी लाल होत गेलं. एक दिवस सुलीनं कुंकवाच्या करंड्यासकट लाल पाण्याचा ठाव घेतला. तेव्हा तर पाणी इतकं लाल... इतकं लाल... इतकं लाल... होत गेलं की कुंकू फिकं फिकं होत गेलं... पाणी आणखीनच लाललाल...!

सुली ही काही आतापर्यंत परकरी पोर राहिली असती का? म्हणजे रुख्मी असती तर तीही म्हातारी झाली असती; पण त्यांची मैत्री काही म्हातारी झाली नव्हती. नुकतीच शेणानं भुई सारवल्यासारखी; ताजी ताजी हिर्वीगार! सुली, रुख्मी, कुंकवाचा करंडा अन्‌ लाल पाणी! हे अजूनही आईच्या लक्षात आहे. तिनंच तर सांगितलीय मला ही गोष्ट ! अन्‌ आईनं असंही सांगितलं, की लोक म्हणायचे, की रुख्मीला सुलीनंच बावडीत ढकललं! पण हे बिलकूलही खरं नाही!
- आजही त्या बावडीचं पाणी लालंच आहे अन्‌ लाल पाण्याची बावडी म्हणूनच ती गावात प्रसिद्ध आहे...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com