esakal | एका लग्नाची गोष्ट (अनिल गुंजाळ)

बोलून बातमी शोधा

anil gunjal

आशा घरी पोचली, मनातले विचार काही कमी होत नव्हते. घरातली सायंकाळची सर्व कामं आटोपून जरा वेळ तिला मिळणार होता. अजून दिनेशही घरी आला नव्हता. आई भाजी निवडत होती आणि बाबा टीव्ही पाहत बसले होते. आशा तशी आज शांतच होती, हे त्या दोघांच्या लक्षात आलं होतं. तिनं ‘‘जरा डोके दुखत आहे,’’ म्हणत त्यांच्याशी बोलणं टाळलं आणि काम पूर्ण केलं. कधी एकदा टेरेसवर जाऊन दिशाशी बोलेन असं तिला झालं होतं.

एका लग्नाची गोष्ट (अनिल गुंजाळ)
sakal_logo
By
अनिल गुंजाळ

आशा घरी पोचली, मनातले विचार काही कमी होत नव्हते. घरातली सायंकाळची सर्व कामं आटोपून जरा वेळ तिला मिळणार होता. अजून दिनेशही घरी आला नव्हता. आई भाजी निवडत होती आणि बाबा टीव्ही पाहत बसले होते. आशा तशी आज शांतच होती, हे त्या दोघांच्या लक्षात आलं होतं. तिनं ‘‘जरा डोके दुखत आहे,’’ म्हणत त्यांच्याशी बोलणं टाळलं आणि काम पूर्ण केलं. कधी एकदा टेरेसवर जाऊन दिशाशी बोलेन असं तिला झालं होतं.

फोनची रिंग वाजत होती. आशा सकाळी सकाळी लगबगीनं ऑफिसला जात होती. बसमधली नेहमीची गर्दी, धड नीट उभं राहता येत नव्हतं. एकदाची बसमधून खाली उतरली. तिनं मोबाईलकडे पाहिलं, तर पाच ते सहा कॉल येऊन गेल्याचं दिसत होतं. नंबरही अनोळखी होता. त्यामुळे कोण असेल या विचारानं तिनं पुन्हा मोबाईल पर्समध्ये ठेवून दिला आणि ऑफिसला गेल्यावर पाहू म्हणून चालू लागली. बसस्टॉपपासून ऑफिसला पोचायला तिला आठ ते दहा मिनिटं लागणार होती. पुन्हा एकदा वाजल्याचा तिला भास झाला; पण जाऊ दे म्हणून तिनं तो घेतला नाही. आधीच पाच दिवसाच्या आठवड्यामुळे ऑफिसची वेळ पावणेदहाची केली होती. त्यामुळे सकाळी उठून आई, बाबांचं, चिरंजीवाचं सगळं करून निघणं यामुळे वेळेत पोचणं ही एक कसरत दररोज करावी लागत असे.

ऑफिसला पोचल्यावर तिनं आलेल्या कॉलला उत्तर द्यायला म्हणून मोबाईल काढला आणि तोच नंबर पुन्हा स्क्रीनवर दिसत होता. तिनं तो कॉल घेतला आणि हॅलो म्हणाली. पलीडून अनोळखी आवाज येत होता. ‘‘हॅलो काकू, मी दिशा बोलतेय.’’ ‘‘कोण दिशा?’’ असं आशानं विचारलं. ‘‘अहो काकू, मी दिशा- तुमची चुलतपुतणी बोलतेय.’’ दिशाचा माळशिरसहून कॉल होता. वीस वर्षांपूवी पाहिलेली चिमुरडी पोर आशाला आठवली. आता ती तशी बावीस-तेवीस वर्षांची झाली असेल. तिनं तिकडून बोलायला सुरुवात केली. ‘‘हॅलो काकू, अगं! ओळखलंस का? मी दिशा, तुमची पुतणी. दादांना तुमच्याशी बोलायचं आहे.’’ तिच्या नवऱ्याला घरातले सगळे दादा म्हणतात याचा तिला कधीच विसर पडला होता. आता अचानक आठवलं आणि तिनं फोन ठेवला.

आशाच्या मनात ऑफिसचं काम करताकरता सर्व विचार घोंगावू लागले; पण सविस्तर बोलता येत नव्हतं, म्हणून तिनंच पुन्हा फोन केला आणि पुतणीला सांगितलं : ‘‘अगं, मी आता ऑफिसला आहे, संध्याकाळी तुझ्याशी घरी गेल्यावर निवांत बोलेन.’’ आणि तिनं कामाला सुरुवात केली. का कुणास ठाऊक; पण आता तिचं मन ऑफिसमध्ये रमत नव्हतं. चेहरा वेगळाच दिसत होता. बाकीच्या मैत्रीणींसोबत ती मोजकंच बोलत होती. ऑफिसमध्येही कोणालाही ती एकटी आई-बाबांकडे राहते हे माहीत नव्हतं. तिचा मुलगा दिनेश बारावीत शिकत होता. गळ्यातलं मंगळसूत्र तसंच होतं. त्यामुळे कोणी विचारायचा प्रश्‍नच नव्हता आणि मंगळसूत्र तिचं होतं. धनी सोबत नाही याचं दु:ख होतंच. दुसऱ्यांसारखा संसार करता येत नाही याची सल होती; परंतु तेच मंगळसूत्र तिचं रक्षक होतं. यामुळे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो हे तिच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे इच्छा नसूनही ती ते घालत होती.

कामावर असलेल्या अनेकांमध्ये एक तिची जीवाभावाची मैत्रीण होती जिच्याजवळ आशा मनातलं सर्व काही सांगू शकत होती; पण आता तिच्याशीपण बोलणं शक्‍य नव्हतं. म्हणून काम करताकरता ती लंचटाईमची वाट पाहत होती, वेळा मिळाला की कधी चित्राशी बोलेन असं तिला झालं होतं.

काम आटोपलं आणि घड्याळाकडे लक्ष जाताच लंचटाईम झाला हे कळलं. चित्राला आशाचा चेहरा आज वेगळाच दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरचा भाव, मनातली चलबिचल समजत होती. जेवण संपलं आणि आशानं बोलायच्या आत चित्रानं विचारायला सुरुवात केली. ‘‘काय मॅडम, आज काय चाललंय?’’ ‘‘काही नाही’’ असं आशा म्हणाली. ‘‘नाही काय, मला समजतं सगळं, सांग काय झालं ते,’’ असं म्हणून दोघी थोडा फेरफटका मारायला बाहेर पडल्या, अजून लंचटाईम संपायला दहा मिनिटं होती. आशा म्हणाली : ‘‘अगं आज पुतणीचा फोन आला होता. ती म्हणत होती दादाला तिच्याशी बोलायचंय, म्हणजे माझा नवरा गं!’’ चित्रानं चेहऱ्यावर आश्‍चर्य व्यक्त करत विचारलं : ‘‘काय म्हणतेस, त्याला का गं तुझी आठवण झाली, लग्न बिग्न केलं की काय त्यानं?’’ ‘‘नाही गं, तो काय करतोय, त्यांच्यात काही सुधारणा तर व्हायला पाहिजे ना? अजून तसाच आहे.’’ असं म्हणत आशानं चेहरा फिरवला.
‘‘जाऊ दे गं! तुला काय करायचं?...पण काय म्हणाला ते तर सांग’’
‘‘अगं बोललेच नाही मी. मी तिला सांगितलं, सायंकाळी बोलेन म्हणून.’’ ‘‘बरं मग बोलून घे गं! बघू तरी काय म्हणतोय ते!’’ असं म्हणत दोघी पुन्हा ऑफिसमध्ये आल्या.
आशा घरी पोचली, मनातले विचार काही कमी होत नव्हते. घरातली सायंकाळची सर्व कामं आटोपून जरा वेळ तिला मिळणार होता. अजून दिनेशही घरी आला नव्हता. आई भाजी निवडत होती आणि बाबा टीव्ही पाहत बसले होते. आशा तशी आज शांतच होती, हे त्या दोघांच्या लक्षात आलं होतं. तिनं ‘‘जरा डोके दुखत आहे,’’ म्हणत त्यांच्याशी बोलणं टाळलं आणि काम पूर्ण केलं. कधी एकदा टेरेसवर जाऊन दिशाशी बोलेन असं तिला झालं होतं.

एकदाची आशा काम आटोपून टेरेसवर पोचली आणि तिनं दिशाला फोन लावला. तिच्या छातीत धडधड होत होती. एवढ्या वर्षानंतर ती नवऱ्याशी बोलणार होती. तो आता बोलण्याच्या अवस्थेत असेल का? याचाही विचार तिच्या मनात येऊन गेला. फोन लागला आणि तिकडून दिशाचा आवाज आला. ‘‘काकू, अगं मी वाटच पाहत होते, दादा किती वेळ झाले मागं लागलेत फोन करू म्हणून, मी त्यांच्याकडे देते,’’ म्हणत तिनं फोन दत्तूकडे दिला. ‘‘हॅलो आशा, मी बोलतोय...’’ आणि शांतता झाली. तिला काय बोलावं सुचेना. तिनं नुसताच हं म्हणून होकार दिला. त्यानं बोलायला सुरुवात केली. ‘‘मला माहीत आहे तू रागावली आहेस, माझं हे असं अजून चालूच आहे; पण एक सांगू का? अगं माझी नोकरी गेली; पण माझ्या नोकरीवर असतानाचे फंडाचे पैसे माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. ते दिनेशला द्यायचे होते.’’ तो तिकडून बोलत होता आणि आशा फक्त ऐकत होती. दत्तूच्या खात्यावर एक लाख सत्तर हजार रक्कम त्यांच्या फंडाची जमा होती. त्यातले काही पैसे त्यानं उधारीचे मिटवले होते आणि आता फक्त एक लाख वीस हजारापर्यंत रक्कम शिल्लक होती. त्यातली त्याला काही मुलाला द्यायची इच्छा होती. पैसे घ्यावेत किंवा कसे याचा विचार तिच्या मनात येत होता. मुलगा तर त्यांना ओळखणारही नाही, कारण गेल्या वीस वर्षांत त्यानं त्यांना पाहिलेलं नव्हतं आणि ते कधी तो आईला विचारतही नसे. आईचा घटस्फोट झालाय आणि ती तिच्या आईकडेच राहते, एवढंच त्याला माहीत होतं- कारण दहावीपर्यंत तो हॉस्टेलमध्ये होता.
फोन चालूच होता. तिनं त्याला ‘‘उद्या सांगते’’ म्हणून फोन ठेवला. त्याचा नंबर पुतणीकडून घेतला आणि मोबाईलमध्ये सेव्ह केला. तेवढ्यात खालून आईच्या आवाजानं ती भानावर आली. कारण झोपायची वेळ झाली होती. एव्हाना दिनेशही घरी आलेला होता.

सकाळी उठली आणि भरभर काम आटोपून लवकर ऑफिसला जायचे होते. निदान चित्राशी बोलून त्याच्याशी बोलणार होती. लवकर पोचली, चित्राही आली होती. चित्रानं तिला समजावलं. हे पैसे असेच वाया जाण्यापेक्षा निदान मुलाच्या पुढच्या शिक्षणाला तरी होतील. सर्व साधक बाधक, फायदे तोटे यांचा विचार करून पैसे घ्यायचे आणि पुढे काय करायचं ते नंतर बघू असं दोघींचं ठरलं आणि ऑफिसच्या कामाला सुरुवात झाली.
सायंकाळी तिनं त्याला फोन केला आणि पैसे कधी आणायचे यासाठी जायची तारीख निश्‍चित केली. आशासोबत चित्रानंही यायचं कबूल केलं होतं. दिनेश, आई-बाबांनाही समजावल्यावर तेही तयार झाले. आशानं आणि चित्रानं पैसे गावच्या बॅंकेत जाऊन काढले आणि तिथंच दिनेशच्या खात्यावर भरले. आशा वीस ते बावीस वर्षांनी दत्तात्रयला भेटत होती. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. तशी आशा शहरात राहिल्यामुळे बाहेरून शिक्षण घेऊन नोकरी करत असल्यानं नेटकेपणानं बोलत होती. तो अजून तसाच होता; पण तो सुधारेल अशी उगाचच आशा चित्राला त्याच्या डोळ्यात दिसत होती. संवाद झाला. तिघांनी मिळून जेवण घेतलं आणि पुन्हा त्या दोघी शहराच्या दिशेनं आणि दत्तू गावाच्या दिशेनं गेले.

येताना चित्रानं आशाला सांगितलं : ‘‘अगं, माझ्या ओळखीच्या एका डॉक्‍टरांचं व्यसनमुक्ती केंद्र आहे. आपण त्यांना तिथं ठेवू या का? मला वाटतं त्यांचं व्यसन नक्की सुटेल, तो सुधारेल आणि आपण माणूस म्हणून एवढे करूया. त्याला असंच वाऱ्यावर सोडलं, तर काही दिवसांनी तो गेल्याची बातमी येईल आणि आपण हळहळ करत बसू.’’ आशा तिच्याकडे पाहून फक्त शांतपणे ऐकत होती. तो सुधारेल यावर तिचा विश्‍वास नव्हता. तिनं त्याचं सर्व रंगरूप पाहिलं होतं. त्याचा मार सहन केला होता; पण का कुणास ठाऊक चित्रा तिच्या मताशी ठाम होती. नाहीतर त्याच्या पैशावर आता आपला तसा काहीच हक्क नव्हता असंही वारंवार आशाला वाटत होतं. चित्राचं म्हणणं तिला पटत होतं. जमा झालेल्या लाखापैकी पन्नास हजार आपण त्यांच्यावर खर्च करू असं ठरलं. त्याला किमान तीन महिने दवाखान्यात ठेवावं लागणार होतं. पुढची सर्व योजना तयार झाली. अशातच दोघींची गाडी स्टॅंडवर पोचली आणि दोघी आपापल्या घरी निघून गेल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा फोन आला. तिनं बसमध्ये आहे म्हणून बोलणं टाळलं. आता दररोज सकाळ-सायंकाळी त्याचा फोन येत होता. ती मोजकीच त्यांच्याशी बोलत असे. ती भेटून गेल्यावर आजपर्यंत काहीच घेतलं नाही, व्यसन केलं नाही असं त्यानं तिला सांगितलं. तिला फार बरं वाटत होतं; पण आता तो कधीही फोन करू लागला होता. तिच्या कामात असताना त्यांच्याशी बोलणं शक्‍य नव्हतं. म्हणून कधीकधी ती रागानं त्याला ‘सायंकाळी बोलते’ असं सांगत होती. चित्राशी तिचं या विषयावर बोलणं सुरूच होतं. आता त्या दोघी भेटल्या, की त्यांचा एक विषय म्हणजे आशाचा नवरा आणि त्याचं पुढं काय करायचं ते.

चित्रानं डॉक्‍टरांशी बोलून, दोघींनी दवाखाना पाहून सर्व शंका विचारून झाल्या होत्या आणि आज त्या दोघी त्यांच्याशी बोलणार होत्या. आशानं ऑफिस सुटल्यावर त्याला फोन केला आणि सर्व माहिती सांगितली. त्यानं होकार दिला. दवाखान्यात पुढच्या आठवड्यात त्याला ॲडमिट करायचं हे नक्की झालं. दोघींनी किती पैसे भरायचे काय काय साहित्य लागेल याची माहिती घेऊन यादी केली. चित्राला वारंवार तो सुधारेल आणि नंतर तो कसा दिसेल याची स्वप्नं पडत होती आणि ती आशाला बोलून दाखवत होती. एक दिवस चित्रा म्हणाली : ‘‘अगं आशा, तो बरा झाल्यावर राहशील त्याच्या सोबत?’’ ती एकदम दचकली आणि म्हणाली : ‘‘नाही, मी नाही राहणार. आता तो एक माणूस म्हणून मी त्याच्याकडे पाहते आणि माणुसकी म्हणून हे काम आपण करणार आहोत. अगाच मला त्याचे पैसे घेतले म्हणून अपराधी वाटायला नको, म्हणून आपण हे करायचं.’’

तो दिवस उजाडला. आज दत्तूला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करायचं होतं. दोघी त्याला स्टॅंडवर घ्यायला जाणार होत्या. ठरल्याप्रमाणं दत्ता एसटीनं गावाहून आला आणि त्या दोघी एका ओला कारमध्ये बसवून तिथं घेऊन गेल्या. आशा पूर्ण प्रवासात सांगत होती. चित्रानं सर्व काही समजून सांगितलं. गेल्या काही दिवसांत त्यानंही कोणतंच व्यसन केलं नाही असं दिसत होतं.
केंद्रातली त्याची दररोजची दिनचर्या सुरू झाली. तिथलं मार्गदर्शन, समुपदेशन, व्याख्यानं, वाचन यावर त्याच्यावर सकारात्मक परिणाम दिसत होते. त्याला फार दिवस ठेवावं लागेल असं वाटत नव्हतं. प्रगती खूप वेगानं होत होती. भेटीच्या दिवशी डॉक्‍टर त्यांच्यातल्या गुणांबद्दल, सहकार्याबद्दल भरभरून बोलत होते. पाहता पाहता एक महिना झाला. या मधल्या महिन्यात चित्रानं त्याच्यासाठी राहायची, खायची आणि नोकरीची व्यवस्था केली होती. त्याचं शिक्षण फार काही झालं नव्हतं. तो बाहेर आला, की सर्व व्यवस्था करायची आणि त्याला चांगल्या मार्गाला लागलेलं पाहायचं अशी इच्छा चित्राची होती. तो मध्येच फोन करून आशाला विचारत होता : ‘‘आपण एकत्र राहायचं का?’’ पण तिचा त्याला नकार होता. तसंच तिनं बोलून दाखवलं नाही; पण चित्राला तसं ठाम सांगितलं होतं. यातून चित्राच्या मनात एक कल्पना आली आणि ती तिनं आशाला सांगितली. ती तर हे ऐकून उडालीच. ‘‘अगं काय सांगतेस तू हे, हे शक्‍य आहे का?’’ ‘‘का नाही? आपण त्याचं लग्न लावून देऊ. तुझ्या नवऱ्याचं लग्न.’’ आशा उद्‌गारली : ‘‘अगं कोण करेल त्यांच्याशी लग्न?’’

सुटकेच्या दिवशी दत्तू मनानं आनंदी दिसत होते. त्या दोघींनी केलेलं काम म्हणजे देवाचे उपकार आणि त्यांचे आभार असं तो मानत होता. तसं त्यांचं वय ४५-४६ असेल. त्यामुळे त्याला बायको तशी मिळणार आणि त्याचाही संसार आनंदानं सुरू होईल अशा आशा सर्वजण बाळगून होते.
दत्तात्रय बाहेर येऊन आठवडा उलटून गेला. त्याची नोकरी सुरू झाली आणि याच काळात चित्राला वधूवर सूचक मंडळाकडून फोन आला. दत्तूची माहिती आणि फोटो पाहून एक बाई लग्नाला तयार झाल्याचं तिला समजलं. सुमित्रा हे तिचं नाव. तिचंही वय साधारण ४०-४२ होतं. अल्पशा आजारानं नवरा गेला होता. घरातली एकुलती एक होती. वृद्धापकाळामुळे गेल्या दोन वर्षांत एकापाठोपाठ एक आई-वडील तिला सोडून गेले होते. आजपर्यंत तीच त्यांचा आधार होती. स्वत:चं घर होतं आणि नोकरीही होती. तिला चित्रानं सर्व माहिती सांगितली. काहीही लपवून ठेवायचं नाही, असं आशानं तिला सांगितलं होतं.

या स्थळाची माहिती केंद्रातल्या पुढील उपचाराच्या भेटीत चित्रानं आणि डॉक्‍टरांनी दत्तात्रयला सांगितली. त्यानंही पुन्हा एकदा आशाकडे पाहत होकार दिला. अजूनही त्याचं मन आशात घोटाळत होतं, असं वाटत होतं; पण तिच्या मनाविरुद्ध आपण काही करायचं नाही असा पक्का विचार त्यानं केला होता आणि तो तयार झाला आणि पुढच्याच आठवड्यात रजिस्टर लग्न करायचा निर्णय डॉक्‍टरांनी दत्तूला सांगितला. दवाखान्यात सुमित्रालाही चित्रानं बोलावलं होतं. डॉक्‍टरांची, समुपदेशकांची दोघांसमवेत भेट झाली. त्यांनीही त्या दोघांना आयुष्य किती सुंदर आहे, ते कसं जगायचं याचं भान दिलं.

डॉक्‍टर, समुपदेशक, आशा, चित्रा यांच्या रजिस्टरवर सह्या झाल्या. त्याअगोदर विवाह नोंदणी अधिकाऱ्यानं दोघांच्या सह्या घेतल्या होत्या. यावेळी आशाचे आई-वडील, बहिणी, मुलगा, दिनेशही उपस्थित होते. विवाह नोंदणी अधिकाऱ्यांनी दोघांना एकमेकास हार घालण्याची सूचना दिली. दिनेशनं मोबाईलमध्ये या क्षणांची नोंद केली. हा सगळा प्रसंग कार्यालयातील कर्मचारी आनंदानं मनात साठवत होते. कारण त्यांच्या कार्यालयात पहिल्यांदाच पूर्वीची बायको, मुलगा आणि सासू-सासरे उपस्थित होते आणि एका बायकोनं आपल्या नवऱ्याचं आनंदानं लग्न लावून दिलं होतं. सगळ्यांनी दोघांना गाडीत बसवलं आणि प्रेमानं निरोप दिला.