मे आय कम इन टीचर? (अनिल पाटील)

anil patil
anil patil

आजोबांनी दटावल्यामुळे आज मात्र नात ईशूची पंचाईत झाली. वय वर्षं अवघं सहा; पण भयंकर स्वाभिमानी. माझ्या बेडरूमच्या दारापाशी येऊन हळूच डोकावून पाहू लागली. मी ढीम्म. तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. मग अचानक तरातरा तिच्या स्टडीरूममध्ये गेली. पाचच मिनिटांत काही तरी लिहिलेला एक कागदाचा चिटोरा घेऊन आली. दबक्‍या पावलांनी हॉलमधून माझ्या बेडरूमपाशी आली. तिनं अंदाज घेतला आणि मी गाफील आहे, असं समजून लगेच थोडीशी दाराजवळ आली आणि क्षणार्धात हातातला तो कागदाचा चिटोरा दाराजवळ टाकून तिच्या रूमकडे पसार झाली.

कोरोना- घरबंदी- कुठं जाणं नाही, कोणाचं येणं नाही. घरातल्या मोजक्‍या सदस्यांसोबतच म्हणजे पत्नी सुनीता, चिरंजीव धीरज, सून अनुजा आणि सहा वर्षाची नात ईशान्वी ऊर्फ ईशू यांच्याबरोबर सकाळचं चहापाणी नाष्टा, भोजन, मग दुपारचा चहा, आणि शेवटी रात्रीचं जेवण हे सर्व टीव्हीवरचं "रामायण', "महाभारत', "मोगली', बातम्या आणि ईशूकरता खास घेतलेली विविध कार्टून चॅनेल्स यांच्यासोबतच पाहत मस्त दिवस चालले असताना दुपारी ईशूनं भोजनोपरांत बातम्या पाहण्याची इच्छा असताना कार्टून पाहण्याचा हट्ट केला. बालहट्ट- कायम करणार, मान्य केला.
झालं, जेवण झाली, अर्धा तास, एक तास, दीड तास झाला. "आता तरी आम्हाला थोड्या बातम्या बघू दे,' म्हणून रिमोट घेऊन चॅनेल बदलण्याचा प्रयत्न केला; पण ईशूनं गोड बोलत चपळाईनं रिमोट आमच्या हाती लागू दिला नाही आणि तिला आवडणारं कार्टून पाहत बसली.

मी नाराजीनं तिला थोडं दटावलं आणि तिच्यासमोरच पत्नीला सांगितलं ः 'आज्जी, ईशूबरोबर तू हॉलमध्येच थांब, मी आपल्या बेडरूममध्ये चाललोय, लिखाण करायचं आहे. तुम्ही बेडरूममध्ये येऊन मला डिस्टर्ब करू नका.''
झालं, ईशूचा चेहरा लगेच कावराबावरा झाला.
मी लटकेच रुसल्याचं नाटक चालू ठेवलं आणि आमची बेडरूम गाठून स्टडी युनिटमध्ये लिखाण सुरू केलं. आता मात्र ईशूची पंचाईत झाली. कारण भोजनोत्तर आमच्या बेडरूममध्ये तिचा आवडता "स्कूल- स्कूल' हा आमचा तासाभराचा रोजचा कार्यक्रम असतो.

त्यामध्ये बहुदा खूपदा तीच टीचरचा रोल करते आणि मला विद्यार्थी व्हावं लागतं. मग पठ्ठी तिच्या या शिक्षिकेच्या भूमिकेचा पूर्ण फायदा घेऊन आजोबाला म्हणजेच म्या पामराला चांगला दम देणं सुरू करते. म्हणजे ः 'अनिल, ओपन युअर नोट बुक, पे अटेन्शन, नो नॉईज, राईट फाइव सेन्टेन्सेस अबाऊट आवर स्कूल. इफ फाऊंड मिस्टेक, आय विल थ्रो युअर कॉपी इन डस्टबिन...'' वगैरे वगैरे.
मग माझा टीचरचा रोल सुरू होतो आणि ती माझी विद्यार्थिनी. तिच्याच क्‍लासमधली शौनक, अन्वया आदी मुलं हजर आहेत असं समजून मला त्यांना काही तरी कारणं काढून रागे भरायला सांगते. खोटी खोटी परीक्षा घ्यायला लावून स्वतःला जास्त मार्क द्यायला लावते. मग मेडल, सर्टिफिकेट आणि लुटूपुटूचं कॅश ऍवॉर्डही स्वतःच घेते. अशा प्रकारे चाललेल्या "स्कूल स्कूल' खेळाला कुटुंबातले अन्य सदस्यही हजर राहून आनंद लुटत असतात..

पण आज मात्र तिची पंचाईत झाली वय वर्षं अवघं सहा; पण भयंकर स्वाभिमानी. आजोबा तर लाडके आणि अतिशय प्रेम. अर्थात तिनं माझं बोलणं ऐकलं होत. तिची चलबिचल सुरू झाली. चेहरा कावराबावरा. पत्नी पाहतच होती तिच्या नकळत.
माझ्या बेडरूमच्या दारापाशी येऊन हळूच डोकावून पाहू लागली. मी ढीम्म. तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. मग अचानक तरातरा तिच्या स्टडीरूममध्ये गेली. पाचच मिनिटांत काही तरी लिहिलेला एक कागदाचा चिटोरा घेऊन आली. दबक्‍या पावलांनी हॉलमधून माझ्या बेडरूमपाशी आली.
माझं पण तिच्या नकळत तिच्यावर लक्ष होतेच. पण मी वाचनात गुंग असल्याचं नाटक करत होतो. पत्नीच्या हातात मोबाईल होताच. ईशूला माहिती नव्हतं, की आजी दबक्‍या पावलांनी तिच्या मागंच उभी आहे.
तिनं अंदाज घेतला आणि मी गाफील आहे, असं समजून लगेच थोडीशी दाराजवळ आली आणि क्षणार्धात हातातला तो कागदाचा चिटोरा दाराजवळ टाकून तिच्या रूमकडे पसार झाली. पत्नीनं हे सर्व अचूक मोबाईलमध्ये टिपलं. मी पत्नीकडे पण लक्ष दिलं नाही. वाचन चालूच.
पत्नी आता आत प्रवेशती झाली आणि माझं लक्ष ईशूने दरवाजाजवळ टाकलेल्या त्या कागदाच्या चिटोऱ्याकडे वेधलं. म्हणाली ः 'तुमची लाडकी ही चिठ्ठी टाकून देऊन टम्म फुगून हॉलमध्येच बसली आहे.''
मी उठलो. दरवाजाजवळ पडलेली ती चिठ्ठी उचलली. काय लिवलंय बरं पोट्टीनं, बघू तरी.
पेन्सिलीनं इंग्रजीमध्ये तिनं असं लिहिलं होतं ः
Why I AM NOT Allowed in Your ROOM?
FROM ISHU.

पत्नीनं पण वाचली. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. माझे पण डोळे डबडबले. आनंदाश्रू होते ते. मी पुसले नाहीत. बालमनातली निरागसता, आई-वडिलांवरचं, आजी-आजोबांवरचं निस्सीम प्रेम, बालहट्ट, मोठ्यांचा त्यांच्यावर ओरडण्याचा परिणाम, त्यांचं दबून जाणं, मूक होणं, भावनावश होणं हे आपणास लवकर समजत नाही. ईशूच्या मनातील खळबळ आम्हा सर्वांच्या हृदयात खोल रुतून बसली. कालवाकालव झाली आणि नंतर पुढच्याच क्षणी मनात तिच्याबद्दल दाटून उसळलेला असीम प्रेमाचा महापूर.
मी पत्नीसह लगेच हॉलमध्ये प्रवेशता झालो. ईशू सोफ्यावर मायूस चेहऱ्यानं आमच्या बेडरूमकडेच नजर ठेवून होती. तिनं पाहिलं होतं, की तिनं लिहिलेली चिठ्ठी आजीनं उचलून आबांना म्हणजेच मला दिलीय. मी तिच्याकडे स्मितहास्य करत पाहिलं. तिची पुरी अजून टम्मच; पण डोळे पाण्यानं गच्च भरलेले.
मी तिला प्रेमानं हाक मारली ः 'ईशू बाळा ये गं. काय झालंय? माझ्याशी बोलणार नाहीस? कट्टी फू केलीस का?''
'नाही; पण तुम्हीच मला तुमच्या रूममध्ये येऊ नको म्हणालात.''
'अगं, असं काही नाही. मला थोडं लिहायचं काम होतं. म्हणून थोडं निवांत पाहिजे होतं. ये बघू.'' मी दोन्ही हात पुढं केले.
'नाही. आधी आपण स्कूल- स्कूल खेळायचं, तुम्ही अगोदर टीचर व्हायचं. मी तुम्हाला "मे आय कम इन टीचर?' असं विचारते. मग आबा तुम्ही मला "येस कम इन' म्हणा. मगच मी तुमच्या बेडरूममध्ये येते.''
चला, पिल्लाचा राग निवळला वाटतं.
जमलेले अश्रू डोळ्यांच्या किनाऱ्याचा बांध फोडून सैरभैर झाले.
मी आनंदाश्रू पुसतच पुन्हा "स्कूल- स्कूल'चा डाव नव्यानं मांडण्यासाठी बेडरूममध्ये प्रवेशता झालो.
रिव्हॉल्व्हिंग खुर्चीवर अजून बसतोय, तोच मला अपेक्षित असलेले मंजुळ शब्द कानी पडले.
'मे आय कम इन टीचर?''
तेच आमचं गोड पिल्लू डोळे स्वच्छ करून हसऱ्या टवटवीत आणि प्रफुल्लित चेहऱ्यानं माझ्या अपेक्षित परवानगीची वाट पाहत एका विजयी योद्‌ध्याच्या थाटात उभं होतं.
मग मी तरी का मागे हाटतोय? मी म्हणालो...
'येस्स्स्सस कम इन मिस. ईशू पाटील.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com