अद्वितीय रुपेरी मानदंड (अनिता पाध्ये)

saptarang anita padhye write mughal e azam movie artilce
saptarang anita padhye write mughal e azam movie artilce

‘मुघले आझम’ हा रुपेरी पडद्यावरचा एक मानदंडच आहे. अद्‍भुत, अलौकिक, अकल्पित, विलक्षण, भव्यदिव्य....ही सर्व विशेषणं या चित्रपटाला चपखल बसतात. प्रचंड खर्चापासून अभिजाततेपर्यंत कोणत्या चित्रपटाची तुलनाच या चित्रपटाशी होऊ शकत नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याला येत्या बुधवारी (ता. पाच ऑगस्ट) साठ वर्षं पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं या रुपेरी कहाणीला उजाळा...

अद्‍भुत, अलौकिक, अकल्पित, विलक्षण, भव्यदिव्य....ही सर्व विशेषणं ‘मुघले आझम’ या चित्रपटाला चपखल बसतात. येत्या ५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्याला तब्बल ६० वर्षं पूर्ण होत आहेत आणि तरीही या चित्रपटाची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. इतकंच नाही, तर या चित्रपटाच्या आसपास फिरकणारा चित्रपटदेखील गेल्या ६० वर्षांत बनलेला नाही.

इसवीसन १५५६ ते १६०५ मुघल राजवटीमधल्या बादशहा अकबराची यशस्वी राजवट, शौर्य, निःष्पक्ष न्यायव्यवस्था, कलासक्तता याविषयी के. आसिफ यांच्या मनात नितांत भक्ती, आदर होता. राजपुत्र सलीम, त्याची प्रेयसी अनारकली यांच्या प्रेमाला बादशहा अकबरनं केलेला विरोध आणि त्यामुळे पिता-पुत्रामध्ये निर्माण झालेल्या संघर्षाची कथा सर्वप्रथम उर्दू नाट्यकर्मी इम्तियाज अली ताज यांनी सन १९२२ मध्ये नाटकाद्वारे, तर १९२८ मध्ये निर्माता-दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांनी ‘अनारकली’ या मूकपट आणि बोलपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणली होती. त्यामुळे सन १९४६ च्या सुमारास के. असिफ यांनी या विषयावर संशोधन करून चंद्रमोहन, नर्गिस, सप्रू, दुर्गा खोटे, वीणा आदी कलाकारांना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर शोभेल असा चित्रपट सुरू केला. सलीम-अनारकली यांची प्रेमकथा असली, तरी चित्रपटाचं कथानक बादशहा अकबर आणि सलीम यांच्यामधल्या संघर्षाभोवती फिरणार असल्यानं चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं ‘मुघले आझम’!

मात्र, काही शूटिंग पार पडलं, तोच अकबराची भूमिका करणाऱ्या चंद्रमोहनचं निधन झाल्यामुळे शूटिंग बंद पडलं. त्याच काळात भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि चित्रपटाचा निर्माता सराज पाकिस्तानात निघून गेला. या दोन्ही घटनांमुळे ‘मुघले आझम’चं भवितव्य धोक्यात आलं. दीड-दोन वर्षांनी सढळ हातानं पैसा खर्च करणारे निर्माते शापूरजी पालनजी मिळाले, तेव्हा जोधाबाईची भूमिका करणाऱ्या दुर्गा खोटे यांचा अपवाद वगळता दिलीपकुमार, मधुबाला आणि पृथ्वीराज कपूर अशा कलाकारांसह चित्रपट नव्यानं सुरू झाला.

पहिल्याच दिवशी पृथ्वीराज कपूर यांचं शूटिंग सुरू झालं, तेव्हा ते बादशहाप्रमाणे अदबशीर, छाती पुढे काढत ऐटबाज चालत नसून सर्वसामान्य माणसाप्रमाणे चालत होते; परंतु आठ दिवस चालण्याचा सराव केल्यानंतर त्यांनी बादशहाची चाल आत्मसात केली. केवळ या चित्रपटासाठी त्यांनी खास खर्जामध्ये संवाद म्हटले होते. त्यामुळे अनेकदा त्यांचा घसा बसत असे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा काळा मस्सा खास लंडनमध्ये बनवला गेला होता. भव्यदिव्य चित्रपट बनवण्याच्या ध्यासापोटी के. असिफ कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार नसायचे. कलाकारांचे कपडे डिझाइन करण्यासाठी खास दिल्लीहून टेलर्स बोलवण्यात आले होते, तर त्यावर कशिदा, नक्षीकाम करण्यासाठी सुरत खंबायतचे कारागीर मासिक वेतनावर नेमले होते. या कपड्यांसाठी वापरण्यात येत असलेलं कापड अत्यंत उच्च दर्जाचं होतं. कोल्हापूरच्या तज्ज्ञ व्यक्तींव्दारे जिरेटोप, मुकुट बनवले गेले आणि आग्र्याहून मोजडी आणल्या गेल्या. जोधाबाई, अकबर, सलीम या व्यक्तिरेखांचे अलंकारसुद्धा खरे मोती, रत्नं आणि सोन्याचा वापर करून हैदराबादच्या सराफांकडून तयार करण्यात आले. ‘मोहे पनघट पे’ या गाण्यात वापरलेली कॄष्णाची मूर्ती अस्सल सुवर्णाची आहे. युद्धप्रसंगासाठी दोन हजार उंट, आठ हजार सैनिक, चारशे घोड्यांचा वापर करण्यात आला होता.
चित्रपटातली गाणी संगीतबद्ध करण्यासाठी त्या काळात लोकप्रिय असलेल्या नौशाद यांना पाचारण करण्यात आलं, तर गीतकार म्हणून शकील बदायुनी यांची निवड झाली. निर्मात्याकडून पैशांचा पुरवठा झाला, की गाणी रेकॉर्ड केली जात असत. त्यामुळे बहुसंख्य गाणी तर चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यानंतरच टप्प्याटप्प्याने रेकॉर्ड करण्यात आली. ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याचे १८ मुखडे शकील बदायुनींनी लिहिले होते, त्यातले तीन निवडण्यात आले. या गाण्यातल्या शेवटच्या ओळीमध्ये के. असिफ यांना एको आणि नंतर आलाप हवा होता. परंतु, त्याकाळी रेकॉर्डिंग तंत्र अद्ययावत नसल्यानं लता मंगेशकर यांना दुसऱ्या रेकॉर्डिंग रूममध्ये माइकपासून थोड्या अंतरावर उभं राहण्यास सांगून ती ओळ म्हणत माइकच्या दिशेनं येण्यास सांगण्यात आलं. दुसऱ्यां‍दा याच पद्धतीनं लता मंगेशकर यांच्याकडून तसंच रेकॉर्डिंग केल्यानंतर त्या ओळीमध्ये हवा तसा एको फील मिळाला होता. हे गाणं चित्रीत करण्यासाठी उभारलेला शिशमहालचा सेट तब्बल दीड कोटी रुपयांचा होता. गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे कथ्थक अदा-गिरक्या घेणं मधुबालाला अशक्य असल्याने मधुबालाप्रमाणे सडपातळ आणि नाजूक शरीरयष्टी असणाऱ्या‍ लक्ष्मीनारायण या लच्छू महाराजांच्या शिष्यावर या गाण्याचा काही भाग चित्रीत करण्यात आला. त्यासाठी मधुबालाला समोर बसवून शिल्पकार बी. आर.खेडकर यांनी मधुबालाच्या चेहऱ्याचा कागदाचा साचा तयार केला आणि नंतर अंधेरीतल्या एका फुगा फॅक्टरीतून तसाच रबरी मास्क तयार केला होता. गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान लक्ष्मीनारायणच्या चेहऱ्यावर हा मास्क चढवून त्याचे कथ्थक अदा आणि गिरक्यांचे शॉट्स घेण्यात आले. शिशमहालच्या आरशांच्या प्रत्येक फ्रेममध्ये गिरक्या घेणारी मधुबाला नसून लक्ष्मीनारायण आहे. श्रेष्ठ शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खां यांनी पार्श्वगायन केलेला हा एकमेव चित्रपट. यातल्या दोन गाण्यांसाठी त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये मानधन देण्यात आलं होतं. महंमद रफी यांनी गायलेल्या ‘ऐ मोहोब्बत झिंदाबाद...’ या गाण्यामध्ये १०० कोरस गायकांचा आवाज वापरण्यात आला.

त्या काळात दिलीपकुमार- मधुबाला यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं; परंतु मधुबालाचे वडील अताउल्ला खान सतत सेटवर हजर राहत असल्यानं त्या दोघांना एकमेकांशी प्रेमालाप करता येत नसे. सलीम-अनारकली यांचा प्रेमप्रसंग चित्रीत करण्यासाठी अताउल्ला राजी न झाल्याने के. असिफ यांनी शक्कल लढवली. सेटबाहेर चित्रपटाच्या पीआरओसह दिवसभर अताउल्लांना पत्त्यांचा डाव त्यांनी खेळायला लावला आणि तो सीन चित्रीत केला होता.

‘मुघले आझम’ पूर्ण होण्यास दहा वर्षं लागली, त्याची असंख्य कारणं होती. सर्व कलाकारांच्या एकत्र तारखा, पैशांचा ओघ वगैरे कारणं होतीच; पण सर्वांत मोठं कारण होतं ते के. असिफ यांची कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका. राजपुत्र सलीम १४ वर्षांनी पुन्हा बादशहा अकबरच्या महालात प्रवेश करतो, तेव्हा जोधाबाई मोती उधळण्यास सांगतात. या सीनसाठी असिफ यांना अस्सल मोती हवे होते, तर शापूरजी ते देण्यास तयार नव्हते. या कारणास्तव सहा महिने शूटिंग बंद होतं. अखेर शापूरजींना माघार घ्यावी लागली होती. जयपूरच्या आमेर फोर्ट रस्त्यावर शूटिंग करताना रस्त्याच्या कडेला उभारलेले दोन-तीन विजेचे खांब दिसताच कॅमेरा अँगल न बदलता असिफ यांनी शूटिंग रद्द केलं आणि जयपूर महापालिकेला सीनचं महत्त्व पटवून दिल्यानंतर तीन महिन्यांनी विजेचे खांब तात्पुरते हटवून मगच चित्रीकरण करण्यात आलं.
चित्रपटाची भव्यता, त्याचं चित्रीकरण, अभिनय, संवाद सर्वच इतकं अप्रतिम होतं, की चित्रपटाची ट्रायल पाहताच वितरकांच्या उड्या पडल्या आणि प्रत्येक राज्यातल्या टेरेटरीमध्ये हा चित्रपट १५ लाख रुपये किमतीला विकला गेला. त्या काळामध्ये मोठे स्टार असलेले चित्रपटदेखील चार-साडेचार लाखांमध्ये विकले जात असत... लेकिन ‘मुघले आझम’की बातही कुछ और थी!

अखेर ५ ऑगस्ट १९६० रोजी ‘मुघले आझम’ भारतातल्या तब्बल १५० चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झाला. आदल्या दिवशी म्हणजे चार ऑगस्टला बॉम्बे सेंट्रल परिसरातल्या मराठा मंदिर थिएटरमध्ये या चित्रपटाचे दोन भव्य प्रीमियर्स आयोजित करण्यात आले. या थिएटरचं उद्‍घाटनच या चित्रपटानं झालं. दोन प्रीमियर होणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट असावा. सोनेरी वर्खानं नटलेल्या प्रीमियरच्या निमंत्रणपत्रिकेवर चांदीमध्ये निमंत्रणाचा मजकूर एम्बॉस करून प्रिंट करण्यात आला होता. संपूर्ण थिएटर रोषणाईनं झगमगत होतं. संध्याकाळ आणि रात्रीचा प्रीमियर सोहळा आणि त्याला उपस्थित राहणाऱ्या चित्रपटसृष्टीमधल्या तमाम सेलिब्रिटिजना बघण्यासाठी मराठा मंदिरच्या रस्त्यावर अक्षरश: माणसांचा समुद्र पसरला होता. जवळपास २७-२८ हजार माणसं जमा झाली होती. गर्दी नियंत्रित करणं पोलिसांनादेखील शक्य होत नव्हतं. चित्रपटाची प्रिंट हत्तीवरून आणली गेली. बादशहा अकबराची व्यक्तिरेखा साकार करणारे पृथ्वीराज कपूर यांचं शाही इतमामात हत्तीवरून आगमन झालं. गुरूदत्त, वहिदा रेहमान, कमाल अमरोही, मीनाकुमारी, सोहराब मोदी, आगा, मुक्री, बी.आर.चोप्रा, राज कपूर आदी मान्यवर प्रीमियला हजर होते. २० रिळं असलेला ‘मुघले आझम’ हा पहिलाच भारतीय चित्रपट होय. चित्रपटांची लांबी अधिक असल्यानं दररोज दुपारी तीन, संध्याकाळी साडेसहा आणि रात्री साडेनऊ असे तीनच शो आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी स्टॉलच्या पहिल्या तीन रांगांसाठी तिकिटाचा दर होता दहा आणे, त्याच्या पाठीमागच्या रांगांच्या तिकिटाचा दर होता एक रुपया पाच आणे, तर बाल्कनीच्या तिकिटांचे दर होते दोन रुपये दहा आणे. पाच रुपयांमध्ये ब्लॅकची तिकीटं विकली जात होती. केवळ भारतातल्या मुख्य शहरांमध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतभर या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटानं ४० लाखांचा व्यवसाय केला.

‘मुघले आझम’ कलरमध्ये बनवण्याचं के. असिफ यांचं त्यावेळी अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण झालं ते २००४ मध्ये; त्यांच्या निधनानंतर ३३ वर्षांनी. या रंगीत चित्रपटाच्या सीडींच्या विक्रीचादेखील विक्रम झाला. आपल्या संपूर्ण हयातीत के. असिफ यांनी दिग्दर्शक म्हणून केवळ दोनच चित्रपट पूर्ण केले. ‘फूल आणि ‘मुघले आझम’. ‘फूल’ यशस्वी ठरला, तर ‘मुघले आझम’नं इतिहास घडवला. या दिग्दर्शकानं जगाला दाखवून दिलं, की गुणसंख्येपेक्षा गुणवत्ता अधिक महत्वाची असते. असा भव्य, यशस्वी, लोकप्रिय चित्रपट अजून तरी बनलेला नाही आणि कधी बनेल असं वाटतही नाही. या अवलियाला मानाचा मुजरा!

पहिल्या तासात हाऊसफुल
‘मुघले आझम’ बघण्याची प्रेक्षकांच्या मनात इतकी उत्सुकता होती, की सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी असलेल्या पहिल्या शोचं अॅडव्हान्स बुकिंग पहिल्या तासाभरातच हाऊसफुल झालं होतं. मुंबईच्या मदनपुरा परिसरातला त्यावेळचा कुख्यात गुंड शमसुद्दीन पहेलवान यानं आपलं सर्व वर्चस्व पणाला लावून आपल्या साथीदाराकरवी पहिल्या शोचं पहिलं तिकीट मिळवलं. पहिल्याच शोनंतर ‘मुघले आझम’ची इतकी माऊथ पब्लिसिटी सुरू झाली, की चित्रपट पाहण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंगसाठी अनेक तास रांगांमध्ये उभं राहावं लागत होतं. तिकिटांसाठी प्रेक्षक रात्रभर थिएटर्सच्या बाहेर पथाऱ्या टाकून झोपत होते. तिकिटांसाठी झुंबड उडत असल्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र अशी लेडीज स्पेशल बुकिंग विंडो तयार करण्यात आली. ‘आन’, ‘झांसी की रानी’ हे चित्रपट १७-१८ रिळांचे बनले होते; परंतु २० रिळं असलेला ‘मुघले आझम’ हा पहिलाच भारतीय चित्रपट होय.

प्रेम आणि राग
हा चित्रपट सुरू झाला, तेव्हा दिलीपकुमार आणि मधुबाला यांचे प्रेमसंबंध सुरू असले, तरी नंतरच्या काळात दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, आपल्या तुटलेल्या संबंधांचा परिणाम दोघांनी चित्रपटावर होऊ दिला नाही. मात्र, एकाच सेटवर बसून दोघं एकमेकांशी अजिबात बोलत नसत. या गोष्टीचं दिलीपकुमार यांना वाईट वाटत असे आणि रागही येत असे. बादशहा अकबराच्या भीतीनं अनारकली शहजादा सलीमच्या प्रेमाचा अव्हेर करते हे सलीमला सहन होत नाही म्हणून तो रागानं अनारकलीच्या गालावर चपराक मारतो, हा सीन चित्रीत करताना या दोघांमधला दुरावा स्पष्ट झाला. आपल्या मनातला राग व्यक्त करण्यासाठी दिग्दर्शकाची सूचना ऐकत दिलीपकुमार यांनी मधुबालाच्या चेहऱ्या‍वर जोरदार चपराक मारल्या होत्या. या सीनचे अनेक रिटेक्स झाले होते. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे मधुबाला अवाक् झाल्या होत्या. त्यांचा गाल लालेलाल झाला होता आणि डोळ्यांत अश्रू आले होते. शॉट ओके होताच काहीही न बोलता त्या मेकअपरूमध्ये निघून गेल्या होत्या. दिलीपकुमार आणि मधुबाला या जोडीचा हा शेवटचा चित्रपट होय.

शूटिंगदरम्यान पायाला चटके
मूल व्हावं म्हणून नवस करण्यासाठी अकबर हजरत शेख सलीमुद्दीन चिश्तीच्या दर्ग्याला भेट देताना अनवाणी चालत जातो, हा सीन चित्रीत करताना राजस्थानच्या रणरणत्या उन्हात तापलेल्या वाळूवर चालताना पॄथ्वीराज कपूर यांच्या पायाला फोड आले होते आणि त्यांना चालणं अवघड होत होतं. मात्र, त्यांच्यासह स्वत: अनवाणी चालत के. असिफ यांनी ते सीन्स चित्रित केले. साम, दाम, दंड, भेद यांचा योग्य वेळी योग्य वापर करून कलाकार, तंत्रज्ञ यांच्याकडून काम करून घेण्याचं कसब त्यांच्या अंगी होतं. कलाकारांपासून स्पॉटबॉयपर्यंत सर्वांची ते मनापासून काळजी घेत असत आणि प्रसंगी रागावतदेखील.

प्रीमियरला दिलीपकुमार गैरहजर
दिलीपकुमार यांच्याशी मैत्री जमल्यामुळे के. आसिफ त्यांच्या घरी जात असत. त्याच दरम्यान दिलीपकुमार यांची बहीण अख्तरशी त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं. असिफ यांचे आधीच दोन विवाह झाले होते. प्रसिद्ध नृत्यकलाकार सितारादेवी या आपल्या मामीशीच के. असिफ यांनी पहिला विवाह केला होता, तर त्यांची द्वितीय पत्नी होती अभिनेत्री निगार सुल्तान. ते सहा मुलांचे पिताही होते. असं असूनही ‘मुघले आझम’ पूर्ण होताच घरच्यांच्या विरोधाला न जुमानता एक दिवस अख्तरनी घरातून पलायन करून के. असिफ यांच्याशी विवाह केला. त्यामुळे ‘मुघले आझम’ची ट्रायल आणि प्रीमियर या दोन्हींवर बहिष्कार टाकत दिलीपकुमार गैरहजर राहिले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे चित्रपटसृष्टीमध्ये बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. असंही म्हटलं जातं, की फिल्मफेअर अॅवॉर्ड कमिटी मेंबर्सनी दिलीपकुमार यांच्याशी संपर्क करून ‘मुघले आझम’साठी त्यांना त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्याचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु दिलीपकुमार यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला होता.

मोगले आझम मध्येच थिएटरवरुन उतरवण्यात आला होता
मराठा मंदिरमध्ये चित्रपट प्रदर्शित करत असताना शापूरजी-पालनजी या निर्माता पिता-पुत्राच्या जोडीनं १०४ आठवड्यांचं बुकिंग केलं होतं; परंतु शापूरजी आणि के. असिफ यांच्यामध्ये काही कारणांवरून मतभेद निर्माण झाल्यामुळे चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत असतानाही ८८व्या आठवड्यातच शापूरजींनी थिएटरवरून चित्रपट उतरवला. के. असिफ यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. शूटिंगदरम्यान सर्जनशीलतेसाठी तडजोड न करता शापूरजी-पालनजी यांच्याशी वादविवाद करत असले, तरी आता ते तसं करू शकत नव्हते. निर्माता असल्यानं थिएटरमध्ये किती आठवडे चित्रपट ठेवायचा हा निर्णय सर्वस्वी शापूरजींच्या हाती होता. त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर आक्षेप न घेता असिफ यांना गप्प बसावं लागलं.

मेहमूद आणि शिशमहल
‘प्यार किया तो डरना क्या’ गाण्याचा शिशमहलचा सेट के. आसिफ यांना इतका भावला होता, की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अनेक महिने तो मोहन स्टुडियोमध्ये तसाच ठेवला होता. स्टुडियोच्या मालकानं तगादा लावल्यावर स्टुडियोच्या गोडाऊनमध्ये व्यवस्थित ठेवून त्याचं भाडं देत होते. त्याचदरम्यान विनोदी अभिनेता मेहमूद यांच्या बहिणीचा विवाह होता. आपल्या बहिणीचं लग्न अनोख्या पद्धतीनं व्हावं अशी मेहमूद यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी असिफ यांच्याकडे शिशमहलचा सेट लग्नसमारंभासाठी वापरण्याबाबत विचारलं, तेव्हा एक पैशाचाही मोबदला न घेता असिफनी मेहमूदना तो सेट वापरायला तर दिलाच; परंतु सेट लावताना ते स्वत: त्या ठिकाणी हजर राहिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com