दुःख रुपेरी (अनिता पाध्ये)

अनिता पाध्ये anitaapadhye@gmail.com
Sunday, 21 June 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं नुकतीच आत्महत्या केली आणि अनेक गोष्टींबाबत चर्चा सुरू झाली. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये हे असं प्रमाण का वाढत चाललं आहे, चित्रपटसृष्टीमध्ये कंपूशाही इतकी क्रूर आहे का, कलाकारांचं जीवनमान कुठं तरी त्यांच्याच अधोगतीला कारणीभूत ठरतं आहे का, मानसिक आधार कसा शोधला पाहिजे, कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आदी गोष्टींवर एक नजर.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं नुकतीच आत्महत्या केली आणि अनेक गोष्टींबाबत चर्चा सुरू झाली. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये हे असं प्रमाण का वाढत चाललं आहे, चित्रपटसृष्टीमध्ये कंपूशाही इतकी क्रूर आहे का, कलाकारांचं जीवनमान कुठं तरी त्यांच्याच अधोगतीला कारणीभूत ठरतं आहे का, मानसिक आधार कसा शोधला पाहिजे, कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आदी गोष्टींवर एक नजर.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं नुकतीच आत्महत्या केली. त्यापूर्वी कुशल पंजाबी, प्रत्युषा बॅनर्जी (बालिका वधू), प्रेक्षा मेहता (क्राइम पेट्रोल), सेजल शर्मा (दिल तो हॅप्पी है जी) या कलाकारांनीदेखील अशाच पद्धतीनं आपलं जीवन संपवलं. असं का होतं आहे? कालपर्यंत लहान-मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या या कलाकारांना अचानक असा निर्णय का घ्यावासा वाटला असावा, त्यांच्या जीवनात अंधार का निर्माण झाला? सुशांतच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा प्रश्न ऎरणीवर आला आहे.

सुशांतच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याची अभिनय कारकिर्द गेल्या सात-आठ वर्षांतली. टीव्ही मालिकांमधून त्यानं चित्रपटात पदार्पण केलं. ‘काय पो चे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘पीके’, ‘छिछोरे’ हे त्याचे चित्रपट यशस्वी ठरले, तर ‘केदारनाथ’ मध्यम. ‘ड्राइव्ह’ नावाचा त्याचा चित्रपट तर काही कारणानं थिएटरऎवजी नेटवर प्रदर्शित झाला. त्याच्या यशस्वी चित्रपटांपैकी अधिक चित्रपटांत त्याच्यासह अन्य कलाकार होते. त्यामुळे चित्रपटाचं यश त्याच्या एकट्याच्या नावावर नव्हतं. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा, अनिश्चितता, एकाकीपणा, असहनशीलता, हायफाय लाईफस्टाईल आणि साध्यासाध्या गोष्टींवरून होणारी निराशा वाढत चालली आहे. मात्र, हिंदी चित्रपटसॄष्टीत याचं प्रमाण सर्वाधिक आहे. इथं गटबाजी, राजकारण तर आहेच; परंतु साप-शिडीचा घातक खेळसुद्धा आहे. इथं दर शुक्रवारी कलाकाराचं भविष्य, त्याची कारकीर्द निश्चित होत असते. एखाद्या कलाकाराचे दोन-तीन चित्रपट लागोपाठ अयशस्वी झाले, कमी चालले तर यशाच्या पटावरून त्याची घसरण होते आणि नव्यानं त्याला यशाची शिडी चढावी लागते. सुशांतच्या बाबतीत असंच झालं का? तो गेल्यावर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली; पण मग सुशांत जिवंत असताना, डिप्रेशनमधून जात असताना त्याच्या मदतीला, त्याला मानसिक धैर्य द्यायला कुणी का नाही पुढे आलं? वर उल्लेख केल्याप्रमाणं बॉलिवूडमध्ये अतिशय वाईट राजकारण करणारे, अधिराज्य गाजवणारे काही निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकार आहेत. जनावरांच्या कळपाप्रमाणं आपापले कंपू तयार करून आपण ही चित्रपटसॄष्टी सांभाळतो आहोत, असा गैरसमज करून घेत ही मंडळी ठरवत असतात, की कुठल्या कलाकाराला काम मिळायला हवं आणि कुणाला घरचा रस्ता दाखवला पाहिजे ते. त्यांच्या कंपूत नसलेल्या कलाकाराला काम मिळू नये असा प्रयत्न तर केला जातोच; पण नाहक वावड्या उठवून अनेक कलाकारांना मिळालेले चित्रपट त्यांच्या हातून निसटतात. जे कलाकार या बड्या धेंडांच्या अटी मान्य करतात, त्यांची हुजरेगिरी करतात, त्यांना सहजपणे काम मिळत राहतं. या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी हल्ली केवळ मुलींनाच कॉम्प्रमाइज करावं लागतं हा अनेकांचा गैरसमज आहे, काही पुरुष कलाकारांनाही कॉम्प्रमाइज करावं लागतं, ही गोष्ट कटू असली तरी सत्य आहे. उच्चशिक्षण घेतलेला सुशांत अशा कंपूंपासून दूर राहत असे. पार्ट्यांमध्ये कमी दिसत असे. गेल्या काही महिन्यांत त्याच्या हातातून एका नामी प्रॉडक्शन हाऊससह अन्य सहा चित्रपट निसटले, असं म्हटलं जातय, हा त्याचाच हा परिणाम होता का, असे प्रश्नही आता उपस्थित होऊ लागले आहेत.

एकीकडे चित्रपटसृष्टीतलं हे क्रूर वास्तव असलं, तरी केवळ चित्रपटसॄष्टीलाच दोषी मानणंदेखील योग्य नाही. काही अन्य गोष्टींचा विचार करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. चित्रपटक्षेत्रातला झगमगाट, स्टार कलाकारांना मिळणारा अमाप पैसा, नाव, ग्लॅमर आणि यशाला भुलून भारतातल्या अनेक लहान-मोठ्या शहरांतले, गावातले अनेक तरुण-तरुणी या क्षेत्रात येतात; पण हे मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, चिकाटी धरावी लागते आणि अपयश पचवावं लागतं ही गोष्ट अनेकजण विसरतात. जसं शाळेत-कॉलेजात गेल्यावर अभ्यास करावा लागतो, तसा चित्रपटसॄष्टीचादेखील अभ्यास करणं, त्याचे कंगोरे तपासणं तितकंच गरजेचं आहे. या क्षेत्रात काम करायचं असेल तर या क्षेत्रातली अनिश्चितता, अपयश, स्पर्धा, राजकरण, कंपुबाजी आदि गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागेल हा विचार करूनच या क्षेत्रात प्रवेश करणं, या गोष्टींना सामोरं जाण्याचं साहस आणि मानसिक बळ निर्माण करणं, त्याप्रमाणं पावलं टाकणं अत्यंत गरजेचं आहे. पाण्यात पडल्यावर पोहता आलं पाहिजे, असाच काहीसा हा प्रकार. परंतु हल्लीच्या तरुण पिढीला फक्त यश हवं असतं आणि तेदेखील झटपट हवं असतं. अपयश स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. आणि यशही डोक्यातून जाऊ न देण्याची तयारी नसते. आपल्या आयुष्यात सगळं काही आलबेल असावं असा त्यांचा हट्ट असतो. आपल्या शरीरासाठी खूप मेहनत घेणारे हे कलाकार आपलं मानसिक बळ वाढण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत हा प्रश्न मनात येतो.

चित्रपटसॄष्टीमध्ये अनिश्चितता आहे, स्पर्धा, चढ-उतार असतात हे या इंटरनेटच्या जगात राहणाऱ्या‍ तरुण मुला-मुलींना माहीत नसतं का? ही सत्यस्थिती ते का स्वीकारत नाहीत? प्रत्येक मोठा कलाकार करिअरच्या अनिश्चिततेतून, यश-अपयशाच्या फेऱ्यातून जात असतोच. ’शूल’ यशस्वी होऊनसुद्धा मनोज वाजपयीकडे चार वर्षं काम नव्हतं, चित्रपटसॄष्टीचे शहेनशहा मानले जाणारे अमिताभ बच्चन यांना यशस्वी कमबॅक करण्यासाठी यश चोप्रांकडे जावं लागलं होतं. जावेद अख्तरसह जोडी तुटल्यानंतर लेखक सलीम खान यांच्याकडे चार वर्षं काम नव्हतं आणि आर्थिक त्रासातून जावं लागलं होतं. अभिनय क्षमता वाढवण्यासाठी कलाकार ज्याप्रमाणं जुने चित्रपट बघतात त्याप्रमाणंच कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार असूनही चित्रपटसॄष्टीत टिकून राहिलेल्या व्यक्तींच्या करिअर ग्राफचा अभ्यास करणंदेखील गरजेचं आहे- कारण त्यातून अपयशी कलाकाराला नैराश्याला तोंड द्यावं लागणार नाही. कलाकार, निर्माते, लेखक यांच्या व्यावसायिक समस्यानिरसन करण्यासाठी बनवलेल्या संस्थांनीसुद्धा चित्रपटसॄष्टीतल्या व्यक्तींना अपयशानं, आर्थिक समस्यांमुळे नैराश्य येऊ नये, समस्यांना तोड देण्यासाठी त्यांची मानसिक शक्ती वाढावी यासाठी समुपदेशन करणं, काही ठोस पाऊलं उचलणं आवश्यक आहे.

दुसरं विदारक सत्य म्हणजे हल्लीचा चंगळवाद, भविष्याबद्दलची बेपर्वाई आणि श्रीमंती लाइफस्टाइलचा हव्यास, दिखावा. सुशांतचा आदर्श होता शाहरुख खान. कारण शाहरुखदेखील त्याच्याप्रमाणं नॉन-फिल्मी बॅकग्राउंडचा, टीव्ही मालिकांतून चित्रपटात येऊन यशाच्या शिखरावर पोचलेला. शाहरुखला आदर्श मानण्यात काहीच चूक नाही; परंतु सुरुवातीच्या काळात शाहरुख खानला खूप स्ट्रगल करावं लागलं होतं, अनेक अपमान सहन करावे लागले होते, अपयश पाहावं लागलं होतं या गोष्टींचा सुशांतनं विचार का केला नाही? स्टार बनल्यानंतरसुद्धा शाहरुख फ्लॅटमध्ये राहत होता, याची पत्रकार म्हणून मी साक्षीदार आहे. नंतरच्या काळात बरीच माया जमवल्यावर, चित्रपटसॄष्टीमध्ये मान्यता मिळवल्यानंतर त्यानं बंगला बांधला. ‘मैंने प्यार किया’साठी ३१ हजार रुपये मोबदला मिळालेला सलमान खान आजही वडिलांच्या घरी राहतो. काही वर्षांपूर्वी त्याच सोसायटीत एक लहान फ्लॅट खरेदी करून त्यात त्यानं आपला जीम आणि निर्मात्यांना भेटण्यासाठी गेस्ट रूम बनवली आहे; पण शूटिंग नसलं, तर तो आई-वडिलांसह असतो. आमीर खान कितीतरी वर्षं आपल्या वडिलांच्या फ्लॅटमध्येच राहत होता. हे नमूद करण्याचं कारण म्हणजे वांद्र्याच्या उच्चभ्रू परिसरातील ज्या भल्या मोठ्या फर्निश फ्लॅटमध्ये सुशांत राहत होता, त्याचं दरमहा भाडं होतं ४ लाख ५१ हजार. त्याला पैशांची अडचण नव्हती, असं गृहित धरलं तरी काही वर्षांपूर्वीच करिअरची सुरुवात झाली असताना इतक्या महागड्या फ्लॅटमध्ये राहणं खरंच गरजेचं होतं का? फ्लॅटचं भाडं, नोकरचाकर, महागडी मोटार, ड्रायव्हर वगैरेचा हिशोब केला, तर सुशांतचा दरमहा खर्च नक्कीच दहा लाखांच्या आसपास असावा. केवळ दिखाऊपणा, हायफाय लाइफस्टाईल, स्टेटस सिंबॉलसाठी सुशांतचा हा अट्टाहास होता, की सलमान, आमीर, शाहरुख या स्टार्सचं अनुकरण होतं? एकदा धर्मेंद्र यांनी मला एक किस्सा सांगितला होता. चित्रपटांत काम करू लागल्यावर अभिनेत्री तनुजाच्या मोटारीसारखी परदेशी बनावटीची मोटार धर्मेंद्र यांनी घ्यावी असा त्यांच्या भावाचा-अजितचा आग्रह होता; परंतु धर्मेंद्र यांनी फियाट मोटार घेतली होती. का तर समजा भविष्यात चित्रपट नाही मिळाले तर फियाट मोटारीची टॅक्सी बनवून कमाईचा मार्ग खुला राहील. धर्मेंद्र फार शिकलेले नसले, तरी विचारी आणि पाय जमिनीवर ठेवून वागणारे असल्यामुळेच आजपर्यंत या क्षेत्रात टिकून आहेत. केवळ सुशांतच नाही, तर कुशल पंजाबी, प्रत्युषा बॅनर्जी, सेजल शर्मा हे कलाकारसुद्धा या गोष्टींना अपवाद नव्हते. यशाची चव, पैशांचं सुख अनुभवल्यानंतर काही काळानं काम मिळत नसल्यानं नैराश्याबरोबरच त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागत होतं आणि त्यातनू आत्महत्येचा मार्ग त्यांनी निवडला होता. भविष्यात काम कमी झालं किंवा मिळालं नाही तर साठवलेला पैसा उपयोगी पडेल, या सत्याकडे कानाडोळा करून अनेक कलाकार दिखाव्याच्या मागं लागतात. पैशांचं सोंग करता येत नाही असं म्हणतात; परंतु हल्ली पैशांचं सोंग करण्यावरच अधिक भर दिला जातो. अनेक कलाकार कर्ज काढून छानछोकीचं आयुष्य जगण्यावर भर देतात. या मुद्द्याद्वारे सुशांत किंवा या कलाकारांवर टीका करण्याचा माझा मानस अजिबातच नाही; परंतु काम न मिळण्यामुळे जितकं नैराश्य येतं, त्याहीपेक्षा अधिक नैराश्य पैसे नसल्याच्या कारणानंसुद्धा येतं हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे. कारण एकदा स्वीकारलेली हायफाय , श्रीमंती लाइफस्टाइल माणसाला कायम सांभाळावी लागते. पैशांअभावी श्रीमंती चोचले माणूस पुरे करू शकला नाही, तर समाजात त्याचं हसं तर होतंच, त्याचबरोबर तो नैराश्याला बळी पडतो. समाजातल्या अन्य क्षेत्रांतली स्थितीदेखील जवळपास अशीच असली, तरी चित्रपटसॄष्टीमध्ये ग्लॅमर असल्यानं इथल्या प्रत्येक गोष्टीची अधिक चर्चा होत असते.

दिवसेंदिवस वाढत चाललेला एकाकीपणा आणि तकलादू नातेसंबंध. स्मार्टफोन, व्हॉट्सॲपमुळे माणसामाणसांमधला संवाद जवळपास बंद झाला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या चांगल्या-वाईट प्रसंगी त्याच्याशी प्रत्यक्ष किंवा किमान फोनवरून बोलण्यापेक्षा माणसं मेसेज करतात. त्यामुळे मन मोकळं करण्याचा मार्ग बंद झाला आहे. चित्रपटसॄष्टीमध्ये तर एखाद्याचं करिअर चांगलं चालत नसेल, तर त्याच्याविषयी आणखीन गैरसमज पसरवले जातात. या झगमगत्या क्षेत्रातली व्यक्ती आपल्या समस्या सहकलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांना सांगू शकत नाही- कारण त्याचं भांडवल केलं जातं, बदनामी, नाचक्की होते. दीपिका पदुकोणसाठी एका कंपूमध्ये राहणारी अभिनेत्री आपल्या नैराश्याबद्दल उघड बोलू शकते; परंतु सुशांतसारख्या कंपूबाहेरच्या कलाकारासाठी ही सोपी गोष्ट नसते. त्याचबरोबर पती-पत्नी, प्रेयसी-प्रियकर, मित्र यांच्यामधल्या तकलादू नातेसंबंधांचं प्रमाण सध्या इतकं मोठं आहे, की निराश झालेल्या व्यक्तीला अनेकदा या नात्याद्वारे मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे आयुष्यातल्या समस्या, विचारांचं थैमान, नैराश्य माणसांच्या मनामध्येच साचून राहतं आणि याचा उद्रेक आत्महत्येच्या किंवा अन्य एखाद्या कॄतीद्वारे बाहेर पडतो.

सर्वांना चटका लावून अवघ्या चौतिसाव्या वर्षी सुशांत निघून गेला; परंतु चित्रपटक्षेत्रातले सद्य, नवोदित कलाकारच नाहीत तर कॉर्पोरेट, आयटी क्षेत्रातल्या तरुण-तरुणींनीसुद्धा सुशांतच्या या कॄतीचा गांभीर्या‍नं विचार करणं आणि त्यातून काही शिकणं गरजेचं आहे. ते तसं वागतील, वास्तवाचं भान ठेवून जपून पावलं टाकतील, अशी आपण आशा करू या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang anita padhye write sushant singh rajput article