esakal | ‘आयुष्याची शाळा’ महत्त्वाची (भारत गणेशपुरे)
sakal

बोलून बातमी शोधा

bharat ganeshpure

अभ्यासाच्या बाबतीत मी मुलाला हेच सांगितलं आहे, की ‘प्रत्येक धडा, विषय समजून घे. नुसतं पाठांतर करू नकोस. आता दोन मार्क कमी मिळाले तर चालतील. कारण पुढचं आयुष्य हे मार्कांवर आवलंबून नसतं, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट कशी समजून घेतली यावर अवलंबून असतं.’

‘आयुष्याची शाळा’ महत्त्वाची (भारत गणेशपुरे)

sakal_logo
By
भारत गणेशपुरे

अभ्यासाच्या बाबतीत मी मुलाला हेच सांगितलं आहे, की ‘प्रत्येक धडा, विषय समजून घे. नुसतं पाठांतर करू नकोस. आता दोन मार्क कमी मिळाले तर चालतील. कारण पुढचं आयुष्य हे मार्कांवर आवलंबून नसतं, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट कशी समजून घेतली यावर अवलंबून असतं.’ मागे वळून बघतो तेव्हा मला दिसतं, की आमच्या वेळी मेरिट लिस्टमध्ये आलेली किंवा भरपूर मार्क मिळालेली बरीचशी मुलं आयुष्याच्या शाळेत तितकीशी यशस्वी नाही झालीत. म्हणून आयुष्याची शाळा डोळसपणे शिक, असं मी ध्रुवला सांगत असतो.

मेहनतीला पर्याय नाही ही माझ्या पालकांनी दिलेली शिकवण मी आजही आचरणात आणत आहे. जगात जादू नावाची गोष्ट नाही, भूत नाही, त्यामुळे आपोआप काही मिळेल असं नसतं. प्रत्येक गोष्ट तुम्हालाच करावी लागणार असते, त्याला काही पर्याय नसतो, हेच तत्त्व मी आतापर्यंत पाळत आलो आहे. त्याचं कारण म्हणजे आमचे वडील नेहमी सांगायचे, की ‘तुम्हाला देवाला नमस्कार करायचा तर करा; पण तो केल्यानंतर आपण कष्टातून सुटलो, असं समजू नका. तुमची कामं, तुमची कर्म तुम्हालाच करावी लागणार आहे. त्यामुळे देवासमोर रोज अगरबत्ती लावली म्हणजे तुम्ही पास व्हाल असं काही समजू नका. यश मिळवण्यासाठी अभ्यास करावाच लागेल. मनःशांती, सकारात्मकता मिळवण्यासाठी तुम्ही मंदिरात अवश्य जा; पण देवच सगळं करेल असं समजू नका. ध्येयपूर्तीच्या वाटेवरून तुम्हाला जावंच लागेल आणि स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करावा लागेल.’ त्यांची ही शिकवण मी कायम लक्षात ठेवली आणि आजही ती मला तितकीच महत्त्वाची वाटते.

आमचे वडील शिक्षक होते. नंतर ते शिक्षण विभागात अधिकारी बनले. त्यांनी अनुभवलेला संत गाडगेबाबांचा एक अनुभव ते नेहमी आम्हाला सांगत. त्या काळी वडील एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी सायकल वापरायचे. एकदा ते परतवाडा येथून येत होते, तेव्हा वाटेत एका विहिरीजवळ संत गाडगेबाबा बसले होते. बाबांना बघून वडील थांबले आणि बाबांच्या बाजूला जाऊन उभे राहिले. त्यावेळी एक माणूस तिथं आला आणि तो गाडगेबाबांना म्हणाला : ‘‘बाबा, मला यावर्षी तुमच्याबरोबर पंढरपूरला येण्याची इच्छा आहे.’’ गाडगेमहाराज दरवर्षी पंढरपूरला जात असत; पण ते कधी मंदिरात जात नसत, तर खराटा हातात घेऊन आजूबाजूची साफसफाई करत असत. गाडगेबाबा म्हणाले : ‘‘चांगली गोष्ट आहे, तुम्हाला पंढरपूरला येण्याची इच्छा आहे, तर तुम्ही या.’’ पुढं त्यांनी त्या माणसाला विचारलं, की ‘‘तुम्ही काय करता, लेकरंबाळं किती आहेत?’’ तो म्हणाला : ‘‘तीन मुली आहेत आणि एक मुलगा आहे.’’ ‘‘मुली किती मोठ्या आहेत?’’ ‘‘एक बारा वर्षांची, एक चौदा वर्षांची आणि एक पंधरा वर्षांची आहे.’’ त्या काळात साधारण या वयातच मुलींची लग्न व्हायची, त्यामुळे ते ऐकल्यावर गाडगेबाबा म्हणाले : ‘‘अरे, लग्नाच्या वयाच्या झाल्या की मुली, मग त्यांची लग्न नाही का करायची तुला?’’ तो माणूस उत्तरला : ‘‘हो हो, करायची आहेत ना!’’ त्यावर बाबा म्हणाले : ‘‘अरे, मग आधी त्यांच्या लग्नाचं बघ की! तू बाप झालास की नाही? मग आता तुझं पहिलं कर्तव्य काय आहे, तर तुझ्या मुलींसाठी योग्य जोडीदार शोधणं, त्यांना चांगलं घर बघून त्यांचा विवाह लावून देणं. हे तुझं कर्तव्य करून मग पंढपूरला यायचं तर ये. कर्तव्य सोडून तू नुसता देवाच्या मागं लागलास, तर त्याचा काय उपयोग आहे?’’ संत गाडगेबाबांबरोबरचा हा प्रसंग वडिलांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्या विचारांचा खोल परिणाम त्यांच्यावर झाला. त्यामुळे आयुष्यात आपोआप आणि अचानक काही होईल हा विचार त्यांना कधी पटला नाही. आपलं कर्म आपण केलच पाहिजे हा विचार त्यांनी आयुष्यभर त्यांनी जपला आणि आमच्याही मनात रुजवला.

आमच्या वडिलांनी सांगितलेली अशी उदाहरणं आम्ही मनापासून ऐकायचो, त्यावर विचार करायचो आणि आचरणात आणायचा प्रयत्न करायचो. आता काळ खूप बदलला आहे. आत्ताच्या पिढीला सगळं रेडिमेड हवं असतं. लहान असताना माझा मुलगा ध्रुव म्हणायचा : ‘‘बाबा, येताना अमुक अमुक घेऊन या.’’ मी म्हणायचो : ‘‘अरे, पैसे नाहीयेत आता.’’ त्यावर तो म्हणायचा : ‘‘अहो, ते एटीएम मशीन असतं ना, त्यातून येतात पैसे.’’ हे ऐकल्यावर मी त्याला समजावून सांगितलं, की ‘‘बाळा, त्यात आपोआप पैसे येत नाहीत. आधी आपल्याला काम करावं लागतं, मग त्याचे आपल्याला पैसे मिळतात, ते बँकेत जमा होतात आणि मग आपण ते एटीम मशीनमधून काढू शकतो.’’ सांगायचा मुद्दा हा, की आजूबाजूच्या बदलत्या गोष्टींमुळे आत्ताची पिढी वास्तवापेक्षा फँटसीमध्ये , रेडिमेड गोष्टींमध्ये जास्त अडकलेली आहे. आजकाल शाळेच्या प्रोजेक्टपासून खाण्याच्या सर्व पदार्थांपर्यंत सगळ्या गोष्टी बाजारात मिळतात. त्यामुळे बरेचदा ते तयार करण्यातली गंमत, मेहनत मुलांना समजत नाही. परिणामी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला आहे. आमचे वडील कायम एक वाक्य म्हणायचे : ‘घी देखा बडगा नही देखा.’ म्हणजे दुकानात तूप मिळतं एवढच माहित आहे पण तूप मिळवण्यासाठी किती मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं हे मुलांना समजत नाही. मी ध्रुवला नेहमी सांगत असतो, की ‘‘तुझे बाबा सेलिब्रिटी आहेत म्हणून तुला कुठंही प्रवेश मिळेल असं समजू नकोस. तुझी मेहनत तुलाच करावी लागेल. चांगल्या कॉलेजला प्रवेश हवा असेल, तर चांगले गुण मिळवावे लागतील. तू अभिनेता, डॉक्टर किंवा इंजिनियरच हो असं आमचं अजिबात म्हणणं नाही. तुला जे व्हायचं ते तू हो; पण त्याच्यासाठी जे कष्ट घ्यावे लागणार आहेत ते स्वतःलाच घ्यावे लागतील हे लक्षात घे.’’ मुलांना सध्याच्या काळात वेगवेगळ्या गोष्टींची सहज उपलब्धता वाढली आहे. आमच्या काळी एवढी मुबलकता नव्हती. त्यामुळे काहीही मिळवायचं असेल, तर त्यासाठी कष्ट करण्याची तयारी होती. मी गावात अगदी साध्या सरळ वातावरणात वाढलो. ध्रुव मुंबईत आणि आधुनिक वातावरणात वाढत आहे; पण तरीही ध्रुवला मी इथपर्यंत येण्यासाठी काय कष्ट घेतले हे सांगत असतो. ‘गावातून मुंबईला आलो, तेव्हा लगेच काही काम मिळालं नाही. सर्वप्रथम स्वतःच्या दोनवेळच्या जेवणाची आणि राहण्याची सोय करावी लागली. छोटी छोटी कामं करत मी इथपर्यंत आलो आहे. पहिली बाईक मी वयाच्या छत्तिसाव्या वर्षी घेतली. तू अगदी लहानपणापासून सहज गाडीतून फिरतोस, हे तुझं नशीब आहेच; पण त्यामागचे कष्ट समजून घे.’ मुलांनाही आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव असावी आणि आपल्यालाही सहज यश मिळणार नाही हे समजलं पाहिजे.

याबरोबरच मी ध्रुवला जबाबदार नागरिक म्हणून काही गोष्टींची जाणीव करून देत असतो. उदाहरणार्थ, आपल्याला मुंबईत पाणी मुबलक प्रमाणात मिळतं म्हणून आपण ते भरमसाठ वापरता कामा नये. आजही कित्येक गावांत पुरेसं पाणी मिळत नाही. कित्येक मैल चालून त्या लोकांना पाणी आणावं लागतं. त्यांचा विचार आपण केला पाहिजे. शॉवरऐवजी बादलीत पाणी घेत जा असं मी त्याला सांगतो आणि हे तो ऐकतोही. शेवटी पालकांनीच मुलांना चांगलं-वाईट, योग्य-आयोग्य या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. काही गोष्टी मुलांना पटतात, तर काही नाही पटत; पण आपण सांगत राहायचं. काही बदल हे पालकांनाही स्वीकारावे लागतात. मुलांनी समज येईपर्यंत मोबाईल वापरू नये, असं मलाही वाटत होतं; पण आता सगळंच ऑनलाइन सुरू झालं आहे, तेव्हा आपण अशा गोष्टींपासून मुलांना दूर नाही ठेऊ शकत. मात्र, वेळेची मर्यादा नक्कीच ठरवू शकतो. तंत्रज्ञानाबाबत ही पिढी उपजत हुशार आहे. मोबाइलचा वापर किंवा अन्य तत्सम गोष्टी मी ध्रुवकडूनच शिकलो. त्याबाबतीत तो माझा गुरू आहे.

आमच्या कुटुंबात कुठलीही वस्तू आणताना ती परस्परांच्या संमतीनंच येते. मुलाला काही हवं आहे, म्हणून तो कधीही परस्पर खरेदी करत नाही. आम्हा दोघांना विचारून आणि दाखवून खरेदी करतो. तसं पाहिलं तर ध्रुवकडे मी बरेचदा बँकेची जबाबदारी देतो. त्याच्याकडे माझं कार्ड असतं; पण तो कधीही न विचारता कोणती वस्तू घेत नाही. मी त्याला सांगून ठेवलं आहे - गरज असेल तेवढंच घ्यायचं. आमच्या वऱ्हाडी भाषेत एक म्हण आहे : ‘पोटाला लागेल तेवढंच खावं. उगाच वाया घालवू नये.’ हेच तत्त्व पैसे खर्च करण्याच्या बाबतीत लागू होतं. गरज असेल ती वस्तू अवश्य घ्यावी; पण वस्तू घेतली आणि ती नुसती पडून राहीली आहे असं होता कामा नये. आज आपल्याकडे लोकांच्या प्रेमामुळे, देवाच्या कृपेमुळे पैसा आहे म्हणून तो व्यर्थ गोष्टीत खर्च करू नये. माझी पत्नी अर्चनाही आम्ही दोघं असतानाच कोणती गोष्ट खरेदी करते. तिला अगदी साडी घ्यायची असली, तरी आमचं मत घेते. भले मला त्यातलं काही कळत नसेल, तरी ती विचारते. छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकांचं मत घेणं, एकमेकांच्या मतांचा आदर करणं या गोष्टी कुटुंब घट्ट जोडलेलं राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

पालक म्हणून मी ध्रुवला सांगतो, की ‘तुला आयुष्यात जे व्हायचं असेल, ते तू नक्की होऊ शकतोस.’ माझ्या या मताला बरेच जण हसू शकतात; पण माझा ठाम विश्वास आहे, की अशक्य वाटणारी गोष्टही तुम्ही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मिळवू शकता. अर्थात त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. तुमच्या ध्येयामध्ये तुमची आर्थिक, सामाजिक, शारीरिक कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही. बरेच जण आपल्या अपयशाचं खापर परिस्थितीवर किंवा शारीरिक अक्षमतेवर फोडतात; पण मला हे मान्य नाही. मात्र, माझं ठाम मत आहे, की तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली, तर कोणतीही परिस्थिती त्याच्या आड येऊ शकत नाही. फक्त तुमची स्वतःवर नितांत श्रद्धा हवी आणि मी हे करू शकतो, असा आत्मविश्वास हवा. स्वतःवरचा विश्वास कधी उडू देऊ नका. तो उडाला, की मग पुढची वाटचाल अवघड होते. सुरुवातीच्या काळात मी कितीतरी वेळा ऑडिशनच्या रांगेत उभा राहायचो. दोन-तीनशे लोक एकावेळी असायचे. बरेचदा काहीजण कंटाळून, काहीच होत नाही म्हणून निराश होऊन निघून जायचे. मात्र, मी माझा विश्वास कधी कमी होऊ दिला नाही आणि मग हळूहळू माझ्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत इथपर्यंत आलो. या मार्गानं जाताना भले उशीर होईल; पण हवं ते मिळतंच.

माझे वडील शिक्षणाधिकारी होते; पण आम्ही अमुकच व्हावं असा त्यांचा आग्रह नव्हता. एक पदवी घेतलीच पाहिजे याबाबत मात्र ते आग्रही होते. म्हणून मी अॕग्रिकल्चरमध्ये पदवी घेतली आणि मग मुंबईत माझ्या ध्येयपूर्तीसाठी आलो. वडिलांनी परवानगी दिली; पण तुझा खर्च तू कामधंदा करून भागव आणि अगदीच काही अडचण आली तर आम्ही आहोत असं सांगितलं. आमची परिस्थिती अडचणीची होती, असं काही नव्हतं; पण मुलांवर जबाबदारी टाकली पाहिजे म्हणजे पैशांचं महत्त्व समजतं, असा माझ्या वडिलांचा विचार होता. मीदेखील ध्रुवला तेच सांगणार आहे. आता तो दहावी झाला. ‘अकरावी-बारावी झाल्यावर पुढचं शिक्षण घेता घेता पार्टटाइम नोकरी कर. ती नोकरी कोणतीही असू दे, अगदी पिझ्झा शाॕपमध्येही चालेल; पण ती कर. कारण तिथं तुला जग कळेल. लोक खालच्या वर्गाशी कसे वागतात, पैसेवाल्यांशी कसे वागतात, आपण या सर्वांशी कसं वागतो, यांसारख्या गोष्टी समजतील. उद्या तुला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तळागाळापासून सर्व लोकांशी कसं वागावं हे तुला समजलं पाहिजे. हे शिक्षण अनुभवातूनच घेतलं पाहिजे.’

अभ्यासाच्या बाबतीतही मी त्याला हेच सांगितलं आहे, की प्रत्येक धडा, विषय समजून घे. नुसतं पाठांतर करू नकोस. आता दोन मार्क कमी मिळाले तर चालतील. कारण पुढचं आयुष्य हे मार्कांवर आवलंबून नसतं, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट कशी समजून घेतली यावर अवलंबून असतं. मागे वळून बघतो तेव्हा मला दिसतं, की आमच्या वेळी मेरिट लिस्टमध्ये आलेली किंवा भरपूर मार्क मिळालेली बरीचशी मुलं आयुष्याच्या शाळेत तितकीशी यशस्वी नाही झालीत. म्हणून आयुष्याची शाळा डोळसपणे शिक, असं मी ध्रुवला सांगत असतो.

माझ्या कामामुळे मी घरातल्या जबाबदाऱ्या जास्त घेऊ शकत नाही. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी अर्चानाच बघते. ध्रुवच्या जडणघडणीमध्येही तिचाच महत्त्वाचा वाटा आहे. सुरुवातीला तीही नोकरी करायची. त्या काळात तिनंही घरासाठी आर्थिक हातभार लावला; पण नंतर तिनं नोकरी सोडली. अर्चनानं घराची पूर्ण जबाबदारी स्वीकारली, म्हणूनच मी निश्चिंतपणे माझं काम करू शकलो. त्यामुळे माझ्या या प्रवासात तिची सोबत खूप महत्त्वाची आहे.

शेवटी पालक म्हणजे अशी व्यक्ती- जी आपल्या मुला-मुलींचं हित सतत बघत असते. मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी मुलांशी बोलून, चर्चा करूनच ते हित बघितलं पाहिजे. मुलांच्या वयानुसार पालकांनी बदलत राहिलं पाहिजे. मुलांच्या वाढत्या वयानुसार पालक बदलत गेले, तर बऱ्याच गोष्टी साध्य होतात. मी अनेक घरात बघितलं आहे, की वडील घरी येताना दिसले की, मुलं पटकन शांत बसून अभ्यासाचं पुस्तक समोर धरून बसतात. ‘बाबा आले’ ही भीती मनात असते. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, की ‘ज्याची मुलं, बायको आपल्या वडिलांना अथवा नवऱ्याला अशा प्रकारे घाबरत असतील, तर तो माणूस पालक म्हणून किंवा जोडीदार म्हणून नालायक आहे. बऱ्याच पुरुषांना, मी घरी आलो म्हणजे घरी सगळं चिडीचूप होतं याचा अभिमान असतो; पण खरं तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही जर घरातले कर्ते पुरुष आहात, तर तुमचं घरात स्वागतच व्हायला पाहिजे. तुमच्या येण्यानं घरात सगळ्यांना आनंदच झाला पाहिजे. तुमच्या येण्यानं घरात दहशत पसरत असेल, तर घरात प्रॉब्लेम आहे असं समजावं.
(शब्दांकन : मोना भावसार)

loading image