esakal | मुलंही बनतात प्रेरणास्थान... (भरत जाधव)
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat-Jadhav

एकदा ती पटकन म्हणाली, " मला हे आवडलं आहे, पण आता नको हं बाबा, पैसे येतील तेव्हा आपण घेऊ." मला तिचं खूप कौतुक वाटलं. पुढं माझं, '' सही रे सही'' नाटक आलं आणि ते वर्षभरातच खूप गाजलं, तेव्हा माझं करिअर खऱ्या अर्थानं सुरू झालं. मी नंतर थ्री बीएचके फ्लॅट घेतला आणि त्यातली एक रूम सुरभीला आवडलेल्या आणि हव्या असणाऱ्या वस्तूंनी भरली आणि तिच्या वाढदिवसाला ती रूम तिला भेट दिली. मुलंसुद्धा वडिलांचं प्रेरणास्थान बनू शकतात ते अशाप्रकारे.

मुलंही बनतात प्रेरणास्थान... (भरत जाधव)

sakal_logo
By
भरत जाधव saptrang.saptrang@gmail.com

एकदा ती पटकन म्हणाली, " मला हे आवडलं आहे, पण आता नको हं बाबा, पैसे येतील तेव्हा आपण घेऊ." मला तिचं खूप कौतुक वाटलं. पुढं माझं, '' सही रे सही'' नाटक आलं आणि ते वर्षभरातच खूप गाजलं, तेव्हा माझं करिअर खऱ्या अर्थानं सुरू झालं. मी नंतर थ्री बीएचके फ्लॅट घेतला आणि त्यातली एक रूम सुरभीला आवडलेल्या आणि हव्या असणाऱ्या वस्तूंनी भरली आणि तिच्या वाढदिवसाला ती रूम तिला भेट दिली. मुलंसुद्धा वडिलांचं प्रेरणास्थान बनू शकतात ते अशाप्रकारे.

आई-वडील यांना मी माझं दैवतच मानतो. कदाचित ही गोष्ट पुस्तकी वाटू शकते; पण माझ्यासाठी हे सत्य आहे. त्यांच्या संस्कारांची शिदोरी आजही माझ्यासाठी मोठा ठेवा आहे. माझे वडील कोल्हापूरहून मुंबईला आले तेव्हा सोबत फक्त कृष्णाचा फोटो आणि दोन कपडे घेऊन आले होते. त्यांनी अगदी शून्यातून संसार उभा केला. लहान-मोठी कामं करत पुढं त्यांनी टॅक्सी चालवली; पण तशाही परिस्थितीत आम्हाला शिकवलं. आम्ही चार भावंडं, त्यांत सगळ्यांत लहान मी. सगळ्यांना शिकवलं, गरिबीची झळ आम्हाला लागू दिली नाही. चाळीतल्या छोट्या घरात राहायचो; पण त्या छोट्या घरात मोठे संस्कार आमच्यावर झाले. तसं पाहिलं तर, आम्ही वेड्यावाकड्या रस्त्यावर जाऊ शकलो असतो; पण माझ्या आई-वडिलांचं वागणं इतकं समृद्ध होतं, की त्यांच्याकडं बघून आम्ही नेहमी संस्कारांच्या समृद्ध रस्त्यानंच वाटचाल केली. अर्थात, या सगळ्या गोष्टी आपण बाप होतो तेव्हाच समजतात, त्यांचं महत्त्व तेव्हा समजतं. आता त्यांच्या आशीर्वादानं बऱ्यापैकी पैसा हातात आहे, त्यामुळं मुलांच्या आवडीनिवडी जपता येतात. पण त्या वेळी अगदी कमी उत्पन्न असताना आई रोजच्या खर्चातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून रविवारी किंवा महिन्यातून एकदा आमच्यासाठी नॉनव्हेज करायची, कारण आम्हाला ते आवडायचं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुटपुंज्या मिळकतीतूनही बचत करून मुलांच्या आवडीच्या गोष्टी करणं, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी धडपडणं, ही नक्की विशेष गोष्ट होती. अशा गोष्टींचं महत्त्व मला तेव्हा नव्हतं समजत; पण आता अधिक ठळकपणे जाणवतंय. सुदैवानं माझ्या मुलांना आजी-आजोबांचा सहवास भरपूर मिळाला. माझी आई अलीकडंच गेली आणि दोन-एक वर्षांपूर्वी वडील गेले. त्यामुळं मुलांना त्यांच्या प्रेमासोबतच उत्तम संस्कारही मिळाले. आम्ही पालक झालो तरी शेवटपर्यंत आई-वडिलांप्रती मनात एकप्रकारचा आदर होता, धाक होता. रोज सकाळी देवाला नमस्कार केल्यानंतर मी आई-वडिलांच्या पाया पडायचो, त्यामुळं माझी मुलंही तेच करतात. या गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत. हे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं आपोआप जातात. आपण शाळेत जाऊन शिक्षण घेतो, पुढं बऱ्याच गोष्टी शिकतो; पण घरात होणारे संस्कार खूप महत्त्वाचे असतात. नशिबानं असे संस्कार अजूनही अनेक महाराष्ट्रीयन कुटुंबांत दिसून येतात. जेवताना ताटात अन्न टाकायचं नाही, हे लहानपणापासून आमच्या मनावर बिंबलं आहे. ताटात काही शिल्लक ठेवलं, तर आम्हाला मार बसायचा.

नको होतं तर एवढं घेतलंच कशाला, हवं तेवढंच घ्यावं आणि घेतलं आहे तर ते संपवायचं, असा आई-वडील दोघांचा शिरस्ता होता. त्यामुळं अजूनही घरात आम्ही कधी अन्न वाया जाऊ देत नाही. माझ्या मुलांनाही मी ही शिस्त लावली आहे. ज्या पिढीतून, संस्कारातून आपण आलो आहोत, त्याचं भान ठेवावंच लागतं आणि त्याची किंमतही कायम मनात असते. मी व पत्नी सरिता मुलांवर कुठली गोष्ट लादत नाही; तुम्ही असंच केलं पाहिजे, असा सहसा आमचा हट्ट नसतो. पिढीनुसार नव्या गोष्टी मुलांबरोबर येणारच; पण संस्कारांच्या बाबतीत मात्र आम्हाला तडजोड चालत नाही. खूप जास्त श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांसाठी गडगंज प्रॉपर्टी ठेवून जातात, पुढच्या पिढीला त्याचा ठेवा देतात. मी मात्र संस्कारांचा ठेवा मुलगी सुरभी व मुलगा आरंभ यांना दिला आहे. सुरभी सासरी जाईल तेव्हा तिथंही तिनं हा ठेवा पुढं न्यावा आणि मुलानंही त्याच्या पुढच्या पिढीला तो द्यावा, असं मला वाटतं.

वडील मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडं काहीच नव्हतं; पण त्यांनी खूप कष्ट केले आणि आम्हाला सक्षम बनवलं. माझं ''अॉल द बेस्ट'' नाटक आलं तोपर्यंत वडील टॅक्सी चालवत होते. माझं उत्पन्न फारसं सुरू झालं नव्हतं. कारण हे नाटक एकांकिका स्पर्धेतून व्यावसायिक रंगभूमीवर आलं होतं. एकदा शिवाजी मंदिरला ''अॉल द बेस्ट''चा प्रयोग होता आणि वडिलांच्या टॅक्सीत जे ग्राहक बसले होते त्यांना याच नाटकाला यायचं होतं. रस्त्यात ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं ते वडिलांना गर्दीतून टॅक्सी लवकर काढण्यासाठी आग्रह करू लागले आणि वैतागून थोडे वाईट शब्द बोलू लागले. रात्री मी शो संपवून घरी आलो तेव्हा मला वडील म्हणाले, "मी आज शिवाजी मंदिरपाशी आलो होतो, तो माणूस जरा घाई करत असभ्य भाषेत बोलत होता. मला सुरुवातीला राग आला; पण नंतर मी विचार केला, की आपल्याच मुलाच्या नाटकासाठी तो घाई करत आहे ना, मग कशाला चिडायचं? उलट मला बरं वाटलं." त्याच दिवशी मी त्यांना म्हणालो, "आता बस झालं, तुम्ही टॅक्सी नका चालवू यापुढं." कारण ते दिवसभर टॅक्सी चालवून त्यांना शंभर रुपये मिळायचे.

मला त्या वेळी त्या नाटकाची शंभर रुपये नाइट होती. त्यामुळं मी त्यांना म्हटलं, "नाटकाचे एक-दोन शो होतात दिवसाचे, तर तुम्ही नका जाऊ आता टॅक्सी चालवायला." मला बरं वाटावं म्हणून त्यांनी माझं ऐकलं; पण पुढचे सहा महिने त्यांनी टॅक्सी चाळीत तशीच ठेवली होती. त्याचं कारण म्हणजे, उद्या नाटकाचं काही झालं, ते बरं नाही चाललं, तर पुन्हा टॅक्सी चालवता येईल. हा त्यांचा एकप्रकारचा मूक पाठिंबाच होता माझ्या करिअरसाठी. त्यामुळं माझीपण जबाबदारी वाढली. माझे वडील जर माझ्यासाठी एवढं करू शकतात, तर मीसुद्धा माझ्या करिअरवर खूप जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून माझ्या वडिलांवर पुन्हा टॅक्सी चालवायची वेळ येऊ नये. अभिनयाचं क्षेत्र तसं खूप अनिश्चित असतं; पण तरीही माझ्या वडिलांनी त्याला कधी विरोध केला नाही, शांतपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या पालकत्वात कधी व्यवहार नव्हता. आजच्या इतकी महागाई तेव्हा नव्हती आणि शंभर रुपयांत व्यवस्थित घर चालवून दोन पैसे ते शिल्लक ठेवायचे.

त्या तुलनेत आजच्या पालकत्वामध्ये गरजाच खूप वाढल्या आहेत. त्या सांभाळताना, पूर्ण करताना बऱ्यापैकी दमछाक होते. कर्जाचे हप्ते वगैरेसारख्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला बांधून घेतलं आहे. त्यातही गाठीशी पैसा राहावा म्हणून आपण अजून काम करतो. आपल्याला जे मिळालं नाही, ते आपल्या मुलांना मिळावं, अशीही भावना आजच्या बऱ्याच पालकांची असते. जगाच्या बरोबर चालण्याच्या नादात आपण गरजा वाढवतो आणि स्वतःची दमछाकही वाढवतो. खरंतर आपल्या लहानपणी आहे त्या सर्व गोष्टींत आपण सुखी असतो, आनंदी असतो. पण नव्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अजून काम करतो, खूप जास्त व्यग्र राहतो. आताच्या काळात कोणतंही काम म्हणजे नऊ तासांची ड्युटी राहिली नाही, ते बारा- चौदा तासांवर गेलं आहे. मुलांना आणि आपल्यालाही मोबाइल, लॅपटॉप वगैरे सारख्या नव्या वस्तूंची गरज निर्माण झाली आहे. आमच्या पिढीनं माझ्या मते सर्वांत जास्त स्थित्यंतरं पाहिली आहेत. ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीचा रंगीत टीव्ही झाला, व्हिडीओ आला, एलईडी आला; तसंच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप अशा कितीतरी गोष्टी जगण्याचा भाग बनल्या आहेत. पूर्वी घरात लँडलाइन फोन असणं ही श्रीमंतीची गोष्ट होती. पण आता घरात जवळपास प्रत्येकाकडं मोबाईल असतो, शिवाय तो कोणत्या कंपनीचा आहे हे देखील महत्त्वाचं बनलं आहे. बरेचदा या सगळ्या गरजा पुरवताना अधिक काम करण्याच्या नादात पालकांचं मुलांकडं दुर्लक्षही होतं. आधीच्या आणि आताच्या अशा दोन पिढ्यांच्या पालकत्वामध्ये मला असे काही फरक जाणवून येतात.

मी स्वतः पालक झाल्यानंतर नाटकात आणि चित्रपटांत अधिक व्यग्र होत गेलो. मुलगी सुरभी हिला तर मी अंथरुणात म्हणजे झोपेतच वाढताना बघितलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. अनेकदा मी लागून सुट्टी आली, की मुलांना शूटिंगच्या ठिकाणीच बोलावून घ्यायचो आणि शूटिंग संपलं की जवळ असणाऱ्या प्रेक्षणीय स्थळी त्यांना घेऊन जायचो. मुलांना वाढवण्यात पत्नीनं म्हणजेच सरितानं खूप जास्त मेहनत घेतली, तिचं योगदान त्यांच्या संगोपनात अधिक आहे. संसाराची एक बाजू स्त्रीनं साभाळलेली असते, तेव्हाच पुरुष दुसऱ्या बाजूनं झोकून लढू शकतो, काम करू शकतो, अन्यथा तो कोणाच्या जिवावर एवढं सगळं करू शकेल? कलाकाराचं मन नेहमी तणावरहित, विचाररहित असावं लागतं, तरच आलेली भूमिका आम्ही अधिक समरसतेनं आणि ताकदीनं करू शकतो. मला अशाप्रकारे तणावरहित ठेवण्याचं श्रेय सरिताचंच आहे. तिनं संसाराची, मुलांची जबाबदारी अतिशय सक्षमपणे सांभाळली.

सुरभी आताच एमबीबीएस झाली आहे, पुढं ती एमडी करणार आहे आणि मुलगा आरंभ नुकताच बारावी झाला आहे. मुलं त्यांचं शिक्षण आणि त्याचबरोबर काळानुसार बदलणाऱ्या गोष्टी स्वतःहून शिकतात, त्याबाबतीत ती पालकांपेक्षा पुढंच असतात. आपण त्यांना देण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे ''संस्कार.'' अर्थात, हे पण शिकवून देता येत नाही, तर आपलं वागणं बघून मुलं आपोआप शिकतात. आपल्या वागण्या-बोलण्याबरोबरच घरात काय चाललं आहे, गोष्टी कशा अॕडजेस्ट केल्या जातात हेसुद्धा मुलांना समजलं पाहिजे, त्याची जाणीव पालकांनी मुलांना करून दिली पाहिजे. आई-बाबा कष्ट करत आहेत आणि मुलं पैसे उडवत आहेत असं होता कामा नये. पैसे कमावण्यासाठी त्यांना किती काम करावं लागतं, घरातील खर्च कसे चालतात वगैरे गोष्टींची जाणीव मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांना करून दिली पाहिजे. ते समजल्यावर मुलं आपोआप शहाणी आणि समजूतदार होतात. माझ्या आई-वडिलांनी लहानपणी आम्हाला सांगितलं होतं, की घरात कोणी मोठं माणूस आलं, की त्यांना नमस्कार करायचा. इतकंच नाही, तर नाटक छान झालं आहे असं सांगायला नाटक संपल्यावर कोणी ज्येष्ठ आलं, तर त्यांनाही नमस्कार करायचा. मी अजूनही ही गोष्ट पाळतो आणि माझं बघून मुलं देखील हे करतात. मोठ्यांचा आदर करा असं मला वेगळं सांगायची गरज कधीच पडली नाही.

तसंच मेहनतीचंदेखील आहे, मुलांना आपल्याकडं बघून मेहेनतीचं महत्त्व बरोबर समजतं. सुरभी दहावीत होती तेव्हा तिनं काही क्लासेस लावले होते, त्यामुळं ती फार व्यग्र झाली होती. मी जेव्हा घरी आल्यावर हे बघितलं तेव्हा मला ते जास्त वाटलं. मी सरिताला म्हणालो, "एवढे क्लास लावायची काय गरज आहे, ताण येतो तिच्यावर." त्याचवेळी मी ''शिक्षणाच्या आईचा घो'' हा चित्रपट करत होतो. त्याचा विषयपण आपण मुलांवर अशा सगळ्या गोष्टी लादतो असाच होता. पण सुरभी मात्र तिचे क्लास व्यवस्थित करत होती. तिनं परीक्षा सुरू होण्याआधी तिच्या रूममध्ये समोर दिसेल अशा पद्धतीनं ९८% असं लिहून ठेवलं होतं. अठ्याण्णव टक्क्यांचं तिचं ध्येय बघून मला छान वाटलं होतं. पण निकालाच्या आदल्या दिवशी मी तिला जवळ बसवून सांगितलं, "हे बघ सुरभी, तू छान अभ्यास केला आहेस, उत्तम गुण तुला पडतीलच; पण मला इतकेच गुण मिळाले पाहिजेत, याचं तू टेंशन घेऊ नकोस. तुला साठ टक्के पडले तरी मला चालणार आहे, त्याचं मला वाईट वाटणार नाही, हे पक्कं लक्षात घे." तिला कोणतंही दडपण येऊ नये हीच माझी अपेक्षा होती. कारण निकालाच्या आधी मुलांची मानसिकता खूप वेगळी असते. त्या वेळी पालकांनी ती समजून घेतली पाहिजे आणि त्यांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

निकाल लागला आणि सुरभीला तिच्या कष्टाचं फळ मिळालं, चौऱ्याण्णव टक्क्यांनी ती उत्तीर्ण झाली. सुरभी लहानपणापासूनच खूप समजूतदार आहे. ती चार वर्षांची होती तेव्हा माझं ''श्रीमंत दामोदर पंत'' हे एकच नाटक सुरू होतं, हातात चित्रपट नव्हते. माझ्याकडं स्कूटर होती. आम्ही तिघं बाहेर जायचो तेव्हा सुरभी सरिताला म्हणायची, "आई हे घ्यायचं, ते घ्यायचं," आम्ही त्या वस्तूची किंमत बघायचो आणि म्हणायचो, "नको आता नको, पैसे येतील ना तेव्हा घेऊ." असं चार ते पाच वेळा झालं. एकदा ती पटकन म्हणाली, "मला हे आवडलं आहे, पण आता नको हं बाबा, पैसे येतील तेव्हा आपण घेऊ." मला तिचं खूप कौतुक वाटलं. पुढं माझं, ''सही रे सही'' नाटक आलं आणि ते वर्षभरातच खूप गाजलं, तेव्हा माझं करिअर खऱ्या अर्थानं सुरू झालं. मी नंतर थ्री बीएचके फ्लॅट घेतला आणि त्यातली एक रूम सुरभीला आवडलेल्या आणि हव्या असणाऱ्या वस्तूंनी भरली आणि तिच्या वाढदिवसाला ती रूम तिला भेट दिली. मुलंसुद्धा वडिलांचं प्रेरणास्थान बनू शकतात ते अशाप्रकारे.

असाच एक गेल्यावर्षीचा प्रसंग सांगतो. मी अमेरिकेत गेलो होतो. तिथून मी दोघा मुलांसाठी अॕपलचे लेटेस्ट फोन आणले. सुरभीला गरज होती म्हणून तिनं तो घेतला. पण आरंभ म्हणाला, "बाबा मला आत्ता याची गरज नाही, मला नको. तुम्ही बाहेर जात असता, तुम्हाला या फोनची गरज आहे, तुम्ही वापरा." दोन्ही मुलांचा हा समजूतदारपणा संस्कारांतूनच आला आहे, असंच मी म्हणेन. यामध्ये पालकांचीच भूमिका महत्त्वाची असते. केवळ जन्म देणं म्हणजे पालकत्व नाही, तर त्यांचं योग्य प्रकारे संगोपन करणं, पालन-पोषण करणं आणि त्यांना एक सक्षम व चांगला माणूस बनवणं, हे पालकत्व आहे.
( शब्दांकन : मोना भावसार )

Edited By - Prashant Patil