esakal | बंदिस्त खेळ (शैलेश नागवेकर)
sakal

बोलून बातमी शोधा

shailesh nagvekar

कोरोनाच्या महासंकटानं सर्वच क्षेत्रांत उलथापालथ घडवली आहे. केवळ खेळ आणि मनोरंजन एवढ्यापुरत्याच मर्यादित न राहिलेल्या क्रीडाक्षेत्राचीही मोठी हानी कोरोनामुळे झाली आहे.

बंदिस्त खेळ (शैलेश नागवेकर)

sakal_logo
By
शैलेश नागवेकर nshailu@gmail.com

कोरोनाच्या महासंकटानं सर्वच क्षेत्रांत उलथापालथ घडवली आहे. केवळ खेळ आणि मनोरंजन एवढ्यापुरत्याच मर्यादित न राहिलेल्या क्रीडाक्षेत्राचीही मोठी हानी कोरोनामुळे झाली आहे. हजारो-लाखो डॉलरची किंवा रुपयांची उलाढाल होत असलेल्या क्रीडाक्षेत्राला लवकरात लवकर सावरायचं असेल तर प्रेक्षकांविना स्पर्धा-सामने भरवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

कोरोना नावाचा विषाणू चीनच्या वुहान शहरात ज्या वेळी ‘बाळसं’ धरत होता; त्याच वेळी लंडनमध्ये इंग्लिश प्रीमिअर लीग, स्पेनमध्ये ला लीगा, इटलीत सिरी ए या प्रमुख फुटबॉल लीग सुरू होत्या. ऑस्ट्रेलियात महिलांची ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धाही पार पडत होती. एव्हाना, या कोरोनाला पाय फुटले आणि त्यानं ‘चायना वॉल’ कधीच पार केली. इटली, स्पेन, लंडन... युरोपातल्या या प्रमुख शहरांमध्ये त्यानं शिरकाव केला आणि हळूहळू सर्वांचीच पाचावर धारण बसण्यास सुरुवात झाली. एखादी वाईट गोष्ट अथवा घटना पाहिल्यावर ‘होत्याचं नव्हतं होणं’ हा शब्दप्रयोग कधी कधी पटकन वापरला जातो; पण सर्वसामान्य जीवनाबरोबरच खेळातही जे सुरळीत सुरू होतं त्याचं कसं होत्याचं नव्हतं झालं व ते कसं अल्पावधीतच घडलं हे समजण्याच्या पलीकडचं आहे.

‘स्पोर्ट्स’ हे आता केवळ खेळ, खेळाडू आणि मनोरंजन एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. त्याचं व्यवसायीकरण कधीच झालं आहे. एक अर्थव्यवस्था उभी करण्याची ताकद खेळामध्ये आहे. फुटबॉल असो वा क्रिकेट, खेळ तोच; पण लीगच्या रूपानं ते ते देश किंवा खेळाचं पालकत्व असलेल्या संघटना त्यांच्या क्षमतेनुसार लाखो, कोट्यवधी रुपये, डॉलर, पौंडची उलाढाल करत असतात. जो जो संबंधित असतो तो तो त्याच्या त्याच्या क्षमतांनुसार, योगदानानुसार कमावत असतो. आयपीएलचंच उदाहरण द्यायचं तर आयपीएलचा मुंबईत सामना असतो तेव्हा ‘मुंबई इंडियन्स’चे मालक आणि आशिया खंडातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून ते प्रेक्षकांना रांगेतून प्रवेश देण्यासाठी स्टेडियमबाहेर बांबूचे बॅरिकेट्स उभारणाऱ्या मजुरापर्यंत सगळेच जण कमावत असतात. अमेरिका खंडातली सर्वाधिक लोकप्रिय एनबीए असो वा टेनिसच्या ग्रँडस्लॅम वा एटीपी स्पर्धा असोत, खेळांच्या स्पर्धांचा हा नित्यक्रम सुरूच असतो; पण एवढ्याशा आणि भिंग लावूनही न दिसणाऱ्या कोरोनानं होत्याचं नव्हतं केलं!

खरं तर सन २०२१ हे वर्ष स्पोर्ट्सचं वर्ष असणार होतं. टोकियो ऑलिंपिक, युरो फुटबॉल, पुरुषांची ट्वेंटी-२० विश्वकरंडक अशा एकाच वर्षात या तीन मोठ्या क्रीडास्पर्धा होत्या.
याशिवाय, इंग्लिश प्रीमिअर लीग, स्पॅनिश लीग अंतिम टप्प्यात होत्या, चॅम्पियन्स लीगही सुरू झाली होती, फ्रेंच आणि विम्बल्डन आणि आयपीएल नित्याप्रमाणे एप्रिल-मे-जून महिन्यांत होणारच होत्या. खेळावर प्रेम करणारा खेळाचाच विचार करेल; पण या सर्व स्पर्धांचा समग्रपणे विचार केला तर किती प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार होती याचं गणित मांडताना कॅल्क्युलेटरवरचे आकडेही कमी पडले असते! मात्र, सध्या सर्व काही लॉकडाउनमध्ये आहे. ऑलिंपिकसह महत्त्वाच्या स्पर्धा वर्षभरासाठी पुढं ढकलण्यात आल्या आहेत; पण तेही अजून अनिश्चितच आहे. कारण, कोरोना कधी संपेल किंवा त्याला नष्ट करणारी लस कधी सापडेल यावर स्पर्धा, तसंच त्यांच्यासंदर्भातलं अर्थकारण अवलंबून आहे.

किती काळ हातावर हात धरून बसणार?
सावधगिरी बागळून कधी तरी सुरुवात तर करावी लागणारच. जर्मन लीगनं यासाठी पुढाकार घेतला आहे. मुळात जर्मनीत कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. काटेकोर व्यवस्था करून त्यांच्या लीग-संयोजकांनी लीग सुरू करून जगाला दिशा दाखवली. केवळ फुटबॉलविश्वच नव्हे तर अमेरिकासुद्धा, ही लीग कोणत्या फॉर्म्युल्यानं खेळवली जात आहे, यावर लक्ष ठेवून आहे. ज्या इटलीत कोरोनानं धुमाकूळ घातला होता, त्यांच्या राज्यकर्त्यांनी हात टेकले होते तिथं सिरी ए लीग सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगालमधून इटलीत जाऊन सराव करू लागला आहे. स्पेनमध्येसुद्धा लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनानंही सराव सुरू केला आहे. त्यांच्या त्यांच्या लीग लवकरच सुरू होतील असा अंदाज आहे.

कोरोनानंतरचं युग
काहीही असो; पण कोरोनानंतरचं युग हे किमान काही काळासाठी तरी फार वेगळं असणार आहे. क्रीडाक्षेत्रही त्याला अपवाद नसेल ही काळ्या दगडावरची रेघ. स्पर्धा सुरू करायच्या असतील तर त्या रिकाम्या स्टेडियममध्ये आणि प्रेक्षकांविना खेळवाव्याच लागणार आहेत. कारण, ‘प्रेक्षक की पैसा?’ याचा विचार करता संयोजकांचं प्राधान्य पैशालाच असणार. आणि ते का असू नये? थोडक्यात काय तर, स्पर्धा-सामन्यांना प्रेक्षक आणि अर्थकारण अशी दोन चाकं असतात; पण आता अर्थकारणाच्या एका चाकावरच हा गाडा ओढावा लागणार आहे.

आपल्याकडच्या क्रिकेटचा विचार करता स्टेडियमची प्रेक्षकक्षमता तशी मर्यादितच असते, परंतु युरोपातल्या फुटबॉल लीगची स्टेडियम्स ही ७०-८० हजारांच्या क्षमतेपुढंच असतात. ९० मिनिटांच्या त्या खेळात प्रेक्षकांचा होणारा गलका, जल्लोष हा अभूतपूर्व असतो; पण जर्मन लीगनं प्रेक्षकांविना फुटबॉल कसा असेल हेही दाखवून दिलं आहे! मुळात, हा शरीरसंपर्क असलेला खेळ. एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचा नियम इथं लागू होऊ शकत नाही, तरीही हा खेळ सुरू झाला, ही सकारात्मक बाब आहे. शेवटी, आता टीव्हीचा आणि मोबाईलचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रक्षेपणहक्कातून मिळणारा निधी नफ्याची गणितं करत असतो, त्यामुळे ‘प्रत्यक्ष प्रेक्षक नसले तरी चालतील; पण खेळ सुरू व्हायला पाहिजे’ असं प्रत्येक क्रीडाप्रेमीला वाटत आहे.

प्रेक्षकांविना क्रिकेट
‘प्रेक्षकांविना सामने’ याला क्रिकेटही अपवाद नसेल. मुळात क्रिकेट हे 'कसोटी’ (लाल चेंडू) आणि 'मर्यादित षटकांचे' (सफेद रंगाचे चेंडू) या दोन प्रकारांत मोडतं. कसोटी क्रिकेटला स्टेडियम तशी रिकामीच असतात; पण मर्यादित षटकांच्या खेळांत, प्रामुख्यानं आयपीएलसारख्या ट्वेंटी-२० सामन्यात तर डीजेही दणाणत असतो. आता डीजे असेल; पण त्यावर ठेका धरणारे प्रेक्षक नसतील. आयपीएलचंच उदाहरण द्यायचं तर, ‘यंदाची स्पर्धा झाली नाही तर तीन हजार कोटींचा फटका बीसीसीआयला बसेल,’ असं अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच सांगितलं आहे. तेव्हा ‘स्टेडियमच्या तिकीटबारीवरून मिळणारं उत्पन्न मिळालं नाही तरी चालेल; प्रक्षेपणहक्कांतून तो तोटा भरून काढू,’ असाच विचार केला जाईल.

शेवटी तोटा प्रेक्षकांचाच!
कोरोनाचं संकट जसजसं कमी होत जाईल आणि भीती दूर होत जाईल
तसतसा मोजक्या प्रेक्षकांना - परस्परांमधल्या अंतराचा नियम पाळून- प्रवेश दिला जाऊ शकेल; पण त्या वेळी तिकीटबारीचा तोटा भरून काढण्यासाठी तिकिटांचे भाव दुप्पट होऊ शकतील आणि परिणामी, प्रेक्षकांच्याच खिशाला फटका बसू शकेल.  

विम्बल्डनची दूरदृष्टी
जगभरात होत असलेल्या विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये विम्बल्डन आपलं आगळंवेगळं अस्तित्व आणि प्रतिष्ठा टिकवून आहे. हिरवळीवरची स्पर्धा, पांढऱ्या पोशाखातले खेळाडू आणि त्यांची शिस्तबद्धता...ही शिस्तबद्धता केवळ दाखवण्यापुरतीच नाही, तर ती त्यांच्या विचारांमध्येही आहे. कोरोनामुळे सर्व खेळ थांबल्यामुळे आर्थिक नुकसान सर्वांना सहन करावं लागत आहे, मात्र, यात अपवाद एकमेव अशा विम्बल्डनचा आहे. कारण, साथीच्या आजारांचा त्यांनी स्पर्धेच्या विम्यामध्ये समावेश केला होता. त्याचे प्रीमिअम ते अनेक वर्षं भरत होते. साथीच्या आजारानं कधी एखादी स्पर्धा रद्द करावी लागेल असा आधुनिक विचार कुणीही केला नव्हता, तो केवळ विम्बल्डननं केला. आणि म्हणूनच त्यांना विमाकंपनीकडून सर्व भरपाई मिळणार आहे.