वाढवू आरोग्यभान (डॉ. प्रदीप आवटे)

dr pradip aawate
dr pradip aawate

कोरोना विषाणूचा शिरकाव महाराष्ट्रातही झाला आहे आणि वेगवेगळ्या आकड्यांनी, माहितींनी अनेकांना चिंतेत टाकलं आहे. या विषाणूमुळे होणारा आजार, त्याचं वेगळेपण नक्की काय, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी नेमकं कोणतं सूत्रं हवं, वेगवेगळ्या समाजघटकांचा दृष्टिकोन कसा हवा, यांमुळे होणाऱ्या मानसिक चिंतांचा सामना कसा करायचा आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन.

ज्या रुडॉल्फ विरकोला त्याची मित्रमंडळी ‘मेडिसिनचा पोप’ म्हणायची त्याचं हे वाक्य : ‘Medicine is a social science, and politics nothing but medicine at a larger scale.’ ते वाक्य आजच्या घडीला पुनःपुन्हा आठवतं आहे. कारण जगातल्या साऱ्या राज्यसंस्था सध्या आपली बाकीची कामं बाजूला ठेवून निव्वळ कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सारं काही करत आहेत. एका आरोग्यविषयक घडामोडीमुळे होत असलेले आर्थिक आणि सामाजिक परिणाम अत्यंत ठळकपणे आपल्यासमोर आले आहेत. उघड्या डोळ्यांनी दिसूही न शकणाऱ्या अतिसूक्ष्म अशा नवीन कोरोना विषाणूनं अवघ्या दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीत अवघं जग संक्रमित केलेलं आपण पाहतो आहोत. जगभरात सुमारे दोन लाख रुग्ण आणि आठ हजाराच्या आसपास मृत्यू या कोविड १९ या आजारामुळे झाले आहेत. भारत आणि महाराष्ट्रातही या आजारानं पाऊल ठेवलं असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या देशात पावणेदोनशेच्या पुढे, तर राज्यात पन्नाशीच्या घरात गेली आहे. चीननंतर इराण, इटली, दक्षिण कोरिया या देशांमधल्या कोरोना उद्रेकाचं स्वरूप पाहता आपल्यापुढे नेमकं काय वाढून ठेवलं आहे आणि आपण त्याचा सामना कसा करणार आहोत, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

नियंत्रणाची पंचसूत्री
कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणाची पंचसूत्री आपल्या हातात आहे. दक्षिण कोरिया, तैवानसारख्या देशांनी ही पंचसूत्री परिणामकारक आहे, हे सिद्ध केलं आहे. ‘विलगीकरण, उपचार, संशयितांचं निदान, निकटसहवासितांचा शोध घ्या आणि लोकांना कोरोनाबाबत शिक्षित करा’ ही ती पंचसूत्री. थोडक्यात Isolate, Treat, Test, Trace आणि Educate या पाच शब्दांमध्ये ही पंचसूत्री सामावली आहे.
कोरोना उद्रेकाची सुरुवात चीनमध्ये झाली आहे. त्यामुळे कोणत्याही देशात सुरुवातीला आढळणाऱ्या कोरोना किंवा कोविड १९ आजाराच्या केसेस या परदेश प्रवासाचा इतिहास असणाऱ्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी सुरू असून, त्यामध्ये आपण या सर्व प्रवाशांचे शरीराचं तापमान पाहतो आहोत. या तपासणीत कोणालाही ताप किंवा इतर लक्षणं आढळल्यास अशा प्रवाशांना तडक विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. मध्यपूर्वेतून किंवा चीन, इराण, कोरिया अशा देशांतून येणाऱ्या प्रवाशांना लक्षणं जरी नसतील, तरी संस्थात्मक पातळीवर वेगळं ठेवण्याकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे. संस्थात्मक क्वारंटाईन आवश्यक असणाऱ्या देशांची यादी बदलत्या परिस्थितीनुसार बदलते आहे. हे वगळता परदेशप्रवास केलेल्यांपैकी अनेकजण लक्षणं नसल्यामुळे आपापल्या घरी जात आहेत. परदेशप्रवासाचा इतिहास असणाऱ्या या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कोणत्याही कोरोनाबाधित देशातून आलेल्या प्रवाशाला दोन आठवडे ‘होम क्वारंटाईन’ अर्थात घरच्या घरी वेगळं राहायला सांगितलेलं आहे. हे घरच्या घरी वेगळं राहणं आपण अधिक गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. अगदी वर्तमानपत्र किंवा दुधाची पिशवी घ्यायलादेखील या व्यक्तींनी बाहेर पडता कामा नये. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारीदेखील महत्त्वाची आहे. प्रत्येक सोसायटीतल्या मंडळींनी किंवा गावकऱ्यांनी आपल्या परिसरात कोणी परदेशातून आलं आहे का, हे पाहून ही व्यक्ती आल्यापासून १४ दिवसांकरिता होम क्वारंटाईनचे नियम पाळते आहे का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कोणी पाळत नसेल, तर त्यांना प्रेमानं आणि समंजसपणे या नियमाचं महत्त्व समजावून सांगणं गरजेचं आहे. संसर्गप्रसार रोखणं हा होम क्वारंटाईनचा उद्देश आहे, त्यामुळे कोणाला वाळीत टाकल्याची भावना यायला नको, हे लक्षात घ्यायला हवं. परदेशाहून आलेली एखादी व्यक्ती घरात एकटीच राहत असेल, तर होम क्वारंटाईनच्या १४ दिवसांच्या कालावधीत तिला बाहेरून लागू शकणाऱ्या आवश्यक वस्तू मिळण्यासाठीदेखील सोसायटी सदस्यांनी प्रयत्न करायला हवेत आणि प्रेमानं समजावून सांगूनही एखादी हट्टी व्यक्ती होम क्वारंटाईन पाळत नसेल, तर प्रशासनास कळवायला हवं. या होम क्वारंटाईन कालावधीत कोणाला ताप, खोकला, सर्दी, श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं आढळल्यास त्यांना शासनानं निश्चित केलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करणं किंवा त्यांनी भरती होणं आवश्यक आहे. मुंबईतलं कस्तुरबा रुग्णालय, पुण्यातलं नायडू रुग्णालय या रुग्णालयांशिवाय राज्यातली सर्व जिल्हा रुग्णालयं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत असे आयसोलेशन वॉर्ड स्थापन करण्यात आलेले आहेत. काही खासगी रुग्णालयांतदेखील ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

औषध आणि लस नाही
कोविड १९ आजारावर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. आपण या रुग्णांवर लक्षणाधारित उपचार करतो. सध्या जगभरातली आकडेवारी पाहता शंभरातले ९७ रुग्ण बरे होताना दिसत आहेत, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मध्यंतरी सफदरजंग रुग्णालयात एका संशयित कोरोना रुग्णानं हॉस्पिटलमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना या आजाराची भीती किती पसरली आहे, हे सांगायला पुरेशी आहे. माध्यमं, चॅनेल्स यावरच्या सततच्या चर्चेनं कोरोनाबद्दलचं हे भय हजारोपटींनी मल्टिप्लाय होतं आहे. आपण हे दहशतीचं वातावरण टाळलं पाहिजे. काळजी आणि सावधानता गरजेची आहे, भीती आणि दहशत नव्हे.
नवीन कोरोना आजाराच्या ५१ प्रयोगशाळा सध्या देशात कार्यरत आहेत. यापैकी आपल्या राज्यात एनआयव्ही (पुणे), कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा (मुंबई) आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर) या तीन प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या प्रयोगशाळा आणखी वाढवण्याकरता आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत देशभरात आणखी ५६ प्रयोगशाळा सुरू होतील; पण मुळात कोरोना निदान चाचणी कोणाची केली जाते, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण सध्या भीतीमुळे सर्दी, खोकला झालेल्या प्रत्येकाला आपली कोरोना चाचणी करून घ्यावी वाटते. परंतु, ज्याला ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणं आहेत आणि ज्यानं नुकताच परदेशप्रवास केला आहे किंवा ज्याचा कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क आला आहे, अशाच व्यक्तींना कोरोना चाचणीची गरज आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ताप, खोकला होण्याचं कोरोना हेच एकमेव कारण नाही.

निकटसहवासितांचा शोध
सध्या आपल्याकडे जे लोक कोरोनाबाधित आढळत आहेत, त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणं, हा कोरोना नियंत्रणातला अत्यंत कळीचा मुद्दा आहे. रुग्ण ज्या विमानानं आला त्या विमानातल्या सहप्रवाशापासून ते तो इथं आल्यानंतर ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला, त्या सर्व व्यक्तींची यादी अत्यंत बारकाईनं तयार करणं आवश्यक आहे. रुग्णाच्या प्रत्येक तासाचा तपशील घेत गेलो, तर सर्व कॉन्टॅक्टची पूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. यातल्या ज्या व्यक्ती रुग्णाच्या अत्यंत जवळच्या आणि सततच्या सहवासातल्या आहेत, त्या सर्वांना लक्षणं असली किंवा नसली तरी आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करून त्यांची चाचणी केली जाते, तर ज्या व्यक्ती या कमी जोखमीच्या आहेत त्यांना लक्षणं नसतील तर १४ दिवस कडक होम क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं. लक्षणं असल्यास भरती करून चाचणी केली जाते. प्रत्येक बाधित रुग्णांचे निकटसहवासित शोधताना लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. अशा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं स्वतःहून पुढे येऊन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणं आवश्यक आहे. बाधित रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध आपण जितक्या चांगल्या आणि शिस्तबद्धरित्या घेऊ तितकं आपल्याला कोरोनाचा चौफेर उधळलेला वारू रोखण्यात यश मिळणार आहे.

लोकसहभाग महत्त्वाचा
कोरोना टाळण्यासाठी आपण काय करायला हवं, याची नेमकी माहिती सर्वसामान्यांना असणं आवश्यक आहे. लोकांच्या सहभागाशिवाय आणि सामूहिक शहाणपणाशिवाय कोणताही उद्रेक नियंत्रणात येत नाही, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कोरोना हा विषाणूजन्य आजार बाधित रुग्णाच्या शिंकण्या- खोकण्यातून उडणाऱ्या थेंबातून पसरतो. हे थेंब ज्या ज्या पृष्ठभागांवर पडतात, त्याला इतरांनी स्पर्श केल्यानं आणि नंतर त्याच हातानं आपला चेहरा, डोळे चोळल्यानं त्याच्या प्रसाराला वेग प्राप्त होतो आणि म्हणूनच वैयक्तिक पातळीवर आपण शिंकताना- खोकताना नाका- तोंडावर रुमाल धरणं, हात वारंवार धुणं, घरातील, कार्यालयातील सर्वांचा स्पर्श होणारे पृष्ठभाग पुनःपुन्हा स्वच्छ करणं या उपायांचा अवलंब आपण सर्वांनी करायला हवा.
संशयित रुग्ण कोणाला म्हणायचं, याचं नेमकं भान आपल्या प्रत्येकाला आवश्यक आहे. नालासोपारामध्ये परवा एक अस्थमा रुग्ण एका डॉक्टरकडे आला आणि मुंबई सोडून कुठंही न गेलेल्या, ना कोणा करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या या रुग्णाला ‘तुला करोना झाला आहे,’ असं म्हणत त्या उच्चशिक्षित डॉक्टरनं या रुग्णास भरती करून घेण्यास नकार दिला. म्हणून आरोग्यविषयक शिक्षण केवळ सर्वसामान्य लोकांसाठीच नव्हे, तर डॉक्टर्ससाठीदेखील गरजेचं असतं. कोरोनाला तर हाकलायचंच आहे; पण त्याच्यासोबत आपलं माणूसपणही हरवायला नको म्हणून संवेदनशीलता जपायला हवी. परदेशातून येणारे लोक म्हणजे कुणी गुन्हेगार नाहीत, हे समजून घेऊन त्यांच्याशी वागायला हवं. माध्यमांनीदेखील या आजाराचं वार्तांकन करताना ते अतिशयोक्त स्वरूपात करणं टाळायला हवं. आजच्या या परीक्षेच्या वेळी भीती न बाळगता Isolate, Treat, Test, Trace आणि Educate या पंचसूत्रीमध्ये आपण काय सहभाग देऊ शकतो, हे आपण प्रत्येकानं लक्षात घेऊन कोरोनाचा वारू रोखण्यात आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. तैवानसारख्या छोट्या देशानं कल्पक नियोजनानं या आजाराचा प्रतिबंध करण्यात यश मिळवलं आहे. आपणही जगापुढे कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणाचं एक नवं मॉडेल उभं करू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आता तरी आरोग्य हा भविष्यकालीन योजनेतला मागच्या बाकावरचा विषय न राहता तो आपल्या प्राधान्याचा विषय बनला पाहिजे, हे लक्षात घेऊ.

कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणाची पंचसूत्री आपल्या हातात आहे. दक्षिण कोरिया, तैवानसारख्या देशांनी ही पंचसूत्री परिणामकारक आहे, हे सिद्ध केलं आहे. विलगीकरण, उपचार, संशयितांचे निदान, निकटसहवासितांचा शोध घ्या आणि लोकांना कोरोनाबाबत शिक्षित करा ही ती पंचसूत्री. थोडक्यात Isolate, Treat, Test, Trace आणि Educate या पाच शब्दांमध्ये ही पंचसूत्री सामावली आहे.
..........
ज्याला ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणं आहेत आणि ज्यानं नुकताच परदेशप्रवास केला आहे किंवा ज्याचा कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क आला आहे, अशाच व्यक्तींना कोरोना चाचणीची गरज आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ताप, खोकला होण्याचं कोरोना हेच एकमेव कारण नाही.
..........
बाधित रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध आपण जितक्या चांगल्या आणि शिस्तबद्धरित्या घेऊ तितका आपल्याला कोरोनाचा चौफेर उधळलेला वारू रोखण्यात यश मिळणार आहे.
..........
या परीक्षेच्या वेळी भीती न बाळगता पंचसूत्रीमध्ये आपण काय सहभाग देऊ शकतो, हे प्रत्येकानं लक्षात घेऊन कोरोनाचा वारू रोखण्यात आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. तैवानसारख्या छोट्या देशानं कल्पक नियोजनानं या आजाराचा प्रतिबंध करण्यात यश मिळवलं आहे. भारतही जगापुढे कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणाचं एक नवं मॉडेल उभं करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com