नात्यांचे 'धागेदोरे' (अक्षय दत्त)

akshay dutt
akshay dutt

'धागेदोरे़' चित्रपटातला एक भाग सगळ्यात आव्हानात्मक होता-कारण त्यातली नायिका सहाव्या मजल्यावरून पडते आणि तिचा मृत्यू होतो. ते सगळं चित्रीत करणं हे माझ्यासाठी खरंच आव्हान होतं, कारण माझ्याकडं तेवढं बजेट नव्हतं. बजेट असतं त्यांच्याकडं फाइट मास्टर, सीजी अशा बऱ्याच गोष्टी असतात. आमच्याकडं तसं नव्हतं. मात्र, हा भाग तर त्या चित्रपटाचा आत्मा होता आणि रुढ मार्गानं तो चित्रीत करणं शक्य नव्हतं. मग माझ्या मनात एक विचार आला, की आपण सेटवर हा प्रसंग चित्रीत का करू नये?...

'आरंभ'नं मला दिग्दर्शक म्हणून एस्टॅब्लिश केलं, तसा मला 'धागेदोरे़' हा पुढचा चित्रपटही मिळवून दिला. 'धागेदोरे' हा कौटुंबिक हिंसाचार या विषयावरचा चित्रपट. सामाजिक विषयांवर काही तरी करावं असं मला वाटत होतं. त्यामुळं 'आरंभ'नंतरचं हे पुढचं पाऊल म्हणता येईल. खरं तर एके दिवशी अचानक पेपर वाचतावाचता हा विषय स्फुरला. बाणेरमधल्या एका घटनेची ती बातमी होती. दोन भाऊ आणि आई-वडील यांनी घरात आत्महत्या केल्याची ती बातमी होती. मोठ्या मुलाच्या पत्नीनं त्यांच्यावर तक्रार केली होती, हे त्याचं कारण होतं. या घटनेतच मला कुठं तरी या चित्रपटाचं बीज दिसलं. मी लगेच श्रीनिवास भणगे यांना फोन केला आणि या विषयावर काही भाष्य करू शकतो का, असं विचारलं. मग आम्ही संशोधन करत गेलो. त्यावेळी लक्षात आलं, की कौटुंबिक हिंसाचार या विषयावरचे कायदे योग्य ठिकाणी पोचलेले नाहीत. उलट काही ठिकाणी मात्र त्यांचा गैरवापर होत आहे आणि त्यातून समस्या निर्माण होण्याचंही प्रमाण वाढतं आहे. मग त्यातून झालेल्या विचारमंथनातून आम्ही 'धागेदोरे'ची गोष्ट बांधायला घेतली. पंकज छल्लानी आणि अभिजित आपटे या माझ्या दोन मित्रांनी 'आरंभ' बघितल्यावर एका चांगल्या चित्रपटाची जबाबदारी टाकली होती. त्यामुळं निर्माते आधीच मिळाले होते. मग आम्ही सगळे भणगे यांच्याकडं गेलो आणि सगळ्यांच्या विचारमंथनंतर भणगे यांनी उत्तम संहिता तयार केली.

कला दिग्दर्शक पद्मनाथ दामले, संकलक भक्ती मायाळू आणि कॅमेरामन रमेश शेळके आम्हाला मिळाले, त्यामुळं काम बरंच सोपं झालं. 'धागेदोरे' हा चित्रपट दोन कुटुंबांतल्या आयडियॉलॉजीजवर भाष्य करणारा चित्रपट होता. यामध्ये मुलांच्या अपब्रिंगिंगपासून अगदी बदललेल्या कौटुंबिक आर्थिक स्तरापर्यंत अनेक गोष्टींचा विचार आम्ही केला होता. त्यामुळं दोन्ही कुटुंबंही तशीच होती. 'आरंभ'पेक्षा 'धागेदोरे'चा पट मोठा होता, त्यामुळं टीम जुळवणं हा भाग अवघड होता. आमच्याबरोबर काम करायला कलाकारांच्या साधारण तीन पिढ्या आम्हाला मिळाल्या, हे आमचं नशीब. विनय आपटे, उदय टिकेकर, संजय मोने, उमा सरदेशमुख, मानसी मागीकर आणि उमेश कामत, भार्गवी चिरमुले आणि सई ताम्हणकर अशा टीम आम्हाला मिळाली. सगळ्या कलाकारांची वेगवेगळी 'स्कूल्स'- त्यामुळं त्या सगळ्यांबरोबर काम करताना खूप मजा आली.

'धागेदोरे़' चित्रपटातला एक भाग सगळ्यात आव्हानात्मक होता-कारण त्यातली नायिका सहाव्या मजल्यावरून पडते आणि तिचा मृत्यू होतो. ते सगळं चित्रीत करणं हे माझ्यासाठी खरंच आव्हान होतं, कारण माझ्याकडं तेवढं बजेट नव्हतं. बजेट असतं त्यांच्याकडं फाइट मास्टर, सीजी अशा बऱ्याच गोष्टी असतात. आमच्याकडं तसं नव्हतं. मग निर्मात्यांनी काय करता येईल असं आम्हाला विचारलं. त्यावेळी कला दिग्दर्शक सुबोध गुरुजी यांनी सांगितलेला एक किस्सा मला आठवला. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की 'दिल का भंवर करे पुकार' हे गाणं कुतूबमिनारमध्ये शूट झाल्यासारखं वाटतं. मात्र, त्यांना ते शक्य नव्हतं-कारण त्यासाठी लागणारी जागा आणि परवानग्या दोन्ही त्यांच्याकडं नव्हत्या. मग त्यांनी एक शक्कल लढवली. गुरजी आणि त्यांच्या टीमनं साडेसात ते दहा फुटांचा एक मनोरा आणि पायऱ्यांचे दोन टप्पे तयार केले आणि तेवढ्या बळावर त्यांनी आख्खंच्या आख्खं गाणं चित्रीत केलं. आणखी पण. मी आणि श्रीनिवास भणगे आमच्या दोघांच्याही गप्पांचा आणि पॅशनचा एक समान धागा आहे तो म्हणजे 'हिचकॉक.' हिचकॉकनंही अनेक प्रसिद्ध स्थळं दाखवली आहेत; पण बहुतांश भाग हे सेटवर चित्रीत झाले आहेत. आमच्या चित्रपटात नायिका वरून पडल्याचं दाखवणं हे कथा पुढं जाण्यासाठी आणि धक्कातंत्रासाठी आवश्यक होतं; पण बजेटच्या मर्यादेमुळं तसं करणं शक्य नव्हतं. मात्र, हा भाग तर त्या चित्रपटाचा आत्मा होता आणि रुढ मार्गानं तो चित्रीत करणं शक्य नव्हतं. मग माझ्या मनात एक विचार आला, की आपण सेटवर हा प्रसंग चित्रीत का करू नये? मग मी लगेच कला दिग्दर्शक पद्मनाभ दामले यांना भेटलो. त्यांना सांगितल्यावर प्रश्न आला तो एवढी मोठी जागा देऊ शकणाऱ्या स्टुडिओचा. आमच्या सुदैवानं आम्हाला डोणजेमधल्या दादा कोंडके स्टुडिओजमध्ये अशी जागा मिळाली. 'धागेदोरे़'चं बरंचसं चित्रीकरण आम्ही पुण्यात अजंठा ॲव्हेन्यू या सोसायटीत केलं. तिथं नवदांपत्याची म्हणून जी रूम आम्ही दाखवली होती, तशीच आयडेंटिकल रूम आम्ही दादा कोंडके स्टुडिओमध्ये तयार केली. स्टुडिओमध्ये एक उंच आणि मोठा कठडा आहे. तिथं ही रूम तयार केली. तो कठडा खूप उंच असल्यामुळं आपोआपच आम्हाला साडेसात ते आठ फुटांची हाइट मिळाली. त्याच्यावर तो सेट. त्यामुळं आमचं काम खूप सोपं झालं. अजंठा ॲव्हेन्यूमध्ये वरून खाली पडली ती एक बाहुली; पण चित्रपटात सई ताम्हणकर पडताना दिसते ते दृश्य मात्र होतं दादा कोंडके स्टुडिओतलं. त्याचं मिक्सिंग आणि ॲक्युट एडिटिंग भक्ती मायाळूनं केलं. त्यामुळं दामले, शेळके आणि मायाळू या तीन दिग्गज लोकांमुळं हा भाग साकार करता आला.

'धागेदोरे'च्या चित्रीकरणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मी यावेळी केलेला रेकॉर्ड. 'आरंभ'च्या वेळी मला जे जमलं नव्हतं, ते मी या चित्रपटात केलं. मी एका दिवशी तब्बल बारा सीन्स चित्रीत केले. हे अर्थात दामले, शेळके आणि कॉस्चुम डायरेक्टर सोनिया लेले यांच्याशिवाय शक्यच झालं नसतं. शेळके कमीत कमी वेळात सुपिरिअर लाइट्स करतात, त्यामुळं हे बारा सीन्स करणं शक्य झालं. अर्थात इतकी घाई करायची नसते, हे मला नंतर कळलं. त्याचीही एक गंमत झाली. एका सीनचं काम संपल्यावर मी उमा सरदेशमुख यांना कॉस्चुम बदलून पुढच्या सीनसाठी यायला सांगितलं. उमा सरदेशमुख वर गेल्या, तेव्हा त्या उदय टिकेकर यांना म्हणाल्यासुद्धा, की हा सिरिअलसारखंच शूट करतोय. मग टिकेकर आणि संजय मोने यांच्यात चर्चा झाली, की आपण हे अक्षयला सांगू या, की हे काम तब्येतीत करायला पाहिजे. अर्थात या सगळ्या कलाकारांनी प्रत्यक्ष सीन्स अगदी निष्ठेनं केले. नंतर टिकेकर चित्रपटाच्या डबिंगला आले, तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं. ते सांगताना ते म्हणाले, ''अरे, एका दिवसात इतके सीन्स शूट झाले आहेत हे कळतसुद्धा नाहीये, कारण तुझं प्लॅनिंग किंवा तुला नक्की काय पाहिजे आहे हे तुझ्या मनात पक्कं होतं. आम्हाला उगाच वाटत होतं, की तू खूप घाई करतोयस; पण आत्ता बघताना वाटतंय, की क्या बात है!'' ही मला वाटतं माझ्यासाठी एक सगळ्यात मोठी पावती होती. हे सगळे कलाकार माझ्या प्रेमापोटी मला जे सांभाळून घ्‍यायचा प्रयत्न करत होते; पण त्यांनीच नंतर मला असं सांगणं हे समाधानाचं होतं.

'धागेदोरे'मुळं मला संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी या गीतकार-संगीतकार जोडीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटाचं टायटल सॉंग मात्र भक्ती मायाळूनं लिहिलंय आणि ते अविनाश-विश्वजीतनं संगीतबद्ध केलंय. चित्रपटाचं पार्श्वसंगीतही अविनाश-विश्वजीत यांनी केलंय. संदीप-सलील यांच्याबरोबर काम करताना मजा आली. शंकर महादेवन यांचाही आवाज सलीलमुळं चित्रपटात आला आणि त्यानं चित्रपटात वेगळीच मजा आणली. 'धागेदोरे' माझ्यासाठी आणखी एक विशेष आहे. कारण याच काळात माझं लग्नही ठरलं होतं. माझ्या सासरची सगळी मंडळी चित्रपटाच्या प्रीमिअरला आली होती. तेव्हा त्यांना जावई नक्की काय करतो हे कळलं.

या चित्रपटाशी संबंधित आणखी एक सांगावंसं वाटतं. एके दिवशी आम्हाला एका ग्रुपचा फोन आला. मेन राइट्स असोसिएशनचा तो फोन होता. 'धागेदोरे' चित्रपट त्यांनी बघितला होता, त्याविषयी त्यांना चर्चा करायची होती. आम्ही मग एके ठिकाणी भेटलो. ते म्हणाले, की सर, आम्ही वास्तवातले उमेश कामत आहोत. तुम्ही चित्रपटात उमेश कामतची आणि त्याच्या कुटुंबाची जी गोष्ट सांगितली आहे, अगदी तशीच आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातही घडली आहे. मला ते विशेष वाटलं. या चित्रपटामुळं मी एमआरएच्या कामाशी कनेक्टेड झालो, आजही मी त्यांच्या कार्यक्रमांना जातो. या चित्रपटासंदर्भात अभ्यास करताना एक विचार अजूनही मला मांडावासा वाटतो, की एखाद्या जोडप्याचं एकमेकांशी पटत नसेल, तर म्युच्युअली सेपरेट का होऊ शकत नाही? त्याचा आपण सामाजिक बाऊ का करतो? ही गोष्ट आपण रिस्पेक्टफुली का करू शकत नाही? अर्थात, हा विचारसुद्धा कुठं तरी पोचला, तर तेसुद्धा 'धागेदोरे'चं एक प्रकारचं यश असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com