प्राधान्य मानवी हितालाच...

प्रतिनिधी
Sunday, 20 September 2020

विज्ञानकथा मराठी साहित्यात नव्या नाहीत, मात्र त्यांची संख्या अगदी अल्प आहे. विज्ञानकथा लेखक खूपच कमी असून, विज्ञानकथांची किंवा कादंबऱ्यांची संख्या त्यामुळंच कमी आहे. डॉ. संजय ढोले हे नव्या पिढीतले आश्‍वासक विज्ञानकथा लेखक. दमदारपणे ते लिहीत आहेत.

विज्ञानकथा मराठी साहित्यात नव्या नाहीत, मात्र त्यांची संख्या अगदी अल्प आहे. विज्ञानकथा लेखक खूपच कमी असून, विज्ञानकथांची किंवा कादंबऱ्यांची संख्या त्यामुळंच कमी आहे. डॉ. संजय ढोले हे नव्या पिढीतले आश्‍वासक विज्ञानकथा लेखक. दमदारपणे ते लिहीत आहेत. ‘डिंभक’ हा त्यांचा सहावा कथासंग्रह. ढोले यांनी या सर्व कथांमध्ये एक सूत्र ठामपणे मांडलंय ते म्हणजे, मानवहित सर्वोच्च स्थानी. त्यामुळं त्यांच्या या कथांमध्ये कुणीही खलनायक असलं, तरी शेवटी विजय मानवजातीचाच आणि मानवाचं ज्यात हित आहे त्याच बाबींचा होतो.

या संग्रहात १२ कथा आहेत. यातल्या बाराही कथांमध्ये त्यांनी विज्ञानाचा आधार घेताना वेगवेगळे प्रश्‍न हाताळले आहेत. केवळ रासायनिक किंवा जीवशास्त्रीय संकल्पना वापरून त्यांनी सर्व कथा लिहिलेल्या नाहीत. शास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून त्यातील काही समीकरणांचा, तसंच सिद्धांतांचा वापर करून त्यांनी आपल्या कथा फुलवल्या आहेत. त्यामुळंच ‘सोनियाची खाण’ या कथेत सोनं तयार करण्याचा शोध लावलेले शास्त्रज्ञ नसर्गाचा समतोल ढासळायला नको म्हणून तो शोध जाहीर करत नाहीत आणि आपल्याला मोह पडला म्हणून आपलं आयुष्य संपवतात. विवेकबुद्धीची टोचणी लागल्यानं ते हा निर्णय घेतात. हाच कित्ता ‘पिंजक’ कथेतले शास्त्रज्ञ डॉ. हमीद गिरवतात. समाजाला पुढं या शोधाचा त्रास होऊ नये, चुकीच्या व्यक्तीच्या हाती हा शोध लागला तर मानवजातीचं त्यात नुकसान आहे, या भावनेतून ते आपली कीर्ती, फायदा या सगळ्यांच्या त्याग करून, वेळप्रसंगी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन, ते मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतात.

'अभय' आणि 'भूतदया' या दोन कथांतले शास्त्रज्ञ मात्र चुकीचं वागतात, त्याची त्यांना वेगळीच शिक्षा मिळते. तर, 'रिपोर्टर' या कथेत डॉ. परम हे शास्त्रज्ञ आपलं संशोधन विकून देशाला, त्याचबरोबर मानवजातीलाच धोका पोहचवू पाहतात. त्यांना इन्स्पेक्टर भानुदास काळे नेमकी शिक्षा देतात. या बारा कथांमध्ये मानवी भावभावनांचा जो कल्लोळ समोर येतो, त्यातून अंतिम सत्य एकच निघतं. ते म्हणजे, विज्ञानानं कतीही प्रगती केली, तरी ते जोपर्यंत मानवी कल्याणासाठी वापरलं जातंय, तोवर ते उपकारक आहे. मात्र, वेगळं काही घडलं, तर काही खैर नाही. ढोले यांनी हे तत्त्व खूप नेमकेपणानं आणि कुठंही प्रचारकी आव न आणता मांडलंय. कथेची गुंफण करताना कुठंही तर्काला त्यांनी रजा दिलेली नाही आणि कथेची रंजकताही कमी होऊ दिलेली नाही. या विज्ञानकथा असल्या तरी त्यात रहस्य, गूढ, प्रेम, थरार आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळींचे रुग्णांसाठी केले जाणारे प्रयत्न... असं सगळं वेगवेगळ्या प्रसंगांतून समोर येतं. ढोले यांनी सगळ्या प्रसंगांची गुंफण चांगली करून विज्ञानाचं तत्त्व राखत, वाचकांचं रंजन होईल आणि त्यांची विज्ञानाबद्दलची गोडी वाढेल, अशीही किमया केली आहे.

पुस्तकांचं नाव : डिंभक
लेखक : डॉ. संजय ढोले प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे (०२०- २४४७६९२४, २४४६०३१३) पृष्ठं १५४, मूल्य : १९५ रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang dhimbak book review