अंतराळयुगातला नवा मनू (डॉ. बाळ फोंडके)

dr bal phondke
dr bal phondke

अंतराळयुगातला एक निर्णायक टप्पा ३० मे रोजी गाठला गेला. या दिवशी स्पेस एक्स या खासगी कंपनीनं बनवलेल्या क्रू ड्रॅगन या अंतराळयानातून अमेरिकेच्या डग हर्ली आणि बॉब बेहेनकेन या दोन अंतराळवीरांनी प्रवास करत आंतरराष्ट्रीय अंतरीक्षस्थानकात प्रवेश केला. या मोहिमेची वैशिष्ट्यं काय, या मोहिमेचे भविष्यात काय पडसाद उमटणार आहेत, कोणत्या गोष्टी साध्य होऊ शकतात आदी गोष्टींचा वेध.

वीस जुलै, १९६९ हा अंतराळयुगातला एक निर्णायक टप्पा होता. कारण त्या दिवशी प्रथम मानवानं पृथ्वीपलीकडे जाऊन चंद्रावर आपला ध्वज रोवला होता. आपण निरनिराळ्या ग्रहा-उपग्रहांपर्यंत मजल मारू शकतो, याची ग्वाही मिळाली होती. तसाच एक, त्या पुढच्या टप्प्यातला, निर्णायक क्षण ३० मे, २०२० रोजी गाठला गेला. त्या दिवशी स्पेस एक्स या खासगी कंपनीनं बनवलेल्या क्रू ड्रॅगन या अंतराळयानातून अमेरिकेच्या डग हर्ली आणि बॉब बेहेनकेन या दोन अंतराळवीरांनी प्रवास करत आंतरराष्ट्रीय अंतरीक्षस्थानकात प्रवेश केला. खरं तर यापूर्वीही अनेक अंतराळवीर तिथपर्यंत पोचले होते. मग या सफरीला निर्णायक क्षण का मानायचं?
त्याची अनेक महत्त्वाची उत्तरं आहेत. काही तांत्रिक आहेत, काही व्यावहारिक आहेत. क्रू ड्रॅगन या यानाची काही वैशिष्ट्यं आहेत. त्याचं प्रक्षेपण फाल्कन-९ या अग्निबाणानं केलं. हा दोन टप्प्यांचा अग्निबाण होता. त्यातला पहिला टप्पा उड्डाणानंतर अडीच मिनिटांनीच गळून पडला; पण तो नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे अंतराळातच जळून गेला नाही, तर परत धरतीवर अलगद उतरला. त्या उलट्या प्रवासासाठीची थ्रस्टर्स आणि दिशानियंत्रणाची सुविधा असलेल्या इंजिनांसहित सारी यंत्रणा अग्निबाणाच्या त्या घटकातच सामावलेली होती. तोवर तो घटक धरतीपासून दूरदूर चालला असल्यामुळं त्याचं तोंड वरच्या दिशेनं होतं. ते उलटं धरतीच्या दिशेनं करणं आवश्यक होतं. तेवढं करण्यानं भागण्यासारखं नव्हतं. कारण त्या घटकाचा वेगही आटोक्यात असायला हवा होता. त्यासाठी असलेल्या इंजिनांनी आपली कामगिरी चोख बजावत त्या घटकाला टाच मारत संयत गतीनं वसुंधरेच्या दिशेनं सोडून दिलं. तो अलगद नियोजित स्थळी सुखरुप येऊन पोचला.

दुसरा टप्पा आता कार्यान्वित झाला. त्यानं क्रू ड्रॅगनच्या मुख्य विभागाला आंतरराष्ट्रीय स्थानकाभवतीच्या कक्षेत स्थानापन्न केलं. यान स्थानकाभवती प्रदक्षिणा घालू लागलं. आता दुसऱ्या टप्प्याची जबाबदारी संपली होती. तो गळून पडला आणि पृथ्वीच्या वातावरण शिरताच ‘खूष रहना यारो, हम तो सफर करते है’च्या थाटात त्यानं आत्माहुती दिली. तो गळून पडला. जळून गेला.

यान आता स्वतःच्या भरवशावर पुढचा प्रवास करत होतं. स्थानकापर्यंत पोचून त्याला जोडून घेण्याची आज्ञावली त्याला आधीच दिलेली होती. तिचं इमानेइतबारे पालन करत ते स्थानकाला हवाबंदरीत्या जोडलं गेलं आणि अमेरिकन अंतराळवीरांना स्थानकात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. असं स्वयंचलित यान ही क्रू ड्रॅगनची खासियत आहे; पण समजा काही अडचण आलीच, तर या स्वयंचलित यंत्रणेला मागे सारून हर्ली आणि बेहेनकेन यांनी त्या यानाचं सारथ्य करण्याचीही योजना केली गेली आहे.
या यानाचेही तीन भाग आहेत. सर्वांत वरचा नाकाचा शेंडा. त्याच्या खाली अंतराळवीरांचं दालन. त्यातला हवेचा दबा सहन होईल असा नियंत्रित केलेला, जणू धरतीवरच्या विमानातूनच प्रवास करत आहोत. त्याच्या खाली यानाचं धड. त्यात बहुतांशी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, मुख्य म्हणजे यानाला ऊर्जा पुरवणाऱ्या सौरपट्ट्या. हे सर्व मिळून यान जवळजवळ नऊ मीटर उंच आहे. सरासरी उंचीच्या माणसाच्या सहापट उंच.
हर्ली आणि बेहेनकेन यांचा स्थानकावर किती काळ मुक्काम असेल हे अजून निश्चित केलं गेलेलं नाही. तरीही कमीतकमी दोन महिने तरी ते तिथं काढतील, असा अंदाज आहे. काही झालं तरी चार महिन्यांच्या आतच त्यांची परतीची सफर सुरू होईल, हे नक्की. याचं कारण म्हणजे जसं ते यान स्वबळावरच शेवटच्या टप्प्यातला प्रवास करत स्थानकाला जोडलं गेलं, तसंच त्याच्यापासून अलग होत परत धरतीपर्यंतचा प्रवासही आपल्या ताकदीवरच त्याला करायचा आहे. त्यासाठी अर्थातच त्याला पर्याप्त उर्जा लागेल. ती पुरवणाऱ्या सौरपट्ट्यांची अंतराळात काही प्रमाणात झीज होते. ती प्रमाणाबाहेर वाढण्यापूर्वीच क्रू ड्रॅगननं आपला परतीचा प्रवास पूर्ण करणं आवश्यक आहे.

हा प्रवासही तसा रोमांचकारी ठरणार आहे. कारण स्थानकापासून स्वतःला सोडवून घेतल्यानंतर काही काळ यान स्थानकाभवती प्रदक्षिणा घालतच राहणार आहे. त्यापूर्वी अर्थात खालच्या धडाला आता तिलांजली देण्याची तयारी सुरू होईल. अंतराळवीरांच्या दालनाला जोडलेल्या इंजिनांचं काम आता सुरू होईल. तीच त्या दालनाला प्रदक्षिणेच्या वर्तुळातून बाहेर काढत पृथ्वीच्या दिशेनं वाटचाल करायला लावतील; पण एकदा का ते दालन पृथ्वीच्या वातावरणात शिरलं, की होणाऱ्या घर्षणापायी प्रचंड उष्णतेचा सामना त्याला करावा लागेल. त्यात ते वितळून जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी दालनाला बाहेरून खास उष्णताविरोधी लाद्यांचं, हीट शील्डचं, कवच दिलेलं आहे. वातावरणातून पुढं आलं, की त्याला जोडलेली पॅरॅशूट उघडतील आणि विहरत विहरत दालन, आणि अर्थात त्यातील अंतराळवीर, सागरावर अवतरण करतील.
ही सारी स्वयंचलित यंत्रणा हे वैशिष्ट्य असलं, तरी त्याचा पहिल्यांदाच वापर होणार आहे. तेव्हा त्यात कोणताही बिघाड होणार नाही, नियोजित मार्गानं ते सुखरूप वाटचाल करेल, याची खातरजमा करून घेण्यासाठी उड्डाणापूर्वीच त्याच्या अनेक चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. त्या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतरच अग्निबाणाला बत्ती दिली गेली आहे.

या अनोख्या तांत्रिक पैलूंबरोबरच या ऐतिहासिक उड्डाणाचे काही व्यावहारिक पैलूही आहेत. अंतराळात, मानवरहित असोत की मानवसहित, यानं आजवर फक्त त्या त्या देशांच्या सरकारी संस्थांनीच पाठवलेली आहेत. अमेरिकेत नासा, आपल्या देशात इस्रो. मात्र, क्रू ड्रॅगनच्या निर्मितीपासून या समग्र प्रवासाचं नियोजन स्पेस एक्स या खासगी कंपनीनं केलं आहे. अंतराळवीरांची निवड नासानंच केली. तसंच या संपूर्ण प्रकल्पावर नासाची देखरेख राहिलेली आहे. त्या दृष्टीनं पाहता हा प्रकल्प खासगी आणि सरकारी अशा संयुक्त प्रयासातून उभा राहिला आहे. तरीही खासगी यानानं प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेव्हा आता अंतराळयुगात खासगी क्षेत्रालाही महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची संधी दिली गेली आहे. अंतराळयुगातल्या खासगी उद्योगांच्या व्यापारी सहभागाची ती नांदी ठरावी.

नासानं हे पाऊल का उचललं, असा सवाल साहजिकच मनात पिंगा घालू लागतो. एक तर अंतराळस्थानक हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं असलं तरी त्यावर जवळजवळ रशियाची मक्तेदारी राहिली आहे. त्यामुळं अमेरिकन अंतराळवीरांनाही तिथवरच्या प्रवासासाठी, आणि तिथून परत येण्यासाठीही, रशियन यानांवर अवलंबून राहावं लागत होतं. ते परावलंबित्व आता संपुष्टात आलं आहे. शिवाय त्यासाठी नासाला खर्चही कमी करावा लागला आहे. स्पेस एक्सला हे कंत्राट देण्यासाठीच नासाला आपली तिजोरी उघडावी लागली आहे. तरीही खासगी क्षेत्राच्या तत्त्वांप्रमाणे प्रकल्पाचं नियोजन झाल्यामुळं खर्चावर आपसूकच नियंत्रण ठेवलं गेलं आहे.

याचा अर्थ आजवर खासगी कंपन्या अंतराळप्रवासापासून दूरच राहिल्या होत्या असा नाही. कारण यानांचे, त्याचं नियंत्रण करण्याच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचे, अनेक घटक खासगी उद्योगांकडूनच उत्पादित केले गेले होते. मात्र, ते त्यांना दिलेल्या आराखड्यानुसार बनवायचे होते. सहा वर्षापूर्वी नासानं अंतराळवीरांच्या प्रवासाची व्यवस्था करण्याचं पूर्ण कंत्राट खासगी उद्योगांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा मागवल्या गेल्या. त्यात स्पेस एक्ससह बोईंग या विमान उत्पादन करणाऱ्या कंपनीचीही निवड झाली होती. साहजिकच त्या दोघांच्या स्पर्धेत वेळ आणि खर्च यांची लक्षणीय बचत झाली; पण स्पेस एक्सनं बाजी मारली. शिवाय स्पेस एक्सनं क्रू ड्रॅगनची निर्मिती पूर्णपणे स्वतंत्ररीत्या केली, हाही एक आनुषंगिक फायदा म्हणायला हवा. एवढंच नाही तर हर्ली आणि बेहेनकेन या अंतराळवीरांचा पोशाखही स्पेस एक्सनंच डिझाईन केलेला आहे. हे पोशाख प्रत्येकाच्या मापाचे शिवलेले आहेत. सब घोडे बारा टक्के या तत्त्वावर आजवर हे पोशाख बनवले जात होते. तसंच डोक्यावरची हेल्मेटही थ्री डी प्रिन्टिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार केली आहेत. हा नवा पोशाख अधिक हलका असूनही त्यात काही नवीन सुविधांचा समावेश केलेला आहे. अंतराळवीरांच्या हालचाली त्यापायी अधिक सुलभ होणार आहेत.

तो काहीसा विज्ञानकथांवर आधारित चित्रपटातल्या अंतराळवीरांच्या परिधानासारखा दिसत असल्यास नवल नाही. कारण तो होझे फर्नान्डिज या हॉलिवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या कॉस्च्युम डिझायनरच्या कल्पनेतूनच साकार झाला आहे, असं बीबीसीनं जाहीर केलं आहे. काही वेळा अंतराळवीरांच्या दालनातला हवेचा दाब एकदम कमी होतो. पोशाखाच्या आत केलेली हवेची तजवीजही मग अडचणीत सापडते. अंतराळवीरांचे प्राण कंठाशी येतात. अशी घटना क्वचितच घडणारी अपवादात्मक असली, तरी ती शक्यता गृहीत धरून त्या प्रसंगी अंतराळवीरांच्या जिवावर बेतणार नाही, अशी व्यवस्थाही या पोशाखांमध्ये केली आहे. अंतराळस्वारीच्या सर्वच अंगांमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. म्हणूनच अशा रीतीनं परिपूर्ण अंतराळस्वारीच्या दिशेनं स्पेस एक्स कंपनीची वाटचाल सुरू झाली आहे, असं म्हणता येईल. यावेळी जरी त्या कंपनीनं बोईंगवर आघाडी घेतलेली असली तरी बोईंगही स्वस्थ बसलेली नाही. धरतीवरच्या हवाई प्रवासासाठी तिनं तयार केलेल्या ड्रीमलायनर या अत्याधुनिक विमानाच्या धर्तीवर स्टारलायनर हे अंतराळयान येत्या काही दिवसात तयार करण्याच्या दिशेनं तिचा दमदार प्रवास सुरू आहे.

स्पेस एक्स ही इलॉन मस्कच्या मालकीची कंपनी आहे. तोच इलॉन मस्क ज्यानं टेस्ला या विजेवर चालणाऱ्या मोटारीचं उत्पादन सुरू केलं आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञानही त्या कंपनीनं स्वबळावर विकसित केलेलं आहे. नवनव्या अनोख्या उद्योगांची मुहूर्तमेढ रचण्यात त्याचा हातखंडा आहे. पेपॅलसारखी डिजिटल पेमेन्ट करण्याची बाब असो की आपल्याकडच्या जुन्या मालाला बाजारपेठ मिळवून देणारी ईबेसारखी सुविधा असो, त्याच्याच प्रतिभेच्या भराऱ्या आहेत. मुंबई ते पुणे हा प्रवास काही मिनिटांतच घडवून आणणाऱ्या ज्या हायपरलूपची चर्चा मध्यंतरी होत होती ते तंत्रज्ञानही त्याचीच निर्मिती आहे. क्रू ड्रॅगनच्या निमित्तानं अंतराळक्षेत्रातही त्यानं उडी घेतली आहे. आणि ते क्षेत्र आता खासगी उद्योगधंद्यांना खुलं करण्याच्या दिशेनं त्यानं पहिलं पाऊल उचललं आहे. अंतराळयानांची निर्मितीच नाही, तर नजीकच्या भविष्यकाळात प्रक्षेपण आणि उड्डाण यातही खासगी क्षेत्राचा मोठा सहभाग असेल, अशी आशा निर्माण झाली आहे. अंतराळपर्यटनाला त्यामुळं चालना मिळण्याची शक्यता आहे. आपला मधुचंद्र प्रत्यक्ष चंद्रावर साजरा करण्याची कल्पना जर काही नवपरिणीत तरुण जोडपी राबवत असतील, तर त्यांचं स्वप्न साकार होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

अंतराळक्षेत्रात भारताचाही दबदबा राहिला आहे. साहजिकच आपणही आपल्या खासगी उद्योगधंद्यांना हे क्षेत्र खुलं करणार की नाही, असा सवाल उभा राहतो. वास्तविक, या तंत्रज्ञानाचा व्यापारी वापर करायला इस्रोनं केव्हाच सुरुवात केली आहे. दूरसर्वेक्षण, रिमोट सेन्सिंगच्या वापरात तर आपण शीर्षस्थ स्थानावर आहोत. त्यासाठी वापरले जाणारे आपले उपग्रह अव्वल दर्जाचे आहे. जमिनीपासून ३६,००० किलोमीटर उंचीवरून जमिनीवरच्या एकमेकांपासून केवळ पाच मीटर दूर असलेल्या वस्तूंची स्वतंत्र ओळख पटवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या मदतीनं मिळणारी मौलिक माहिती आपण व्यापारी तत्त्वावर इतर देशांना उपलब्ध करून देत आहोत. अनेक विकसनशील, तसंच विकसितही, देशांचे उपग्रह आपण आपल्या प्रक्षेपकांद्वारे अंतराळात स्थापित करून देत आहोत तेही केवळ भूतदयेच्या दृष्टिकोनातून नाही. त्यातून देशाला भरघोस उत्पन्नही मिळत आहे. त्याशिवाय मनोरंजन, दळणवळण, दूरसंचार या क्षेत्रांना आवश्यक असणारे उपग्रहांवरचे ट्रान्सपॉन्डर्स आपण भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देत आहोत.

हा सर्व व्यापार सरकारी माध्यमातूनच होत आहे. तरीही उपग्रहांच्या बांधणीपासून ते त्यांना अंतराळात स्थापित करण्याच्या मोहिमांपर्यंत अनेक खासगी उद्योगधंद्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. अर्थात तो कंत्राटी स्वरूपाचा आहे. स्वायत्त स्तरावर खासगी कंपन्यांना त्यात वाव नाही. परंतु अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लष्करी उत्पादनाच्या क्षेत्राबरोबर अंतराळक्षेत्रही खासगी उद्योगधंद्यांना खुलं करण्याची योजना जाहीर केली आहे. तिचा तपशील अजूनही ठरायचा असला तरी स्पेस एक्सच्या धर्तीवर आपल्याही देशात खासगी उद्योगांना आता नवीन संधी उपलब्ध होण्याची आशा वाढीला लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com