esakal | स्वास्थ्यदायक स्थानबद्धता (डॉ. हिमांशू वझे)
sakal

बोलून बातमी शोधा

dr himanshu vaze

कोरोना या विषाणूची संसर्गसाखळी तोडण्यासाठी सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन अवस्थेत आहे. गर्दी टाळण्यासाठी, ‘सेफ सोशल डिस्टन्सिंग’साठी असं पाऊल उचललं जाणं अत्यावश्यकच होतं. परिणामी, ‘घरातच राहा रात्रंदिवस’ हे सूत्र प्रत्येकाला अमलात आणावं लागत आहे.

स्वास्थ्यदायक स्थानबद्धता (डॉ. हिमांशू वझे)

sakal_logo
By
डॉ. हिमांशू वझे drhimanshuvaze@gmail.com

कोरोना या विषाणूची संसर्गसाखळी तोडण्यासाठी सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन अवस्थेत आहे. गर्दी टाळण्यासाठी, ‘सेफ सोशल डिस्टन्सिंग’साठी असं पाऊल उचललं जाणं अत्यावश्यकच होतं. परिणामी, ‘घरातच राहा रात्रंदिवस’ हे सूत्र प्रत्येकाला अमलात आणावं लागत आहे. ते अमलात आणणं कठीण असलं तरी अशक्य मात्र खासच नाही. आपल्या आरोग्यहितासाठी परिस्थितीनं लादलेल्या या अत्यावश्यक ‘स्थानबद्धते’कडे आपण सकारात्मकतेनं कसं पाहू शकू, आनंदाच्या वाटा घरबसल्या कशा शोधू शकू याविषयी...

सध्या देशव्यापी ‘गृहस्थयोग’ सुरू आहे! सरकारच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत सामाजिक आणि भौगोलिक मर्यादांमध्ये राहणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य बनलं आहे. जीवनावश्यक अर्थात् जिवंत राहण्यासाठी गरजेच्या वस्तू आणण्याव्यतिरिक्त स्वतःच्या घराचा उंबरठा शक्य तितक्या कमी वेळा ओलांडणं हे स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि मानवजातीसाठी हितावह आहे. विषाणूरूपी अदृश्य शत्रूविरुद्धचं हे विश्वव्यापी युद्ध लढताना प्रत्येकाला स्वतःच्या प्राणांबरोबरच इतरांचा प्राण वाचवण्याची संधी आहे. त्या अर्थानं आपण सगळे ‘योद्धे गृहस्थी’ आहोत. विषाणूग्रस्त रुग्णांना सेवा देणारे समस्त वैद्यकीय जीवरक्षक आणि विषाणूंची लागण होऊ नये म्हणून झटणारे सुरक्षारक्षक पोलिस यांच्या अहोरात्र प्रयत्नांना संपूर्ण यश येण्यासाठी हा खारीचा वाटा उचलण्याच्या जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला वारंवार करून दिली जात आहे.

हा युद्धसदृश परिस्थितीचा काळ नक्की कधी संपेल हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. मात्र, याची बाधा किती लोकांना होईल, यात किती जणांचे जीव जातील, त्याचे आर्थिक, सामाजिक व अन्य परिणाम कसे व किती दूरगामी होतील वगैरे विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आपण मग्न आहोत. महाभारतात
संजयानं धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या‍ प्रत्येक घटनेचा ‘आँखो देखा हाल’ सांगितला असं म्हणतात. त्याप्रमाणे विवेकचक्षूवर पट्टी बांधलेले आजचे असंख्य ‘धृतराष्ट्र’ सध्या घरात बसून या विश्वयुद्धाचा इत्थंभूत तपशील गोळा करण्यात दंग आहेत. तंत्रज्ञानानं केलेल्या अद्भुत प्रगतीमुळे अगणित ‘संजय’ माहिती पुरवण्याचं कर्म हिरीरीनं, चढाओढीनं करत आहेत. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा ‘स्कोर अपडेट’ घेण्याच्या ईर्ष्येनं प्रेरित झाल्याप्रमाणेच जणू प्रत्येक जण येणारी प्रत्येक ‘ताजा खबर’ ग्रहण करण्यास आतूर आहे. या माहितीच्या महापुरात किती वाहत (आणि वाहवत) जायचं याची खबरदारी आणि स्वातंत्र्य ही वैयक्तिक बाब असली तरी एका विषाणूमुळे मिळालेला हा सक्तीचा गृहस्थाश्रम ही एक अभूतपूर्व सुवर्णसंधी आहे हे चतुर सत्पुरुषांच्या कधीच लक्षात आलं असेल!
उपजीविकेचा व्यवसाय व नोकरी अचानक स्थगित झाल्यानं अनेकांना आर्थिक व मानसिक ताण जाणवत आहे. जीवनावश्यक सेवेत सहभागी असणाऱ्या, तसंच घरातून काम करू शकणाऱ्या माहिती तंत्रज्ञान व तत्सम क्षेत्रांतल्या मंडळींचा सन्माननीय, सुदैवी अपवाद वगळता बाकीच्यांनी हे ‘घरकोंडलेपण’ जाचक ठरणार नाही याची वेळीच दक्षता घ्यायला हवी. व्यवसायातली प्रगती (प्रोफेशनल ग्रोथ) थांबली तरी व्यक्तिगत प्रगती (पर्सनल ग्रोथ) आपण या काळात करून घेऊ शकतो. बाह्यसमृद्धी खुंटली म्हणून अंत:समृद्धीला वेसण का घालावी? आत्मोन्नतीचा मार्ग हा ज्यानं त्यानं आपापला शोधायचा असतो. सध्याचा काळ त्यासाठी विशेष अनुकूल आहे. मला वेळ नाही (वस्तुत: प्राधान्य नाही) यासारख्या सबबी बासनात गुंडाळून ठेवायला आता मुहूर्त पाहायची गरज नाही.

* घरकामांतली अंगमेहनत अनुभवा!
शरीरापासून सुरुवात करू या.
ग्रीष्म ऋतूची चाहूल लागली आहे. आपण भारतवासी भाग्यवान आहोत. कारण, वाढतं तापमान विषाणू रोखण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतं; किंबहुना बजावेलच. त्याच वेळी आपल्याला मात्र शरीर सुदृढ ठेवण्याचे विविध पर्याय शोधावे लागतील. पत्र्याची घरं असणाऱ्यांना किंवा आकारानं लहान किंवा भरगच्च वस्तीत घरं असणाऱ्यांना ते सोपं असणार नाही; पण तरीही डगमगून न जाता शरीरधर्म पाळणं आवश्यक आहे. शरीराची कार्यक्षमता ते वापरल्याशिवाय वाढू शकत नाही. ज्यांना ते वापरण्याची अजिबात सवय नाही त्यांना घरातले केरवारे, इतर साफसफाई, बागकाम वगैरे कामांतली अंगमेहनत अनुभवण्याची संधी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या या कालावधीत आहे.
यामध्ये व्यायामाबरोबरच स्वावलंबी झाल्याचा दुहेरी आनंद आहे. सध्याची सर्व घरकामं वय, लिंग, बुद्धिमत्ता, समाजातलं स्थान इत्यादी भेद न बाळगता कुटुंबातल्या प्रत्येकानं समजूतदारपणे वाटून घ्यायला हवीत. कौटुंबिक मन:स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीनं ही कामं शक्यतो सकाळी लवकर करावीत. कपडे धुणं, वाळवणं व त्यांच्या घड्या करणं, तसंच भांडी घासणं-विसळणं, ओटा घासणं-धुणं-पुसणं इत्यादी नित्यगृहकर्म सध्या व्यायामात अंतर्भूत आहेत. यातून शरीराला पुरेसं आव्हान निर्माण होत नाही असं पुरुषांना वाटलं तरी ते करण्याचे अनेकविध फायदे आहेत हे ती कामं केल्यावर लक्षात येईल.
व्यायामाची गरज सगळ्यांना असली तरी त्याचं स्वरूप व्यक्तिगणिक बदलतं. ‘व्यायाम म्हणजे बुवा घराबाहेर पडायलाच हवं’ किंवा ‘घरात बसून मला बाई गुदमरल्यासारखं होतं म्हणून मी खाली चक्कर मारतेच’ या दोन्ही भावनांना मुरड घालायला हवी. सध्या जे काही करायचं ते स्वतःच्या घरात किंवा स्वतःच्या बाल्कनीत अथवा गच्चीत.
आपल्या सोसायटीमध्ये फिरणं अथवा खेळणं याला सध्या सरकारी अनुमती नाही. होम क्वारंटाईन आहे, सोसायटी क्वारंटाईन नाही. कुठल्याही सामुदायिक आवारात जाण्याचा धोका अनेकांना अजूनही लक्षात आलेला नाही. ‘सेफ सोशल डिस्टन्सिंगची पॉलिसी फक्त अनिवार्य ठिकाणांसाठी आहे, ती सोसायटीच्या रस्त्यांवर, पार्किंगमध्ये किंवा गच्चीवर एकत्र येण्यासाठी लागू नाही, कारण मुळात तिथं एकत्र येणंच वर्ज्य आहे. मात्र, जरा अडनिड्या वेळेस गेलो तर कोण बघणार अथवा विचारणार आहे असे आत्मघातकी विचार सध्या करू नयेत. त्याऐवजी आपली लक्ष्मणरेषा पार न करता स्वतःच्या कुटीमध्ये राहून स्वत:च्या कुडीला अधिक कार्यक्षम बनवण्याची तजवीज करावी.
व्यायाम म्हणून घरातच चालणं अनेकांना अवघड वाटतं; पण सध्या येरझारा घालणंच इष्ट. फिश टँकमधले मासेही समुद्रातल्या काही माशांपेक्षा जास्त अंतर पोहतात. घरात दिशा बदलत चालावं. कुटुंबातल्या सदस्यांबरोबर इतका काळ एकत्र राहण्याची कुणालाच सवय नाही. जागा छोटी असल्यास प्रत्येकानं वेळा वाटून घ्याव्यात. दिवसात तीन ते दहा हजार पावलं चालण्याचं उद्दिष्ट ठेवावं. त्यासाठी किमान अर्धा ते कमाल दीड तास द्यावा. एकाच वेळेस सलग चाललं पाहिजे असं नाही. चालण्याला अमुक अशा वेळेचंही बंधन नाही. जेवणाअगोदर किंवा नंतरही सहस्रपावली घालता येते. मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी त्यांच्या नेहमीच्या वेळेला चालावं. गुडघे वा कंबर दुखत असल्यास (विशेषत: सध्या ओढवलेलं घरकाम केल्यामुळे) चालण्याच्या व्यायामाऐवजी ही दुखणी बरी होण्याचे व्यायाम करावेत.

* व्यायामात जेवढं वैविध्य, तेवढा फायदा
तंदुरुस्ती टिकवण्यासाठी लवचिकता वाढवणाऱ्या व्यायामप्रकारांना सध्या प्राधान्य द्यावं. त्यामध्ये सूर्यनमस्कार, अवगत असलेली योगासनं नियमितपणे करावीत. प्राणायामाचे व्यायाम करणं विशेष उपयुक्त आहे. कार्यक्षमता वाढवणाऱ्या व्यायामांचं (फंक्शनल ट्रेनिंग) प्रशिक्षण घेतलं असल्यास ते व्यायामप्रकार घरच्या घरी करण्यास हरकत नाहीत. व्यायामाची सवय नसलेल्यांनी अर्ध्या तासापासून सुरुवात करून रोज पाच मिनिटं वाढवत जावीत. वजन (विशेषत: ढेरी) कमी करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्यांना या समयबाहुल्याचं सोनं करता आलं पाहिजे. सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळांना प्रत्येकी एक तास व्यायाम व आहारातली पथ्यं सांभाळल्यास एकवीस दिवसांच्या या बंदकाळात अडीच ते तीन किलो वजन सहज कमी होऊ शकतं.
व्यायामाची तीव्रता वाढवण्यासाठी दमछाकीच्या व ताकदीच्या व्यायामाचाही समावेश असू द्यावा. त्यामध्ये नृत्य, दोरीवरच्या किंवा साध्या उड्या, बेडूकउड्या, डकवॉक, घरामध्ये जिना असल्यास त्याची चढ-उतार, स्थिर सायकलिंग, उताणं पडून हवेत सायकलिंगची हालचाल असे प्रकार करता येतात. बलवृद्धीसाठी डंबेल्स, मुद्गल, जोर-बैठका, पुशअप्स, सीटअप्स, तसंच ताकदीचा अंतर्भाव असलेली वीरासन, मयूरासनासारखी योगासनं, ‘ताईची’सारखे व्यायामप्रकार करावेत. जेवढं वैविध्य जास्त, तेवढा फायदा अधिक. व्यायाम शक्यतो पूर्वी शिकून केलेले असावेत. व्यायामापूर्वी आणि नंतर आवश्यक असे ताण (स्ट्रेचेस) शरीराला द्यावेत. शेवटी शवासन अथवा ‘कूल डाऊन’ करावं.

* अशी टिकवा रोगप्रतिकारक शक्ती
व्यायामामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते हा सद्यपरिस्थितीत महत्त्वाचा फायदा आहे. कारण, सध्या कुठल्याही कारणासाठी दवाखान्यात जाणं शक्य तेवढं टाळलेलं बरं. शरीर योग्य प्रकारे थकवलं की साधारणपणे भूक आणि झोप उत्तम लागते. व्यायाम, आहार आणि विश्रांती यांच्यात नियमितता आली की शरीर निरोगी ठेवायला विशेष खटपट करावी लागत नाही. जिभेचे चोचले पुरवायचे हे दिवस नाहीत. शहरांमध्ये अजूनही पार्सलसेवा उपलब्ध आहे; पण तरीही घरात शिजवलेलं ताजं अन्न खाणं हे नक्कीच सुरक्षित व पोषक आहे. नजीकच्या भविष्यकाळासाठी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तसंच घरात आहोत म्हणून येता-जाता स्वयंपाकघरात डोकावू नये. उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार प्यावंसं वाटणं स्वाभाविक असलं तरीही फ्रीजमधलं पाणी किंवा बर्फ घातलेली पेयं पिणं कटाक्षानं टाळावं. त्याउलट दर दोन तासांनी भांडंभर कोमट पाणी प्यावं. दिवसातून एकदा मीठ व हळदयुक्त गरम पाण्यानं गुळण्या कराव्यात किंवा वाफारा घ्यावा. ताप, सर्दी, खोकला किंवा घसादुखी होऊ शकेल अशा कुठल्याही खाद्यपदार्थापासून व पेयापासून तर या वर्षी लांब राहिलेलंच बरं!

*छंद-कला जोपासण्याचा हाच काळ
हे झालं शरीराविषयी. आता थोडंसं मनाविषयी. तसं पाहिलं तर या दोहोंचं कायम अद्वैतच असतं. शारीरिक पातळीवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक विधायक गोष्टीचा अनुकूल परिणाम मनावर होत असतोच; पण तरीही मनाच्या अंगानं स्वतंत्र विचार करायला हवा. संयम, निर्भयता, संकल्पशक्ती, सकारात्मकता, आज्ञाधारकता अशा अनेक मानवी गुणांची परीक्षा पाहणारा हा काळ आहे. मनाच्या शक्तीला दिलेली ही वेगवेगळी नावं आहेत किंवा वेगवेगळ्या रूपांमध्ये मनोऊर्जा जेव्हा प्रकट होते तेव्हा तिचं वर्णन करणाऱ्या या संज्ञा आहे. मानसिक ताकद कमावण्यासाठी आपण आत्तापर्यंत जे काही केलं व करतो आहोत त्याचा कस आता आणि यापुढच्या काळात लागणार आहे. अनावश्यक विचारांत गुरफटून गेल्यानं होणारा ऊर्जेचा अपव्यय टाळणं मन:स्वास्थ्य टिकवण्यासाठी गरजेचं आहे. काळजी करणं हानिकारक आहे, काळजी घेणं हितकारक आहे. क्रियापदबदलानं होणाऱ्या अर्थांतरामधला फरक नीट समजून घ्यायला हवा.
भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीच्या विवंचनेनं काळजी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. काळजी करणारं मन कायम भविष्यात फरफटत जातं. आजचा दिवस अधिक चांगला होण्यासाठी त्याचा काहीही उपयोग नसतो. हे माहीत असूनही मनात नकारात्मक विचारांचं थैमान सुरूच राहतं. हे थांबवण्यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं असतं. ती स्वतःसाठी आणि इतरांसाठीही घ्यावी लागते. मानसिक दौर्बल्य किंवा भावनिक अस्थिरता असणाऱ्यांसाठी ती विशेष घ्यावी लागते. काळजी घेणारं मन हे कायम वर्तमानात असतं. आपलं मन रमेल अशा गोष्टीत त्याला गुंतवून ठेवणं हा नकारात्मकता घालवण्यासाठी सगळ्यात सोपा आणि रामबाण इलाज आहे. आपल्याला आवडणारी पुस्तकं वाचणं, उत्तम संगीत ऐकणं, निवडक नाटकं, सिनेमे, मालिका पाहणं अशा गोष्टींमध्ये वेळ मजेत जातो. शिवाय, नको त्या विचारांचा आपोआप विसर पडतो. नकारात्मक विचार येऊ नयेत म्हणून स्वतंत्र योजना आखावी लागत नाही. मनाला आनंद देणारे छंद, कला जोपासण्यास सुरुवात केली नसेल तर ती आता करावी. पुरुषांनी आपल्याला पाककलेमध्ये किती गती व रुची आहे ते प्रत्यक्ष आजमावून पाहावं. ‘बकेट लिस्ट’मधल्या राहून गेलेल्या व घरबसल्या करता येणाऱ्या छंद-कलांची यादी करून मग त्यांच्या पूर्ततेसाठी वेळेचं नियोजन करावं. त्यानिमित्तानं एक आत्मपरीक्षणही होईल. मनाच्या ऊर्जेची गुंतवणूक ही मनाला रिझवून शांत करणाऱ्या गोष्टींमध्ये असावी. अतिरंजक, चेतवणाऱ्या गोष्टी मनाची ऊर्जा खेचून घेतात. अशा प्रकारच्या मनोरंजनाची लागलेली चटक हे दुबळ्या मनाचं निदर्शक आहे.

* दुसऱ्यांचं दुःख कृतिशीलतेनं जाणा
चांगलंच होईल अशी आशा ठेवणं; पण त्याचबरोबर वाइटाला सामोरं जाण्याची तयारीही असणं हा कुठल्याही अवघड परिस्थितीतला सर्वोत्तम दृष्टिकोन आहे. त्यासाठी मनाला तारेवरची कसरत करावी लागते. मृत्यूची भीती प्रत्येकालाच असते. सध्या संपूर्ण पृथ्वीवर त्याचं तांडव सुरू आहे. कितीही ठरवलं तरी आपण हे रौद्रनृत्य पाहण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. सोशल मीडियावर, बातम्या देणाऱ्या वाहिन्यांकडे दुसरी कुठलीही बातमी नाही. घरामध्ये बाल्यावस्थेत, वृद्धावस्थेत असलेल्यांना, तसंच कमकुवत मनाच्या व्यक्तींना आणि इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना या क्लेशदायी वृत्तभडिमारापासून दूर ठेवायला हवं. घरात असणं हे संपूर्णपणे सुरक्षित आहे याची वारंवार जाणीव करून द्यायला व घ्यायला हवी. आपण कुठं विजनवासात किंवा तुरुंगात अडकलेलो नाही. कंटाळा ‘एंजॉय’ करता येत नसेल तर देशासाठी अमानुष शिक्षा भोगलेल्या अनेक राष्ट्रपुरुषांची चरित्रं जरूर वाचावीत. जगातल्या युद्धकैद्यांच्या प्रेरणादायी कथा वाचाव्यात. त्यामानानं आपली परिस्थिती फारच सौम्य असल्याचं लक्षात येईल. त्यातूनही ‘या सगळ्यात आमचा काय अपराध?’ यांसारखे विचार मनात येऊ लागले तर आपल्या डोक्यावर छप्पर आहे, खायला अन्न आहे, नळाला पाणी आहे, झोपायला गादी आहे याबद्दल कृतज्ञ राहून या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करताना थकत चाललेले कोट्यवधी देशवासी डोळ्यासमोर आणावेत. त्यांच्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल ते पाहावं.

* श्वासाचं किमयागार अनुसंधान
असहायता व भीती या दोन प्रमुख नकारात्मक भावना कमी-अधिक प्रमाणात सध्या प्रत्येकाला जाणवू शकतात. त्यांचा चित्तावरचा थर अधिकाधिक घट्ट होत गेला तर त्याचे परिणाम शरीरावर होऊ लागतात. ते टाळण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्वासावर लक्ष ठेवणं. तो छाती न हलवता लहान मुलाप्रमाणे फक्त पोटानं घेत राहावा. श्वास घेताना पोट फुगलेलं पाहावं, तर उच्छ्वास सोडताना ते आत गेलेलं बघावं. सुरुवातीला ही प्रक्रिया उताणं झोपून पोटावर लहानशी उशी ठेवून करावी. श्वास शक्य तितका दीर्घ आणि संथ असावा. श्वास पाहता पाहता मनातल्या अनावश्यक विचारांची वर्दळ कमी होत जाईल. एका वेगळ्याच प्रकारच्या शांतीचा अनुभव येईल. ही प्रक्रिया सुरुवातीला दिवसातून दोन वेळा प्रत्येकी किमान पंधरा मिनिटं करावी व इतर वेळेस याच प्रकारे श्वास घेण्याचा संकल्प करावा. श्वासाच्या अनुसंधानाइतका मनावरचा ताण दूर करणारा दुसरा शास्त्रीय मार्ग नाही. श्वासाच्या निरंतर अभ्यासानं स्थिर झालेलं चित्त हे नुसत्या आशावादी मनापेक्षा कित्येक पटींनी बलवान असतं.

* घर नव्हे, तात्पुरती ध्यानगुंफाच!
कुठल्याही साधनेच्या, उपासनेच्या दृष्टीनं सध्याचा काळ फारच अनुकूल आहे, त्यामुळे अगदी खच्चून साधना करावी. बाहेरच्या वातावरणात नीरव शांतता आहे. ते प्रदूषणमुक्त आहे. ज्या निवांततेसाठी एरवी आपण धडपडतो ती घरबसल्या अनायासे उपलब्ध आहे. आध्यात्मिक साधकांसाठी सद्ग्रंथांचं वाचन, स्वाध्याय, नामस्मरण, ध्यान करायला कुठलीही आडकाठी नाही. ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे...’ हे समर्थवचन नेहमीच्या व्हॉट्सअप टंकलेखनाखेरीज इतर विधायक विषयांनाही लागू करावं. वैयक्तिक उन्नतीसाठी परमेश्वरानंच आपल्या घराचं रूपांतर तात्पुरत्या गुहेमध्ये केलं आहे असं समजून प्रपंच परमार्थरूप करावा. तशीही केशकर्तनालयं संध्या बंद असल्यानं वैराग्याचं बाह्यलक्षण एव्हाना आपल्यामध्ये आपोआपच दिसू लागलं असेल!
तेव्हा,
हे विश्वचि माझे घर।
ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर।
आपणचि जाहला।।

या ज्ञानेश्वरमाउलींच्या प्रसिद्ध ओवीचा अनुभव ‘याचि देही, याचि डोळा’ घ्यायची इच्छा असेल तर,
हे घरचि माझे विश्व
ऐसी बुद्धी सर्वांची स्थिर
किंबहुना कोरोनामुक्ती
सहजचि पावेल।

या अस्मादिकांच्या चार ओळी लक्षात असू द्याव्यात! विषाणूरूपी भस्मासुराचं आव्हान झेलण्यासाठी त्या स्मरणात असणं आवश्यक आहे.
दोनच दिवसांनी, सात एप्रिलला, जागतिक आरोग्यदिन आहे. आरोग्याच्या दृष्टीनं जागतिक महामारीचा हा काळ कठीण असला तरी तो कायम टिकणार नाही हे नक्की. तो निश्चितच संपेल. तोपर्यंत ही इष्टापत्ती आहे असं समजून, उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं आपलं स्वास्थ्यसंवर्धन करत राहावं.
सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामया: ।।

loading image