esakal | ‘ग्रामकुल’ : ‘आत्मनिर्भर’तेचं पहिलं पाऊल (डॉ. राजा दांडेकर)
sakal

बोलून बातमी शोधा

dr raja dandekar

‘आत्मनिर्भर भारता’ची सध्या चर्चा सुरू आहे. आत्मनिर्भरता अर्थात स्वावलंबन अंगी बाणायचं असेल तर त्याची सुरुवात अगदी प्राथमिक स्तरापासून झालेली कधीही चांगली. आपला भारत हा कृषिप्रधान आहे आणि तो बहुतांश खेडेगावांमध्ये वसलेला आहे.

‘ग्रामकुल’ : ‘आत्मनिर्भर’तेचं पहिलं पाऊल (डॉ. राजा दांडेकर)

sakal_logo
By
डॉ. राजा दांडेकर rajadandekar@yahoo.com

‘आत्मनिर्भर भारता’ची सध्या चर्चा सुरू आहे. आत्मनिर्भरता अर्थात स्वावलंबन अंगी बाणायचं असेल तर त्याची सुरुवात अगदी प्राथमिक स्तरापासून झालेली कधीही चांगली. आपला भारत हा कृषिप्रधान आहे आणि तो बहुतांश खेडेगावांमध्ये वसलेला आहे. अशा ठिकाणी आत्मनिर्भरता निर्माण करायची तर सर्वांगीण विचार गरजेचा असतो. कोकणात काम करणाऱ्या ‘लोकसाधना’चे डॉ. राजा दांडेकर यांनी ‘ग्रामकुल’लया संकल्पनेतून असा विचार मांडला आहे. त्याविषयी...

गेल्या महिन्यात गावात गावसईची सभा झाली. विषय होता : ‘लॉकडाउननंतर पुढं काय?’ आबालवृद्ध, स्त्री-पुरुष सर्वजण ग्रामदेवतेच्या देवळात जमले होते. विशेष म्हणजे, कोरोना महामारीमुळे गावाकडे परत आलेले बरेचसे तरुण, ग्रामस्थ उपस्थित होते. लॉकडाउन झालेली गावं आज ना उद्या मोकळी होतील; पण माणसं मोकळा श्वास घेऊ शकतील का? सगळ्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आणि प्रश्नचिन्ह होतं. अनेकांनी अनेक प्रश्न मांडले.

लॉकडाउन संपल्यावर पुन्हा शहरात जायचं का? पुन्हा नोकरी मिळेल का? गेलो नाही तर गावाकडे राहून काय करायचं? ‘निसर्ग’ वादळामुळे गावातल्या घरांची, वाड्यांची अतोनात हानी झाली आहे, संसाराला पैसे कुठून मिळतील? मुलांच्या शिक्षणाचं काय? आज सगळं काही विस्कटलंय...आयुष्य ठप्प झालंय...आपलं प्रत्येकाचं आणि गावाचं ही जगणं थांबलंय...सगळ्यांचे चेहरे प्रश्नांकित होते. थोडा वेळ स्तब्धता होती. कुणीच काही बोलेना...म्हणून शेवटी गावातल्या शैक्षणिक संस्थेचा कार्यकर्ता म्हणून ‘या सगळ्या प्रश्नांवर मला काही बोलावसं वाटतंय, आपण सर्वांनी त्यावर चर्चा करू आणि मग कामाला लागू,’ असं मी सुचवलं. सर्वांनी मला बोलायला सांगितलं. त्याचंंच हे साररूप.
भांबावलेल्या, धास्तावलेल्या माझ्या गावकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचं बळ मला माझ्या ‘लोकसाधना’च्या ४० वर्षांच्या अनुभवानं दिलं आहे. ४४ वर्षांपूर्वी मोझरीच्या गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमात आठ दिवसांचं जीवन अनुभवलं. तिथं ‘ग्रामगीते’तली एक ओवी वाचनात आली : ‘म्हणोनि मित्र हो! ऐका निश्चिती| गावीच मुलांचे शिक्षण घ्या हाती| सुखी होतील सकळ जन| पांग फिटेल जन्मजाती|’
या दोन ओळी मी अनेक वेळा वाचल्या, मनात त्या रुजल्या. ‘लोकसाधना’ हा या विचारांचाच एक छोटासा रुजवा. आज निमित्त झालंय कोरोनाचं; पण या ओवीवरून ‘ग्रामकुल’ची कल्पना मांडावीशी वाटतेय. ही कल्पना सन १९७६ पासून माझ्या मनात रुंजी घालत आहे. आज शाश्वत जीवनासाठी त्याची गरज आहे.

आपण सर्वांनीच आता वर्तमानस्थितीचा आणि पुढच्या पिढीच्या जगण्याचा विचार करायला हवा. शिक्षण हेच परिवर्तनाचं माध्यम आहे. ते कसं असावं याचा विचार करू या. शिक्षणाचा उपयोग दैनंदिन जगण्यासाठी कसा करता येईल यासाठी माझ्या मनात एक कल्पना आली आहे आणि ती म्हणजे ‘ग्रामकुल’. अगदी पूर्वी आपल्या देशात ‘गुरुकुल’ शिक्षणपद्धती होती. बलुतेदारी होती. गावं-खेडी समृद्ध होती. शेती करून माणसं सुखा-समाधानानं जगत होती. ब्रिटिशांनी ही गुरुकुल शिक्षणपद्धती आणि गाव आत्मनिर्भर (स्वावलंबी/स्वयंपूर्ण) करणारी बलुतेदारी मोडून काढली आणि पुढच्या पिढ्यांना साक्षर करून नोकरदार बनवलं. मग खेडी ओसाड पडू लागली.
शिकली-सवरलेली मुलं शहरांकडे धावू लागली आणि खेड्यांचे ‘वृद्धाश्रम’ झाले! आमचे अनुभव, परंपरागत कला-कौशल्य...सगळं काही आम्ही विसरून गेलो, नोकर झालो, गुलाम झालो आणि कोकण मनीऑर्डर वर जगू लागलं.

कोरोनाच्या महामारीमुळे शहरांकडून पुन्हा गावांकडे होत असलेलं लोकांचं पुनरागमन ‘ग्रामकुल’च्या माध्यमातून गावं नव्यानं समृद्ध करू शकेल. 'ग्रामकुल’ किंवा ‘गावकुल’हा ‘गुरुकुल’चा नवीन आविष्कार आहे. याद्वारे ‘आत्मनिर्भर भारता’चं स्वप्न पूर्णत्वास जाऊ शकतं. पंचक्रोशीवर आधारित, प्रचलित शिक्षणाबरोबरच आधुनिक बलुतेदार तयार करणारी नवीन शिक्षणरचना मला अभिप्रेत आहे. ‘ग्रामकुल’द्वारे गावातल्या लोकांच्या गरजा भागवणारं शिक्षण गावातच मिळेल. नवीन पिढीला, चाकरमान्यांना, पुन्हा आपल्या मायभूमीत स्वयंरोजगार-उद्योग करण्याची ही संधी आहे. शाश्वत जीवन जगण्यासाठी ती साह्यभूत ठरू शकते. स्थानिक पातळीवरच्या शक्तिस्थानांचा विचार करून, तिथल्या निसर्गाला अनुसरून शेतीपूरक उद्योग गावपातळीवर उभारून गावांना आर्थिक स्वावलंबन मिळेल. पिढीजात कौशल्यावर आधारित अनेक घराणी, माणसं आजही आहेत. कुलगत गुण अनेकांमध्ये आहेत. अनेकांना वांशिक वैशिष्ट्यं लाभलेली आहेत. अशा पंचक्रोशीतल्या कारागिरांकडून लौकिक शिक्षणाला धरूनच व्यवसाय-उद्योग-शिक्षण पंचक्रोशीतल्या ‘ग्रामकुल’कडून मिळेल.
‘आत्मनिर्भर भारता’साठी ‘गुरुकुल,’ ‘ग्रामकुल’ विद्यालय, महाविद्यालय अशी शिक्षणव्यवस्था उभी करता येईल. दुर्गम, ग्रामीण भागांतल्या, खेड्यांतल्या, आदिवासी पाड्यांतल्या, तसंच देशाच्या सीमावर्ती भागातल्या मुलांच्या शिक्षणाचा थोडा असाही विचार आपण करायला हवा.

या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातल्या पूर्वसुरींच्या कार्याचा थोडा आढावा घेतल्यास योग्य ठरेल.
सह्याद्रीच्या-हिमालयाच्या डोंगरदऱ्यांतल्या, ईशान्य भारतातल्या प्रवासात किंवा नर्मदापरिक्रमेत मी खेड्यांचं जनजीवन पाहिलं तेव्हा तिथल्या मुलांच्या शिक्षणाचा आणि जगण्याचा विचार करत आलो, संदर्भ लावत आलो. जवळजवळ १८ वर्षांच्या काळात संपूर्ण भारतभरच्या समाजदर्शनातून ‘भारतशिक्षा शोधयात्रा’ हा विषय मनात आकाराला आला. त्याच वेळी महात्मा गांधी, विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, जे. कृष्णमूर्ती यांचे शिक्षणविषयक विचार आणि तत्त्वज्ञान मनात होतंच. कधी आसाममधल्या माजुली बेटावरची गुरुकुलं डोळ्यांसमोर येत होती, ‘थ्री इडियट्स’ मधली कल्पनेतली शाळा, लेहमधलं ‘व्हाईट लोटस स्कूल,’ ‘असीम फाउंडेशन’बरोबर काश्मीरच्या प्रवासात पाहिलेल्या तिथल्या दुर्गम खेड्यांतल्या शाळा, आंध्र प्रदेशातली ‘ऋषी व्हॅली’ची शाळा, त्यांच्या सभोवतालच्या वीस खेड्यांतली ‘सॅटेलाईट स्कूल्स’ आणि आंध्र प्रदेश शासनाचा ‘स्कूल इनबॉक्स’ प्रकल्प, केरळमधली जंगलातली कणवू आश्रमशाळा, तसंच कर्नाटक, तामिळनाडू, केरळमधल्या प्रयोगशील शाळा, राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातल्या खेड्यातल्या शाळा, बंकर रॉय यांचा 'बेअरफूट कॉलेज’चा प्रकल्प, बिहारमधल्या ‘बुद्ध जीवनदर्शन यात्रे’त पाहिलेल्या शाळा, ओडिशाच्या प्रवासातल्या शाळा, मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरची श्रीरामकृष्ण मिशनची शाळा, अरुणाचल प्रदेशात पाहिलेली श्रीरामकृष्ण मिशनची निवासी शाळा...अशी समग्र ग्रामीण भारताची शिक्षणव्यवस्था पाहिली आणि डोकं चक्रावून गेलं.

करावे काय शिक्षण जे कधी कामाशी येईना
पुस्तके पाठ करूनही लाभ अंती नसे कोणा
हे तुकडोजीमहाराजांचं वचन आठवलं.

खरंच, शिक्षण कशासाठी? शिक्षणाचा आणि जगण्याचा संबंध काय? प्रचलित शिक्षण ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसाच्या प्रत्यक्ष जगण्यात किती उपयोगाला येतं? आयुष्यातली १५ ते २० वर्षं शिकून माणूस आत्मनिर्भर/स्वावलंबी होऊ शकला का? माणूसच आत्मनिर्भर झाला नाही तर देश कसा आत्मनिर्भर होणार? मग पुन्हा ‘गड्या, आपुला गाव बरा’ अन् ‘ग्राम हेचि मंदिर’!

‘ग्रामकुल’च्या शिक्षणपद्धतीची कल्पना स्पष्ट करता येईल ती ‘लोकसाधना’च्या गेल्या ४० वर्षांच्या ग्रामविकासाच्या कार्यातून. प्रचलित शिक्षणपद्धतीबरोबरच इयत्ता पाचवी ते सातवीला जीवनोपयोगी शिक्षण, आठवी ते दहावीला मूलभूत तंत्रज्ञानाचा परिचय आणि दहावीनंतर ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम ‘मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स’ हे अभ्यासक्रम शासनमान्य आहेत. यातला पदविका अभ्यासक्रम हा अकरावी-बारावीला करता येतो. यातूनच कौशल्याधारित शिक्षण घेता येतं. ‘आत्मनिर्भर भारता’चा विचार करताना कौशल्यविकास हे समाजविकासाचं साधन आणि मंत्र असेल. सन २०२८ मध्ये भारत हा जगातला सर्वात जास्त लोकसंख्येचा तरुण देश असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची गरज म्हणून ‘स्किल डेव्हलपमेंट’चा विचार जनतेसमोर ठेवला आहे. देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे सर्व कुशल कामगार देशातच मिळतील. ‘ग्रामकुल’मधून!

‘ग्रामकुल’ म्हणजे नक्की काय, त्याचा अभ्यासक्रम आणि त्याची दैनंदिनी कशी असेल? पाहू या...

वस्तीशाळा किंवा वाडीशाळा, सार्वजनिक ठिकाणची मंदिरं, समाजमंदिरं, अंगणवाडी किंवा कुणाचं रिकामं घर इथंच वाडी-वस्तीवरची सगळी मुलं-मुली आणि मोठी माणसं रोज जमतील. वाडीतल्या मुलांचे अंगणवाडी ते महाविद्यालयीन वयानुसार सहा गट पाडले जातील. ‘ग्रामकुल’ शिक्षण सहा सत्रांमध्ये चालेल. आपण जमणार असू त्या ठिकाणी बरोबर सकाळी सात वाजता पहिल्या सत्राची घंटा वाजेल. वाडीतली सगळी मुलं-मुली आणि मोठी माणसं एकत्र जमतील आणि प्रातःस्मरण, सूर्यनमस्कार, योगासनं होतील. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत, तसंच एकमुखानं सर्वजण ओंकारनाद, ध्यान करतील. लागलीच दुसऱ्या सत्रात, मुलांचा एकत्र परिपाठ सुरू होईल; पण मग गावातली मोठी माणसं आपापल्या कामाला निघून जातील. त्यांची कामं, उद्योग ठरले नसतील तर, गावात राहून शेती व शेतीवर आधारित उद्योग-व्यवसायासाठी आत्मनिर्भर बनवणारं शिक्षण ‘ग्रामकुल’/ ‘लोकसाधना’तून घेता येईल. याशिवाय, देशी गोवंशआधारित कृषिविकास असेल. गोपालनाचं आणि पंचगव्य-उत्पादनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, शिक्षणव्यवस्थेतून (पाचव्या सत्रात) दिलं जाईल. इथं पहिलं-दुसरं सत्र संपेल.

सर्व मुलं घरी जाऊन स्नान, न्याहारी करून पुन्हा तिसर्‍या सत्रात ‘ग्रामकुल’मध्ये वा शाळेत जातील आणि प्रचलित शिक्षणपद्धतीतला अभ्यास करतील. औपचारिक-प्रचलित शिक्षणपद्धतीच्या परीक्षा या शालेय पातळीवर देता येतील. तिसरं सत्र असं चालेल. शिकणं आणि शिकवणं या दोन्ही प्रक्रियांद्वारे सर्वच मुलं शालेय अभ्यासक्रम पूर्ण करतील. गावातले त्यांचे ताई-दादा आणि शाळेचे शिक्षक यांचं त्यांना मार्गदर्शन लाभेल.
चौथं सत्र गृहकाम आणि गृहउद्योगांचं असेल. घराची साफसफाई, स्वयंपाक, धुणी-भांडी आणि दुपारी भोजनोत्तर अर्धा तास विश्रांती.

पाचवं सत्र सायंकाळी चार ते सात. हे सत्र वयोगटानुसार जीवनोपयोगी शिक्षणाच्या प्रात्यक्षिकांचं आणि उपक्रमांचं असेल. त्याची रूपरेषा गटवार ठरवण्यात आलेली आहे. प्रात्यक्षिकांच्या या पाचव्या सत्रात, शैक्षणिक उपक्रमातल्या आपल्या आवडीच्या विषयात शिकून काम करण्याची संधी प्रत्येकाला मिळेल. बारा बलुतेदार जी काम करायचे ती करणारे सुतार, लोहार, चर्मकार, कुंभार इत्यादींच्या मुलाखती घेणं, त्यांच्या कामाची पद्धत अनुभवणं, पोस्टाचे, बँकेचे, वेगवेगळ्या संस्था-आस्थापनांचे व्यवहार समजून घेणं. उदाहरणार्थ : आरोग्यकेंद्र, चिरेखाणी, हॉटेलव्यावसायिक, बागायतदार, प्रक्रिया, मत्स्य अशा अनेक लघु-उद्योजकांच्या मुलाखती घेणं, त्यांची कामं समजून घेणं, पावसाळ्यात शेतात नांगर धरणं, पेरणी व इतर कामं करणं. टीव्ही-मोबाईल दुरुस्ती करणारे, इलेक्ट्रिशिअन यांना मदत करता करता शिक्षण घेणं अशी अनेक कामं या सत्रात असतील.

यातूनच गावात ‘हँडीमन’, ‘मल्टीस्किल वर्कर’ तयार होतील. गावाच्या परिसराच्या गरजा भागवणारे तंत्रज्ञ, ‘बेअरफूट इंजिनिअर’ तयार होऊन गावागावात अनेक आधुनिक बलुतेदार-उद्योजक तयार होतील. शिक्षकही कृतिशील होतील. असं निर्मितिक्षम शिक्षणच समाजाला आत्मनिर्भर बनवेल व चरितार्थाची साधनं याच उद्योगातून गावात राहून मिळतील. या साऱ्यात कुटुंबाचा सहभाग असल्यानं गावं स्वयंपूर्ण होतील. काहीना बाह्य जगाचं आकर्षण असतं. असे आधुनिक बलुतेदार तयार झाल्यानंतर परराज्यांत, परदेशांत, अगदी कायमस्वरूपी नाही; पण आपली सेवा देऊ शकतील एवढं गुणवत्ताधारक कौशल्य त्यांच्याकडे निर्माण होईल. म्हणजे ‘ब्रेन ड्रेन’ न होता ‘ब्रेन गेन’ ही संकल्पना राबवली जाऊ शकते.

तिन्हीसांजेला सात वाजता सहावं सत्र सुरू होईल. समाजमंदिरात सर्वांनी जमायचं, प्रार्थना, परवचा, स्तोत्र, पाढे, भजन जे आवडेल ते म्हणायचं. दिवसभरात आलेल्या विशेष अनुभवांवर चर्चा करायची आणि पसायदान झाल्यानंतर उद्याच्या भेटीचं नियोजन करून घरी जायचं. कुटुंबातल्या व्यक्तींना गरजेनुसार मदत, वृद्ध-आजारी व्यक्तींची सेवा आणि झोपण्यापूर्वी थोडंसं चिंतन करायचं.

‘ग्रामकुल’ वर्षभर चालेल. शालेय अभ्यासक्रम मात्र शासननियमानुसार १६० दिवस चालेल. ‘ग्रामकुल’मध्ये सुटी क्वचितच असेल. सण-समारंभ, लग्न-मुंजी, आजारपण या गोष्टीसाठी सुटी मिळू शकेल. सर्व सण-समारंभ गावात सामूहिकरीत्या साजरे केले जावेत, गावाची विकासकामं गाव श्रमदानातून केली जावीत, लहान-थोर सर्वांनी श्रम करावेत हे पाहिलं जाईल.

‘ग्रामकुल’मध्ये विद्यार्थ्यांना काही गृहपाठ देण्याची कल्पना आहे. या गृहपाठांमध्ये, ग्रंथभिक्षा (आप्तपरिवार, शेजारी यांच्याकडून ग्रंथ मिळवणं), अनुभवभिक्षा (कोणताही नवीन अनुभव मिळवा आणि मित्रांना सांगा), ज्ञानाभिक्षा (कोणतंही नवीन ज्ञान मिळवा आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर करून पाहा), परिसरभिक्षा (परिसरातले पशू-पक्षी, वृक्षवल्ली, वनौषधी इत्यादींचं ज्ञान मिळवा, त्या ज्ञानाचा संग्रह करा), प्राच्यवस्तूभिक्षा (प्राच्यवस्तू व त्यांची माहिती मिळवा) या बाबींचा समावेश असेल.

प्राचीन काळी कोकणात वापरात असलेल्या वस्तू पडून असल्यास त्या मिळवून संग्रहित करायच्या. तेही पर्यटकांचं एक आकर्षणकेंद्र होईल. अशा पाच प्रकारच्या भिक्षा 'ग्रामकुल’साठी मागण्याचा गृहपाठ विद्यार्थ्यांना देता येईल.

‘ग्रामकुल’च्या या सहा सत्रांमधून आणि गृहपाठातून आपल्याला अपेक्षित ते सर्व घडेल असा माझा विश्वास आहे. अडचणी नक्कीच येतील, मतभेदही होतील; पण आपण सर्वांनी या गोष्टी व्यवस्थित समजून, विचारपूर्वक, सजगतेनं केल्या तर ‘ग्रामकुल’च्या कृतीतून केवळ आपलंच गाव नव्हे, तर देश सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर होईल.

loading image