सेल्फी आणि 'स्व'चं भान (डॉ. संजय विष्णू तांबट)

डॉ. संजय विष्णू तांबट
Sunday, 7 July 2019

डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच हा प्रकार, त्याची वाढत जाणारी क्रेझ, समाजाची मानसिकता, धोके-अपरिहार्यता आदी सगळ्या गोष्टींचं विश्‍लेषण.

डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच हा प्रकार, त्याची वाढत जाणारी क्रेझ, समाजाची मानसिकता, धोके-अपरिहार्यता आदी सगळ्या गोष्टींचं विश्‍लेषण.

हल्ली सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही समारंभात दिसणारं एक ठळक दृश्‍य म्हणजे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात स्वतःची किंवा स्वतःसोबत इतरांची छायाचित्रं टिपणारी मंडळी. अगदी लग्नसमारंभांत वर-वधू भेटीला आलेल्या पाहुण्यांचं भान विसरून मित्रांसोबत सेल्फी घेताहेत, हे दृश्‍य आपल्या सवयीचं झालं आहे. आपल्या रोजच्या जगण्यात शिरलेली ही गोष्ट कधीतरी स्वतःचं आणि भवतालाचं भान विसरायला लावते आणि त्यातून होतात ते जीवघेणे अपघात. या लेखाचं निमित्त आहे, ते या संदर्भात "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेली आकडेवारी.

या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, 2011 ते 2017 या कालावधीत सेल्फी घेताना जगभरात 259 जणांचा मृत्यू झाला आणि भारतातली मृत्यूंची संख्या 159 आहे. ती धक्कादायक आहे. त्यामुळे तिच्या आणखी खोलात जाण्याचं ठरवलं. सेल्फीमुळं होणाऱ्या वाढत्या मृत्यूंमुळं चिंतेत पडलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांनी हे संशोधन केलं. "सेल्फी डेथ', "सेल्फी अपघात' असे काही कीवर्ड देऊन त्यांनी गुगलवर शोध घेतला, त्यातून ही आकडेवारी त्यांच्या हाती आली. तिची मर्यादा पाहता प्रत्यक्षात सेल्फी घेताना झालेल्या अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या खूप जास्त असणार. समुद्रात-तलावांत बुडून, उंच पर्वत किंवा इमारतींवरून पडून, गाडीखाली चिरडून अशी अपघाताची कारणं या विद्यार्थ्यांना सापडली. त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी- विशेषतः पर्यटनस्थळांवर "नो सेल्फी झोन' जाहीर करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तिचा नक्कीच विचार करायला हवा.

सरकार असे निर्बंध आणेल तेव्हा आणेल; पण त्याआधी आपणही एक व्यक्ती, समाज म्हणून "सेल्फी' नावाच्या आपल्या आयुष्यात अपरिहार्य बनलेल्या गोष्टीचा विचार करायला हवा. वर उल्लेख केलेल्या लेखाचं शीर्षक "सेल्फी - बून ऑर बेन' असं आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये आपणही अशा विषयांवर निबंध लिहिले आहेत. आता आपल्याभोवती वाढलेल्या डिजिटल साधनांच्या पसाऱ्यातून "सेल्फी' नावाची बाब पुढं आल्यानं ती केवळ अशा निबंधाचा नव्हे, तर सार्वजनिक चर्चाविश्वाचाही भाग बनली आहे. माध्यमांचे अभ्यासकही त्याच्या अनेक पैलूंचा विचार करत आहेत. अशा काही शोधनिबंधांच्या आधारे सेल्फी आणि त्याअनुषंगानं स्वतःबद्दलचं भान थोडं वाढवणं हा या लेखाचा हेतू आहे.

सेल्फी हा शब्द सन 2013मध्ये ऑक्‍सफर्डच्या इंग्रजी शब्दकोशात दाखल झाला, ही गोष्ट आता सर्वांना ठाऊक आहे. "स्मार्टफोनच्या साह्यानं स्वतःचं छायाचित्र काढणं आणि ते फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, पिंटरेस्ट अशा सोशल मीडियावर प्रसारित करणें,' असं स्पष्टीकरणही त्यात दिलं आहे. कॅमेरा आणि इंटरनेटची सुविधा असलेल्या नव्या मोबाईल फोनमुळं ही गोष्ट प्रचलित झाली, हे त्यात ओघानं आलंच. मात्र, मनुष्याला स्वतःबद्दलचं आणि स्व-प्रतिमेबद्दलचं आकर्षण अनादी काळापासून आहे. तंत्रज्ञान हातात नव्हतं तेव्हा तो शब्दांमधून त्याचं वर्णन करत होता. बाह्यरूपापासून ते आत्मशोध घेण्यापर्यंतचं हे तत्त्वज्ञान जगभरातल्या सर्वच समुदायांमध्ये विखुरलेलं आपल्याला आढळतं. ते तूर्त बाजूला ठेवून चित्रकला आणि नंतर छायाचित्रणाचं तंत्रज्ञान विकसित झालं त्यावर नजर टाकली, तरी सेल्फीचं मूळ आपल्याला शोधता येतं.

स्वप्रतिमेचं प्रेम...
आरशात स्वतःला न्याहाळण्यात वेळ घालवणं ही बाब तशी नवी नाही. "सेल्फ पोर्टेट' नावाचा प्रकार चित्रकलेत अनेक वर्षं आहे. छायाचित्रणाच्या सुरवातीच्या दिवसांत सन 1839मध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया प्रांतातल्या रॉबर्ट कार्नेलियसनं धातूच्या प्लेटवर स्वतःचं छायाचित्र घेतल्याची नोंद आहे आणि ते आजही उपलब्ध आहे. छायाचित्रणाचं तंत्रज्ञान विकसित झालं, तसं अशा छायाचित्रांचंही प्रमाण वाढलं. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धातही सेल्फी म्हणावीत अशी छायाचित्रं काढली गेली. कोडॅकसारख्या कंपनीनं सर्वसामान्यांना छायाचित्रं काढता येतील असे कॅमेरे स्वस्तात उपलब्ध केल्यावर काही प्रमाणात स्वतःची छायाचित्रं स्वतःच काढण्याचे प्रकार सुरू झाले; पण खरी क्रांती झाली ती कॅमेरा असलेले स्मार्टफोन लोकांच्या हातात आल्यानंतरच. सन 2002मध्ये असे कॅमेरे प्रथम अमेरिकेत उपलब्ध झाले. सन 2010मध्ये पहिल्यांदा फ्रंट कॅमेरा असलेले स्मार्टफोन लोकांच्या हातात आले आणि सेल्फी काढण्याचं आणि सोशल मीडियावर ते प्रसारित करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं. आता नवा स्मार्टफोन घेताना त्याच्या इतर फीचर्सबरोबरच पुढचा आणि मागचा कॅमेरा किती मेगापिक्‍सलचा हे पहिल्यांदा बघितलं जातं. त्यातून सेल्फीचं वेड वाढत गेलं आणि ते इतक्‍या टोकाला गेलं, की सेल्फी घेताना आपला जीव धोक्‍यात येऊ शकतो याचं अनेकांचं भान हरवलं. त्यामुळं या प्रकाराकडं गांभीर्यानं पाहण्याची वेळ आली आहे.

पहिल्यांदा ही गोष्ट विचारात लक्षात घ्यायला हवी, की सेल्फीचा नव्या डिजिटल जगण्याचे आणि समाजात एकूणच दृश्‍य घटकांच्या (छायाचित्रं आणि व्हिडियो) वाढलेल्या चलनवलनाचे संदर्भ सोडून विचार करता येणार नाही. अमेलिया जोन्स या लेखिकेचं विधान महत्त्वाचं आहे. ती म्हणते ः 'We don't know how to exist anymore without imagining ourselves as a picture'. म्हणजे चित्रं-छायाचित्रांशिवायच्या जगाची आपण आता कल्पनाच करू शकत नाही.
नवं डिजिटल तंत्रज्ञान आणि इंटरनेटसारख्या सुविधांमुळं आपल्या जगण्याचा पोत बदलला आहे. मॅन्युएल कॅस्टेल "नेटवर्क सोसायटी'चं वर्णन करताना जगभरातलं संगणक (आता स्मार्टफोन म्हणजे हातातला संगणक) एकमेकांना जोडले गेल्यानं केवळ हे संगणक नव्हे, तर तुम्ही-आम्ही या महाजालाचा म्हणजे नेटवर्कचा भाग (नोड) झालो आहोत, असं सांगतो. हे आपण रोजच्या व्यवहारात अनुभवतो आहोत. लहान मुलांना रमवण्यासाठी (बेबीसीटिंग) संगणक-स्मार्टफोनचा वापर करण्यापासून ते व्यक्तिगत आणि व्यावसायिक जगात या डिजिटल साधनांचा उपयोग आता अपरिहार्य बनला आहे. त्यामुळं आधीच्या पिढ्यांपेक्षा आपलं जगणं निराळं आहे. नवमाध्यमं, सोशल मीडिया आणि माहितीची (डेटा) प्रचंड प्रमाणात देवघेव हा त्याचाच एक भाग आहे. अशा समाजात स्वतःची ओळख प्रस्थापित करणं आणि अभिव्यक्त होणं वेगळं असणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. या गोष्टी अजूनही आपल्यापैकी अनेकांना नवीन असल्यामुळं प्रयोग करत, चुकतमाकत पुढं जाणं आणखी काही काळ घडणार आहे. डिजिटल साधनांच्या वापरातली प्रगल्भता समाजात अजून रुजायची आहे. या व्यापक संदर्भात सेल्फीकडं आपण बघितलं, तर त्यातलं नावीन्य, प्रयोगशीलता आणि त्याच्या वापरातले धोके आपल्या लक्षात येऊ शकतील.

समाज आणि "सेल्फीसिटी'
लेव्ह मॅनोविच या तज्ज्ञाच्या नेतृत्वाखाली सन 2013मध्ये "सेल्फीसिटी' नावाचं एक संशोधन झालं. बॅन्कॉक, बर्लिन, मॉस्को, न्यूयॉर्क आणि साओ पावलो या जगातल्या पाच प्रमुख शहरांमध्ये सेल्फीच्या संदर्भात पाहणी करण्यात आली. त्याच्या जोडीला एक लाख वीस हजारांहून अधिक सेल्फी छायाचित्रांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून अनेक निष्कर्ष काढण्यात आले. उदाहरणार्थ, तरुण वयातल्या मुली इतरांपेक्षा अधिक सेल्फी काढतात आणि शेअर करतात. त्यांचं सरासरी वय 23.7 वर्ष असं आहे. सेल्फी काढताना मान तिरकी करण्याचं प्रमाण महिलांमध्ये पुरुषांपेक्षा दीडशे टक्के जास्त आहे. या संशोधनातल्या निष्कर्षांवर स्वतंत्रपणे चर्चा करता येईल; पण सांगायचा मुद्दा हा की, सेल्फी हा आजच्या समाजात घट्टपणे रुजलेला प्रकार आहे. त्याकडं केवळ वेड किंवा क्रेझ म्हणून पाहता येणार नाही.

सेल्फीसंदर्भात नेहमी पुढं केला जाणारा एक मुद्दा म्हणजे "नार्सिसिस्ट' प्रकारच्या मानसशास्त्रात उल्लेख केलेल्या विकाराचा. नार्सिसस हे रोमन साहित्यातलं एक मिथक आहे. या नावाचं फूल दिसायला सुंदर असलं, तरी पुनरुत्पादन करू शकत नाही- त्यातून बिया निर्माण होत नाहीत. नार्सिसस नावाच्या एका राजपुत्राला प्रेयसीकडं दुर्लक्ष केल्याची शिक्षा म्हणून या फुलासारखा तोही पाण्यात पडलेल्या स्वतःच्याच प्रतिबिंबात हरवून जाईल, असा शाप मिळतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. हे मिथक सांगून सेल्फी म्हणजे स्वतःच्या प्रेमात अडकणं, स्व-प्रतिमेचे कैदी होणं या प्रकारची टीका मोठ्या प्रमाणात झाली आहे.

सेल्फीचा होणारा अतिरेक या दृष्टीनं त्याकडं पाहिल्यास ती योग्यही वाटते. म्हणजे स्थळ-काळ न पाहता काढलेले सेल्फी मोठ्या टीकेचे धनी होतात. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धात नाझी सैनिकांनी ज्यूंचा प्रचंड छळ व नरसंहार केला. त्याची एक छळछावणी पोलंडमध्ये आहे. एका तरुणीने सन 2014मध्ये या छळछावणीसमोर उभी राहत हसऱ्या मुद्रेनं सेल्फी काढला आणि तो सोशल मीडियात पोस्ट केला. त्यावर चहूबाजूंनी टीका झाली. अंत्यसंस्कारांच्या वेळी काढले जाणारे किंवा मृतदेहांच्या पार्श्वभूमीवर काढले जाणारे अशा प्रकारचे सेल्फी चुकीचेच आहेत आणि त्यावरची टीकाही रास्त आहे. मात्र, तुमच्यामाझ्यासह जगभरात मोठ्या संख्येनं लोक सहजपणे सेल्फी काढतात आणि त्याचा आनंद घेतात, याची कारणमीमांसाही करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं सेल्फीकडे केवळ नकारात्मक दृष्टीनं न पाहता त्यातल्या सकारात्मक बाजूही लक्षात घ्यायला हव्यात.

डिजिटल युगातली अभिव्यक्ती
सेल्फी ही डिजिटल युगातली अभिव्यक्ती आहे. सेल्फी म्हणजे स्वतःला दृश्‍य स्वरूपात सादर करणं (व्हिज्युअल सेल्फ-रिप्रेझेंटेशन) आहे. सोशल मीडियावर सेल्फी टाकताना साधारणपणे लोकांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणं आणि समाजात आपली एक विशिष्ट प्रतिमा प्रस्थापित करणं हे हेतू मनात असतात. या गोष्टी लोक आधीही करत होते आणि यापुढंही विविध प्रकारे करत राहणार. ही एक स्वाभाविक मानवी प्रवृत्ती आहे आणि सामाजिक व्यवहारातला तो न टाळता येणारा भाग आहे.
सेल्फी काढताना आणि तो त्वरेनं पोस्ट करताना "मी या ठिकाणी आहे,' असं आपल्याला मित्रांना सांगायचं असतं. आपला चेहरा आणि शरीरयष्टी चांगली दिसावी, यासाठी सेल्फी काढणारे प्रयत्न करतात. अशा छायाचित्रांना मोठ्या प्रमाणात लाइक मिळतात, मित्रमैत्रिणींचा प्रतिसाद मिळतो. आपणही इतरांच्या सेल्फींना असाच प्रतिसाद देतो. त्यातून असे सेल्फी वारंवार काढण्याचं आणि शेअर करण्याचं प्रमाण वाढतं. ते कोणत्या ठिकाणी काढत आहोत, त्यासाठी आपल्या जीवाला धोका नाही ना याचं भान राहिलं नाही, तर अपघात होतात. सतत सेल्फी काढत राहण्याचं एक प्रकारचं व्यसनही काहींना - विशेषतः किशोरवयीन मुलामुलींना लागू शकतं. त्यातून आपण हसतमुख, सडपातळ दिसलं पाहिजे अशा हट्टातून खाण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो आणि आरोग्याच्याही तक्रारी उद्भवू शकतात. सेल्फीचे अशा प्रकारचे कोणते शारीरिक, मानसिक, सामाजिक परिणाम होतात आणि त्यांचं नेमकं प्रमाण काय आहे, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.

विशिष्ट प्रतिमेचा हेतू
सेल्फीचा दुसरा हेतू स्वतःची विशिष्ट प्रतिमा घडवण्याचा आहे. अशा प्रकारचा प्रोपागंडा केवळ सर्वसामान्य व्यक्तीच नव्हे, तर समाजातले प्रतिष्ठित व राजकीय नेतेही करतात. बॉलिवूड-हॉलिवूडमधल्या तारेतारकांचे सेल्फी, त्यांना चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून कायम राहणारं प्रसिद्धीचं वलय हा त्याचाच एक भाग आहे. किम कर्दाशियनसारख्या व्यक्ती स्वतःच्या सेक्‍स अपीलचा चातुर्यानं उपयोग करत स्वतःला सतत प्रसिद्धीच्या झोतात ठेवतात.

राजकारणाच्या बाबतीत बोलायचं, तर बराक ओबामा यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेकांनी सेल्फीचा वापर मोठ्या हुशारीनं केला आहे. त्यांचा कित्ता आता दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेते करताना आपण पाहतो. इतकंच नव्हे, तर एखाद्या देशाचं ब्रॅन्डिंग करण्यासाठीही अशा डिजिटल डिप्लोमसीचा वापर होताना आता दिसतो. विविध सामाजिक कार्यकर्ते आणि चळवळीही सेल्फीचा वापर करताना दिसतात. याचा अर्थ व्यक्तिगत आणि सामूहिक पातळ्यांवर सेल्फीचा नवा पायंडा आता रुजला आहे आणि तो रोखणं आता कोणाच्या हातात राहिलं नाही.

या पार्श्वभूमीवर सेल्फीच्या आवडीचं रूपांतर व्यसनात न होण्याची दक्षता घेत त्याचा विवेकानं वापर शक्‍य आहे का, याचा विचार आवश्‍यक ठरतो. सेल्फी ही तंत्रज्ञानानं निर्माण केलेली एक सुविधा आहे आणि त्याचा वापर माझं "स्व'त्व राखून कसा करता येईल, याचं भान त्यामुळंच आवश्‍यक ठरतं. सेल्फीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण कॅमेऱ्यात केवळ समोर दिसणारं दृश्‍य न टिपता स्वतःला पुढं ठेवून विशिष्ट ठिकाण, वास्तू, व्यक्तीसमूह आणि प्रसंगाचं चित्रण करतो. त्याचा एक अर्थ सेल्फी टिपणारी व्यक्ती महत्त्वाची आणि पार्श्वभूमी किंवा इतर संदर्भ त्या मानानं दुय्यम असा निघतो. याचा भावार्थ लक्षात घेऊन सेल्फीत दिसणारं केवळ बाह्यरूप महत्त्वाचं न मानता आपली खरी ओळख किंवा व्यक्तित्व ठळकपणे पुढं येण्यासाठी आपण प्रयत्न करू शकू का, याचा विचार करायला हवा. तसं झालं तर सेल्फीतलं "स्व'चं भान अधोरेखित होऊन त्याचा अतिरेक आणि इतर धोकेही सहजपणे टाळता येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang dr sanjay tambat write selfie article