सागरपातळीतल्या वाढीचं संकट (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar
dr shrikant karlekar

‘क्लायमेट चेंज’ या अमेरिकेतल्या संशोधन संस्थेनं ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या संशोधनपत्रिकेत, गेल्याच आठवड्यात एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे. जगातली मुंबई, शांघाय यांसारखी अनेक आशियायी शहरं आणि किनारपट्टीच्या परिसरात राहणाऱ्या तीस कोटी लोकांपैकी वीस कोटी लोकसंख्येचा प्रदेश वर्ष २०५० ते २१०० पर्यंत वाढणाऱ्या समुद्रपातळीमुळं, प्रत्येक भरतीच्या कालखंडात, कायम स्वरूपात, भरती मर्यादेच्या पाण्याखाली जाणार असल्याचा धोक्याचा इशारा यात देण्यात आला आहे. समुद्रपातळी जगभरात सर्वत्र वाढत असल्याबाबतचं भाकीत नवं नाही. मात्र, या नवीन प्रयोगांत किनारी जमिनीच्या नेमक्या उंचीचं मोजमाप करून त्यावरून तयार केलेल्या उंचसखलपणा दर्शविणाऱ्या सांख्यिक त्रिमित प्रतिकृतींचा अचूक वापर करण्यात आला आहे. या भाकिताच्या अनुषंगानं एकूण परिस्थितीचा वेध.

‘क्लायमेट चेंज’ या अमेरिकेतल्या संशोधन संस्थेनं ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या संशोधनपत्रिकेत, गेल्याच आठवड्यात जगभरातल्या समुद्राच्या पातळीत झपाट्यानं होत असलेल्या वाढीच्या परिणामांचं भयावह आणि विदारक दृश्य समोर आणणारं एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे. जगातली मुंबई, शांघाय यांसारखी अनेक आशियायी शहरं आणि किनारपट्टीच्या परिसरात राहणाऱ्या तीस कोटी लोकांपैकी वीस कोटी लोकसंख्येचा प्रदेश वर्ष २०५० ते २१०० पर्यंत वाढणाऱ्या समुद्रपातळीमुळं, प्रत्येक भरतीच्या कालखंडात, कायम स्वरूपात, भरती मर्यादेच्या पाण्याखाली जाणार असल्याचा धोक्याचा इशारा यात देण्यात आला आहे.

मुंबई, कोलकाताबरोबरच बँकॉक, शांघाय यांसारखी शहरं आणि चीन, भारत, बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांतल्या किनाऱ्यांना याचा मोठा फटका बसेल आणि आजपर्यंतच्या अंदाजापेक्षा ही वाढ तिपटीनं जास्त असेल, असंही या संशोधनात म्हटलं आहे.
हे संशोधन अनेक दृष्टींनी समुद्रपातळीतील संशोधनाच्या या आधीच्या संशोधनापेक्षा वेगळं आहे. समुद्रपातळी जगभरात सर्वत्र वाढत असून, सखल किनाऱ्यावरील मोठा भूभाग नजीकच्या भविष्यात पाण्याखाली जाईल, हे भाकीत नवं नाही. मात्र, यापूर्वीच्या यासंबंधीच्या प्रतिकृती (मॉडेल्स) या उपग्रहांनी दिलेल्या प्रतिमांवर आधारित असल्यामुळं त्यांत किनाऱ्याच्या समुद्रसपाटीपासून असलेल्या उंचीचं नेमके निर्देशन होत नव्हतं. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या उंचच उंच इमारतींनी भरून गेलेल्या प्रदेशाची अचूक उंची मोजलीच जात नव्हती. मात्र, या नवीन प्रयोगांत किनारी जमिनीच्या नेमक्या उंचीचं मोजमाप करून त्यावरून तयार केलेल्या उंचसखलपणा दर्शविणाऱ्या सांख्यिक त्रिमित प्रतिकृतींचा (DEM : डिजिटल एलेव्हेशन मॉडेल) अचूक वापर केला गेला असल्यामुळं या भाकिताला अधिक विश्वासार्हता प्राप्त झाली आहे.
यापूर्वी SRTM (शटल रडार टोपोग्राफिक मिशन) सांख्यिकीवर (डेटा) आधारित मिळणाऱ्या प्रदेशाच्या त्रिमित प्रतिकृतीत अनेक त्रुटी आढळत होत्या. ही सांख्यिकी, प्रदेशाची समुद्रसपाटीपासून असलेली नेमकी उंची देत नाही, तर त्यांत प्रदेशातल्या झाडांचे माथे, इमारती, पूल, मनोरे यांचे माथे यांची उंची समाविष्ट झालेली असते. दाट लोकसंख्या आणि घनदाट जंगलांच्या प्रदेशांची अचूक उंची नोंदली जात नाही. प्रदेशाची प्रत्यक्ष उंची आणि एसआरटीएमनं दिलेली उंची यांत दीड ते दोन मीटरचा फरक हा पडतोच. त्यामुळं ही आकडेवारी लक्षांत घेऊन तयार केलेले सागरपातळीमुळे पाण्याखाली जाऊ शकणऱ्या भूप्रदेशांचे नकाशे चुकीचं चित्र उभं करतात.

आताच्या नवीन तंत्राचं नामकरण ‘कोस्टल डीईएम’ (Coastal DEM) असं करण्यात आलंय. यात किनाऱ्यावरच्या एक ते वीस मीटर उंचीच्या प्रदेशाचं लायडर (Lidar : लाईट डिटेक्शन अँड रेजिंग) तंत्रज्ञान वापरून जागतिक पातळीवर सर्वेक्षण करून उंचीदर्शक माहिती गोळा करण्यात आली असल्याचं या संशोधनात म्हटलेलं आहे. यामुळं प्रदेशाची प्रत्यक्ष उंची आणि लायडरनं दिलेली उंची यांत जास्तीत जास्त केवळ दहा सेंटिमीटरचा फरक पडू शकतो आणि नकाशे खूपच विश्वासार्ह बनतात असाही दावा करण्यात आला आहे. किनाऱ्यांची चालू असलेली धूप, भर आणि किनाऱ्यांच्या दिशेनं खाडीतून येणारा गाळ अशा गोष्टींचा विचार यात करण्यात आलेला नाही- कारण त्यामुळं उंचीत होणारा अल्पकालीन बदल खूपच नगण्य असतो.
या प्रयोगातून असं दिसून आलं, की जगातल्या किनारपट्टयांची समुद्रसपाटीपासून आपल्याला आज उपग्रह प्रतिमांतून कळणारी उंची प्रत्यक्षात खूप कमी आहे. त्यामुळंच सागरपातळी वाढून किनारी प्रदेश पाण्याखाली बुडून जाण्याचा धोका वास्तवात खूपच मोठ्या प्रदेशाला जाणवणार आहे. मोठ्या शहरी भागांत होऊ शकणाऱ्या सागरी आक्रमणाचा विस्तार यामुळंच मोठा असेल. दुर्गम, एकाकी आणि कमी वस्तीच्या किनारी भागांत मोजमापातली त्रुटी फारशी जास्त नसली, तरी लायडर तंत्रामुळं उंचीचं मापन अधिक बिनचूक मिळू शकतं.

या नवीन उंचीदर्शक नकाशातून असंही दिसून येतं आहे, की सागरपातळीतल्या वाढीमुळं मोठ्या शहरांतल्या जास्त लोकसंख्येला या संकटाचा सामना करावा लागेल. आधीच्या एसआरटीएमनं केलेल्या सर्वेक्षणात फार मोठा प्रदेश पाण्याखाली जाईल असं दिसत नव्हतं- कारण समुद्रपातळीत दोन मीटरची वाढ होईल असं म्हटलं, तरी किनाऱ्याजवळच्या प्रदेशाची उंची प्रत्यक्ष उंचीपेक्षा दोन मीटरनं जास्तच दिसत होती. त्यामुळे भरतीच्या वेळी किनाऱ्यालगतचा चिंचोळा भाग पाण्याखाली जाईल, असं दृश्य दिसत होतं. मात्र, नवीन तंत्रानं केलेल्या सर्वेक्षणांत किनाऱ्यांजवळचा फार मोठा भाग जेमतेम दोन मीटर उंचीचाच असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं पातळी जसजशी वाढत जाईल, तसा खूप मोठा भाग पाण्याखाली जाईल आणि खूप जास्त लोकसंख्या बाधित होईल, असं स्पष्टपणे दिसून येतंय. भारतातली साडेतीन कोटी लोकसंख्या बाधित होईल. पूर्वीच्या अंदाजानुसार ही संख्या पन्नास लाख इतकीच होती.
जगातल्या विविध किनारपट्टयांवर जिथं धूपरोधक, सुनामीरोधक भिंतींसारख्या रचना आणि बंधारे उभारण्यात आले आहेत त्यांचा या भूउंची मापन सर्वेक्षणात अर्थातच समावेश केलेला नाही. त्यामुळं सागरपातळीतील वाढीमुळं निर्माण होणाऱ्या संकटात त्यांचा किती आणि कसा उपयोग होऊ शकेल, याचाही नव्यानं विचार आता करावा लागेल.

हिम आवरणाचं प्रमाण कमी
गेली काही वर्षं सातत्यानं जगातल्या समुद्रांच्या पातळीत वाढ होते आहे. गेल्या काही हजार वर्षांत, पृथ्वीवरच्या हिम आवरणाचं प्रमाण हिम वितळल्यामुळं तेहत्तीसहून जास्त टक्क्यांनी कमी झालं आहे आणि त्यामुळं समुद्राची पातळी अनेक मीटर्सनी सर्वत्र उंचावली आहे. जागतिक तापमानवाढीमुळं जगातलं आणि विशेषतः आर्क्टिक आणि अंटार्क्टिकवरचं हिम वितळत असून, हिमालय, युरोपियन आल्प्स इथल्या हिमनद्याही वेगानं वितळत आहेत. गेल्या दशकात पूर्व अंटार्क्टिकवरच्या बर्फाच्या थरात दरवर्षी दोन सेंटिमीटर या वेगानं वाढ झाली आणि पश्चिम अंटार्क्टिकवरचा थर दर वर्षी नऊ मिलिमीटर या वेगानं वितळला. सन १९५७ पासूनची अंटार्क्टिकवरच्या हवेची निरीक्षणं असं सांगतात, की इथल्या हिमस्तरांचं तापमान एका दशकात एक दशांश अंश सेल्सिअस या वेगानं वाढतं आहे.
जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी पंचावन्न टक्के लोकसंख्या समुद्रकिनाऱ्यांच्या सपाट सखल प्रदेशात केंद्रित झाली आहे आणि यातले बहुतांश लोक आणि त्यांची मालमत्ता भविष्यातल्या समुद्राच्या भयावह आक्रमणाच्या दाट छायेखाली जगत आहेत. समुद्रपातळीतील वाढ ही तशी माणसाच्या नियंत्रणाबाहेर असलेली समस्या; पण कोट्यवधी लोकांच्या जीवित आणि वित्ताशी निगडित म्हणून संवेदनशील समस्या आहे. जगातल्या दहा देशांचं यामुळं अतोनात नुकसान होणार असून, त्यातले सात देश हे आशिया प्रशांत भागातलेच आहेत. बांगलादेशातले अडीच कोटी, चीनमधले दोन कोटी आणि फिलिपिन्समधले दीड कोटी लोक यामुळं आपद्ग्रस्त होतील. भारतात मुंबई आणि कोलकाता, चीनमधली शांघाय आणि ग्वांग्झू, बांगलादेशातलं ढाका, म्यानमारमधलं रंगून, थायलंडमधलं बँकॉक, व्हिएतनाममधलं हो चि मिन्ह सिटी आणि हाय फोंग या शहरांना मोठा धोका असेल.

हळूहळू आक्रमण
पावसाळ्यात किनाऱ्यांची वाढती धूप, गावांना पडणारा पाण्याचा वेढा, किनाऱ्यावरच्या गावांत घुसू पाहणारं समुद्राचं पाणी यांसारख्या घटना आपल्याकडे कोकणात आता वारंवार दिसू लागल्या आहेत. या घटना एकाएकी दिसू लागलेल्या नाहीत. त्या हळूहळू दृश्यरूप धारण करू लागल्या आहेत. उथळ होणारी नदीपात्रं आणि सर्वत्र संथ गतीनं उंचावणारी सागरपातळी यांचा पूर आणि किनाऱ्यांची धूप हा दृश्य परिणाम आहे. किनारी प्रदेशातली बांधकामं, धक्के आणि बारमाही बंदरांची निर्मिती, समुद्रातून होणारी वाहतूक, किनारा समीप भागात ऊर्जेसाठी चालू असलेली खोदकामं, पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी चालू असलेली अनिर्बंध बांधकामं अशा सर्व कामांमुळे आधीच किनाऱ्यावरच्या भूशास्त्रीय आणि जैविक प्रक्रियांवर मोठा ताण आहे. त्यामुळं समुद्रपातळीच्या वाढीला सामोरं जायला जगातले समुद्रकिनारे असमर्थ बनत आहेत. किनाऱ्यांचं पर्यावरण झपाट्यानं अतिसंवेदनशील बनतं आहे.
सागरपातळी वाढण्याची प्रक्रिया जागतिक आणि स्थानिक पातळीवरच्या कारणांमुळं होत असते. हिमटोप आणि हिम नद्यांतलं बर्फ वितळण्याची क्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. मनुष्यनिर्मित प्रदूषणानं त्याला हातभारही लागतो आहे. यामुळे जागतिक स्तरावर सागरपातळी वाढू लागली आहे. किनाऱ्याजवळचा प्रदेश खचल्यामुळे किंवा उंचावल्यामुळेही सागरपातळीत स्थानिक स्तरावर हालचाल घडत असते. जिथं जमीन खचण्याचा वेग जास्त असतो, तिथं समुद्रपातळी वाढण्याचा वेगही जास्त असतो. जगाच्या काही भागांत गेल्या पन्नास वर्षांत स्थानिक पातळीवर सागरपातळी दहा सेंटिमीटरनं म्हणजे जागतिक वेगाच्या दुप्पट वेगानं वाढल्याचं दिसून आलंय.

सर्वव्यापी, दूरगामी परिणाम
समुद्राच्या पातळीतल्या वाढीमुळे किनाऱ्यावर संथ गतीनं होत असलेल्या समुद्राच्या या आक्रमणाचे पर्यावरणीय परिणाम सर्वव्यापी आणि दूरगामी असून आता ते अनेक स्वरूपांत अनेक देशांत अनेक ठिकाणी दिसून येऊ लागलेत. किनाऱ्यांची गेल्या काही वर्षांपासून होऊ लागलेली धूप, पाणथळ व दलदल प्रदेशांची कमी होणारी संख्या, वादळी महोर्मी (स्टॉर्म सर्जेस) यांतली वाढ, नदीमुखं आणि त्रिभुज प्रदेशांचे होणारे स्थानबदल, किनाऱ्यांवरच्या जमिनींची, खाड्या आणि विहिरींची वाढणारी क्षारता, खारफुटी वनस्पती आणि सागरी जीवांचा वाढता विध्वंस अशा गोष्टी आता ठिकठिकाणी डोकं वर काढू लागल्या आहेत. महाराष्ट्राचा कोकण किनाराही याला अपवाद राहिलेला नाही!
समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळं किनाऱ्याजवळ असलेली आणि समुद्रातली बेटं पाण्याखाली जाण्याचा धोका मोठा आणि नक्की आहे. सर्वच किनाऱ्यांवरचा खारफुटी आणि पाणथळ प्रदेश यांचं संरक्षक पट्टा (बफर म्हणून असलेलं कार्य) अनेक ठिकाणी संपुष्टात येऊ लागला आहे. अनेक पक्षी आणि प्राण्यांचे आवास नष्ट होऊ लागले आहेत. वादळी महाकाय लाटा वाढून किनारी वस्त्या आपत्तीग्रस्त होण्याचा अनुभव अनेक वस्त्या घेतच आहेत. भविष्यात या वाढीमुळं पावसाचं प्रमाण वाढून जमिनीवरील प्रदूषकं मोठ्या प्रमाणांत समुद्रात जातील आणि त्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरसमुळं किनारासमीप प्रदेशांतले जलचर नष्ट होतील. उष्णता संवेदनशील जलचरांचे निवास उत्तरेकडे सरकतील. प्रवाळ, जलजशैव आणि शेलफिश समुद्रजलाची खोली, पातळी आणि तापमान, क्षारता, घनता बदलल्यामुळं अस्तंगत होण्याचा धोकाही वाढेल. किनारी मैदाने, लगुन्स, त्रिभुज प्रदेश आणि पुळणींच्या प्रदेशात समुद्र दरवर्षी पाच मीटर रुंदीचा किनारा गिळंकृत करील, अशीही शक्यता आहे.

सध्या सुरू असलेल्या सागरपातळीतल्या वाढीचा दरवर्षी जाणवणारा प्रभाव वर्ष २०५० मध्ये अतितीव्र होऊन प्रत्येक वर्षी मोठा प्रदेश पाण्याखाली जाऊ लागेल आणि वर्ष २१०० पर्यंत किनाऱ्यांचे मोठे भाग समुद्रात बुडतील. जगातल्या निरनिराळ्या ठिकाणी पाण्याखाली जाणाऱ्या प्रदेशांची व्याप्ती कमी-जास्त असली, तरी याआधीच्या अंदाजापेक्षा ती सगळीकडंच जास्त असेल, असं हे नवीन संशोधन सांगतं. विसाव्या शतकांत जागतिक समुद्रपातळी ११ ते १६ सेंटिमीटरनं वाढली. या शतकात ती नियंत्रणांत ठेवण्याचे आपण कितीही प्रयत्न केले, तरी ती ०.५ सेंटिमीटरनं नक्कीच वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाच आहे. वर्ष २०५० पर्यंत ती वीस सेंटिमीटरनं वाढेल, असंही भाकीत आहे. या वाढीत उंच पर्वतशिखरांवरचा बर्फाचा सहभाग १० ते ३० सेंटिमीटर पातळी वाढवण्यात, ग्रीनलंडवरच्या बर्फाचा १३ ते ३५ सेंटिमीटर, अंटार्क्टिकवरील बर्फाच्या विलयनाचा २० ते ३७ सेंटिमीटर आणि औष्णिक प्रसरणाचा ११ ते ३७ सेंटिमीटर असेल, असंही गणित मांडण्यात आलं आहे. मात्र, यामुळं किनाऱ्याजवळचा किती प्रदेश पाण्याखाली जाईल, याची नेमकी कल्पना या नव्या संशोधनानंतर येऊ शकते आहे. ती लक्षात घेऊनच किनाऱ्यावरच्या वस्त्यांच्या बाबतीत प्रत्येक सागरकिनारा लाभलेल्या देशाला आणि कमी उंचीच्या सागरी बेटांना आपलं धोरण ठरवावं लागणार आहे हे नक्की.

लक्षद्वीपचा सांगावा
गेल्या अनेक वर्षांपासून वाढत असलेल्या समुद्रपातळीचे पुरावे जगात अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत. हे संकट किती मोठं आहे, याची कल्पना आपल्या लक्षद्वीपच्या बेटांवरून चांगली येऊ शकेल. ही सागरी बेटं आज वाढत्या समुद्रपातळीच्या सावटाखाली आपलं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत आहेत. या बेटांचा जो ऱ्हास सध्या सुरू आहे आणि भविष्यात या बेटांना ज्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, त्याची आज अनेकांना फारच कमी माहिती आहे. समुद्रपातळीत येत्या भविष्यकाळात दीड ते दोन मीटरनं होणारी वाढ या कमी उंचीच्या प्रवाळ बेटांना पूर्णपणे गिळंकृत करणार असल्याचं भाकीत अनेक सागरशास्त्रज्ञांनी व हवामानतज्ज्ञांनी यापूर्वीच केलं आहे.

या सगळ्या बेटांचा इतिहास सदैव वाढणाऱ्या सागरपातळीशीच निगडित आहे. अरबी समुद्रातल्या, भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून चारशे किलोमीटर दूर असलेल्या या लक्षद्वीप द्वीपसमूहात ११ बेटावर माणसांची वस्ती आहे. १५ बेटांवर ती नाही. या बेटांच्या आजूबाजूचा समुद्रतळाचा अभ्यास असं दाखवतो, की इथं पाण्यात बुडालेल्या पाच प्रवाळ भित्ती (कोरल रीफ्स) आहेत. एका उथळ लगूनच्या आजूबाजूला असलेली सखल बेटांची ही एक साखळीच आहे. वाढत्या समुद्रपातळीमुळं होत असलेल्या किनाऱ्याच्या झीजेमुळं ती वेगानं संकटग्रस्त बनत आहेत. उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासातून ही बाब अगदी ठळकपणानं समोर आली आहे.

या द्वीपपसमूहातल्या बंगाराम या कंकणाकृती प्रवाळ बेटाचा भाग असलेलं ‘पाराळी १’ हे माणसाची वस्ती नसलेलं प्रवाळ बेट सप्टेंबर २०१७ मधे समुद्रानं गिळंकृत केल्यामुळं नकाशावरून नाहीसं झालं आणि समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळं येऊ घातलेल्या एका मोठ्या संकटाची त्यानं जणू घोषणाच केली. जागतिक तापमानवृद्धीमुळं वाढणारी समुद्रपातळी हेच या घटनेमागचं एकमेव कारण होतं. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळ बेटांत ‘पाराळी २’, ‘पाराळी ३’, ‘थिंनाकारा’ अशी आणखी तीन बेटं असून तीही नाहीशी होण्याची लक्षणं आहेत. त्यामुळं यापुढं लक्षद्वीप द्वीपसमूहात ३६ बेटं नसून, ३१ बेटंच आहेत असं म्हणण्याची आपल्यावर नजीकच्या काळात वेळ येणार आहे. इथली सगळी बेटं कमी उंचीची, समुद्रसपाटीपासून केवळ एक ते दोन मीटर उंच असून, त्यावर डोंगर, पर्वत अशी भूरूपं नाहीत. काही बेटांवर वाळूच्या उंच टेकड्या आणि थोड्या उंचीवर पुळणी आहेत. इथल्या सर्वच प्रवाळांच्या वाढीत समुद्रपातळीतल्या बदलानुसार अनेक बदल झाल्याचं दिसून आलंय. पंधरा हजार वर्षांपूर्वी या भागात समुद्रपातळी आजच्यापेक्षा १२० मीटरनी खाली होती. सात हजार वर्षांपूर्वी ती वीस मीटर इतकीच खाली होती. समुद्रपातळी खाली जाण्याची किंवा वर येण्याची क्रिया खूपच संथ गतीनं झाली असेल, नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवाळ बेटं तयार होऊ शकली नसती किंवा शिल्लक राहू शकली नसती.

कदाचित अशीच परिस्थिती जगातल्या इतर अनेक बेटांवर आणि सखल सागरी किना-यावर येण्याची शक्यता आता वाढली आहे! आत्तापर्यंत जगातल्या अनेक मोठ्या दाट लोकवस्तीच्या शहरांत वाढत असलेल्या समुद्रपातळीचा परिणाम दिसू लागला आहेच. जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअस आणि चार अंश सेल्शिअसनं वाढ झाल्यामळं मुंबईतली अनुक्रमे ३९ आणि ५० टक्के लोकसंख्या आणि कोलकात्यातली २४ आणि ५१ टक्के लोकसंख्या बाधित होणार असल्याची आकडेवारी याआधीच काही संशोधन संस्थांनी दिली आहे. चीनमधल्या शांघाय शहरासाठी ही आकडेवारी सर्वाधिक म्हणजे ३९ आणि ७६ टक्के इतकी मोठी आहे! आत्ताच्या नव्या गणिताप्रमाणं ही आकडेवारी भविष्यात यापेक्षा खूपच जास्त असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com