भूशास्त्रीय पर्यटनाचा खजिना (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

shrikant karlekar
shrikant karlekar

भूरूपांनी समृद्ध असलेल्या श्रीलंकेसारख्या देशात तर या संकल्पनेला खूपच महत्त्व आहे. हा देश अनेक असामान्य, आकर्षक आणि विलक्षण सुंदर; पण तितक्याच क्लिष्ट भूरूपांनी (लँडफॉर्म्स) समृद्ध बनलेला आहे. अनेक परदेशी पर्यटक इथं समुद्रकिनारे, राष्ट्रीय उद्यानं आणि जंगलं बघण्यासाठी येतात. मात्र, निसर्गपर्यटनापेक्षा (इकोटुरिझम) भूशास्त्रीय पर्यटन (जिओटुरिझम) संकल्पना आकलनाच्या पातळीवर पर्यटकाला निसर्गाच्या अधिक जवळ नेणारी आहे. श्रीलंकेतल्या जिओटुरिझमबाबत खूप मोठी क्षमता आहे. पर्यटनाच्या नव्या प्रकारावर एक नजर.

श्रीलंका हे निसर्गानं सौंदर्याची मनसोक्त उधळण केलेलं आणि माणसाच्या अमर्याद हस्तक्षेपापासून बऱ्याच अंशी मुक्त असलेलं असं हिंदी महासागरातलं एक मनस्वी बेट आहे! अतीव सुंदर अशा स्वच्छ पुळणी, उंचच उंच डोंगर, खोल नदीपात्रं, दूरवर पसरलेली भाताची खाचरं आणि घनदाट जंगलं ही सगळीच या देशाची बलस्थानं आहेत. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात भूशास्त्रीय अभ्यासाच्या निमित्तानं या देशाला दिलेल्या भेटीतून हे लक्षात आलं, की श्रीलंकेत भूशास्त्रीय पर्यटन (जिओटुरिझम) या पर्यटनाच्या नवीन प्रकाराची खूप मोठी क्षमता (पोटेंशिअल) आहे. या प्रकारच्या पर्यटनांत मुख्य भर हा एखाद्या विशिष्ट प्रदेशातली नैसर्गिक भूरूपं आणि भूआकार यांनी बनलेल्या भूदृश्याकरता केलेल्या पर्यटनावर असतो- त्यामुळं अशी ठिकाणं शोधणं आणि त्यांच्या पर्यटनक्षमतेचं मूल्यमापन करणं या गोष्टी यात महत्त्वाच्या ठरतात.
पर्यटनवृत्तीचा वाढता कल आणि त्याची गरज आणि मागण्या लक्षात घेऊन, पर्यावरणहितैषी आणि पर्यटकांच्या जिज्ञासू वृत्तीचं समाधान करण्यासाठी नवनवीन संकल्पना सध्या पुढं येत आहेत. भूशास्त्रीय पर्यटन ही त्यातलीच एक आधुनिक कल्पना. जिओसाईट्स, जिओटोप्स, जिओमॉर्फोसाईट्स व जिओपार्क्स अशा विविध संज्ञांनी ही जिओटुरिझमची कल्पना मांडण्यात येते. प्रदेशाच्या भौगोलिक आणि भूशास्त्रीय वैशिष्ट्यानुसार, या नवीन पर्यटन प्रकाराचं महत्त्वही पर्यटकांच्या लक्षात आणून दिलं जातं.

भूरूपांनी समृद्ध असलेल्या श्रीलंकेसारख्या देशात तर या संकल्पनेला खूपच महत्त्व आहे. हा देश अनेक असामान्य, आकर्षक आणि विलक्षण सुंदर; पण तितक्याच क्लिष्ट भूरूपांनी (लँडफॉर्म्स) समृद्ध बनलेला आहे. अनेक परदेशी पर्यटक इथं समुद्रकिनारे, राष्ट्रीय उद्यानं आणि जंगलं बघण्यासाठी येतात. मात्र, निसर्गपर्यटनापेक्षा (इकोटुरिझम) ही जिओटुरिझम संकल्पना आकलनाच्या पातळीवर पर्यटकाला निसर्गाच्या अधिक जवळ नेणारी आहे. कारण कोणत्याही प्रदेशातलं पर्यावरण हे प्रामुख्यानं तिथल्या भूदृश्याचाच परिणाम असतं- उदाहरणार्थ पर्वतीय पर्यावरणावर पर्वताच्या विविध गुणधर्मांचा खूप मोठा परिणाम नेहमीच झालेला दिसतो. त्यामुळे पर्वत, मैदानं, नद्या, समुद्रकिनारे अशी भूदृश्यं समोर ठेवून पर्यटन केलं, तर ते अधिक आनंददायी होतं. हे समजण्यासाठी हिमालय, सह्याद्री, मिसिसिपी, गोबीचं वाळवंट अशी अनेकविध उदाहरणं देता येतील.

श्रीलंका हा देश भूशास्त्रीय आणि भूदृश्य पर्यटनासाठी अतिशय आदर्श प्रदेश आहे. या देशाचा नव्वद टक्के भूप्रदेश हा ५७ कोटी वर्षं जुन्या खडकांनी बनला आहे. वीस कोटी वर्षांपूर्वी हे बेट गोंडवनभूमी या महाखंडाचा भाग होता आणि तो भारताशी जोडलेला होता. गोंडवनभूमीतल्या या खंडांचा प्रवास ईशान्येच्या दिशेनं सुरू होता. साडेचार कोटी वर्षांपूर्वी भारतीय भूतबक (टेक्टॉनिक प्लेट) युरेशिया तबकाला धडकली आणि हिमालयाची निर्मिती होऊ लागली. श्रीलंकेचा प्रदेश भारतीय तबकाच्या मध्यवर्ती भागात होता- त्यामुळं इथं भूकंप, ज्वालामुखी उद्रेक अशा घटना घडल्या नव्हत्या. पाच लाख वर्षांपूर्वी हे बेट समुद्रपातळीच्या उंचावण्यामुळं भारतापासून वेगळं झालं. गेल्या अडीच लाख वर्षांत इथल्या किनारपट्टीवर अनेक वेळा समुद्रपातळीच्या खाली-वर हालचाली झाल्या. श्रीलंकेच्या सोळाशे किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर गेल्या आठ ते दहा हजार वर्षांत झालेल्या बदलांमुळं किनारपट्ट्यांचा आकार आणि दंतुरपणा अनेक वेळा बदललाही आहे. आत्ताच्या किनारपट्टीवर आढळणाऱ्या उत्थापित पुळणी (रेज्ड बीचेस), अश्मीभूत पुळणी (फॉसिल बीचेस) पुरले गेलेले (बरीड) प्रवाळ आणि किनाऱ्यापासून खूप आत जमिनीच्या दिशेनं आढळणारे शंख-शिंपले या सर्व गोष्टी सागरपातळीतल्या हालचालींचे पुरावेच आहेत.

श्रीलंकेचे सर्व दिशांनी असलेले समुद्रकिनारे एकमेकांपासून भिन्न असून प्रत्येकानं आपलं स्वतःचं वैविध्य जपून ठेवलं आहे. पश्चिमेकडच्या हिक्कादुवा, बेंटोटा, मोरातुवा, कोलंबो, निगोम्बो या किनाऱ्यावर वाळूचे दांडे, लगून, सरोवरं आणि दलदलींचे प्रदेश मोठ्या संख्येनं दिसतात, तर उत्तरेकडच्या आणि ईशान्येकडच्या नीलवेल्ली, त्रिनकोमाली किनाऱ्यांवर भरड वाळू, चिखल याचं प्राबल्य आढळून येतं. हंबनटोटा, टांगाले, मटारा आणि गॉल इथल्या किनाऱ्यांवर २५०० ते ३५०० वर्षं जुन्या अश्मीभूत पुळणी असून, त्या आत्ताच्या समुद्रपातळीपासून दोन ते तीन मीटर उंचीवर आहेत. अनेक पुळणींवर कमी उंचीच्या वाळूच्या टेकड्या आहेत. मात्र, त्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसायांतर्गत झालेल्या बांधकामामुळं पूर्णपणे बाधित झाल्या आहेत.

पश्चिम किनाऱ्यावरच्या वीस चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या, निगोम्बी इथल्या दलदल प्रदेशाप्रमाणंच अनेक ठिकाणी विस्तृत दलदलींचे प्रदेश आढळून येतात. या दलदली साडेतीन ते पाच मीटर जाडीच्या गाळानं भरून गेल्या असून, त्यांत पूर्वीच्या उच्च समुद्रपातळीच्या काळांत संचयित झालेल्या अनेक सागरी जीवांचे अवशेष आढळतात. पूर्व किनाऱ्यावरच्या ट्रिंकोमालीच्या परिसरात कनिया या गावाजवळ उष्ण पाण्याचे झरे असून त्याभोवती सात कुंडं तयार करण्यात आली आहेत. श्रीलंकेचा भूमीप्रदेश अंतरंगातल्या आणि कवचावरच्या हालचालींच्या दृष्टीनं जागृत किंवा अस्वस्थ नसला, तरी याच प्रदेशांतून जाणाऱ्या अन्तर्भूतबक सीमेवर हे झरे असल्याचं सांगण्यात येतं. ट्रिंकोमाली इथल्या कोनेश्वर मंदिर परिसरात क्वार्टझाइट या रूपांतरित गाळाच्या खडकांत कोरल्या गेलेल्या घळईत भयप्रद वाटावे असे प्रचंड मोठे कडे दिसून येतात. हबरानाजवळच्या मिनेरिया राष्ट्रीय उद्यान परिसरात याच क्वार्टझाइट खडकांचं विदीर्ण रूप खोल भेगा, रंगीबेरंगी गारगोटीचे दगड, खडकांचे पापुद्रे अशा विलक्षण स्वरूपांत आपल्यासमोर येतं.

डम्बुला इथं असलेला जगप्रसिद्ध सिगिरिया खडक अडीच अब्ज वर्षं जुना आहे! तो ज्वालामुखीचा अवशिष्ट ठोकल्यासारखा दिसणारा उंचवटा असून त्याच्या उघड्या पडलेल्या तीव्र उताराच्या भिंतींवर नीस या रूपांतरित खडकाचे एकाखाली एक असे तीन विभाग स्पष्टपणे दिसून येतात. समुद्रसपाटीपासून ३७० मीटर उंचीवर असलेल्या या खडकाची उंची दोनशे मीटर आहे. याच्या खालच्या थरात अनेक नैसर्गिक गुहा आहेत. सिगिरिया खडकाच्या आजूबाजूच्या विस्तीर्ण सपाट प्रदेशांत ग्रॅनाईट खडकाचे असंख्य तुकडे आजही विखुरलेले दिसतात.

श्रीलंकेच्या मध्यवर्ती भागातल्या डोंगराळ प्रदेशांत कँडी, नुवारा एलीया आणि एला ही शहरं वसली असून, अतिशय सुंदर अशा निसर्गसौंदर्यानं हा प्रदेश नटून गेलाय. एलापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेला ‘रावण धबधबा’ हा तर या सौंदर्याचा अगदी कळस आहे. क्वार्टझाइट, नीस अशा खडकांतून प्रचंड उंचीवरून खाली कोसळणारा हा जलप्रपात, आजूबाजूच्या खडकांत दिसणारे प्रस्तरभंग, खोल नदीपात्र ही सगळी भूरूपं एला प्रांताची शक्तिस्थानंच आहेत. दक्षिणेकडच्या बुंडाला राष्ट्रीय उद्यानाच्या टोकाला असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी लाटांनी झिजवून मागं हटवलेले क्वार्टझाइट आणि ग्रॅनाईट खडकातले समुद्रकडे हे एक अप्रतिम सागरशिल्प आहे. वीस मीटर उंचीच्या या कड्याच्या पायथ्याजवळच्या पुळणीवरची वाळू वाऱ्याबरोबर उंच वर उडत येऊन कड्याच्या माथ्यावर तयार झालेल्या वाळूच्या टेकड्या हे भूरूप तर आश्चर्य वाटावं असं निसर्गलेणंच! ही वाळू गेल्या ऐंशी हजार वर्षांत उडत आल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय.

हिंदी महासागरात सन २००४ मध्ये आलेल्या सुनामीमुळं श्रीलंकेतले अनेक किनारे अक्षरशः उद्ध्वस्त झाले. या आपत्तीचे पुरावे जागोजागी आजही अस्तित्वात आहेत. कोलंबोच्या दक्षिणेला ९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेरालिया या गावात किनाऱ्याजवळ सुनामीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारण्यात आलं आहे. इथं किनाऱ्यापासून दोनशे मीटर अंतरावरून एक रेल्वेमार्ग जातो. २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या सुनामीनं या रेल्वेमार्गावरून कोलंबोकडून गॉलकडे जाणाऱ्या रेल्वेतल्या १८०० प्रवाशांचा जीव घेतला. सुनामीग्रस्त झालेले रेल्वेचे डबे आजही त्या प्रसंगाचीआठवण म्हणून तिथंच ठेवलेले आहेत!

भूरूपांच्या निर्मितीमागचा इतिहास, त्याची प्राचीनता, अखंडता आणि निर्मिती अशा गोष्टींचं मानवी मनाला निश्चितच आकर्षण वाटत असतं. उंच डोंगर पर्वतांची जडणघडण, त्यातल्या कडे-कपाऱ्यांचा राकटपणा, नद्यांची विस्तीर्णता अशा सर्व गोष्टींत भूरूपपर्यटनाचे गुणधर्म एकवटलेले आहेत. निसर्गाच्या जवळ जाण्याचा आणि त्याच्या विशालतेचा, ताकदीचा अंदाज येण्यासाठी तो समजून घेणं महत्त्वाचं. किनारी पर्यटनाचं उदाहरण घेतलं, तर त्यातला खरा आनंद हा प्रामुख्यानं किनाऱ्यावरच्या वाळूच्या टेकड्या, खाड्या, पुळणी, समुद्राची खोली, भरती-ओहोटीचं चक्र समजून घेणं यातच आहे. त्यासंबंधीची माहितीपत्रकं, धोकादायक प्रदेशांचं स्थान दाखवणारे नकाशे उपलब्ध करणं हे यासाठी महत्त्वाचं असतं. दोन दिवसांची मौजमजा यापेक्षा निसर्गवाचन करता येण्याची संधी मिळवून देणं आणि पर्यटकांची तशी मानसिकता तयार करणं, हा जिओटुरिझमचा मुख्य उद्देश आहे. जागतिक स्तरावर होणारे भूरूपातले बदल, त्यांची होणारी हानी, मानवी हस्तक्षेपाचा परिणाम या समस्यांचा विचारही यात केलेला असतो. यामुळे पर्यावरणरक्षणाबरोबरच पर्यटनाचा आनंदही घेता येतो, असं जिओटुरिझम संकल्पनेचा आग्रह धरणाऱ्या सर्वांनाच मनापासून वाटतं. भारतातही त्या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणं गरजेचं आहे. भारतात भूरूपांची अशी समृद्धी श्रीलंकेपेक्षा खूपच जास्त असली, तरी जिओटुरिझम या प्रकाराची तशी वानवाच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com