माझं भारतीयत्व (भाग २) (डॉ. यशवंत थोरात)

dr yashwant thorat
dr yashwant thorat

त्या दिवसानंतरच्या घटना हा एक प्रदीर्घ प्रवास आहे. त्या प्रसंगानं मला खूप काही शिकवलं. मुख्य गोष्ट म्हणजे, कुणी कितीही प्रयत्न करो; पण ‘नाही रे’ वर्ग हा ‘आहे रे’ वर्गाला कायमच परका वाटत असतो. एकाचं दुःख दुसरा पाहू शकतो; पण अनुभवू शकत नाही. तिथं नकार आणि अन्याय हा परंपरेनं असतोच. तो अन्याय झुगारून देऊन एक नवा समाज निर्माण करण्याचा ‘नाही रे’ वर्गाचा प्रयत्न असतो. समाजाचं स्वास्थ्य बिघडू नये म्हणून उदारमतवाद्यांनी परिस्थितीचं हे वास्तव स्वीकारलं पाहिजे.  

‘सप्तरंग’ पुरवणीतल्या गेल्या आठवड्यातल्या माझ्या लेखाचा उल्लेख करतच उषा माझ्या खोलीत आली.
‘‘तुमच्या आजच्या लेखाबद्दलचं माझं मत सांगू का?’’
मी ‘नको’ म्हणणार होतो; पण आजवर इमानेइतबारे तिच्याशी जमवून घेण्याची सवय अंगी बाणवून  घेतलेली असल्यानं मी म्हटलं : ‘वा, सांग.’  
‘‘सुरुवातीच्या काळात एक भारतीय म्हणून तुमच्या विचारांना कशी दिशा मिळाली हे लेखातून स्पष्ट झालंय; पण कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी राहून गेल्या आहेत.’’
‘‘हे बघ, हे वृत्तपत्रातलं सदर आहे. माझ्या आत्मकथनाचं पुस्तक नव्हे. शिवाय, मी काही सेलिब्रिटी नाही आणि माझे विचार जाणून घेण्यासाठी लोकांनी उत्सुक असावं असंही काही नाही.
‘‘वाह, ‘आपण सेलिब्रिटी नाही,’ ही वस्तुस्थिती मान्य केल्याबद्दल धन्यवाद!पण एक खरं आहे की तुमचं सदर लोकांना आवडतं. कारण, तुम्ही प्रवचन देत नाही. उलट, स्वतःचे दोष आणि दुर्बलता व्यक्त करता आणि त्यातला तुमचा प्रामाणिकपणा वाचकांना भावतो.’’
आपलं म्हणणं कसं गळी उतरवायचं यात उषा तरबेज आहे. आधी स्तुती करायची आणि नंतर नकळत सुरी चालवायची हे तिचं जुनं तंत्र आहे.
आज तर ‘तलवार’ चालवत ती म्हणाली : ‘‘तुमच्या नंतरच्या आयुष्यात तुमचे काही विचार प्रवाहाच्या विरुद्ध गेले म्हणून त्यांचा उल्लेख केला नाही का? असं कसं चालेल? गरज असताना न बोलणं म्हणजे परिस्थितीला शरण जाऊन ती स्वीकारण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं ते सांगून टाका आणि पुढचा भाग लिहा.’’
माझी आई म्हणत असे की ‘जगात दर दहा मिनिटांनी एक मूर्ख जन्माला येतो.’ कदाचित, मला उद्देशूनच ती हे म्हणत असावी!
‘‘मागचा लेख मी कुठं थांबवला होता?’’ मी पुटपुटलो.
‘मै हिंदुस्थानी हूँ...’ उषानं नेमकं वाक्य सांगितलं.
* * *

भारत स्वतंत्र कसा झाला ही एक गोष्ट आहे; पण आपण त्याकडे कसं बघतो ही वेगळी गोष्ट आहे. देशाविषयी प्रेम आणि अविचल निष्ठा म्हणजे काय स्वातंत्र्यानंतरच्या त्या काळातप्रत्येकाला राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी व्हायचं होतं. सारं वातावरण एका आदर्शवादानं भरून-भारून गेलं होतं आणि आमच्यासारखी सामान्य माणसंही त्यामुळे प्रेरित झाली होती.
देशासमोरचं दारिद्र्य आणि भांडवलशाही व शोषण यांच्यातील अभद्र युतीची जाणीव असलेल्या काही जणांनी डाव्या विचारांची कास धरली. देश कसा चालला पाहिजे याविषयीची मांडणी ते साम्यवादी विचारसरणीच्या अंगानं करायला लागले. काही जणांनी सद्यःस्थितीला आपली अंधश्रद्धा, परंपरागत रूढी आणि पुराणमतवादी जीवनशैली जबाबदार असल्याचं मानून पाश्चात्य जीवनपद्धतीचा अंगीकार केला, तर काहींनी पाश्चात्य मूल्यं आणि भौतिक चंगळवाद यांच्या अगदी विरुद्ध जाऊन आध्यात्मिक मार्गानं इतिहासाचा पुन्हा शोध घ्यायला सुरुवात केली.
माझी परिस्थिती ‘न खुदा ही मिला, न विसाल-ए-सनम’सारखी होती. माझं भारतावर प्रेम होतं; पण विवेकाच्या कसोटीवर पारखून घेतल्याशिवाय देशाच्या कोणत्याही धोरणाचं समर्थन किंवा प्रशंसा करण्यास मी तयार नव्हतो. चीनच्या हेतूंचा अंदाज चुकल्यामुळे सन १९६२ च्या युद्धात आपला जो पराभव झाला होता त्यामुळे मनाला तीव्र वेदना झाल्या. तरुणाईच्या छातीवरचा गुलाब हिमालयातल्या बर्फात कोमेजून गेल्याचं दुःख माझ्या मनात सलत होतं. ‘गरिबी हटाव’च्या इंदिरा गांधी यांच्या धोरणाला माझा पाठिंबा होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं बांगलादेशच्या युद्धात विजय मिळवला तेव्हा सगळ्या देशाबरोबर मीही जल्लोष केला होता; पण ता. २५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागू झाली. त्या दिवशी पाचोरा इथं रेल्वेनं जात असताना, ती कृती बरोबर नसल्याची स्पष्ट नोंद मी माझ्या डायरीत केली होती. ‘एखादी व्यक्ती कितीही मोठी असली तरी देशातल्या लोकभावनेपेक्षा आपण मोठे आहोत असं तिनं मानू नये’ असं मी त्या नोंदीत म्हटलं होतं.
कोणतीही गोष्ट वरवर पाहून स्वीकारायची नाही, हा माझ्या मनात दडलेल्या ‘भारतीया’चा आग्रह होता आणि आजही तो कायम आहे.
मी काही काळ जरी राजकीय वर्तुळाच्या जवळ वावरलो तरी ‘आपलंच म्हणणं बरोबर’ हा कुठल्याही पक्षाचा, नेत्याचा किंवा धोरणाचा दावा मान्य करू शकलो नाही. माझ्या आयुष्यात मी अनेकांना आदर दिला आणि अनेकांची स्तुती केली; पण एक गोष्ट मनात पक्की होती की ते माझ्यासारखेच चिखल-मातीचे बनलेले आहेत आणि सर्व मानवांमध्ये असलेली शक्ती आणि दुर्बलता त्यांच्यातही आहे.
आज माझ्या भोवतीच्या तरुणांना पूर्वीच्या राजवटीतली अनिश्चितता आणि ठोसपणाचा अभाव जाणवतो. त्याच्या तुलनेत त्यांना निश्चित आणि योजनाबद्ध  निर्णय घेण्याचं आकर्षण वाटतं. त्यांच्या बाबतीत काही प्रश्न नाही. तो प्रत्येक पिढीचा अधिकार असतो. माझं म्हणणं एवढंच आहे की निर्णय विवेकावर आधारित असावा. आद्य शंकराचार्यांचा उपदेश कायम स्मरणात ठेवा :

वैराग्य बोधाय पुरुषस्य पक्षिवत्
पक्षाऊ विजनीहि विचशांतवम्

पक्षाला दोन पंख असतात. उडण्यासाठी दोन्हींची गरज असते. त्याप्रमाणे सत्यशोधकानं सम्यक् दृष्टिकोनाचा आणि विवेकाचा आधार घ्यावा. त्यामुळेच माझं भारतीयत्व माझ्या ‘माणूस म्हणजे काय’ या शोधात गुंतलं आहे. अर्थात्, तो एक प्रवास नसून, अनेक प्रवास आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे, मी ज्या संपन्नतेत जन्मलो आणि जी परिस्थिती मी अवतीभवती पाहिली तीमधला विरोधाभास. सगळीकडे विषमता होती; पण लहानपणी मी ती बघितली का? कदाचित लष्करी वातावरणातल्या भव्यतेत ती विषमता लपली असेल. ‘मेयो’मध्ये तर ती अस्तित्वातच नव्हती. कोल्हापुरात ग्रामीण भागात गरीब लोक होते; पण ते मी नंतरच्या आयुष्यात पाहिले तसे नव्हते. बँकेत असताना कृषिकर्ज विभागाचा अधिकारी या नात्यानं मला देशभर प्रवास करावा लागला. या काळात मला गरिबी काय असते ते खऱ्या अर्थानं कळलं. अर्थात्, ते समजायला आणि त्यावर मार्ग काढायला खूप वर्षं जावी लागली.

जातीविषयीची गोष्टही जवळपास तशीच होती. जातीची जाणीव मला मी ‘मेयो’ स्कूलमध्ये असतानाच झाली. रजपूत संस्थानिकांच्या मुलांसाठी ती शाळा काढण्यात आली होती. ‘लढवय्यांचे गुण हेच सर्वोच्च आहेत’ असा एक समज होता; पण त्यात विखार नव्हता. आमच्या घरी तर जातीपातीचा विषयच नव्हता. निवृत्तीनंतर माझे आई-वडील कोल्हापूरला स्थायिक झाले. माझ्या वडिलांबरोबर निवृत्त झालेले माझ्या वडिलांचे मदतनीस शिपाई  गंगाराममामा हे आमच्या घरचे सर्वेसर्वा होते. संपूर्ण घरावर त्यांची करडी नजर होती. ते महार रेजिमेंटमध्ये होते हे मला माहीत होतं; मात्र त्यांच्या जातीसंदर्भातला
विचारही माझ्या मनाला कधी शिवला नाही.
पददलितांबद्दल आडून आडून पण बोचरी वाक्यं मी पहिल्यांदा ऐकली, जेव्हा मी मुंबईत रिझर्व्ह बँकेचा पर्सनल ऑफिसर असताना माझ्याकडे क्लार्क आणि त्याखालच्या अन्य पदांसाठीच्या भरतीची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा. रोस्टर हा शब्द तेव्हा मला समजला आणि ‘रोस्टर पॉइंट्स भरायचे नसतात, कारण अनुसूचित जाती-जमातीचे लोक बिनकामाचे असतात,’ असंही मला आडून आडून सांगण्यात आलं होतं!
राज्यघटनेत राखीव जागा थोड्या कालावधीपुरत्या निर्माण करण्यात आल्या होत्या; पण त्या आता जवळपास कायमच्याच झाल्या आहेत आणि त्या सवलतींचा ज्यांना फायदा मिळतो ते तो आपला जन्मसिद्ध अधिकारच मानत आहेत असं अनेकांचं म्हणणं होतं. त्या अनेकांच्या दृष्टीनं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती आणि अन्य गोष्टींप्रमाणे याचंही खापर राजकारण्यांवर फोडलं जात होतं.

हा काही भारतातील जातिव्यवस्था किंवा आर्थिक विषमता याविषयीचा निबंध नव्हे; पण याचा माझ्या अंतर्मनावर काय परिणाम झाला आणि त्यानं माझ्या विचारांना कशी दिशा दिली हे सांगणं महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टींसाठी कारणीभूत ठरलेले दोन प्रसंग कमालीचे नाट्यपूर्ण आहेत.
मी १९९७ –९८ या काळात एका वर्षाची अभ्यासरजा घेतली होती. ग्रामीण भागाला ज्या गोष्टींची खरी गरज होती त्या गोष्टी त्या भागाला कर्जाच्या माध्यमातून मिळत आहेत की नाही हेही मला पाहायचं होतं. विशेषत: ‘शेती करणाऱ्यांपेक्षा आपल्याला जास्त कळतं’ असं ग्रामीण भागात पतपुरवठा करणाऱ्या आणि त्याबाबतचं धोरण ठरवणाऱ्या मंडळींना नकळत वाटत होतं, ज्यात मीही एक होतो, आणि त्याबाबत माझा भ्रमनिरास झाला होता. त्यामुळं मला वस्तुस्थिती तपासायची होती.
पश्चिम घाटातल्या एका खेड्यात मी सुमारे एक वर्ष घालवलं. एके दिवशी मी पाहणीसाठी त्या भागातल्या पडसाली या छोट्या पाड्यावर गेलो. मोडक्या-तोडक्या झोपड्यांचा तो एक पाडा होता.

मी तिथल्या एका झोपडीत गेलो. माझी ओळख सांगितली. टेपरेकॉर्डर सुरू केला आणि तिथं असलेल्या गंगूबाई या वृद्ध महिलेला तिच्या स्थितीविषयी विचारलं. तिचं उत्तर धक्कादायक होतं. ती म्हणाली : ‘‘विकास म्हणजे काय असतं हे काही मला माहीत नाही. माझ्या झोपडीला आतापर्यंत कुणी भेट दिली नाही आणि पुढंही कुणी देईल असं वाटत नाही. तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकत नाही. कृपया, इथून जा.’’
गरिबीत जन्म घेणं हा एक शाप आहे. गरिबी म्हणजे अशा एका कुलूपबंद खोलीत अडकून पडणं, जिची किल्ली परमेश्वरानं बाहेर फेकून दिली आहे...!
‘गरिबी लई दांडगा वनवास आहे भाऊ, लई दांडगा वनवास आहे!’ हे तिचं वाक्य माझ्या काळजावर चरे उमटवून गेलं. गरिबी काही मला नवी नव्हती आणि मी ती पहिल्यांदाच पाहत होतो असंही नव्हतं; पण ज्या निश्चलतेनं, भावनाशून्य आवाजात आणि निस्तेज डोळ्यांनी ती जे बोलली त्यानं माझं काळीज जणू उभं चिरलं गेलं. तिच्या त्या वाक्यानं मला ‘स्वत:ला तपासावं,’ असं वाटायला लागलं. मी एक असा माणूस आहे की जो श्रीमंतीत जन्मला आहे आणि आता गरिबांविषयीचा कळवळा दाखवतोय...त्या वाक्याचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला.

पठारावरून खाली उतरताना मनात दाटलेल्या अंधाराशी माझा सामना सुरू होता. मनाच्या त्या अवस्थेत मी गरिबीविरुद्धच्या युद्धातील सर्वात ख्यातनाम असलेल्या बांगलादेशाच्या ग्रामीण बँकेचे संस्थापक महंमद युनूस यांना एक पत्र लिहून मदतीची विनंती केली. मला त्यांच्या कार्याची माहिती होती; पण त्यांना मी कधी भेटलो नव्हतो. माझ्या ड्रायव्हरनं दुसऱ्या दिवशी ते पत्र पोस्टात टाकलं. आपण असं काही पत्र पाठवल्याचं मी नंतर विसरूनही गेलो.
त्यानंतर अभ्यासरजेच्या अंतर्गत मी अमेरिकेत गेलो होतो. वॉशिंग्टनमध्ये असताना एक फोन आला.
‘प्रोफेसर युनूस यांना उद्या सकाळी न्याहारीच्या वेळी भेटू शकाल का?’ युनूससाहेबांचं नाव त्या वेळी नोबेल पुरस्कारासाठी सर्वात आघाडीवर होतं.
दुसऱ्या दिवशी मी न्याहारीच्या वेळी त्यांना भेटलो. माझं पत्र त्यांच्या हातात होतं.
‘‘हे पत्र तुम्ही लिहिलंय का?’’ असं त्यांनी मला विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. ‘‘तुम्ही अंत:करणापासून लिहिता...एखाद्या कवीसारखं! मग रिझर्व्ह बँकेसारख्या रुक्ष संस्थेत कसं काय काम करता?’’ असं त्यांनी मला विचारलं. माझ्याकडे उत्तर नव्हतं.
पत्रातल्या मजकुराचा संदर्भ देत ते म्हणाले : ‘‘तुमचा देवावरचा राग निरर्थक आहे, दु:खं माणसानं निर्माण केलंय, त्यानं नव्हे. तुमच्या प्रश्नांना अंतिम उत्तर देण्याची विनंती तुम्ही मला केली आहे; पण असं काही उत्तर नसतं. ‘या विश्वात गोंधळ आहे की न्याय’ असं तुम्ही विचारलं आहे; पण ते नेमकं कुणाला माहीत असणार? जीवनाचा अर्थ जाणून घ्यायची मला फारशी फिकीर नाही. स्वामी विवेकानंद यांनी एकदा म्हटलं होतं, ‘सृष्टी हळूहळू विनाशाकडे जात आहे...’ मला ते मान्य आहे; पण ते घडण्यापूर्वी आपण थोडा वेळ तरी स्वत:ला विसरून इतरांसाठी काही करणार आहोत का? तुम्ही तसं करू शकलात तर तुम्हाला जाणवेल की आपल्या प्रयत्नांतून इतरांच्या जीवनात बदल होताना पाहून जे सुख मिळतं त्या सुखात स्वत:चीच अशी एक वेगळी शक्ती असते. कुठल्याही दु:खावर फुंकर घालणारी. हे काही अंतिम उत्तर नव्हे; पण मी या श्रद्धेवर जगत आहे.’’
ते पुढं म्हणाले : ‘‘तुमच्याविषयी बोलायचं तर तुमचा मार्ग तुम्हाला स्वत:लाच शोधला पाहिजे. ऑफिसमधून थोडा वेळ काढा आणि आपलं पद आणि नाव विसरून ज्यांना कधीच कुठलं पद किंवा नाव मिळालेलं नाही त्यांच्यासाठी काहीतरी करा. ग्रामीण बँकेत या...बांगलादेशाच्या ग्रामीण भागात काम करा. कदाचित, यातूनच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल.’’

मी तसं केलं आणि त्यातून अनेक गोष्टी बदलल्या. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. माझा मार्ग मला दिसायला लागला. मी बदललो. चांगला झालो की नाही मला माहीत नाही; पण संवेदनशील अधिकारी बनलो.
नंतर खूप दिवसांनी गंगूबाईच्या गावात मी पुन्हा गेलो. रस्ता तसाच होता.
ते पठार पूर्वी होतं तसंच होतं आणि दूरवरचं क्षितिजही! डोंगरावर जाणारी वाट आणि तिच्या कडेकडेनं असणारी झाडंही तशीच होती. तिच्या झोपडीचे आता फक्त अवशेष उरले होते. केवळ दगडांचा ढिगारा! मला जाणवलं की फक्त मी बदललो होतो. मी बदललो होतो; पण गंगूबाई आता कुठल्याही बदलाच्या पलीकडे गेली होती. मी तिच्या आठवणीत क्षणभर तिथं बसलो. मला असं वाटतं की तिच्या खोलीच्या किल्ल्या बाहेर फेकणाऱ्या परमेश्वराला त्या पुन्हा सापडल्या असतील आणि तिच्या मृत्यूपूर्वी त्यानं त्या तुरुंगाची दारं उघडली असतील!
* * *

जात या शब्दाची माझी ओळख झाली ती व्यक्तिगत पातळीवर. मला विद्यापीठाच्या स्तरावरील एका व्याख्यानात ‘भारतातील जातिव्यवस्थेच्या विविध बाजू’ हा विषय मांडायचा होता. माझी थोरली कन्या आभा केम्ब्रिजमधला अभ्यासक्रम संपवून नुकतीच परतली होती. मी भाषणाची तयारी करत असताना तीही मदतीला आली.
‘‘भाषणात तुम्ही नेमके कोणते मुद्दे मांडणार आहात?’’ तिनं विचारलं.
‘‘मी असं मांडणार आहे की प्रत्येक समाजात लोकांमध्ये काही ना काही फरक असतोच. जोपर्यंत सामाजिक दर्जा ठरवण्यासाठी त्याचा आधार घेतला जात नाही तोपर्यंत त्यात फारसा धोका नाही; पण जेव्हा हा फरक लादला जातो आणि संपत्ती, उत्पन्न, सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी हाच एकमेव आधार मानला जातो तेव्हा त्यातून अक्षम्य अशी विषमता निर्माण होते,’’ मी म्हणालो.
‘‘अगदी बरोबर,’’ ती म्हणाली.
नंतर आम्ही तिचं करिअर, पुढची योजना, लग्न अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या. अचानक ती गप्प झाली आणि कुठल्या तरी विचारात हरवून गेली. आणि तिनं मला एकदम विचारलं : ‘‘मी एखाद्या दलित मुलाशी लग्न केलं तर तुम्हाला चालेल?’’
काही क्षण मी नि:शब्द झालो. काळ थांबला.
मला तिला सांगायचं होतं की ‘अगं, असं काय विचारतेस? तू मला पूर्णपणे ओळखतेस. असं झालं तर ते चांगलंच आहे. त्याला विरोध कशासाठी? तुझा आनंद महत्त्वाचा आहे. जातीपातीचा विचार हे एक थोतांड आहे. बेधडक पुढं पाऊल टाक...’ पण हे शब्द माझ्या गळ्यातच अडकले. त्या एका क्षणी माझी उदारमतवादी वृत्ती - जी माझ्या व्यक्तिमत्त्वाचा अंगभूत घटक आहे असं मी मानत होतो ती - उघडी पडली. तो एक मुखवटा होता. त्याच्याखाली उच्च जातीतला असल्याच्या वर्चस्वाचा एक भाव दडलेला होता. आपल्या वडिलांचं भाषण हे चांगल्या पद्धतीनं श्रोत्यांवर फेकलेले कोरडे शब्द आहेत...आपले वडील दलित चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते; पण जोपर्यंत एक दलित मुलगा त्यांचा जावई म्हणून उभा राहणार नव्हता तोपर्यंतच त्यांचं हे ‘खंदे पुरस्कर्तेपण’ होतं, हे तिच्या क्षणार्धात लक्षात आलं.

त्या दिवसानंतरच्या घटना हा एक प्रदीर्घ प्रवास आहे. त्या प्रसंगानं मला खूप काही शिकवलं. मुख्य गोष्ट म्हणजे, कुणी कितीही प्रयत्न करो; पण ‘नाही रे’ वर्ग हा ‘आहे रे’ वर्गाला कायमच परका वाटत असतो. एकाचं दुःख दुसरा पाहू शकतो; पण अनुभवू शकत नाही. तिथं नकार आणि अन्याय हा परंपरेनं असतोच. तो अन्याय झुगारून देऊन एक नवा समाज निर्माण करण्याचा ‘नाही रे’ वर्गाचा प्रयत्न असतो. समाजाचं स्वास्थ्य बिघडू नये म्हणून उदारमतवाद्यांनी परिस्थितीचं हे वास्तव स्वीकारलं पाहिजे.  
म्हणून भाषणं देण्यात, आपल्या उदारमतवादाचं प्रदर्शन करण्यात फारसा अर्थ नाही. उगाच अश्रू गाळण्यापेक्षा प्रत्येकानं जर आपल्या कृतीतून संवेदनशीलतेचा प्रत्यय आपलं कुटुंब, मित्र आणि समाज यांना दिला तरी ते पुरेसं आहे. सामाजिक स्थिती सुधारायला त्याचा फार उपयोग होईल.
या गोष्टींनी माझ्या धर्मनिरपेक्षतेला आकार दिला. ‘मी हिंदू आहे’ हे महात्मा गांधीजींचं वाक्य मी स्वतःच्या बाबतीतही अनेकदा उच्चारलं आहे. माझ्या धर्माचं रक्षण करण्यासाठी  प्राणही देण्याची माझी तयारी आहे; पण धर्म हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. राज्याच्या धोरणाचा तो भाग असू नये.

एक नागरिक म्हणून माझे हक्क आणि माझी कर्तव्यं इतरांसारखीच आहेत. तात्त्विक मुद्दे काही असले तरी लोकशाहीचे नियम स्पष्ट आहेत. देशातला अल्पसंख्याकवर्ग हा गरीबवर्ग आहे हे मान्य करूनच आपण भविष्यात वाटचाल करायला पाहिजे. हा वर्ग आपल्या समाजाचा एक भाग आहे, म्हणूनच उपलब्ध गोष्टींची न्याय्य आणि योग्य वाटणी झाली पाहिजे. यातल्या त्रुटी शोधून त्यांच्यावर उपाय योजायला हवेत.  लोकशाहीनं बहुमताला राज्य करण्याचा अधिकार दिला आहे; पण त्याच वेळी अल्पमताचं रक्षण आणि विकास करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकली आहे. राज्यघटनेत तसं स्पष्टपणे म्हटलेलं नसलं तरी राज्यघटनेला तेच अभिप्रेत आहे. अल्पसंख्याकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. त्यासाठी गरज असेल तर ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये सुधारणा किंवा त्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा त्यांच्या संमतीनं फेरविचार करायला पाहिजे. तसं झालं नाही तर किंवा आपण या देशाचे समान घटक आहोत असं अल्पसंख्याकांना वाटलं नाही तर देशाच्या ऐक्याला आणि एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो. वास्तववादी उदारमतवाद आणि खरी खरी धर्मनिरपेक्षता या केवळ वरवरच्या गोष्टी नाहीत, तर देशाच्या अस्तित्वासाठी त्या अत्यावश्यक गोष्टी आहेत.
माझ्या या मतांमुळे ‘हा सौम्य हिंदू आहे, असा हिंदू, जो स्वतःच्या धर्माऐवजी इतर धर्मांबद्दल बोलतो,’ अशी टीका माझ्यावर अनेकदा होते.

ही टीका रास्त आहे; पण टीकाकारांचं लक्ष्य चुकीचं आहे. माझ्या विचारांची वाट चुकली आहे, असं म्हणायचं असेल तर ज्या लोकांकडून मी शिकलो, ज्यांना आदर्श मानलं, जे केवळ फुकाचा उपदेश न करता स्वतः आयुष्यात प्रेमपूर्ण आणि सहिष्णुतेनं जगले ते जबाबदार आहेत. त्यांनीच मला शिकवलं की तू हिंदू आहेस ही भाग्याची गोष्ट आहे... त्यांनीच मला सांगितलं की हिंदू असणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे... कारण, त्यात खुले विचार, उदार दृष्टी आणि निर्मळ मन अभिप्रेत आहे. हिंदू मन हे असं मन आहे की ज्यात प्रत्येकाला जागा मिळते...हिंदू असणं म्हणजे आपल्या मनातली मानवता जागवणं आणि इतरांमध्ये माणूस पाहणं होय...इतरांचा स्वीकार, त्यांना सामावून घेणं आणि त्यांना आपल्यात एकरूप करणं हीच त्याची जीवनशैली आहे.
जो धर्म माणसाला अस्तिक किंवा नास्तिक असण्याचं अथवा समूर्ताची पूजा किंवा अमूर्ताची उपासना करण्याचं अथवा देवालयात जाण्याचं किंवा स्वतःमध्येच देव शोधण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देतो असा जगात अन्य कुठलाही धर्म नाही. धर्माची तत्त्वं सांगण्याची पात्रता माझ्यात नाही. मी अगदीच सामान्य आहे. माझा धर्म हा काही
उथळ आणि संकुचित असा अरुंद ओढा नव्हे, जो जराशा उन्हानंही आटून जावा! माझा धर्म हा अमोघ गंगेसारखा आहे, जिनं हजारो वर्षं या भूमीला सुजलाम् सुफलाम् केलं आहे आणि येणारी हजारो वर्षं ती हेच कार्य अविरतपणे करेल...

मैं हिंदुस्थान था...मैं भारत हूँ...मैं हिंदुस्थान रहूँगा.

(उत्तरार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com