एका लग्नाची निराळी गोष्ट (फादर फ्रान्सिस दिब्रिटो)

father francis dibrito
father francis dibrito

एरिक आणि मर्लिन हे चर्चप्रणित युवक संघटनेच्या तालमीतून तयार झाले आहेत.
कोरोनाकाळात त्यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीची जाण आणि समज त्यांना तिथूनच मिळाली. ते विचार त्यांच्या मनात झिरपत गेले. माणसाच्या जडणघडणीत कूस व मूस यांचा फार मोठा वाटा आहे. कूस म्हणजे आपल्यावर झालेले कौटुंबिक संस्कार आणि मूस म्हणजे आपल्यावर झालेले सामाजिक संस्कार. दोहोंचा मिळून झालेला हा एकत्रित परिणाम आहे.

ही आहे एका लग्नाची निराळी गोष्ट. गोष्ट आहे वसईस्थित एरिक आणि मर्लिन यांच्या लग्नाची. मनुष्य हा कुटुंबात घडत असतो, शाळेत घडत असतो. ख्रिस्ती मनुष्य चर्चमध्येही घडत असतो. चर्चतर्फे विविध सेवा उपलब्ध असतात. युवकांची जडणघडण हा चर्चपुढचा एक मोठा कार्यक्रम आहे. युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वसईतल्या कॅथॉलिक चर्चनं ‘युवदर्शन’ या नावाचं सेवाकेंद्र सुरू केलं आहे. या सेवाकेंद्राद्वारे युवकांच्या सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक विकासासाठी प्रयत्न केले जातात. अनेक तरुण-तरुणींना या संस्थेतर्फे मार्गदर्शन केलं गेलं आहे व त्याद्वारे त्यांचं व्यक्तिमत्त्व खुललेलं आहे. या धडपडणाऱ्या तरुण-तरुणी आज जगाच्या कानाकोपऱ्यात विविध ठिकाणी यशस्वीपणे कार्यरत आहेत.
                     
आठ वर्षांपूर्वी एरिक व मर्लिन हेसुद्धा ‘युवदर्शन’मध्ये आले. आपल्या मोकळ्या वेळात अनेक कौशल्यं त्यांनी इथं शिकून घेतली. या ठिकाणी युवकांसंदर्भात मोठ्या प्रमाणात सामजिक विश्लेषण केलं जातं. युवकांचं मद्यपान, आत्महत्या, भरधाव वेगानं वाहन चालवणं, तसंच लग्न, बारसं अशा प्रसंगी केली जाणारी पैशाची उधळपट्टी आदी प्रश्नांवर समूहचर्चेतून इथं विचारमंथन केलं जातं. आतापर्यंत त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला आहे. ‘युवदर्शन’मध्ये या दोघांची फादर रेमंड रुमाव या तरुण धर्मगुरूशी मैत्री झाली. रुमाव हे सामाजिक बांधिलकी मानणारे एक धर्मगुरू. त्यांनी दोघांमधले गुण ओळखले व त्यांना मार्गदर्शन केलं. गोरगरिबांविषयी दोघांच्याही मनात कणव होती. समाजातल्या अडल्या-नडलेल्यांच्या मदतीला धावून जाणं हा त्यांचा स्थायी भाव झाला होता. जुजबी ओळख, त्यांनतर मैत्री, मग घनिष्ठ मैत्री या पायऱ्या ओलांडून एरिक व मर्लिन यांनी आयुष्याचा जोडीदार म्हणून एकमेकांची निवड केली. दोघांतल्या सामाजिक कार्याचा हा सामायिक धागा बहुतेक दोघांना एकमेकांकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरला असावा.                  
       
दरम्यान, मर्लिन हिनं बीएड करून शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. ‘युवदर्शन’च्या द्वैवार्षिक संमेलनाच्या निमित्तानं एरिक यानं रुमाव यांच्या सहकार्यानं एक मोठा कार्यक्रम घडवून आणला. त्यातूनच एरिकला आपल्यातल्या गुणांची व भावी कार्याची दिशा दिसू लागली. ते होतं इव्हेंट मॅनेजमेंटचं क्षेत्र. हळूहळू मर्लिनसुद्धा त्याला मदत करू लागली. इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात खूप धावपळ असते, तसंच सर्जनशीलतेलाही खूप वाव असतो हे एव्हाना दोघांनी चांगलंच ओळखलं होतं, त्यामुळे दोघांनीही याच क्षेत्रात स्थिरस्थावर व्हायचं ठरवलं व यथावकाश या क्षेत्रात त्यांनी चांगला जमसुद्धा बसवला. दोघांचं लग्नाचं वय झालं होतं. दोघांच्या मित्र-मैत्रिणींची लग्नं पार पडत होती आणि त्यानिमित्तानं लाखो रुपयांची उधळपट्टी होत होती. दोघंही हे सगळं पाहत होते. त्यावर चिंतन करताना दोघांनी ठरवलं की आपलं लग्न आपण साधेपणानं साजरं करायचं. दरम्यान, कोरोनाचं संकट उद्भवलं. अनेक प्रश्न निर्माण झाले. तुम्ही-आम्ही सगळेजण लॉकडाउनमध्ये अडकलो; पण एरिक आणि मर्लिन मात्र वसईच्या तहसीलदारांसमवेत व ‘टीम वसई’च्या खांद्याला खांदा लावून दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना धान्य पुरवण्यात, त्यासाठी निधी गोळा करण्यात व ‘कम्युनिटी किचन’द्वारे रस्त्यावरच्या लोकांना जेवण पुरवण्याच्या उपक्रमात काम करत होते.

‘युवदर्शन’च्या मुशीत तयार झालेल्या या दोघांना तिथं मिळालेल्या कार्यानुभवाचा इथं खूप फायदा झाला. श्रमिक ट्रेनद्वारे वसईतून श्रमिकांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याच्या कामी दोघांकडे असलेल्या संघटनकौशल्याचा, ‘टाइम मॅनेजमेंट’चा व संगणकीय कौशल्याचा कस लागला.  दोघांच्याही मनातली कोरोनाची भीतीही नाहीशी झाली. ‘कोरोनायोद्धा’ म्हणून कार्य करत असतानाच त्यांनी आपल्या लग्नाची तारीखसुद्धा निश्चित केली आणि समारंभाचं स्वरूपसुद्धा ठरवलं. दोघांसाठी कोरोना ही इष्टापत्तीच ठरली!

ता. २० जूनला रीतसर शासकीय परवानगी घेऊन, सामाजिक अंतर ठेवून व सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करत मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत दोघंही गास चर्चमध्ये विवाहबद्ध झाले. त्या वेळी उभयतांना चर्चच्या अधिकृत प्रार्थनेद्वारे आशीर्वाद देताना धर्मगुरू म्हणाले : ‘‘गोरगरिबांची सेवा केल्यामुळे त्यांनी तुमचं एक दिवस स्वर्गात स्वागत करावं.’’ चर्चमधला विधी आटोपल्यावर दोघंही सत्पाळा इथल्या सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या सभागृहाकडे गेले. तिथं ग्रामीण भागातल्या लोकांसाठी विलगीकरणकक्षाच्या उभारणीचं काम शासनातर्फे सुरू होतं. ते जिथं राहतात तिथल्या लोकांसाठी हा कक्ष उभारला जात होता. एरिक आणि मर्लिन यांनी या कक्षासाठी लागणारे ५० बेड, गाद्या, उश्या व ऑक्सिजन सिलिंडर अशी एकूण तीन लाख रुपयांची मदत शासनाला केली. लग्नानिमित्त ना वाजंत्री, ना मंडप, ना  जेवणावळी, ना आतषबाजी, ना हनिमून.

ख्रिस्ती विवाहसोहळ्यात नववधू पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान करते. या गाऊनची किंमत पन्नास हजारांच्या पुढं असते. एक दिवस तो वापरल्यानंतर एरवी तो कपाटात धूळ खात पडलेला असतो. इथं विशेष नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, पैशाची अशी उधळपट्टी मर्लिनला मान्य नव्हती. आपण लग्नासाठी महागडा गाऊन शिवायचा नाही, तर आपल्या कुण्या मैत्रिणीकडे गाऊन मागायचा व तो घालायचा आणि त्यातून वाचलेले पैसे सामाजिक बांधिलकीच्या कामी वापरायचे असं तिनं अगोदरच ठरवलं होतं. एरिक-मर्लिन यांच्या या अनोख्या कृतीनं त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला.

विलगीकरणकक्षातल्या लोकांचं दुःख व आपल्या विवाहसोहळ्याचा आनंद असं दुःखाचं आणि आनंदाचं एक वेगळंच समीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला.
वृत्तपत्रं, दूरचित्रवाणीच्या वाहिन्या, सोशल मीडिया या सर्वांनी उभयतांच्या या विधायक कामाची कौतुकमिश्रित नोंद घेतली. ‘‘आम्ही एक मेणबत्ती प्रज्वलित केली आहे. आमच्या या कृत्यातून प्रेरणा घेऊन आता अनेक वाती तेवाव्यात व सामाजिक बांधिलकीची ही ज्योत सर्वदूर पोहोचावी,’’ असं एरिक आणि मर्लिन यांना वाटतं.

एरिक आणि मर्लिन यांचं हे सत्कृत्य पाहून एका रेडिओ जॉकीनं त्यांना प्रश्न विचारला: ‘‘इतनी अच्छाई मिलती कहाँ है? लाते कहाँ से हो?’’ त्यावर ‘वसईतल्या मातीचाच हा गुण असावा,’असा एरिकच्या उत्तराचा मथितार्थ होता!

एरिक आणि मर्लिन हे चर्चप्रणित युवक संघटनेच्या तालमीतून तयार झाले आहेत. सामाजिक बांधिलकीची जाण आणि समज त्यांना तिथूनच मिळाली. ते विचार त्यांच्या मनात झिरपत गेले. माणसाच्या जडणघडणीत कूस व मूस यांचा वाटा फार मोठा आहे. कूस म्हणजे आपल्यावर झालेले कौटुंबिक संस्कार आणि मूस म्हणजे आपल्यावर झालेले सामाजिक संस्कार.
दोहोंचा मिळून झालेला हा एकत्रित परिणाम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com