आशयघन, थरारक, उत्कंठावर्धक (हर्षद सहस्रबुद्धे)

हर्षद सहस्रबुद्धे sahasrabudheharshad@gmail.com
Sunday, 14 June 2020

‘पाताल लोक’ ही वेब सिरीज सध्या बरीच गाजते आहे. दिग्दर्शन, अभिनय, संकलन, पार्श्वसंगीत, छायांकन अश्या सर्वच आघाड्यांवर जमून आलेली ही नवी वेब सिरीज आपल्या सभोवती घडत असणाऱ्या घटनांची एक नवी ओळख करून देते.

‘पाताल लोक’ ही वेब सिरीज सध्या बरीच गाजते आहे. दिग्दर्शन, अभिनय, संकलन, पार्श्वसंगीत, छायांकन अश्या सर्वच आघाड्यांवर जमून आलेली ही नवी वेब सिरीज आपल्या सभोवती घडत असणाऱ्या घटनांची एक नवी ओळख करून देते. या घटनांमागच्या एकूण सामाजिक-राजकीय यंत्रणेवर, डाव्या-उजव्या मतप्रवाहांच्या सोयीस्कर सरमिसळीवर प्रकाश टाकते, घटनांकडे पाहायची नवी तटस्थ दृष्टी देते. या आगळ्यावेगळ्या वेब सिरीजवर एक झोत.

पत्रकार आणि लेखक तरुण तेजपाल लिखित ‘द स्टोरी ऑफ माय असासिन्स’ नावाच्या पुस्तकावर आधारित असणारी ॲमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित झालेली ‘पाताल लोक’ ही नवी वेब सिरीज, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती आहे. संजीव मेहरा (नीरज काबी) नामक दिल्लीस्थित सुप्रसिद्ध टीव्ही पत्रकाराची हत्या होणार असल्याचा सुगावा गुप्तचर यंत्रणांना लागतो आणि हा नियोजित हल्ला होण्यापूर्वीच हल्लेखोरांना पकडण्यात त्यांना यश येतं. हा कट नेमका कुणी रचला, यामागचे खरे सूत्रधार कोण आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता या गोष्टींचा तपास सुरू होतो. तपास सीबीआयकडून दिल्ली पोलिसांकडे सोपविला जातो. दिल्ली पोलिसांतर्फे संपूर्ण कारकिर्दीत फारशी चमक दाखवू न-शकलेल्या पोलिस इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीकडे (जयदीप अहलावत) तपासाची जबाबदारी येते. नोकरीसंदर्भातली रोजची कंटाळवाणी कामं, कार्यालयातलं अंतर्गत राजकारण आणि काही किरकोळ कौटुंबिक समस्यांना वैतागलेल्या, नैराश्यानं काहीशा त्रस्त असणाऱ्या हाथीरामकडे या हाय प्रोफाईल केसच्या रूपानं सुवर्णसंधी चालून येते. या मोठ्या कटामागच्या सूत्रधारांचा सुगावा लावल्याखेरीज इन्सपेक्टर हाथीराम चौधरी आता शांत बसणार नसतो. तपासाला सुरुवात होते. चक्रं वेगानं फिरतात आणि वरवर साध्या दिसणाऱ्या घटनांमागची गुंतागुंत ध्यानात येऊ लागते. कमालीचं सशक्त कथाबीज असणारी ‘पाताल लोक’ ही नवी वेब सिरीज आजवर प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजपैकी सर्वाधिक चांगल्या, प्रभावी सिरीजपैकी एक आहे असं निश्चितपणे म्हणता येईल.

अनेक घटकांचं मिश्रण असलेली, डोकं चक्रावून टाकणारी जबरदस्त कथा, पुरेसा वेळ घेऊन, विचारपूर्वक केलेला कथाविस्तार आणि अतिशय नेटकेपणी, ठिकठिकाणी आवश्यक त्या संदर्भांची पेरणी करत लिहिलेली, घट्ट वीण असलेली दमदार पटकथा यामुळे ‘पाताल लोक’ कमालीची रंजक बनली आहे. या सिरीजच्या कथानकाला अनेक पदर जोडलेले आहेत. मूळ कथानकासोबतच प्रवास करणारी असंख्य उपकथानकं आहेत. चित्ताकर्षक अशी गुंतागुंत आहे. सुमारे पाऊण तासाचा एक भाग, असे तब्बल नऊ प्रदीर्घ भाग असूनही ही सिरीज कुठंही भरकटत नाही. कंटाळवाणी वाटत नाही. एखादा नैराश्यग्रस्त पोलिस अधिकारी, गुन्हेगार, डाव्या विचारसरणीचा विशेष प्रभाव दाखवणारी काही दृश्यं, धर्म, जातीपातींवरून केलेलं सूचक भाष्य, शिवीगाळ, हिंसाचार, सेक्स इत्यादी समकालीन वेबसिरीजमध्ये आढळतात ते सर्व घटक ‘पाताल लोक’मध्येही आढळतात. मात्र, ठिगळासारखे कृत्रिमपणे जोडलेले कमीत कमी घटक, हा या सिरीजचा विशेष. मूळ कथानक आणि असंख्य उपकथानकं हातात हात घालून मार्गक्रमण करतात आणि आपल्या देशात नांदणाऱ्या एकूण व्यवस्थेचा ‘बर्डस्-आय व्ह्यू’ प्रेक्षकांसमोर मांडतात. या मालिकेचा उद्देश मनोरंजन हा नव्हे. वास्तवात घडून गेलेल्या अथवा घडणाऱ्या घडामोडी, वरवर पाहता साध्यासरळ दिसतात; पण त्यामागे असणारा एकूण विचार, त्यानुसार निर्मिलेल्या योजना, या योजनांचे आपसातले दुवे, त्यामुळे घडणाऱ्या बऱ्यावाईट घटना, त्यामुळे विशिष्ट वर्गाला होणारे फायदे तोटे, एकंदर सामाजिक मानसिकता, विचारधारणा आणि त्यामध्ये सूक्ष्म पातळीवर होत असणारा बदल इत्यादी गोष्टी नेमकेपणानं टिपत ही सिरीज सद्यःस्थितीवर अतिशय मार्मिक टिप्पणी करते.

गुन्हेगार नेमके कसे घडतात, साध्या माणसाचं निर्घृण गुन्हे करणाऱ्या भयंकर गुन्हेगारात रूपांतरण कसं होतं, आर्थिक-सामाजिक परिस्थिती आणि भोवतालचा समाज याकरता कारणीभूत असतो का? राजकारण, गुन्हेगार, पोलिस, प्रसारमाध्यमं, अर्थकारण आणि समाजकारण यांचा परस्परसंबंध आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत नेमकी कशा पद्धतीची असते, विविधतेत एकता असल्याचं भासणाऱ्या भारतीय समाजाची अंतर्गत रचना नेमकी कशी आहे, तिच्या गर्भात नेमकं काय दडलेलं आहे याचा सखोल विचार करून ‘पाताल लोक’ लिहिलेली आहे. गुन्हेगार घडण्याकरता कारणीभूत असलेल्या मानसिकतेची सावकाशीनं होत जाणारी जडणघडण, बाल-लैंगिक शोषण, बाल-अत्याचार, गरीबी, मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस फोफावतच जाणारी गरीब वस्ती, तिथल्या भीषण समस्या, जातींची उतरंड, खेडोपाड्यात अजूनही मूळ धरून असलेली जात, धर्म इत्यादीबाबतची कट्टरता, माणसात खोलवर दडून असणारा अमानुषपणा, दैनंदिन व्यवहारांना घट्ट वेढून असणारं राजकारण इत्यादी अनेक भीषण समस्यांवर गांभीर्यानं मार्मिक भाष्य करणारी ही सिरीज आहे.

पकडलेल्या चार गुन्हेगारांकडून माहिती काढत काढत, त्यातून मिळणारे दुवे जुळवत जाताना इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीला एकंदर परिस्थितीचा अंदाज येऊ लागतो. व्यक्तिगत आणि कार्यालयीन पातळीवर अडचणींना तोंड देत देत गुन्ह्याचं तपासकार्य संपूर्ण सचोटीनं करणारा निष्ठावान, प्रामाणिक अधिकारी हाथीराम जयदीप अहलावतनं मोठ्या झोकात सादर केला आहे. आजवरच्या कारकीर्दीतली त्याची ही सर्वाधिक महत्वाची भूमिका आहे. याशिवाय नीरज काबी, अभिषेक बॅनर्जी, राजेश शर्मा, इषवाक सिंग, निहारिका दत्त, स्वस्तिका मुखर्जी, गुल पनाग यांसारख्या अनेक दमदार कलावंतांची फळी यामध्ये आहे. ‘किल्ला’ चित्रपटाचा दिग्दर्शक अविनाश अरुण यानं या सिरीजचं दिग्दर्शन आणि छायांकन करण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडली आहे; तर ‘परी’ या अनुष्का शर्मा निर्मित भूतपटाचा दिग्दर्शक प्रोसीत रॉय यानं अविनाश अरुणसह दिग्दर्शन केलं आहे. एनएच १०, उडता पंजाब, सोनचिडिया सारखे आशयघन चित्रपट देणाऱ्या सुदीप शर्मानं सागर हवेली, हार्दिक मेहता आणि गुंजीत चोप्रा इत्यादींबरोबर ‘पाताल लोक’ लिहिली आहे.

निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आणि तंत्रज्ञ जेव्हा एका विचारानं झपाटून जाऊन समरसून काम करतात, तेव्हा अप्रतिम कलाकृती आकार घेते. असाच अनुभव ‘पाताल लोक’ पाहताना अनेकदा येतो. यातलं प्रत्येक पात्र अतिशय विचारपूर्वक लिहिलेलं आहे. हाथीराम चौधरी, संजीव मेहरा, हथोडा त्यागी ही पात्रं तर विशेष मेहनत घेऊन लिहिलेली आहेत. कथानक आणि संवादातले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. वेळोवेळी पेरलेले पुराणकालीन संदर्भ, गुन्हेगाराची मानसिकता तपशिलात जाऊन उलगडायचा प्रयत्न करणं, आशयघन संवाद सिरीजची रंगत वाढवतात. असंख्य घटना, पात्रं असूनही पटकथेवरची पकड जराही सुटू न-देणं, हे दिग्दर्शक आणि पटकथाकारांचं यश म्हणावं लागेल. प्रत्येक भागाची सुरुवात आणि शेवट हा खूप वेगळ्या पद्धतीनं लिहिलेला आहे. या पद्धतीमुळे सुरवातीपासून शेवटपर्यंत उत्सुकता आणि रंजकता टिकून राहते. साधारण पाचव्या-सहाव्या भागापासून वेगवेगळे तपशील जसे समोर येऊ लागतात, तसं या सिरीजचं व्यापक रूप अधिक ठळकपणे सामोरं येऊ लागतं.
सर्वसामान्य माणसाला जे दिसतं अथवा जे दाखवलं जातं, त्यापेक्षा प्रत्यक्षातली परिस्थिती ही अतिशय निराळी असते. संजीव मेहरा केसचा तपास करताना अनेक धक्कादायक सत्यं हाथीरामपर्यंत पोचू लागतात आणि अतिशय गुंतागुंतीच्या, प्रचंड मोठा पैस असणाऱ्या व्यापक जाळ्याचा आपण स्वतः एक अत्यंत छोटासा भाग आहोत, हे त्याला यथावकाश उमगत जातं. मीडियानं लोकांपर्यंत पोचवलेलं सत्य, प्रत्यक्षात घडून गेलेल्या अथवा घडणाऱ्या घटना, त्यामागचा कार्यकारणभाव यात जमीन-अस्मानाचा फरक असणं, याकरता अहोरात्र कार्यरत असणारी एकंदर यंत्रणा, ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरता सहायक ठरणारे धर्म, जात आणि अर्थ व स्वार्थाधारीत सामाजिक, राजकीय प्रवाह, यंत्रणेत समाविष्ट असणारे छोटे–मोठे घटक, त्यांची मानसिकता, त्यानुसार त्यांनी केलेल्या कृती, त्यामुळे होणारा एकंदरीत परिणाम या सगळ्याचं तपशीलवार दर्शन पाताल-लोक घडवते. प्रेक्षकाला अंतर्मुख करते.

बहुपदरी कथानकाचा एकेक पदर सावकाशपणे उलगडण्याकरता आवश्यक असणारा वेळ घेत असताना, त्यामध्ये असणाऱ्या पात्रांची मनोभूमिका तपशीलवारपणे रेखाटताना सिरीज कुठंही रटाळ होणार नाही याची निर्माता-दिग्दर्शकांनी पुरेशी काळजी घेतलेली आहे. यातली उपकथानकं ठिगळ लावल्यासारखी सामोरी येत नाहीत. प्रत्येक गोष्टीची रचना सकारण केलेली आहे. बरीचशी चित्रीकरणस्थळं खरीखुरी आहेत. दिल्ली, गुडगाव, चित्रकूट, रोहतक, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांमधल्या सुमारे ११० स्थळांवर पाताल लोक चित्रित केली गेली आहे. दिग्दर्शन, अभिनय, संकलन, पार्श्वसंगीत, छायांकन अश्या सर्वच आघाड्यांवर जमून आलेली ही नवी वेब सिरीज आपल्या सभोवती घडत असणाऱ्या घटनांची एक नवी ओळख करून देते. या घटनांमागच्या एकूण सामाजिक-राजकीय यंत्रणेवर, डाव्या-उजव्या मतप्रवाहांच्या सोयीस्कर सरमिसळीवर प्रकाश टाकते, घटनांकडे पाहायची नवी तटस्थ दृष्टी देते. एकूण पाहता, ‘पाताल लोक’ ही प्रत्येक समाजघटकाच्या अधिष्ठान आणि आस्तित्त्वामागची कारणमीमांसा अधोरेखित करणारी एक रंजक, उत्कंठावर्धक आणि अविस्मरणीय अशी अनुभूती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang harshad sahasrabudhe write navi khidaki article