मीठ-मिरची (हेरंब कुलकर्णी)

heramb kulkarni
heramb kulkarni

अंगाला मीठ लागून लागून पायाची-हाताची सालपटं निघणारे मुंबईजवळच्या मिठागारातले मजूर असतील, नाहीतर मिरच्या खुडून खुडून तिखटानं हाताची लाही लाही होणारे विदर्भातले मजूर असतील...वेदना सहन करत राहतात. हातचं काम जाईल म्हणून संघर्ष करत नाहीत. किमान वेतन व मानवी सुविधाही त्यामुळे त्यांना मिळत नाहीत. सर्वत्र पसरलेल्या-विखुरलेल्या या असंघटित वर्गाला कामाच्या ठिकाणी किमान मानवी जगणं कसं मिळवून द्यायचं हाच खरा प्रश्न आहे.

मीठ-मिरची हा शब्द गरिबांच्या जगण्याशी जोडलेला आहे. काही नसेल तेव्हा गरीबवर्ग मीठ-मिरची खातो किंवा त्याच्या घरात निदान मीठ-मिरची तरी असतेच. मात्र, हे गरिबांचं मीठ आणि गरिबांची मिरची एक बाजारपेठीय वस्तू म्हणून कसकशी तयार होते हे बघायचं ठरवलं. गरिबांची मीठ-मिरची तयार करणारे लोकही गरीबच असतात नि गरीबच राहतात हे या वेळी लक्षात आलं. मीठ बनवणारी मिठागरं छायाचित्रांत खूप आकर्षक दिसतात. कधी रेल्वेतून जाताना बघितलेली मिठागरं मनात ठसून राहिली आहेत. प्रत्यक्षात ती बघावीत म्हणून मुंबईच्या विरार-भाईंदर परिसरात गेलो. भाईंदर रेल्वे स्टेशनपासूनच मिठागरं सुरू होतात. ती बघत बघत थेट उत्तनपर्यंत गेलो.
मीठनिर्मितीची प्रक्रिया सगळीकडे सारखीच; पण समुद्राचं पाणी आणि त्यातून मीठ तयार होतं हा गैरसमज इथं फिरल्यानंतर दूर झाला. समुद्राचं पाणी किनाऱ्याजवळ खूपच प्रदूषित व अशुद्ध असल्यानं मीठ नीट तयार होत नाही. त्यामुळे जमिनीत बोअर घेऊन त्याचं पाणी वापरावं लागतं. विजेचं बिल खूप येतं. पुन्हा मीठ तयार
करण्यासाठीचा करही द्यावा लागतो.

रोजच्या खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यासाठीचा एक घटकपदार्थ...आणि तेवढ्यापुरतीच मागणी त्याला असते एवढीच जुजबी माहिती एरवी आपल्याला मिठाबद्दल असते. मात्र, प्रत्यक्षात तसं नसून उद्योग-व्यवसायात मिठाला विशेष मागणी असते, हे मिठागाराच्या मालकांशी बोलल्यावर लक्षात आलं
चर्मोद्योग, बर्फोद्योग, सोडा, कागद-उद्योग यांत मीठ मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये हा व्यवसाय खूप मोठा आहे. खरं तर तामिळनाडू व गुजरात ही दोन्ही सरकारं यासाठी अनुदान देतात.

पावसाळा संपला की मिठाची खाचरं करण्याचं काम सुरू होतं. पेरणीसाठी वाफे करावेत तसे वाफे करून त्यातून पाणी फिरेल अशी आळी केली जातात. विजेची मोटार लावून पाणी वाफ्यात सोडलं जातं. ते पाणी सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून मीठनिर्मिती करू लागतं; पण त्यासाठी सतत त्या वाफ्यातलं पाणी काठीनं हलवावं लागतं. जिथं मीठ लवकर तयार होतं ते काढून घेणं व जिथं सावकाश तयार होतं तिथं पाणी हलवणं व मीठ निघेल तिथं पुन्हा पाणी सोडणं अशी कामं सुरू असतात. उन्हात मिठावर सूर्याची किरणं पडून अधिक चटका बसतो. डोळे चमकून डोळ्याला इजा होऊ शकते, त्यामुळे ही कामं उन्हं वाढली की बंद करावी लागतात. पहाटे लवकर उठून आणि दुपारी उन्हं उतरली की ही कामं केली जातात. पहाटे उठून मीठ काढणं, गोणीत भरणं आणि ते वाहून सुरक्षित ठिकाणी साठवणं अशी कामं केली जातात. ही कामं करताना कातडीला सतत मीठ लागून ती हुळहुळी होते. कातडीची सालपटं निघतात. नजर कमी होते. एका मिठागारात दुपारी कामं सुरू झाली तेव्हा मीठ प्रत्यक्ष भरलं जाताना आणि वाहून नेलं जात असताना पाहायला मिळालं.

जाड प्लास्टिकच्या टबमध्ये/टोपलीमध्ये मीठ लाकडाच्या पट्टीनं भरलं जात होतं. एका मजुराच्या डोक्यावर तो टब ठेवला गेला. तो मजूर पळत पळत दूर असलेल्या ढिगाऱ्याच्या दिशेनं गेला. काही अंतरावर दुसरा मजूर उभा होता. पहिल्या मजुरानं तो टब त्या दुसऱ्या मजुराच्या डोक्यावर दिला. मग त्या दुसऱ्या मजुरानं तो मिठाचा टब मिठाच्या ढिगाऱ्यात रिता केला.
मी तो भरलेला टब उचलून बघितला तेव्हा तो माझ्याच्यानं हललासुद्धा नाही. एका टबात किती मीठ असतं असं विचारलं तेव्हा उत्तर मिळालं :
‘‘४० किलो.’’
ती ४० किलोचा टब अथवा टोपली घेऊन ते मजूर पळत होते, धावत होते. मिठाचा ढिगारा उंच उंच जात होता...त्यामुळे ढिगाऱ्याजवळच्या मजुराला ढिगाऱ्याला फळी लावून उंच चढून जावं लागत होतं. परिणामी, ४० किलोंचं ओझं घेऊन चढताना दमछाक होत होती. एवढ्या काबाडकष्टाचे पैसे मिळत होते केवळ सात हजार रुपये महिना. म्हणजे २३० रुपये रोज! इतक्या कष्टाची मजुरी अत्यल्प आहे.
४० किलो ओझं घेऊन किती चकरा होतात हे ते मजूर मोजत नाहीत. फक्त मीठ तयार झालं की ते सगळं संपेपर्यत ओझं वाहत राहायचं इतकंच सुरू असतं. घाम वाहत असतो. घामाची खारट चव या मिठागारातल्या कष्टानंच झाली असेल का, असा प्रश्न पडतो! मालकाला भेटलो.
‘‘मजुरी का वाढवत नाही?’’ विचारलं.
त्यानं त्याच्या अडचणी सांगितल्या.
काहीशा उपकाराच्या भाषेत तो म्हणाला : ‘‘या जमिनी शहराला लागून असलेल्या आहेत. त्यातली २० एकर जमीन आम्ही मिठागाराऐवजी बिल्डिंगसाठी वापरली तर कोट्यवधी रुपये मिळतील; पण पूर्वज करत होते म्हणून आम्ही हा व्यवसाय करतो.’’
‘‘फारतर पाच हजार टन मीठ तयार होतं व त्याचाही भाव १८०० पासून हजार रुपयांपर्यंत खाली-वर होत राहतो. त्यामुळे हा व्यवसाय आता परवडत नाही. तरीही आम्ही १०० रुपये ओव्हरटाईम देतो,’’ मालकानं आणखी माहिती दिली.
मीठ एकदा गोळा केलं की ते गोण्यांमध्ये भरून ठेवावं लागतं. एक गोणी भरण्याचे चार रुपये मिळतात. मजूर कितीही थकले तरीही पैशाच्या आशेनं गोण्या भरत राहतात.

या मिठाच्या संदर्भात केंद्र सरकारचा विभाग आहे. त्यांच्या कार्यालयात गेलो. सेस जमा करणं आणि तयार झालेलं मीठ प्रयोगशाळेत पाठवणं अशा प्रकारचं काम तिथं केलं जातं.
‘कामगारांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, किमान मजुरी मिळाली पाहिजे, त्यांना उन्हात काम करावं लागतं,’ हे त्या अधिकाऱ्याच्या निदर्शनाला मी आणून दिलं तर त्यानं मलाच ‘तत्त्वज्ञान’ ऐकवलं. म्हणाला : ‘‘सुख हे मानण्यावर असतं, सुख ही मानसिक स्थिती आहे.’’
मी सहज वर बघितलं तर दोन कर्मचारी असलेल्या त्या कार्यालयात डोक्यावर सहा पंखे गरगरत होते आणि तो अधिकारी उन्हात काम करणाऱ्या मजुरांसंदर्भात ‘तत्त्वज्ञान’ सांगत होता.
मालकांच्या दबावाखाली हे कार्यालय काम करतं हे लक्षात यायला वेळ लागला नाही. मजूर जिथं राहतात त्या झोपड्यांमध्ये मी गेलो. पहाटेच्या श्रमानं थकून दुपारी ते विश्रांती घेत होते. सगळे मजूर गुजरातहून आलेले. मी मिठागारांना भेट दिली तेव्हा मे महिना होता. मे महिन्याच्या कडक उन्हात पत्राच्या खोल्यांमध्ये ते मजूर भाजून निघत होते. भात आणि भाजी एवढाच स्वयंपाक त्यांनी केलेला होता. या कामाबद्दल, कष्टाबद्दल मजुरांची कसलीच तक्रार नव्हती, असं त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं. उलट, सलगपणे काम मिळतं म्हणून ते समाधानी होते...
त्यांच्या त्या समाधानानं मला अधिकच असमाधानी केलं!

***

मिठाच्या कहाणीसारखीच तिखट कहाणी मिरच्यांची आहे. गरिबाच्या जेवणात असलेली लाल मिरची बाजारात येताना गरिबालाच रडवते. विदर्भात नागपूर जिल्ह्यात व भंडारा जिल्ह्यात फिरताना अनेक ठिकाणी लाल मिरची खुडण्याचं काम सुरू दिसलं. आंध्र प्रदेशातले ठेकेदार आंध्र आणि विदर्भातली लाल मोठी मिरची शेतकऱ्याकडून खरेदी करतात आणि तिचे देठ काढून व्यापाऱ्यांना विकतात. व्यापारी त्यातली चांगल्या प्रतीची मिरची परदेशात विकतात व उरलेली देशात विकतात. शेतात घेतलेली किंमत पुढं वाढत वाढत जाते. अशा मिरचीचे देठ खुडण्याचं काम ठिकठिकाणी दिलं जातं. पूर्वी नागपूर जिल्ह्यात अशी कामं बघितली होती. या वेळी भंडारा जिल्ह्यात ही कामं बघायची होती.

एका वस्तीत पोत्याचा निवारा केलेला आणि त्याखाली ५० महिला-पुरुष बसलेले, समोर मिरचीचे ढीग. जवळ जाऊन त्या मजुरांशी बोललो. आमच्याशी एकीकडं बोलताना दुसरीकडं मिरच्या खुडण्याचं त्यांचं काम सुरूच होतं. एक किलो मिरची खुडल्यावर त्यांना सहा रुपये मिळत होते. एक किलो मिरची म्हणजे ४०० च्या आसपास नग. म्हणजे एक मिरची खुडण्याची मजुरी फक्त ६ पैसे! धक्का बसला. ते सगळे मजूर रोजची मजुरी किमान १०० रुपयांच्या पुढं जावी म्हणून या महिला-पुरुष किमान २० किलो मिरची खुडतात, म्हणजे कशीबशी मजुरी १२० रुपये मिळते. मी हिशेब केला. तब्बल ८००० मिरच्यांचे देठ वेगळे केले गेल्यावर तेव्हा कुठं १२० रुपये मिळतील. इतक्या मिरच्या खुडायला किमान १० तास लागतात. हे महिला-पुरुष सकाळी लवकर काम सुरू करतात. सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत १२ तास हे काम सुरू असतं. सणाचे अगदी महत्त्वाचे दिवस सोडले तर वर्षभर महिला कामावर येतात. काम सुरू असताना चहा प्यायला, पाणी प्यायलासुद्धा लवकर कुणी उठत नाही. कारण, त्यांना तितके तास काम पूर्ण करायचं असतं. पुन्हा हे काम वेगानं व्हावं म्हणून उकिडवं बसून (दोन पायांवर) बसून काहीजण काम करतात, त्यातून पाठीला रग लागते.

मी या मजूर-कामगारांना भेटलो तो काळ कडक उन्हाळ्याचा होता. पंखा नसलेल्या त्या ‘खुराड्या’त ठसका उठला होता. मिरची नरम व्हावी म्हणून तिच्यावर सारखं पाणी मारलं जातं, त्यामुळे खुडायला सोपं जातं. हे काम करताना मजुरांच्या
हाताला सारखा घाम येत होता. एक मजूर महिला म्हणाली :
‘‘हाताला आलेल्या घामात तिखटाचे कण जातात व दिवस-रात्र हाताची लाही लाही होते. घरी जाऊन आंघोळ केल्या वरही अंगाचा तिखटपणा जात नाही. आग आग होत राहते.’’
आग होऊ नये म्हणून काही महिला हाताला माती लावतात. महिलांचे हात बघितले तर त्यांचे तळहात राठ झालेले होते आणि काळपट पडलेले होते. भंडारा जिल्ह्यात अनेक म्हातारी माणसं
हे काम करताना मला दिसली तेव्हा विदारक वास्तव कळलं. घरात म्हातारी माणसं रिकामी बसण्यापेक्षा त्यांना त्यांचे मुलगे-सुना इथं पाठवतात. तेवढेच कुटुंबाला रोजचे १०० रुपये मिळतात. बिचारी म्हातारी माणसं रडतखडत मिरच्या खुडत होती. सरस्वतीबाई नावाची ८० वर्षांची महिला एकटीच कोपऱ्यात बसून मिरच्या खुडत होती. मुलगा-सून यांच्यापासून ती वेगळी राहत होती. तिला नात्यातलं कुणी विचारत नव्हतं. जशा जमतील तशा मिरच्या ती खुडत होती. तिला नीट दिसतही नव्हतं की तिच्याच्यानं अपेक्षित गतीनं कामही होत नव्हतं.
एका मांडवात पती-पत्नी होते. ते एकत्र काम करत होते. काहींनी हाताला प्लास्टिकचे कागद बांधले होते.
हे सगळं पाहिल्यावर, ‘‘इथली परिस्थिती मी संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणतो,’’ असं मी मजुरांना म्हणालो.
तेव्हा ‘‘तक्रार करू नका,’’ अशी गयावया ते मजूर करू लागले. त्या मजुरांचा खूप राग आला.
मी संतापून म्हणालो : ‘‘तुम्ही तक्रार केली नाही तर मग तुम्ही हे सहन करण्याच्याच योग्यतेचे आहात, असं मला नाइलाजानं म्हणावं लागेल.’’
त्यावर मजुरांचं म्हणणं : ‘‘तक्रार केली तर मालक हे काम आमच्या गावातून काढून नेईल आणि दुसऱ्या गावात काम जाईल.’’
शेतात उन्हात राबण्यापेक्षा त्यांना सावलीतली ही वेदना सुसह्य वाटत होती आणि हे काम रोज मिळतंय हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटत होतं.

ही मिरची पुढं कुठे जाते आणि मालक त्यातून किती पैसे मिळवतो हे मी त्या मजुरांना सांगू लागलो. त्यांना त्यातलं काहीच माहीत नव्हतं व त्याविषयीची उत्सुकताही नव्हती. काही ठिकाणी आता मजुरी आठ रुपये झाली आहे; पण ती १० रुपये जरी झाली तरीसुद्धा ४०० मिरच्या खुडायच्या तुलनेत ती अत्यल्पच आहे. मात्र, हातातलं काम जाईल म्हणून कामगार गप्प राहतात.

अंगाला मीठ लागून लागून पायाची-हाताची सालपटं निघणारे मुंबईजवळच्या मिठागारातले मजूर असतील, नाहीतर मिरच्या खुडून खुडून तिखटानं हाताची लाही लाही होणारे विदर्भातले मजूर असतील...वेदना सहन करत राहतात. हातचं काम जाईल म्हणून संघर्ष करत नाहीत. किमान वेतन व मानवी सुविधाही त्यामुळे मिळत नाहीत. सर्वत्र पसरलेल्या या असंघटित वर्गाला कामाच्या ठिकाणी किमान मानवी जगणं कसं मिळवून द्यायचं हाच खरा प्रश्न आहे. गरीब माणसाच्या घरात येणारी मीठ-मिरची ही दुसऱ्या गरिबांच्या शोषणातूनच येते. मीठ आणि मिरची पुढं उद्योगांना विकली जाताना खूप महाग होत जाते; पण त्यासंदर्भातलं काम करणाऱ्या स्वस्त मजुरांना गरीब ठेवूनच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com