कमानींचं उद्यान! (जयप्रकाश प्रधान)

jaiprakash pradhan
jaiprakash pradhan

वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या आकारांच्या कमानींचंही उद्यान असू शकतं? होय, असं एक उद्यान आहे. जगातली सर्वात लांब कमान तिथं पाहायला मिळते. अमेरिकेतल्या उटाह या राज्यामधल्या मोआब या अगदी छोट्याशा गावाजवळ हे कमानींचं उद्यान वसलं आहे. याच आर्चेस पार्क आणि कॅनियन लँड्स पार्कविषयी...

अमेरिकेच्या ग्रामीण भागांत अमेरिकी दाम्पत्याबरोबर चाळीस दिवस भटकण्याचा योग आम्हाला - मी आणि पत्नी जयंती - काही महिन्यांपूर्वी आला. आम्ही त्यांच्या मोटारीतून १४ हजार किलोमीटरची भटकंती केली व अनेक नॅशनल पार्क्स, स्टेट पार्क्स पाहिली. अमेरिकेत फिरत असताना काही स्थळांना भेट द्यायलाच हवी अशांमध्ये ‘आर्चेस नॅशनल पार्क’ चा समावेश होतो. उटाह राज्यातल्या मोआब या अगदी छोट्या गावाजवळ आर्चेस पार्क आणि कॅनियन लँड्स पार्क वसली आहेत. त्यामुळे मोआब इथं पर्यटकांची सतत वर्दळ असते. पाणी आणि बर्फ, टोकाचं हवामान व भूगर्भातील मिठाच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या तांबड्या, नानाविध आकारांच्या कमानी व थक्क करून सोडणाऱ्या आकारांचे दगड म्हणजे आर्चेस नॅशनल पार्क.
गेली हजारो-लाखो वर्षं ही प्रक्रिया सुरू आहे. कमानींची, दगडांची संख्या इथं प्रचंड आहे. त्यामुळेच नैसर्गिक चमत्कारांचं जगातलं सर्वात मोठं पार्क म्हणून ते ओळखलं जातं. इथं अगदी तीन फुटांपासून ते ३०६ फूट लांबीपर्यंतच्या दोन हजारांपेक्षा जास्त कमानी दिसतात. दगडांची शिल्पंही अशीच आश्चर्यकारक म्हणावी लागतील.
या पार्कमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम माहितीकेंद्रात गेलो. विविध माहितीपत्रकं, नकाशे, त्याचबरोबर हे विस्तीर्ण पार्क पाहायचं कसं याचं उत्तम मार्गदर्शन तिथं मिळालं. आर्चेस पार्क हे कुटुंब, मित्रमंडळी यांच्याबरोबर व्यवस्थित पाहावं असं पार्क आहे.
पर्यटक मोटारीतून पार्कमध्ये भटकू शकतात; पण अनेक ठिकाणी पायी फिरण्याचीही तयारी हवी. काही कमानी तर अगदी आतल्या बाजूला आहेत. निदान तीन-चार किलोमीटर चालल्यानंतरच त्यांचं दर्शन घडतं. गाडी तिथं जाऊ शकत नाही; पण उत्तम पायवाटा तयार करण्यात आल्या आहेत. लांबूनही काही कमानी पाहता येऊ शकतात. जिथं जिथं या कमानी, शिल्पं आहेत तिथं तिथं त्यांच्याभोवती दोऱ्यांचं कुंपण बांधण्यात आलेलं आहे.

त्या कुंपणाच्या आत जाता येत नाही. त्या जागांची छायाचित्रं काढण्यासाठी थोड्या उंचावर गॅलऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. आसपास कुणीही सुरक्षारक्षक नसतो; पण प्रत्येक जण नियमांचं पालन करताना दिसतो. एखादी कमान किंवा शिल्पाकृती मूळ रस्त्यापासून किती लांब आहे, तिथं कठीण चढ आहे का, वृद्ध किंवा अपंग यांनी जाणं कितपत योग्य आहे, पिण्यासाठी किती लिटर पाण्याची बाटली जवळ ठेवायला हवी...अशा बारीकसारीक सूचना माहितीपत्रकात देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचा
बारकाईनं अभ्यास करून मग पार्क पाहायला सुरुवात करणं फारच उपयुक्त ठरतं. पार्कमधल्या ‘लँडस्केप’ , ‘डेलिकेट’ , ‘डबल कमानी’ महत्त्वाच्या मानण्यात येतात. ‘लँडस्केप’ कमान ही खडकात नैसर्गिकरीत्या निर्माण झालेली जगातली सर्वात लांब कमान आहे. कमानीच्या दोन टोकांच्या पायांमधलं अंतर ३०६ फूट (९३ मीटर्स) म्हणजे फुटबॉलच्या मैदानापेक्षाही अधिक आहे! कमानीच्या वरचा थर झिजून झिजून पातळ झाला असून मध्यभागी त्याची रुंदी खूपच कमी आहे. दुसरी पाहण्यासारखी कमान म्हणजे ‘डेलिकेट’ कमान. तिला डेलिकेट कमान म्हणण्याचं कारण म्हणजे, तिची उंची ५२ फूट आहे; पण रुंदी मात्र अगदी थोडी. ‘डबल’ कमानीची रचना थोडी मजेशीर झाली आहे. तीत जमिनीपासून सुमारे शंभर फूट उंचीवर एकाच रुंद व मोठ्या खडकात दोन कमानी एकामागं एक तयार झाल्या आहेत. त्या जणू खिडक्यांसारख्या दिसतात. लहान कमान ६७ फूट रुंद, तर पुढची ८६ फूट रुंद आहे. त्यामुळे या दोन्ही खिडक्यांमधून आरपार पाहता येऊ शकतं. त्यांना ‘पॉटहोल’ असंही नाव आहे.
आर्चेस पार्कमध्ये ऊन्ह, वारा, पाऊस यांची प्रक्रिया दगडांवर होऊन त्यांनाही नानाविध आकार प्राप्त झाले आहेत. त्यातलं मुख्य आकर्षण म्हणजे ‘बॅलन्स रॉक’ . एका छोट्या टेकडीच्या माथ्यावर छोटा दगड व त्यावर निमुळता उंच दगड जणू तोल सांभाळून उभा आहे. खरोखरच निसर्गाची ही किमया थक्क करून सोडते. या परिसरात फारसा पाऊस पडत नाही. मात्र, वारा जोरदार वाहतो. त्यामुळे वाळूचे किंवा खडकांचे बारीक तुकडे उडतात तेव्हा वजनामुळे ते उंचावर जाऊ शकत नाहीत. खडकाचा मधला भाग झिजून अरुंद होतो. खालच्या भागाची फारशी झीज होत नाही, तसंच खडकाच्या वरच्या भागाचीही कमी झीज होते. त्यातूनच १२८ फूट उंचीच्या या ‘बॅलन्स रॉक’ची निर्मिती झाली.

एके ठिकाणी जणू हत्तींची मिरवणूक निघाल्यासारखी दगडांची रचना झाली आहे. ‘परेड ऑफ एलिफंट्स’ असं नाव त्या शिल्पाला देण्यात आलं आहे. इतिहासकालीन तीन राण्या एकमेकींशी गप्पा मारत उभ्या आहेत असं शिल्पही अगदी हुबेहूब वाटतं. त्यांच्या डोक्यांवरचे मुकुट, नाक, कान, डोळे हुबेहूब वाटतात. या शिल्पाला ‘गॉसिप’ असं नाव आहे. एका छोट्या डोंगरावर जणू बुद्धिबळातली प्यादीच तयार झाली आहेत. काही दगडांना मंदिरांचे आकार प्राप्त झाले आहेत. इथं काय काय पाहावं अशी अवस्था न झाली तरच नवल.
आर्चेस नॅशनल पार्कमधील नैसर्गिक शिल्प, कमानी तयार होण्यात भूगर्भातल्या रचनेचा मोठा वाटा आहे. इथं वेगवेगळ्या भूगर्भकाळात वाळू, चुनखडी, माती व मीठ यांच्यापासून तयार झालेल्या खडकांचे थर आहेत.

असं सांगण्यात येतं, की सुमारे तीन-साडेतीन कोटी वर्षांपूर्वी इथं समुद्राचं पाणी शिरलं व त्याचं बाष्पीभवन होऊन मिठाचा थर झाला. त्यानंतर लाखों वर्षांनी नद्यांना पूर येऊन त्यांचा गाळ वाहून आल्यानं तो थर या मिठावर साचला. पुढं इथं वाळवंट तयार झालं व वाळूच्या दगडांचा थर झाला. या सर्व साचलेल्या थरांच्या खाली, मिठाच्या थरावर दाब पडून व उष्णता निर्माण होऊन मिठाच्या थराचं द्रवात रूपांतर झालं व त्याला घड्या पडल्या. वरचे थर उचलले जाऊन डोंगर-दऱ्या तयार झाल्या, तसंच खडकांतल्या भेगांमध्ये गेलेल्या पाण्याचं थंडीमुळे बर्फ होऊन भेगा रुंदावत गेल्या व हळूहळू त्यांचे तुकडे झाले. हे तुकडे हवेच्या झोतानं वेळोवेळी वाहत जाऊन इतर खडकांवर आपटतात व त्यांची झीज करतात. परिणामी, या विविध आकारांच्या कमानी, खिडक्या तयार होतात. हा निसर्गाचा अनोखा चमत्कारच मानण्यात येतो. हे चक्र आजही सुरू आहे. सध्याही नवीन कमानी, शिल्पं तयार होत असून जुन्या कमानी, जुनी शिल्पं नष्टही पावत आहेत. निसर्गाची प्रक्रिया, झीज यांतून भविष्यकाळातही ते असंच सुरू राहील.
इथले काही बदल थक्क करून सोडतात. ६० फूट लांब, ११ फूट रुंद व ४ फूट जाडीच्या दगडाची शिळा सन १९९१ मध्ये खालच्या बाजूनं कोसळली व त्याची अगदी पातळ पट्टी तशीच राहिली. अशी अनेक उदाहरणं बघायला मिळाली.
आर्चेस पार्कमध्ये फिरण्यासाठी एक संपूर्ण दिवसच हाताशी हवा. अनेक अमेरिकी नागरिक आपली ‘कॅरॅव्हॅन’ घेऊनच इथं येतात. पार्कमध्ये कॅम्पिंगची व्यवस्था आहे. कॅम्पमध्ये कॅरॅव्हॅन लावायची, सायकली बाहेर काढायच्या किंवा भाड्यानं घ्यायच्या व भटकंती सुरू करायची. तुम्ही स्वत:च्या वाहनानं गेलात व भरपूर चालण्याची तयारी असेल तरीही पार्क मस्तपैकी पाहता येतं. अमेरिकेच्या भेटीत आर्चेस पार्कला भेट द्यायलाच हवी.

* * *

कॅनियन लँड्स नॅशनल पार्क
उटाहमधल्या मोआब या गावाजवळचं आणखी एक पार्क म्हणजे ‘कॅनियन लँड्स नॅशनल पार्क.’ ‘आर्चेस’पासून जेमतेम पाऊणेक तासाच्या अंतरावर ते आहे. हे पार्क म्हणजे भूगर्भशास्त्राचं एक उत्कृष्ट प्रदर्शनच म्हणावं लागेल. ‘आर्चेस’मध्ये जमिनीवर दगडांची शिल्पं तयार झाली आहेत, तर कॅनियनच्या दऱ्या-खोऱ्यांत कातरलेले दगड दिसून येतात. त्याचं वेगळेपण अगदी निराळं वाटतं.
हजारो-लाखो वर्षांपूर्वी जमा झालेल्या खडकाच्या घळ्यांचं कोरीव काम इथल्या ग्रीन नदीत दृष्टीस पडतं. कॅनियन पार्कमध्ये आज दिसणारे बहुतेक खडक हे दूरवरच्या पर्वतराजीमधून इथं आलेले आहेत. हजारो-लाखो वर्षांपूर्वी खडक फुटल्या-तुटल्यावर त्यांचे अवशेष वारा, पाणी यांद्वारे दूरवर वाहून नेले गेले आणि त्यांचेच हे गाळाच्या खडकाचे थर जमा झाले. या खडकांमध्ये वर्षानुवर्षं-शतकानुशतकं पाणी झिरपतं. त्यामुळे त्यांची झीज होते, तसंच ते रुंदही
होतात. त्यातूनच त्यांचे आजचे नानाविध आकार, लँडस्केप दृष्टीस पडतात. जगातले भूगर्भशास्त्राचे अभ्यासक फार मोठ्या प्रमाणात अभ्यासासाठी-संशोधनासाठी इथं येतात.
या पार्कमध्ये गेलात तर तिथली मेसा आर्च पाहायला हवी. मूळ रस्ता सोडून खाली उतरून आम्ही या आर्चच्या जवळ आलो आणि पोटात धस्स झालं. सुमारे चाळीस फूट लांबीची ही चांगली जाडजूड भक्कम कमान. दोन्ही बाजूंनी या कमानीवर चढता येतं. आर्चच्या एक बाजूला आम्ही उभे होतो आणि दुसऱ्या बाजूला १२०० फुटांची सरळ खोल दरी. आमच्यासमोर दोन धाडसी अमेरिकी नागरिक कमानीवर चढले. वारा प्रचंड होता. आम्ही त्या अमेरिकींचे फोटो काढले; पण ‘दरीच्या दिशेनं नजर टाकणंही मुश्किल’ अशी त्यांची प्रतिक्रिया होती. बाजूच्याच बक कॅनियनमध्ये तांबडा, काळा, राखाडी या रंगांच्या दगडांची शिल्प दिसतात. आर्चेस आणि कॅनियन पार्कमध्ये निसर्गाचे नानाविध चमत्कार मन भरून पाहता येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com