esakal | संस्कृतीच्या कपारींतून फिरताना... (जयप्रकाश प्रधान)
sakal

बोलून बातमी शोधा

jaiprakash pradhan

अमेरिकेतल्या कोलोरॅडो राज्यात ‘मेसा वर्दे पार्क’ हे पुराणवस्तू संशोधनशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं पार्क आहे. उत्तर अमेरिकेचा शोध लागण्याच्या आधी सुमारे चौदाशे वर्षांपेक्षाही पूर्वी ‘पुएब्लोअन्स’ जमातीची वस्ती मेसा वर्दे इथं नांदत होती. ‘मेसा वर्दे राष्ट्रीय पार्क’ च्या ५२ हजार एकरांत त्या जमातीचे जवळजवळ पाच हजार अवशेष जतन करण्यात आले आहेत. त्या पार्कविषयी...

संस्कृतीच्या कपारींतून फिरताना... (जयप्रकाश प्रधान)

sakal_logo
By
जयप्रकाश प्रधान

अमेरिकेतल्या कोलोरॅडो राज्यात ‘मेसा वर्दे पार्क’ हे पुराणवस्तू संशोधनशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं पार्क आहे. उत्तर अमेरिकेचा शोध लागण्याच्या आधी सुमारे चौदाशे वर्षांपेक्षाही पूर्वी ‘पुएब्लोअन्स’ जमातीची वस्ती मेसा वर्दे इथं नांदत होती. ‘मेसा वर्दे राष्ट्रीय पार्क’ च्या ५२ हजार एकरांत त्या जमातीचे जवळजवळ पाच हजार अवशेष जतन करण्यात आले आहेत. त्या पार्कविषयी...

अमेरिकेतल्या एकट्या कोलोरॅडो राज्यात एकूण १३ नॅशनल पार्क्स असून, तिथलं ‘मेसा वर्दे पार्क’ हे पुराणवस्तू संशोधनशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानण्यात येतं. तिथले प्राचीन अवशेष व्यवस्थित रीतीनं जतन व्हावेत या हेतूनं तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी ता. २९ जून १९०६ रोजी नॅशनल पार्क म्हणून त्याची घोषणा केली. उत्तर अमेरिकेचा शोध लागण्याच्या आधी सुमारे चौदाशे वर्षांपेक्षाही पूर्वी ‘पुएब्लोअन्स’ जमातीची वस्ती मेसा वर्दे इथं नांदत होती. सन ५५० ते सन १३०० अशी साडेसातशे वर्षं त्या जमातीचं इथं वास्तव्य होतं.

‘मेसा वर्दे राष्ट्रीय पार्क’च्या ५२ हजार एकरांत त्या जमातीचे जवळजवळ पाच हजार अवशेष जतन करण्यात आले आहेत. त्यांत डोंगरकपारीतली ६०० घरं असून, ३० लाखांपेक्षाही अधिक वस्तू, दस्तऐवज संशोधनासाठी ठेवण्यात आले आहेत.
‘मेसा वर्दे पार्क’ मध्ये प्रवेश करताच सुरुवातीला माहितीकेंद्र लागलं. इथं पार्कमधल्या विविध सहली, जाण्याचे मार्ग यांची माहिती रेंजरकडून सांगितली जाते. काही प्राचीन अवशेष डोंगरांच्या कड्याकपाऱ्यांत आहेत. तिथं चढून जाण्यासाठी ट्रेकिंगचा सराव हवा. काही ठिकाणी तर अक्षरश: सरपटत जावं लागतं. त्याची माहिती घेतल्यानंतर विविध सहली हौशी, धाडसी पर्यटकांना-गिर्यारोहकांना निवडता येतात. ज्यांना फार कठीण नाही; पण थोडा चढ-उतार पार करणं शक्य आहे त्यांनी कुठं कुठं जावं याचंही मार्गदर्शन केलं जातं. ज्यांना पार्कमध्ये केवळ गाडीतून फिरून पुएब्लोअन्सच्या घरांची व अन्य काही अवशेषांची माहिती घ्यायची आहे, त्यांना त्या मार्गाचे नकाशे देण्यात येतात. त्यामुळे आपलं वय, प्रकृती व वेळ या सर्व गोष्टींचा मेळ घालून पार्कमध्ये कुठं व कसं फिरायचं याचा निर्णय पर्यटकांना घेता येतो. फार धाडसी नव्हेत; पण डोंगरांमध्ये थोडा चढ-उतार करून भटकता येईल अशा सहली करण्याचा निर्णय मी व पत्नी जयंतीनं घेतला व संपूर्ण दिवसात विविध अवशेष आम्हाला व्यवस्थित पाहता आले. त्यांची माहिती घेता आली.

मेसा वर्देमधल्या विविध अवशेषांवरून त्या संपूर्ण काळातल्या संस्कृतीचं अतिशय उत्तम दर्शन घडतं. पुराणवस्तू-संशोधक या लोकांना ‘अनासाझी’असं म्हणतात. याचा अर्थ ‘प्राचीन परदेशी’; पण अमेरिकेत मात्र ते ‘पुए-ब्लोअन्स’ या नावानं ओळखले जातात. त्यांच्या अनेक पिढ्या इथं राहत होत्या.
स्थानिक काऊबॉईज जंगलात भटकत असताना सन १८८० मध्ये त्यांना डोंगरांच्या कपारींमधल्या या घरांचा शोध सर्वप्रथम लागला. मग पुराण-वस्तुसंशोधकांनी त्यांचं मूळ व अन्य धागेदोरे यांचं संशोधन सुरू केलं. अनेक वर्षं उत्खनन, त्याची मीमांसा, वर्गीकरण व तुलना यांचा अभ्यास करूनही त्यासंबंधीची अचूक शास्त्रीय माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही आणि ती कधीच होणं शक्यही नाही. कारण, पुएब्लोअन्सनी आपल्यासंबंधीची माहिती देणारे काहीही लेखी दस्तऐवज मागं ठेवलेले नाहीत व त्यांच्या आयुष्याची वैशिष्ट्यं सांगणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या कधीच नष्ट झाल्या आहेत. अर्थात्, त्यांची दऱ्या-खोऱ्यांतली घरं, त्यांची रचना, त्यातल्या बारीकसारीक वस्तू यांमुळे पुएब्लोअन्स समाज, त्यांची संस्कृती, चाली-रीती, प्रथा यांबाबत काही अंदाज बांधणं शक्य झालं आहे.

चौदाशे वर्षांपूर्वी लोकवस्ती करून जंगलात, डोंगरात राहणं, तिथं उपजीविकेची साधनं शोधणं अत्यंत कठीण होतं. बदलतं हवामान, हिमवादळं, पाऊस यांना तोंड देत जीवन जगणं खरोखरच अशक्यप्राय; पण पुएब्लोअन्सच्या एवढ्या पिढ्या इथं राहिल्या, याचं मुख्य कारण, त्यांची उत्तम घरबांधणी, थंडी-वाऱ्याला तोंड देण्यासाठी वापरलेली कल्पकता व नियोजन. त्यांची घरं ही प्रामुख्यानं डोंगरांच्या मोठ्या व लांबलचक कपारींत बांधलेली दिसतात. घराचं मूळ बांधकाम वाळूच्या दगडांत आहे. खोल्यांची लांबी-रुंदी-उंची वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी लागेल. घराच्या भिंती या भक्कम, उंच व सरळ रेषेत दिसतात. झोपण्याची खोली सहा फूट बाय आठ फूट, म्हणजे दोन किंवा तीन जणांचं तीत व्यवस्थित वास्तव्य होत असावं. त्या काळात वर्षभर पीक काढणं शक्य नव्हतं. काही ठराविक हंगामात धान्य पिकवून ते उर्वरित काळासाठी साठवून ठेवावं लागत असे. त्यामुळे धान्याचा साठा करायचं गोदाम हे मूळ घरापासून थोडं लांब व उंचावर बांधण्यात येई. संपूर्ण घराच्या बांधकामाचा बारकाईनं अभ्यास केला तर पुएब्लोअन्स हे बांधकामात अत्यंत कुशल कारागीर होते या निष्कर्षावर पुराण-वस्तुसंशोधक आले आहेत.

प्रत्येक घरासमोर कोर्टयार्ड (अंगण) असे. रोजचे दैनंदिन व्यवहार इथंच होत असावेत. उन्हाळ्यात विस्तवाचा उपयोग प्रामुख्यानं स्वयंपाकासाठी केला जायचा; पण वर्षातले बरेच महिने कडाक्याच्या थंडीचे असत. त्यामुळे उबेसाठी खोल्यांमध्ये लाकडं पेटती ठेवावी लागत. परिणामत: अनेक खोल्यांच्या भिंती व छत काळं झालेलं दिसतं. त्यांचं जीवन हे कमालीच कष्टमय होतं. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा कामात सहभाग असे. उन्हाळ्यात जबरदस्त मेहनत व हिवाळ्यात थोडा आराम, असं त्यांच्या जीवनाचं चक्र असे. शेती हा पुएब्लोअन्सचा मुख्य व्यवसाय. द्विदल धान्य, मका आदी पिकंही ते घेत. शिकार हा पुरुषांचा आवडता छंद. हरीण, उंदीर, खारी यांची शिकार खाण्यासाठी उपयोगी ठरे. प्रत्येक कुटुंब आपल्याबरोबर कुत्री व टर्की कोंबड्या पाळत असत. टर्की कोंबड्या अत्यंत उपयुक्त असत. एकतर त्यांचं मांस म्हणजे मेजवानी. या कोंबड्यांची पिसं विविध कामांसाठी वापरली जात आणि टर्की कोंबड्यांच्या हाडांपासून निरनिराळी शस्त्रं तयार करण्यात येत.

पुएब्लोअन्सच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक जीवनाबद्दलची काहीही लेखी माहिती उपलब्ध नाही; पण न्यू मेक्सिको व अॅरिझोना इथल्या आधुनिक पुएब्लोअन्सच्या जीवनपद्धतींबरोबर त्यांची तुलना करून तज्ज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत. सुरुवातीला त्यांचं कुटुंब मर्यादित असे. मग कुटुंबातल्या सदस्यांची संख्या वाढू लागली की घरांचा आकारही मोठा होत जाई.
‘मेसा वर्दे पार्क’मधलं ‘स्प्रूस ट्री हाऊस’ पाहिलं की पुएब्लोअन्सच्या चौदाशे वर्षांपूर्वीच्या घरांची, जीवनपद्धतीची बरीचशी कल्पना येते. तिथं पोचण्यासाठी थोडं खोल दरीत उतरावं लागतं; पण त्यासाठी उत्तम रस्ता तयार करण्यात आला आहे. डोंगरांच्या लांबलचक कपारींत ही घरं बांधण्यात आली आहेत. हे मेसा वर्देमधलं सर्वात मोठं खेडं मानण्यात येतं. इथं एकूण १२९ खोल्या असून ६० ते ९० लोक त्यांत राहत असत. या वस्तीचं वैशिष्ट्यं म्हणजे, एक मोठी खोली जमिनीखाली बांधलेली आहे. आम्ही शिडीनं तीत उतरलो. ती ‘प्रार्थने’ची व ‘आणीबाणी’ची खोली होती. हिमवर्षाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला तर गावातले वृद्ध, तसेच स्त्री-पुरुष तिथं जमा होत. थंडीपासून रक्षण करण्यासाठी लाकडं पेटवण्यात येत. त्यांचा धूर बाहेर जाण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याखेरीज सर्वच खोल्यांची बांधणी एकदम भरभक्कम. काही ठिकाणी बाहेरच्या अंगणात छोट्या विहिरीसुद्धा आढळून आल्या. मेसा वर्देतील अवशेष हे मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहेत; पण प्रत्येक ठिकाणी रेंजर असतो व तो आवश्यक ती सर्व माहिती पर्यटकांना देतो.

‘स्प्रूस ट्री हाऊस’पासून काही अंतरावर डोंगराच्या एक कड्यात ‘क्लिफ् पॅलेस’ आहे. तो आम्ही पाहिला. त्याची रचना भव्यदिव्य अशीच आहे. बहुधा त्या समाजाचा प्रमुख व त्याचे कुटुंबीय त्या ‘महाला’त राहत असावेत. या पार्कमधले अन्य काही अवशेष पाहण्यासाठी शिड्यांवरून कपारीत शिरावं लागतं व अक्षरश: सरपटत पुढं पुढं सरकावं लागतं. उत्तम गिर्यारोहकांनाच ते शक्य होतं. पार्कमधील म्युझियामही पाहण्यासारखं आहे. प्युएब्लोअन्सची शस्त्रं, धनुष्य-बाण, नानाविध आकारांची, रंगांची भांडी तिथं ठेवण्यात आली आहेत. चौदाशे वर्षांपूर्वीचे अवशेष उत्तम रीतीनं जतन केलेले आढळतात.

loading image