बर्फाचा गालिचा; पाचूची कमान (जया जोग)

jaya jog
jaya jog

रात्रीचे साडेदहा वाजले होते. अंगात गरम कपड्याचे चार-चार थर चढवून बूट, हातमोजे, कानटोपी असा जामानिमा करून नाकाला गरम मफलरनं झाकून घेतलं होतं आणि डोळे विस्फारून पाहत होते निसर्गाचा अद्‌भुत खेळ. काळ्याभोर आकाशाच्या गर्भरेशमी पटलावर हिरव्या रंगाच्या लडी उलगडू लागल्या होत्या. एका लडीकडे निरखून बघत असतानाच दुसरीकडे कुठंतरी हिरवी नक्षी उमटू लागे. तिकडे नजर फिरवली, की पहिली गायब! पुन्हा वेगळ्याच ठिकाणाहून दोन हिरव्या लडी डोळे मिचकावू लागल्या... इतक्‍या वर्षांचं उराशी जपलेलं स्वप्न पुरं झालं. नॉर्दर्न लाईट्स बघायला मिळाले- याचि देही याचि डोळा!

भोवताली गडद अंधार उणे बारा अंश तापमानाची कडाक्‍याची थंडी, पायाखाली बर्फाचे गालिचे, वरून बर्फाची भुरभुर, बर्फाळ, बोचरा, सोसाट्याचा वारा अशा वातावरणात मी उभी होते. रात्रीचे साडेदहा वाजले होते. अंगात गरम कपड्याचे चार-चार थर चढवून बूट, हातमोजे, कानटोपी असा जामानिमा करून नाकाला गरम मफलरनं झाकून घेतलं होतं आणि डोळे विस्फारून पाहत होते निसर्गाचा अद्‌भुत खेळ! काळ्याभोर आकाशाच्या गर्भरेशमी पटलावर हिरव्या रंगाच्या लडी उलगडू लागल्या होत्या. एका लडीकडे निरखून बघत असतानाच दुसरीकडे कुठंतरी हिरवी नक्षी उमटू लागे. तिकडे नजर फिरवली, की पहिली गायब! पुन्हा वेगळ्याच ठिकाणाहून दोन हिरव्या लडी डोळे मिचकावू लागल्या. आता तर त्यांना केशरी रंगाची किनार पण दिसू लागली. या दोन लडींनी वेगळाच मोहक खेळ सुरू केला. एकमेकींना पीळ घालून त्या मजेत डोलू लागल्या. अनिमिष नजरेनं हे दृश्‍य मनात साठवून घेत असतानाच क्षणार्धात त्यावर ढगांचा पडदा पडला. काही मिनिटं अशीच गेली. मी तशीच थांबून राहिले. ढगांचा पडदा उघडण्याची वाट बघत! निसर्गाच्या या विभ्रमाची मनावर चढलेली धुंदी ओसरू लागली, तशी आजूबाजूची भयानक थंडी जाणवू लागली. बोचऱ्या वाऱ्याचे चेहऱ्यावरचे सपकारे झोंबू लागले. बरोबर असलेले बरेच जण हॉटेलच्या उबेत परतले होते. आम्ही दोघं-तिघंच फक्त त्या बर्फाळ रस्त्यावर घुटमळत होतो. आभाळाकडे आशाळभूतपणे बघत! बर्फाचा पाऊस, बोचरा वारा सहन करत आकाशाचा सगळ्या दिशांनी वेध घेत होतो. पुन्हा दिसेल का ते हिरव्या रंगाचं कारंजं? वर बघूनबघून मानेचे तुकडे पडायची वेळ आली. ‘चला जाऊ आता हॉटेलवर’ असा सूरही निघू लागला; पण कुणाचाच पाय तिथून निघत नव्हता. ‘न जाणे आपण गेल्यानंतर हे ढग दूर झाले तर?’ पाहता पाहता वाऱ्याचा वेग वाढला. आम्हाला एका जागी स्थिर उभं राहणं कठीण होऊ लागलं. एकमेकांना आधार देत सावरतोय, तेवढ्यात ढगांनी दूर होताना त्यांच्या मागची पाचूची कमान आमच्या डोक्‍यावर धरली. मधूनच केशरी रंगाची एखादी रेशमी लड या कमानीला जास्तच उठाव आणत होती. आम्ही सगळे हा नजारा डोळ्यात मनात साठवत आधाशीपणे पिऊन घेत होतो. निसर्गाचा हा अद्‌भुत चमत्कार बघताना मी स्तब्ध झाले. निःशब्द झाले. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. असं वाटलं, की ‘बस्स! हा क्षण इथं असाच थांबावा. या क्षणी निसर्गदेवतेशी एकरूप झालेल्या अवस्थेत संपून जावं. या रंगांमध्ये विरघळून जावं. आता मला कसलीही इच्छा उरलेली नाही. मी पूर्णपणे निरासक्त, निर्मोही आहे.’ खरोखरीच एक मनस्वी, अशारीरिक आत्मानंद मिळाला मला!
त्याच धुंदीत हॉटेलमधल्या उबदार खोलीत आले. अंगावरचे गरम कपड्यांचे थर उतरवून साधा सुती गाऊन चढवला आणि अंथरुणाला पाठ टेकली. एक दीर्घ उसासा सोडला. आज आपलं इतक्‍या वर्षांचं उराशी जपलेलं स्वप्न पुरं झालं. नॉर्दर्न लाईट्स बघायला मिळाले- याचि देही याचि डोळा.
हे नॉर्दर्न लाईट्स‌ म्हणजे सूर्यावर सतत होत राहणाऱ्या स्फोटांमधून बाहेर पडलेले कण. ते पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळच्या चुंबकीय क्षेत्रात प्रवेश करून असं रंगविभोर रूप धारण करतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधली रंगपंचमीच म्हणा ना! नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दिवसातली स्कॅन्डेनेव्हियाची ट्रिप असा अद्‌भुत अनुभव देते. या दिवसांत इकडे फक्त तीन-साडेतीन तासच दिवसाचा प्रकाश असतो. तोदेखील लख्ख सूर्यप्रकाश नाहीच!
आपण मनाशी बाळगलेली अनेक गृहितकं इथं कोसळून पडतात. आपल्या मनातल्या ठाम कल्पना म्हणजे सकाळी सूर्य उगवणारच. निदान सात-आठ तास लख्ख सूर्यप्रकाश असणारच. डोक्‍यावर निळं आभाळ असणारच! हे सगळे ठोकताळे इथं अक्षरशः बर्फात गोठून जातात. सकाळी कधीतरी साडेदहा-अकराच्या सुमाराला सूर्याच्या आगमनाची चाहूल देत पूर्वेला केशरी रंगाची किनार दिसू लागते. सूर्य वर येऊन थोडंसं ऊन पडतं. उंचउंच पाईनच्या झाडांची डोकी जरा कुठं सोनेरी होताहेत, तोवरच मावळतीचे रंग उधळायला सुरवात होते आणि तीन-साडेतीन वाजता चक्क रात्र होते.
आमच्या ट्रिपची सुरवात झाली हेलसिंकीपासून. ही फिनलंडची राजधानी! असं म्हणतात, की फिनलंड हा जगात सर्वांत कमी लोकसंख्येचा आणि सर्वांत आनंदी लोकांचा देश आहे.
हेलसिंकीची सिटी टूर करून आम्ही पुढं गेलो रुव्हेनिमी या गावी. एव्हाना बर्फ आणि कडाक्‍याची थंडी अंगवळणी पडायला सुरवात झाली होती. अशाच बर्फाळलेल्या वातावरणात आम्ही जवळच असलेल्या सांताक्‍लॉज व्हिलेजला भेट दिली. हे ठिकाण म्हणजे पाश्‍चात्य बच्चे कंपनीचं प्रचंड मोठं श्रद्धास्थान. तिथं कुटुंबवत्सल मंडळींची तोबा गर्दी उसळली होती. बर्फ तुडवत, थंडगार बोचरं वारं अंगावर घेत तो सगळा चैतन्यमय नजारा डोळ्यांत साठवून घेतला. परतीच्या वाटेवर आम्ही ‘रंगमहाल’मध्ये जेवायला थांबलो. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही- ‘रंगमहाल’च! भारतापासून हजारो मैलाच्या अंतरावर उत्तर ध्रुवाजवळच्या या देशामध्ये ‘रंगमहाल’ नावाचं भारतीय जेवण देणारं एक छानसं हॉटेल आहे. हेच नव्हे तर आणखीही काही भारतीय जेवण देणारी हॉटेल्स या स्कॅडेनेव्हियन देशात आहेत. त्यांची नावंही ‘महाराजा’, ‘एलेफंट’, ‘पंजाबी तडका’, ‘जयपूर’ अशी खास भारतीय. या सगळ्या ठिकाणी स्थानिक खवैयांचीही भरपूर गर्दी. त्या दिवशी ‘रंगमहाल’मध्ये तर चक्क कांद्याची गरमागरम खेकडा भजी होती. हुडहुडी भरलेल्या थंडीत अशी भजी बघूनच तोंडून शब्द निघाले ‘अन्नदाता सुखी भव!’
दुसऱ्या दिवशी स्वीडनमधल्या किरुना आणि ऍबिस्कोसाठी बसचा प्रवास होता. हा एक नितांत सुंदर अनुभव. वाटेतल्या छोट्या छोट्या गावातल्या घरांची उतरती छपरं, कुंपनं, पाईनची जंगलं, रस्त्यालगची तळी- जिथं म्हणून नजर जाईल तिथं बर्फच बर्फ! आमची ट्रिप होती १ ते १२ जानेवारी. त्यामुळे सगळीकडे मावळत्या ख्रिसमसचा आणि नव्या वर्षाचा उत्सवी जोष कायम होता. वाटेवरच्या एखाद्या घरासमोर छोटंसं ख्रिसमस ट्री दिसायचं आणि त्यावरची लुकलुकत्या दिव्यांची आरास सगळा आसमंत जिवंत करायची. घरांच्या बंद खिडक्‍यांमधून येणारी मंद प्रकाशाची तिरीप चैतन्याची चाहूल द्यायची. या रस्त्यावर आजूबाजूला रेनडियरचे कळप हुंदडताना बघून जगण्यातल्या ऊर्जेची जाणीव होत होती. स्वीडनहून नॉर्वेला जाताना उत्तर ध्रुव जास्तच जवळ आला. त्यामुळे बर्फाचा जोरही वाढला. आता मात्र हा बर्फ थोडा भीतीदायक वाटू लागला. ट्रॉम्सोला पोचल्यावर आम्ही एका रेनडियर फार्मला भेट दिली. सुदैवानं तेव्हा बर्फाचा पाऊस थांबला होता. उरला होता फक्त बोचरा थंडगार वारा. नॉर्वेमधले मूळ रहिवासी ‘सामी’ हे मुख्यतः रेनडियर फार्मिंग करतात. त्याबरोबरच या ‘सामी’ लोकांनी वेशभूषा, संगीत या माध्यमातून त्यांची संस्कृतीही जपली आहे. आम्हाला ‘सामी’ जेवण, ‘सामी’ संगीत अशी मेजवानी देण्याआधी या मंडळींनी आम्हाला रेनडियरच्या गाडीतून त्या बर्फाळ पठाराची सैर घडवली. मी आणि माझी मैत्रीण शोभा एका गाडीत बसलो. अर्ध्या वाटेत गेल्यावर असं वाटलं, की लख्ख चांदणं पडलं आहे. वर पाहिलं, तर आभाळ अंधारात केव्हाच गुडूप झालं होतं. मग इकडे तिकडे पाहिलं. कुठूनही कुठलाही प्रकाश येत नव्हता. दूरवरच्या तंबूत शेकोटी दिसत होती. मग हे चांदणं कुठलं? काहीही कळलं नाही; पण कुठला तरी उजेड त्या बर्फावरून परावर्तित होत होता आणि त्या टिपूर चांदण्यानं आम्हाला न्हाऊ घातलं होतं. मनावर गारुड करणारं ते दृश्‍य तो एक जादूभरा अनुभव. रेनडियर फॉर्मवरुन परत आल्यावर थोडी विश्रांती घेऊन शोभा आणि मी जरा फिरायला बाहेर पडलो. रस्ता ओलांडण्यासाठी थांबलो. त्या क्षणी रस्त्यावरून जाणारी एक गाडी गचकन थांबली. ‘ही पुढे का जात नाहीये? बंद बिंद पडली की काय?’ असा विचार करत आम्ही तशाच थांबून राहिलो. आता त्या गाडीच्या शेजारी दुसरी गाडीही येऊन थांबली. अशा गोंधळलेल्या अवस्थेत तीन-चार सेकंदच गेले असतील. मग डोक्‍यात प्रकाश पडला, की इथं पायी चालणाऱ्यांना अतिशय सन्मानपूर्वक अग्रक्रम दिला जातो. भानावर येत भराभर पावलं उचलतं हात उंचावून त्या दोन्ही गाड्यांना ‘थँक्यू’ म्हणत आम्ही पलीकडे गेलो.
ऍस्लो हे आमच्या ट्रिपमधलं शेवटचं शहर. तिथलं पोलर म्युझियम बघून थक्क झालो. तिथं दर्यावर्दी लोकांच्या धाडसी कथा ऐकल्या. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही मोहिमा केलेली दीडशे वर्षं जुनी महाकाय बोट बघितली. साऊंड अँड लाईट इफेक्‍टमुळे आम्ही तो काळ अक्षरशः जगलो.
या तिन्ही देशांत जाणवलेली विशेष गोष्ट म्हणजे फ्लुरोसंट भगभगीत दिव्यांचा कमीत कमी वापर. कुठलीही दिव्यांची सजावट मंद पिवळसर रंगात असेल, तर ती किती देखणी, मुलायम, शांत करणारी असते, हे पदोपदी अनुभवलं!
हे जग आपल्यापेक्षा खूप वेगळं आहे. आपल्याला कनवाळू निसर्ग लाभला आहे. इथं मात्र तो कठोर आणि निर्दय आहे; पण या लोकांनी त्यातून मार्ग काढत अशा निसर्गाशी दोस्ती केली आहे. आपलं जगणं शक्‍य तेवढं आनंदमय करण्याचा प्रयत्न केला आहे. याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!
स्वप्नवत भासणाऱ्या गोजिऱ्या दुनियेची सैर झाली. एक नितांत सुंदर अनुभव मिळाला. नॉर्दर्न लाईटस्‌चा करिष्मा डोळे भरून पाहता आला. निसर्गदेवतेची कृपा याहून ती काय वेगळी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com