esakal | रिमझिम गिरे सावन... (जयंत टिळक)
sakal

बोलून बातमी शोधा

jayant tilak

पाऊस आणि ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणं यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या चित्रपटाशी संबंधित बासू चटर्जी आणि योगेश यांचं काही काळापूर्वीच निधन झालं, तर ते गाणारे किशोरकुमार यांचा मंगळवारी (ता. चार ऑगस्ट) जन्मदिन. या निमित्तानं या गाण्याचा रसास्वाद.

रिमझिम गिरे सावन... (जयंत टिळक)

sakal_logo
By
जयंत टिळक jayant.tilak@gmail.com

पाऊस आणि ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणं यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या चित्रपटाशी संबंधित बासू चटर्जी आणि योगेश यांचं काही काळापूर्वीच निधन झालं, तर ते गाणारे किशोरकुमार यांचा मंगळवारी (ता. चार ऑगस्ट) जन्मदिन. या निमित्तानं या गाण्याचा रसास्वाद.

खरं तर हा सीझन पावसाच्या गाण्यांच्या कार्यक्रमांचा... पण गेले चार महिने कोरोनाची दहशत आणि लॉकडाऊनमुळे नाटक-चित्रपटांप्रमाणेच म्युझिक शोजही बंद आहेत. या पाऊसगाण्यांच्या कार्यक्रमांत नेहमी अगदी अव्वलस्थानी असणारं गाणं म्हणजे ‘रिमझिम गिरे सावन..’. काही गाण्यांबद्दल बोलताना ते गाणं अनेक वर्षांनंतरही ताजं -टवटवीत वाटतं असं आपण म्हणतो. रिमझिम गिरे सावन..’ हे गाणं अशाच काही गाण्यांपैकी एक! ही किमया आहे पंचमच्या सुमधुर संगीताची आणि किशोरच्या सदाबहार आवाजाची! या गाण्याशी संबंधित आणखी दोन महत्त्वाच्या व्यक्ती अगदी अलीकडंच हे जग सोडून गेल्या. ‘रिमझिम गिरे सावन..’ लिहिणारे गीतकार योगेश यांनी २९ मे रोजी जगाचा निरोप घेतला, तर हे गाणं ज्या चित्रपटात आहे त्या ‘मंझिल’चे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी योगेशजींनंतर अवघ्या सहा दिवसांनी म्हणजे ४ जून रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली! तब्बल ४१ वर्षे होऊनसुद्धा जे गाणं आजही आपला ताजेपणा आणि अर्थातच आपली लोकप्रियता टिकवून आहे ते ‘रिमझिम गिरे सावन..’ गाणं ऐकताना आता पंचमदा-किशोरदांबरोबरच योगेशजी आणि बासूदांचंही स्मरण होईल. २७ जून हा पंचमचा स्मृतिदिन, तर ४ ऑगस्ट हा किशोरकुमार यांचा जन्मदिन!
एखादं महत्त्वाचं पात्र असावं तसा पाऊस अनेक हिंदी चित्रपटात मोठी भूमिका बजावताना दिसतो. पाऊस हा गाण्यांसाठी अगदी उत्तम विषय असल्यामुळे हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आपल्या चित्रपटात पाऊस आणि पावसाच्या गाण्यांसाठी सिच्युएशन निर्माण करतातच. परिणामत: हिंदी चित्रपटांनी अनेक उत्तम पाऊसगीतांचा खजिना रसिकांना बहाल केला आहे. अशा शेकडो गाण्यांमध्ये आपला वेगळेपणा आणि ताजेपणा आजही टिकवून ठेवलेलं सदाबहार गाणं म्हणजे ‘रिमझिम गिरे सावन..’
मौसमी आणि सुपरस्टार अमिताभ या अनोख्या आणि त्याआधी कधीही एकत्र न आलेल्या जोडीवर चित्रीत झालेल्या ‘मंझिल’ या चित्रपटातलं ‘रिम झिम गिरे सावन..’ हे गाणं दोन व्हर्जन्समध्ये आहे. एक आहे किशोरकुमार यांच्या, तर दुसरं लता मंगेशकर यांच्या आवाजात. किशोरकुमार यांच्या आवाजातलं जरा कमी लयीतलं आहे- कारण ते घरगुती मैफलीतलं आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं आऊटडोअरचं असल्यामुळे त्याला एक स्वाभाविक लय, गती आहे. ‘किरवाणी’ रागावर आधारित हे गाणं काहीसं गंभीर प्रकृतीचं असूनही आपल्या भारदस्त, दमदार आवाजानं किशोरकुमार यांनी पंचम यांच्या या गाण्याला चार चांद लावले आहेत. गाणं सुरू होतं ते सतारच्या म्युझिकनं. दोन्ही अंतर्‍यांच्या आधी सतारीचे सुंदर पीस आहेत. (मात्र पडद्यावर अमिताभ मात्र हार्मोनियम वाजवताना दिसतो.) गाणं सुरू असतानाच मौसमी मैफलीत ‘एन्ट्री’ घेते. या चित्रपटातून खूप कालावधीनंतर मौसमी चॅटर्जीचं दर्शन रसिकांना झालं आणि ती दिसलीयही यात फार बारीक आणि गोड.

दोन्ही गाण्यांची सिच्युएशन आणि मूड वेगळे असल्यामुळे गीतकार योगेश यांनी मुखडा एकच ठेवून दोन वेगळी गाणी लिहिली. हे गाणं दहावीस नाही, तर चक्क ४१ वर्षं जुनं आहे हे सांगूनही खरं वाटणार नाही, इतका ताजेपणा आजही ते टिकवून आहे. याचं श्रेय अर्थातच संगीतकार पंचम, गायक लता आणि किशोर आणि अर्थातच गीतकार योगेशजी यांचं!

या दोन्ही गाण्यांत जास्त लोकप्रिय ठरलं ते किशोरकुमार यांनी गायलेलं. आजही हे गाणं पुनःपुन्हा ऐकलं आणि विविध कार्यक्रमांतून सादर केलं जातं़ पण या गाण्याचं पिक्चरायझेशन बासूदांना आणखी छान करता आलं असतं, असं मला उगाचच वाटत राहतं. मात्र, लता मंगेशकर यांच्या आवाजातल्या याच रोमँटिक गाण्याचं पिक्चरायझेशन सुंदर करून बासूदांनी ‘किशोर व्हर्जन’ गाण्यावर केलेल्या अन्यायाचं काहीसं परिमार्जन केलंय.

‘मंझिल’ हा आठ वर्षं रखडलेला आणि काही वर्षं चक्क डब्यात पडून राहिेलेला चित्रपट १ ऑक्टोबर १९७९ या दसर्‍याच्या शुभदिनी वरळीतल्या सत्यम्‌मध्ये प्रदर्शित झाला. याचं शूटिंग ‘जंजीर’ प्रदर्शित होण्याअगोदर म्हणजे १९७३ पूर्वी, जेव्हा अमिताभ सुपरस्टारच काय, स्टारही नव्हता तेव्हा सुरू झालं होतं. ‘जंजीर’च्या अगोदरचे अमिताभचे जवळपास सगळे चित्रपट (सात हिंदुस्तानी, रेशमा और शेरा, बन्सी बिरजू, प्यार की कहानी, परवाना, एक नजर, रास्ते का पथ्थर, बंधे हाथ, गहरी चाल इत्यादी) अगदी सपाटून आपटले होते. मार्च ७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आनंद’ सुपरहिट झाला; पण तो अर्थात राजेश खन्नामुळे! मात्र, जया भादुरीनं अमिताभवरच्या प्रेमापोटी, तिचं वजन वापरून दिग्दर्शक बासू चटर्जीना गळ घालून अमिताभला हा चित्रपट मिळवून दिला होता. मात्र, थोडंफार शूटिंग झाल्यावर जय पवार, राज प्रकाश आणि राजीव सूरी या नवख्या निर्मात्यांना फिल्म चालण्याविषयी शंका वाटून, आणखी पैसे बुडण्याचा धोका नको म्हणून हा सिनेमा डबाबंद करून टाकला; पण १९७३ मध्ये अमिताभचे ‘जंजीर’, ‘अभिमान’ आणि ‘नमकहराम’ असे तिन्ही चित्रपट हिट झाले. पाठोपाठ १९७४ मध्ये ‘मजबूर’, ‘बेनाम’ आणि ‘कसौटी’ही हिट झाले. १९७५ हे वर्ष तर अभिताभचंच होतं. त्या वर्षी ‘दिवार’, ‘जमीर’, ‘शोले’, ‘चुपके चुपके’ आणि ‘मिली’ अशा तब्बल ५ हिट चित्रपटांमुळे राजेश खन्ना यांचं सुपरस्टारपद प्रेक्षकांनी अमिताभच्या डोक्यावर ठेवलं. त्यामुळे ‘मंझिल’च्या निर्मात्यांना काही वर्षांपूर्वी डबाबंद केलेल्या ‘मंझिल’ची आठवण आणि वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांनी अमिताभचे पाय धरत नी बासूदांना गळ घालत पुन्हा शूटिंग सुरू करायला लावलं. यामुळे बारकाईने पाहिलं, तर सुरवातीच्या काही सीन्समधला अमिताभ, सुरवातीची मौसमी यांच्या तब्येती आणि नंतरच्या तब्येती यात खूपच तफावत दिसून येते.

‘रिम झिम गिरे सावन..’ हे गाणं ‘जंजीर’पूर्वीच्या दिवसांत शूट झालेलं असल्यामुळे आणि तेव्हा अमिताभला ‘स्टार व्हॅल्यू’ नसल्यामुळे ते गेट वे ऑफ इंडिया, ओव्हल मैदान, फोर्ट, आझाद मैदान, व्हीटी स्टेशनसमोरचा चौक, मरीन ड्राइव्ह यांसारख्या वर्दळीच्या रस्त्यांवर, खऱ्याखुऱ्या पावसात बघ्यांचा फारसा अडथळा न येता शूट करता आलं. त्या दिवसांत अमिताभ हा पडेल हिरो म्हणून निर्मात्यांमध्ये अप्रिय असला, तरी हिरोइन्सच्या लेखी मात्र ‘हॉट प्रॉपर्टी’ होता. मौमीसुद्धा याला अपवाद नव्हती. ती अमिताभवर फिदा होतीच आणि ‘मंझिल’च्या शूटिंगदरम्यान तिचे अमिताभशी मस्त सूर जुळले होते.
‘रिम झिम गिरे सावन..’ या गाण्याचं शूटिंग जवळजवळ संपत आले असताना दुपारच्या लंच ब्रेकमधे दिग्दर्शक बासू चटर्जीना काहीशा तक्रारीच्या सुरात मौसमी म्हणाली : ‘बासुदा, या इतक्या मस्त रोमँटिक गाण्यात हिरो-हिरोईन यांच्यात हातात हात घेण्यापलीकडे काहीच जवळीक घडत नाहीये.’ बासुदांची पंचाईत झाली. कारण सिनेमाच्या स्टोरीनुसार नायक नायिका यांच्यात इतकी जवळीक दाखवणं हे गाण्यात अभिप्रेत नव्हतं; पण तिकडे मौसमी तर हटून बसलेली. शेवटी बासुदांनी मरीन ड्राइव्ह समुद्राकाठच्या कठड्यावरून चालणाऱ्या मौसमीला हाताचा आधार देत अमिताभ तिला कठड्यावरून उचलून खाली घेतो असा शॉट घेतला आणि मौसमीचा हट्ट पूर्ण केला. हे गाणं रसिकांना एवढं भावलं, की हजारो युगुलांनी स्वत:ला अमिताभ आणि मौसमी समजत त्यांचं अनुकरण केलं. हे गाणं तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं, पाहिलं असेल; पण मला खात्री आहे की, हा मजकूर वाचल्यानंतर तुम्ही ते आता ते परत युट्यूबवर पाहणार!

loading image