esakal | ‘अर्धा तास तरी व्यायाम कराच’ (कबीर दुहनसिंग)
sakal

बोलून बातमी शोधा

kabir duhan singh

‘अर्धा तास तरी व्यायाम कराच’ (कबीर दुहनसिंग)

sakal_logo
By
कबीर दुहनसिंग

जो फिट असतो, तोच ‘हिट’ होतो, यावर माझा विश्‍वास आहे. आपली शरीरयष्टीही चांगली पाहिजे. पॅन्ट-शर्ट घातल्यावरही आपलं व्यक्तिमत्त्व तेवढंच भारदस्त दिसणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम केलीच पाहिजे. मी मुंबईत असतो, त्यावेळी न चुकता सकाळी सात वाजताच उठतो. त्यानंतर एक बाटलीभर गरम पाणी पितो. त्यानंतर योगासनं करतो. रात्री न चुकता साडेदहा वाजता झोपतो. त्यामुळं सकाळी लवकर उठता येतं अन् मनही प्रसन्न राहतं.

वेलनेस ही गोष्ट प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. जो फिट असतो, तोच ‘हिट’ होतो, यावर माझा विश्‍वास आहे. याचा अनुभव मलाही आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये मी पहिलं पाऊल टाकलं, त्यावेळी खलनायक कसा असावा, याचा मी आदर्श असल्याचं सांगीतलं जाई. कारण, खलनायकाची भूमिका नायकाएवढीच दमदार असावी लागते. त्यासाठी आपलं व्यक्तिमत्त्वही तेवढंच महत्त्वाचं असतं. आपली शरीरयष्टीही तेवढी चांगली पाहिजे. पॅन्ट-शर्ट घातल्यावरही आपलं व्यक्तिमत्त्व तेवढंच भारदस्त दिसणं गरजेचं आहे. आपले शोल्डर, वेस्ट हेही चांगलं असणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम केलीच पाहिजे.

मी ज्यावेळी मुंबईत असतो, त्यावेळी न चुकता सकाळी सात वाजताच उठतो. त्यानंतर एक बाटलीभर गरम पाणी पितो. त्यानंतर योगासनं करतो. त्याचबरोबर सूर्यनमस्कारही न चुकता करतो. हे सर्व झाल्यानंतर नाश्‍ता भरपूर करतो. नाश्‍त्यामध्ये ओट्‌स, विविध प्रकारची फळं, ज्युस असतात. हे केल्यानंतर मी व्यायाम करतो. त्याचप्रमाणे रात्री न चुकता साडेदहा वाजता झोपतो. त्यामुळं सकाळी लवकर उठता येतं अन् मनही प्रसन्न राहतं. अभिनय क्षेत्रामध्ये असल्याने अनेक कलाकार रात्री उशिरापर्यंत पार्टी करतात. त्यामुळे त्यांना झोपायला रात्री दोन-तीनही वाजतात. मात्र, त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी कामावर होतो अन चित्रीकरणाचं सगळं गणितच बिघडतं. मात्र, माझ्यामुळे चित्रीकरणाचं गणित मी कधीही बिघडवू दिलं नाही. कारण, रात्री वेळेवर झोपल्यामुळे मी माझी कामे दिवसभरात कधीही करू शकतो.
मी दररोज पाच ते सहा लिटर पाणी पितो. त्याचबरोबर नारळ पाण्यासह वेगवेगळ्या ज्युसेसचंही सेवन करतो. त्यामधून माझ्या शरीराला जे घटक आवश्‍यक आहेत, ते मिळतात. रात्री आठ वाजल्यानंतर मी काहीही खात नाही. मात्र, नाईट वॉक हमखास करतो. रात्री झोपण्यापूर्वी मी ग्रीन टी पितो. त्यामुळे मला चांगली झोप लागते, अन् सकाळी फ्रेश असतो. दररोजच्या आहारामध्ये भाजीपाल्याचा सर्वाधिक समावेश असतो. दिवसभरात मी तीन वेळा तरी जेवण घेतो. शिमला मिरची आवर्जून खातो. त्याचप्रमाणे गाजर, काकडीचाही आहारात समावेश असतो. सॅलडमुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. त्यामुळे आपली त्वचाही टवटवीत राहते. विशेष म्हणजे आपल्या शरीरावर फॅट आजिबात चढत नाही.

स्वतःसाठी वेळ द्या
सध्या मी ‘पहिलवान’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. मुंबईत असल्यानं दररोजच व्यायामाचं वेळापत्रक पाळून जिममध्ये जाणं होतं. मात्र, बाहेर असल्यानं इथं जिमची व्यवस्था नसल्यानं मी वेगवेगळ्या प्रकारचे एक्‍सरसाईज करतो. कारण, मी फिटनेसपासून लांब राहू शकत नाही. जॉगिंग पार्कमध्ये अनेक जण सकाळी धावताना दिसतात. त्यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश असतो. त्याचप्रमाणं प्रत्येकानं स्वतःसाठी थोडा तरी वेळ दिला पाहिजे. मी इथं सायकलिंग करतो. त्याचप्रमाणं बैठकाही काढतो.

फिटनेसमुळंच मला चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका मिळत आहेत. सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये खूपच आव्हानं आहेत. त्यामध्ये जो व्यवस्थित अभिनय करेल आणि फिटनेस राखेल, त्याला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये माझ्या कुटुंबीयांतलं कोणीच नाही. तरीही मी यशाचा पल्ला गाठला आहे. ‘पहिलवान’ चित्रपटासह आणखी चार चित्रपटांमध्ये मी काम करत आहे. खरंतर अभिनयामध्ये शरीरयष्टीला खूपच महत्त्व असतं. कारण, आपलं शरीर चांगलं असेल, तर आपण नायक वा खलनायकाची भूमिका साकारू शकतो. आज नायक असलेला उद्या एखाद्या चित्रपटात खलनायकही असू शकतो अन् आजच्या खलनायकाला नायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळू शकते. त्यामुळं आपण आपल्या शरीर आणि आरोग्याबाबत जागरुक असलं पाहिजे.

व्यायामासाठी खूप अभ्यास
खरंतर मी व्यायामाबाबत कोणाचंच मार्गदर्शन घेत नाही. मात्र, योग्य पद्धतीनं व्यायाम करण्याबाबत खूप अभ्यास करतो. त्यासाठी युट्यूब आणि गुगलचा वापर करतो. त्याच्या माध्यमातून व्यायामाचे धडे घेतो. आपलं वजन कमी करायचं की जास्त, या गोष्टींसह आहाराबाबतच्या अनेक गोष्टींची माहिती आपल्याल्या या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध होते. ज्यावेळी मी प्रशिक्षकाच्या माध्यमातून व्यायाम करतो, त्यावेळी त्यांचंच मार्गदर्शन कायम ठेवतो. ज्यावेळी नवीन प्रकार शिकायचा असतो, त्यावेळी प्रशिक्षकाची मदत घेतो. कारण, प्रशिक्षक असल्यास कोणतीही काळजी करण्याची गरज नसते. आहाराबाबत सल्ल्याची मला गरज भासते, तेव्हा मी डॉक्‍टरांकडंही जातो.

मनःशांती खूप गरजेची
सध्याचं युग खूपच धावपळीचं आहे. त्यातच प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा असल्यानं नकळतपणे ताणतणाव येत असतो. त्यासाठी मनःशांती खूप गरजेची असते. त्यासाठी मी मेडिटेशन करतो. सध्या ‘पहिलवान’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळं मी या परिसरातील गार्डनमध्ये जातो. तिथं एका झाडाखाली शांतपणे बसतो. या परिसरात अनेक जण येतात. त्यांच्याशी मनमोकळेपणानं गप्पाही मारतो. त्यामुळं मनावरचा भार हलका होतो. चित्रीकरण संपल्यानंतरही मी रूममध्ये अर्धा तास मेडिटेशन करतो. त्यामुळं दिवसभराचा ताण कमी होतो. विशेष म्हणजे मेडिटेशनसाठी वेळेचं बंधन नसतं. ते कधीही करता येतं. आपल्या मनात सेकंदासेकंदाला येणारे असंख्य विचार मेडिटेशनमुळं कमी होतात. अनेकदा मी मनःशांतीसाठी आवश्‍यक असणारं संगीतही लावतो. त्याचा फायदा मला नेहमीच होत असतो.

‘पहिलवान’ या चित्रपटात मी टोनीचं पात्र साकारत आहे. यामध्ये मी मुख्य खलनायकाची भूमिका साकारत आहे. हा खलनायक खतरनाक बॉक्‍सर असतो. अभिनेता सुदीपच्या विरोधात माझी भूमिका आहे. यातल्या बॉक्‍सर खलनायकासाठी मला खूप तयारी करावी लागली. त्यासाठी मी सहा महिने बॉक्‍सिंग शिकलो. माझ्या शरीराला प्रोटिनची आवश्‍यकता होती. त्यानुसार मी आहाराचाही समावेश केला. ‘पहिलवान’ हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे. यातल्या भूमिकेसाठी मी तीन महिन्यांमध्ये तब्बल आठ किलो वजनही कमी केलं. त्यासाठी प्रशिक्षक दुर्गाची मदत झाली. तसंच चार महिने प्रशिक्षणही घेतलं.

खरंतर मी आपल्या कुटुबीयांची खूपच काळजी घेतो. मी त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही. अभिनय क्षेत्रामध्ये कोणीही नसताना मला माझ्या आई-वडिलांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्यांच्यामुळंच मी साडेतीन वर्षांमध्ये ३० ते ३२ चित्रपटांमध्ये अभिनय करू शकलो. त्यामुळं मी जगात कुठंही असलो, तरी दररोजच कुटुंबीयांच्या संपर्कात राहतो. अनेक जण बाहेर असल्यास चार-चार दिवस आपल्या कुटुबीयांशी संपर्क साधत नाहीत. मात्र, मला ही गोष्ट अजिबात जमत नाही. मित्रांसाठी मी त्यांचा मित्रच असतो. अभिनेता असलो म्हणून वेगळा आविर्भाव दाखवत नाही. खूपच साधंसुधं जीवन मी जगतो. खलनायकाच्या भूमिका साकारत असलो, तरी मला चांगले लोकच आवडतात. सध्या तर सर्वत्र धांगडधिंगा सुरू असतो. अनेक जण मद्यपानासह पार्ट्या करतात. धिंगाणा घालतात. त्यामुळे आपल्यासह कुटुंबीयांचेही नाव खराब होते. पण, असं करणं चुकीचं आहे.
(शब्दांकन : अरूण सुर्वे)

loading image
go to top