ओझं (केतकी भाटे)

ketaki bhate
ketaki bhate

नक्की काय चुकलंय हे न शोधता हायपर होऊन बंबार्डिंग करत सुटणं ही अनुपमाची जुनी सवय होती; पण बॉसचं कधीच काहीच चुकत नसतं, त्यामुळे तिला कोणी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. सुलेखानं कसंबसं तिला शांत केलं आणि "काय झालंय ते पाहून दोन तासांत अपडेट करते,' असं सांगितलं. खरं तर टेस्टिंग चांगलं झालं होतं. टीमनं व्यवस्थित काम केलं होतं. सुलेखानं रिव्ह्यूपण बारकाईनं केला होता. त्यामुळे उलट क्‍लाएंटकडून चांगला फीडबॅक येईल अशा अपेक्षेत ती होती आणि झालं होतं भलतंच.

सकाळी साडेनऊची वेळ. सुलेखाची ऍक्‍टिवा हायवेवरून धावत होती. ऑफिसला वेळेत पोचायची धडपड करत. शनिवार-रविवारची सुटी झालेली. त्यामुळे सकाळपासून मनाविरुद्ध शरीर सगळी कामं उरकत होते. आणि शेवटी एकदाची ती निघाली होती. रोजच्याप्रमाणे आजही "मारावी या नोकरीला लाथ' असा विचार तिच्या मनात येऊन गेला होताच. त्यात आज आहनाच्या शाळेची सहल गेली होती आणि "आई, आज तू घ्यायला ये,' असा हट्ट तिनं धरला होता. आता हे सगळं गणित कसं जमवायचं हा विचार करतच तिनं गाडी पार्क केली. कार्ड स्वाइप करून आत शिरतेय तोच आशिष धावत आला आणि म्हणाला ः ""अग लवकर अनुपमाला पिंग कर. तिचे चार कॉल्स येऊन गेले तुझ्यासाठी.''

आता आज काय वाढून ठेवलंय या विचारातच तिनं लॉगिन केलं आणि अनुपमाला पिंग केलं. सुलेखाची मॅनेजर अनुपमा घरून काम करायची. अनुभवी आणि क्रिटिकल रिसोर्स असल्यामुळे तिला ही सुविधा देण्यात आली होती. अनुपमाचे धडाधड मेसेजेस आले ः "शुक्रवारी रिलीज केलेलं सॉफ्टवेअर क्‍लाएंट लोकेशनवर चालत नाहिये. आय नीड टू टॉक टू यू.' मग लगेच स्काइप कॉल आलाच आणि प्रश्नांचा भडिमार सुरू झाला ः ""असं कसं झालं? तुझ्या टीमचं टेस्टिंग पूर्ण झालं होतं ना? तू रिव्ह्यू केलं होतंस की नाही? तुमचं ना हल्ली कामात लक्षच नसतं. मी आता एचआरला सांगून ते फेसबुक, व्हॉट्‌सऍप सगळ बंद करायला सांगणारे.''... हे आणि असं बरंच काही.
नक्की काय चुकलंय हे न शोधता हायपर होऊन बंबार्डिंग करत सुटणं ही अनुपमाची जुनी सवय होती; पण बॉसचं कधीच काहीच चुकत नसतं, त्यामुळे तिला कोणी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. सुलेखानं कसंबसं तिला शांत केलं आणि "काय झालंय ते पाहून दोन तासांत अपडेट करते,' असं सांगितलं. खरं तर टेस्टिंग चांगलं झालं होतं. टीमनं व्यवस्थित काम केलं होतं. सुलेखानं रिव्ह्यूपण बारकाईनं केला होता. त्यामुळे उलट क्‍लाएंटकडून चांगला फीडबॅक येईल अशा अपेक्षेत ती होती आणि झालं होतं भलतंच.

आता पुन्हा सगळं टेस्टिंग करायचं म्हणजे इतर कामं मागं पडणार होती. त्यांचीही डेडलाइन जवळ येत होती. अनुपमाला तर दोन तासांत उत्तर द्यायचं होतं. विचार करून तिच्या डोक्‍याचा पार भुगा झाला होता. त्यात मध्येच आहना सहलीला नीट पोचली असेल ना, टीचरबरोबरच असेल ना, कुठं हरवणार तर नाही ना अशा नको त्या विचारांनी काळजाचं पाणी होत होतं.
हे सगळं सहन न झाल्यानं तिनं हर्षदला मेसेज केला ः "आनूची ट्रिप गेलीये. नीट असेल ना ती.' त्याचा नेहेमीप्रमाणं तिला शांत करणारा रिप्लाय आला ः "डोंट वरी. ती मस्त मजा करत असेल. उगाच काहीतरी विचार करत बसू नको.'
आहनाचं हे शाळेचं पहिलं वर्ष. त्यामुळे ट्रिपही पहिलीच. म्हणून सुलेखाला काळजी वाटत होती; पण हर्षदशी बोललं की तिला बरं वाटायचं. तसं आत्ताही वाटलं. तेवढ्यात स्काईप वाजलं आणि ती भानावर आली. अनुपमाला दिलेल्या दोन तासांतली 15 मिनिटं निघून गेली होती. मग तिनं आशिषला बरोबर घेतलं आणि टेस्टिंग पुन्हा सुरू केलं. आशिष टीममध्ये सर्वांत अनुभवी होता.

सर्व पाहत बसणं शक्‍य नव्हतं, त्यामुळे महत्त्वाच्या फंक्‍शनॅलिटीज पाहायला घेतल्या. कुठंच काही इश्‍यू नव्हता. मग अजून थोडं खोलात जाऊन तपासलं; पण सगळं जागच्या जागी होतं. तोपर्यंत दीड तास होत आला होता. तेवढ्यात आशिष म्हणाला ः ""आपण जी इनिशिअल सेटिंग्जची फाइल पाठवली होती, ती सेटिंग्ज केली असतील ना त्यांनी? कारण ती केली नाहीत तर सॉफ्ट्‌वेअर हवं तसं चालणार नाही.'' पण सुलेखाला तसं वाटलं नाही. ""हे सॉफ्ट्‌वेअर ते बरेच महिने वापरतायत. आत्ता दिलं ते फक्त त्याचं अपडेटेड व्हर्जन होतं. त्यामुळे ही सेटिंग्ज काही त्यांच्यासाठी नवीन नाहीत; पण बाकी काहीच मिळत नाहीये आणि शंकेला जागा नको,'' म्हणत तिनं हीसुद्धा शक्‍यता पडताळून पाहायचं ठरवलं.

तिनं अनुपमाला ई-मेलमधून आशिषची शंका बोलून दाखवली. अनुपमानं बाकी काही न करता फक्त ते ई-मेल क्‍लाएंटला फॉरवर्ड केलं. तोपर्यंत साडेबारा झाले होते. म्हणजे क्‍लाएंटकडे रात्रीचे बारा-साडेबारा... आता या वेळी तिथं कुणी जागं असेल का, या विचारात सुलेखा होती. नसेल तर त्यांचं उत्तर मिळायला रात्रीपर्यंत वाट पाहावी लागणार होती. मनातून तिला थोडं बरंही वाटलं. बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे जरा वेळ तरी निवांतपणा मिळेल. तेवढ्यात आरती "लंचला चल' म्हणून बोलवायला आलीच. आरती सुलेखाची खास मैत्रीण. दोघी एकाच दिवशी जॉइन झाल्या होत्या. वेगवेगळ्या प्रोजेक्‍ट्‌समध्ये काम करत असल्या, तरी लंच टाईम त्यांचा हक्काचा होता.
लंच करून आल्यावर लॉगीन करून आता आजचं काम हाती घ्यावं या विचारात सुलेखा होती. आल्यापासूनचा सगळा वेळ क्‍लाएंट इश्‍यूमध्येच गेला होता. तेवढ्यात कानात आनूचा आवाज घुमला ः ""आई, आज तू मला घ्यायला ये. व्हॅन काका नकोत.'' ट्रीप चार वाजता येणार होती. इथून साडेतीनला तरी निघायला हवं होतं. आल्यापासून जे काही चाललं होतं त्यानंतर अनुपमाला "मला लवकर जायचं आहे' हे सांगण्याची हिंमत होत नव्हती. सुलेखा सहा जणांची टीम हॅंडल करत असली, तरी तिलाही अनुपमाला अगदी विचारावं नाही तरी सांगावं तरी लागायचंच. काय करावं या विचारात असतानाच इन्बॉक्‍समध्ये अनुपमाचे ई-मेल येऊन धडकले. ""आता काय नवीन'' असा विचार करतच तिनं ते उघडले. एफवायआय... आणि खाली क्‍लाएंटचे फॉरवर्डेड ई-मेल होते.

"आमचा टेस्टिंग करणारा नेहमीचा इंजिनिअर रजेवर असल्यामुळे दुसऱ्या प्रोजेक्‍टच्या इंजिनिअरनं टेस्टिंग केलं. त्याला अशी काही सेटिंग्ज करायची असतात याची कल्पना नव्हती. ती केल्यावर सॉफ्टवेअर उत्तम चालत आहे. सॉरी फॉर द इननन्व्हिनिअन्स कॉज्ड अँड थॅंक्‍स फॉर द क्विक रिस्पॉन्स,' अशा आशयाचे ते ई-मेल होते. ते क्‍लाएंट असल्यानं त्यांनी अजून काही लिहिणं अपेक्षितच नव्हतं. त्यांनी सॉरी लिहिलं हेच जास्त होतं.

ते वाचून सुलेखाचे डोळे पाण्यानं भरले. असं झालं, की तिला स्वतःचाच राग यायचा. एवढ्याशा गोष्टीसाठी रडू काय येतंय... पण तिनं तिच्या कामात कसूर ठेवली नव्हती, याची पावतीच होती ती.
तेवढ्यात अनुपमाचा मेसेज ः "आज काय काय कामं प्लॅन केली होती ती सुरू करा. तो इश्‍यू आता रिझॉल्व झालाय. गुड जॉब!' एवढ्या सगळ्या झकाझकीनंतर अनुपमाचे हे दोन शब्द म्हणजे मेमधल्या रणरणत्या उन्हात पावसाचे थेंब अंगावर पडावे तसंच सुलेखाला वाटलं. संधी साधून तिनं "आज मला लवकर जायचं आहे,' हे सांगून टाकलं. "टीमला कामं देऊन मी जाईन आणि बाकी काही राहिलं असेल तर घरून थोडा वेळ लॉगीन करेन,' हेही सांगायला ती विसरली नाही. इकडे आशिषलाही तिनं "तुझी शंका खरी ठरली आणि आता सगळं ओके आहे. वेल डन.' असा मेसेज टाकला. तोपर्यंत अनपेक्षितरीत्या लगेचच अनुपमाचा "ओके. नो प्रॉब्लेम.' असा रिप्लाय आला. कदाचित इश्‍यू सॉल्व्ह झाल्यानं तिचाही मूड चांगला झाला असावा.

सुलेखाला आनूचा हसरा चेहेरा समोर दिसायला लागला. तिनं भराभर सगळ्यांना कामं नेमून दिली. तिचीही कामं उरकायला सुरुवात केली. तीन वाजता टीमला "मी लवकर निघत आहे. काही लागले तर फोन करा,' असे ई-मेल केले. साडेतीनच्या जरा आधीच निघाली. ऍक्‍टिवाला किक मारून पाच मिनिटं आधीच शाळेत पोचली. गाडी पार्क करत असतानाच आनूची बस गेटमधून आत शिरली. एकेकाला हात धरून टीचर खाली उतरवत होत्या. सुलेखा समोरच उभी होती. टीचरला धरून आनूनं एक उडी मारली आणि तिची भिरभिरती नजर आईला शोधू लागली. आपण आईला सांगितलंय म्हटल्यावर आई येणारच हा विश्वास तिच्या डोळ्यात दिसत होता. तेवढ्यात सुलेखा तिच्या नजरेस पडली आणि धावत येऊन आनू तिच्या मिठीत शिरली.

गाडीवरून घरी येईपर्यंत अखंड आनूची बडबड सुरू होती. ट्रीपमध्ये काय काय झालं, काय मजा केली, खाऊ काय होता असं बरंच काही. सुलेखालाही ऐकताना खूप छान वाटत होतं.
आनूचा चेहरा आनंदानं खुलला होता आणि सुलेखाचा चेहरा समाधानानं. ऑफिस आणि तिचं पिल्लू.. दोघांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com