‘लेस इज मोअर’....! (किरण यज्ञोपवीत)

किरण यज्ञोपवीत
Sunday, 20 September 2020

चैतन्य ताम्हाणे यांनं ‘कोर्ट’ चित्रपटातूनच आपल्याकडं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर चैतन्यच्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाला व्हेनिस चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार मिळाले. पहिलं यश हे फक्त नशीब नव्हतं हे त्यानं सिद्ध केलं. त्याच्याबरोबर काम केलेल्या दिग्दर्शकानं चैतन्यच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला शोध...

चैतन्य ताम्हाणे यांनं ‘कोर्ट’ चित्रपटातूनच आपल्याकडं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर चैतन्यच्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाला व्हेनिस चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार मिळाले. पहिलं यश हे फक्त नशीब नव्हतं हे त्यानं सिद्ध केलं. त्याच्याबरोबर काम केलेल्या दिग्दर्शकानं चैतन्यच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला शोध...

चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘द डिसायपल’ या चित्रपटासाठी ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘Fipresci’ हा खास समीक्षकांकडून गौरवला जाणारा सन्मान आणि ‘सर्वोत्कृष्ट पटकथे’चा पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद झाला. त्याही पलीकडे सांगायचं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय सिनेमा म्हणजे इथल्या व्यवस्थेचे किंवा सामाजिकतेचे प्रतिबिंब पडणारे विशिष्ट आशय-विषय, विशिष्ट पद्धतीचं सादरीकरण असं लक्षात घेतलं जातं. या समजुतीला चैतन्यच्या कामानं खूप मोठा धक्का दिला आहे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. या पुरस्कारांनी मला जाणवलेली गोष्ट अशी की आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलं जाण्यासाठी स्वतःच्या मुळाशी नेणारा आशय तुमच्याकडे असेल तर त्याला भाषेशी, प्रांताची बंधनं न पडता सगळ्यांनाच तो आपलाच वाटतो. दुसरा मुद्दा असा की आपले विषय, आपली संस्कृती घेऊन मराठी भाषेतला चित्रपटही आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजला जाऊ शकतो, हा विश्वास या पुरस्कारामुळं निर्माण झाला आहे, असं मला वाटतं.

‘द डिसायपल’ या चित्रपटात भारतीय शास्त्रीय संगीत हा विषय हाताळला गेला आहे. हा विषय नेमका कसा हाताळला गेला आहे, ते मी सांगणार नाही पण यासंदर्भात भारतीय माणसाचं संगीतावरचं प्रेम, त्याच्या उपासकांची गाण्यावरची श्रद्धा, तयार झालेलं समाजमन ज्यात संगीताच्या घराण्यांच्या वैभवशाली परंपरा, आपल्या समाजात असलेल्या आख्यायिका, समज-अपसमज, त्यातून घडत जाणारा विचार त्यात मांडला आहे. हा चित्रपटाबद्दल चैतन्य व्हेनिस इथल्या मुलाखतीत बोलताना म्हणाला आहे, की ‘मी दुसऱ्या विषयावर काम करत असताना मला शास्त्रीय संगीताचा किडा चावला आणि मी हा विषय हातात घेतला.’ पण विषय हातात घेतल्यानंतर त्यानं सलग दोन-तीन वर्षं झपाटून त्यावर काम केलंय. त्यामुळं चांगल्या दर्जाचा आशय घेऊन हा चित्रपट तयार झालाय, हे मी इथं नमूद करतो.

एक्सप्रेशन या अर्थानं आपण ज्याला भाव म्हणतो, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत राहणं, आणि हे जे मूळ एक्सप्रेशन आहे, त्याचा शोध घेत राहणं, हे चैतन्यचं सगळ्यात मोठं दिग्दर्शकीय वैशिष्ट्य आहे. अभिनेत्याला या मुळाचा शोध घ्यायला प्रवृत्त करण्याचं काम त्याच्यातला दिग्दर्शक करत असतो. मी अभिनेता म्हणून काय करत असतो? तर हाती आलेला टेक्स्ट वाचल्यानंतर, त्यावर मेंदूत विशिष्ट प्रक्रिया घडते आणि त्यातून आलेला प्रतिसाद मी अभिनित करतो. हा त्या लेखनाला माझा बौद्धिक आणि मानसिक स्तरावर दिलेला प्रतिसाद आहे. त्याच्या अनेक पद्धती असू शकतात. यातली एक पद्धत घेऊन चैतन्य काम करतो. अगदी मूळ भावाला कसं अजमावता येईल याचा विचार चैतन्य करतो. या विचारातूनच दिग्दर्शक म्हणून तो अभिनेत्याला सूचना करतो. जेव्हा तो म्हणतो ‘सर, आय ॲम नॉट फॅन ऑफ युअर ज्येश्चर’ हे म्हणताना त्याला हे सांगायचं असतं की मला तुमच्यातली स्वाभाविकता हवी आहे. आतल्या भावाच्या मुळाकडे सहजपणे तुम्हाला जायचं आहे आणि ते करताना स्वतःतल्या कमीत कमी उर्जेनं तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे.

चैतन्यकडे असणारी ही विचारांतली स्पष्टता अतिशय आत्मविश्वासातून आली आहे. चित्रपट तंत्रावर त्याची असणारी हुकुमत अफाट आहे. सर्वसाधारण दिग्दर्शक एखादा प्रसंग उठावदार कसा होईल, त्या प्रसंगाला कसं नटवता येईल, त्यातून भावार्थ कसा उलगडता येईल. याचा प्रयत्न करतो.
अभिनय करताना वेगवेगळे टेक होतात. त्यातून अभिनेता काय वेगळं देऊ शकतो, हे आजमावलं जातं. चैतन्यही टेक घेतो, पण त्याला वेगळेपणा, वैविध्य नको असतं तर त्याला हवं असतं स्वतःच्या मुळाशी जाणं. चैतन्य नेमका इथंच वेगळा ठरतो. तळाशी जी शांतता आहे, त्या मागचा कार्यकारणभाव आहे, तिथं त्याला जायचं असतं. तेही कोणता अभिनिवेश न घेता. हे करायला फार मोठी दिग्दर्शकीय समज आणि आत्मविश्वास लागतो, असं मला वाटतं.

खरंतर चैतन्य आणि मी यापूर्वी कधी भेटलो नव्हतो. कामानं आम्ही एकमेकांना माहीत होतो इतकंच. पण युगंधर देशपांडेनं मला ऑडिशन द्यायला सांगितलं. ऑडिशन खूप आवडल्याचा आणि आपण भेटूया का, अशी विचारणा करणारा त्याचा मला फोन आला. भेटायला गेलो तेव्हा तो अतिशय साध्या पद्धतीनं त्याचं म्हणणं सांगत होता. पण ते ऐकता ऐकता तो काय विचार करतोय, ते नेमकं काय आहे, हे मला चिमटीत पकडता आलं नाही. पण त्यात काही वेगळेपण आहे, हे मात्र तेव्हा जाणवलं होतं.
पुढं रिहर्सल सुरू झाल्या तेव्हा त्याच्यातल्या दिग्दर्शकाची ओळख होत गेली. तो वरकरणी तुम्हाला अतिशय कम्फर्टेबल करतो, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जे नेहमी करता ते मला नकोय. मी तुमच्यात काही शोधतोय... ते तुम्हाला सापडतंय का?, याची जाणीव करून देतो. ही जाणीवच त्याच्यातल्या दिग्दर्शकाची गाठ किती घट्ट आहे, याची ओळख करून देते.

खरंतर ही सगळी प्रक्रियाच त्याच्यासाठी एक शोध आहे. हा शोध काय आहे, ते कुणालाच माहीत नाही, पण त्याची दिशा काय आहे, हे मात्र त्याला पक्कं माहीत आहे. या शोधाच्या प्रक्रियेत तो प्रत्येकाला सामावून घेतो.
मी अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. प्रत्येक दिग्दर्शकाचा एक स्वतंत्र ॲप्रोच असतो. काही दिग्दर्शक हे अभिनेत्याला सतत अस्वस्थतेच्या अवस्थेत ठेवतात. ते त्याला स्थिर होऊच देत नाही. काही दिग्दर्शक अजिबात प्रतिसाद देत नाहीत. काहीही झालं तरी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव उमटत नाहीत. काही प्रचंड प्रोत्साहन देत असतात. पण या या सगळ्यात चैतन्यचा ॲप्रोच काहीसा वेगळा आहे. ‘तुमच्यातलं चांगलं बघून मी तुम्हाला बोलावलं आहे. ते तुमच्यातच आहे. आता ते इथे मूळ रुपात कसं आणता येईल ते पाहू.’ हा चैतन्यचा ॲप्रोच अभिनेत्याला प्रचंड आश्वस्त करतो.
अतिशय साध्या पद्धतीनं व्यापक विचारांपर्यंत पोहोचता येतं, हे चैतन्यनं दाखवून दिलं आहे. म्हणजे व्हेनिससारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तंत्रज्ञानानं अतिउत्कृष्ट असलेले चित्रपट सहभागी होतात. त्यात एक खोल विचार साधेपणानं पण तरीही तांत्रिक अंगाने विचार करता उच्च निर्मितीमूल्ये असलेला चित्रपट घेऊन जायचा, म्हणजे सर्व झगमगाटामध्ये आपला एक बुलंद आवाज ठेवण्यासारखंच आहे.

उत्तम चित्रकार आपला सगळा ऐवज एकाच चित्रात ओतत नाही. या चित्राला नेमकं काय लागणार हे त्याला हे पक्कं ठाऊक आहे. आपल्याकडे काय आहे आणि त्यातलं आपल्याला एवढंच पुरणार आहे. ‘लेस इज मोअर’ ही जी समज आहे, तेच चैतन्यचं वैशिष्ट्य आहे. तोच त्याचा स्थायीभाव आहे.

‘द डिसायपल’ हा चैतन्यचा दुसरा चित्रपट. कोर्ट चित्रपटातूनही तो त्याच्या मूळ स्वराकडे गेला होता. तो सिनेमा ज्या पद्धतीनं संपतो, त्याचा मला विलक्षण मोह पडला होता. त्यामुळंच इथून पुढं चैतन्य कोणत्या प्रकारचा विषय घेऊन येईल, याची मला उत्सुकता आहे. त्याच्या दोन कामांतून काहीसा अंदाज आला आहे, तरीही वाटतं तो पुढच्यावेळी आपल्यातल्या प्रेक्षकाला चकवा देईल. त्याच्या पुढच्या प्रवासात त्याला काय सापडतंय, ते जाणून घेण्याची विलक्षण उत्सुकता मला आहे. ज्याला वेगळी जीवनदृष्टी आहे, त्याला काय दिसतंय, हे पाहण्यात एक मजा असते. आता यातूनच एक प्रश्न तयार होतो तो म्हणजे अशा वेगळ्या जीवनदृष्टीचा दिग्दर्शक प्रेक्षकाचं मन कसं घडवतो हा.
खरंतर दिग्दर्शकानं दिलेल्या नव्या अनुभवाचा स्वीकार करण्याची तुमची मानसिक तयारी आहे का? असा प्रश्न आपण विचारतो तेव्हा याचं उत्तर बहुतेकवेळेला नकारार्थी येतं. त्यामुळं प्रेक्षकांना या वेगळ्या अनुभवापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी चैतन्यसारख्या दिग्दर्शकांनी घेऊ नये. त्यांनी त्यांचं काम करावं. प्रेक्षक म्हणून घडण्याची जबाबदारी स्वतः प्रेक्षकांनी घेतली पाहिजे. मराठी प्रेक्षकांनी तर ती घेतलीच पाहिजे. आता निर्माते येत आहेत. ते धाडस करत आहेत. ‘द डिसायपल’ निर्माते विवेक गोम्बर हे त्यापैकीच एक आहेत. वेगळ्या विषयावर आणि चैतन्यवर त्यांनी विश्‍वास दाखवला त्याबद्दल त्याचं कौतुक केलं पाहिजे. मराठी माणसाचा कान चांगला तयार झालाय. पण चित्रसाक्षरता म्हणावी तशी आपल्याकडे नाही. म्हणूनच वेगळ्या प्रकारचा सिनेमा स्वीकारण्यासाठी थोडी बैठक होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रेक्षकाच्या मनाची एक स्थिरता लागेल. जीवनाचं पोषण करण्यासाठी आवश्यक असलेलं जे मूळ आहे, ते नेमकं काय आहे, ते समजण्याची क्षमताही यावी लागेल. या क्षमतेपर्यंत येणं, ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. चैतन्यही ही जबाबदारी प्रेक्षकावरच सोडतो आहे.
सचिन खेडेकर हा माझा चांगला मित्र. तो मला म्हणाला होता, “ही नवीन सेन्सिबिलीटी असलेली पिढी आहे आणि त्यातही हा मला वेगळा विचार करणारा मुलगा वाटतो. त्याला तू काय करतो आहेस. तुझं व्यक्तित्त्व काय आहे आणि ते कसं वापरता येईल याकडे त्याचा कल आहे,’ तो हे म्हणाला, तेव्हा मला तो नेमकं काय म्हणतोय हे लक्षात आलं नाही. पण आज त्याच्यासोबत काम केल्यानंतर सचिनला नेमकं काय म्हणायचं आहे, हे लक्षात येतंय. कारण तुम्ही काम करता असताना, आपल्याला काहीएक अंदाज येत नाही. पण ज्या अर्थी चैतन्यनं केलेलं काम आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलं जातंय त्या अर्थी त्यानं आमच्याकडून जे काही करून घेतलं त्याचं मोल लक्षात येतंय. खरंतर मीही अजून सिनेमा पाहिलेला नाहीय. पण या सगळ्या प्रक्रियेत माझ्यातल्या दिग्दर्शकालाही त्याच्यातल्या दिग्दर्शकानं घडवलंय. वेगळ्या रंगाची उधळण असणाऱ्या जगात मूळ रंगाकडे जात राहणं, त्याचीच तृषा कायम बाळगणं, हेच चैतन्यमधलं जिनियसपण आहे. ज्या विषयांनी आपण अस्वस्थ आहोत, त्या विषयांचं आणि आपल्या कामाचं एकमेकांमध्ये काही प्रतिबिंब पडतं आहे का? आपण कोणत्या दिशेनं चाललो आहोत, याचाही शोध मला माझ्यातल्या दिग्दर्शकाला ‘द डिसायपल’च्या निमित्तानं मला घेता आला. हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang kiran yadnyopavit write the disciple article