Padma Gole
Padma Goleesakal

दुःख हवे ! महापुरुषांचे मनोगत!

कवयित्री पद्मा गोळे (१९१३ ते १९९८) या तासगावच्या राजघराण्यातील होत. त्यांचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. शालेय जीवनापासूनच कवयित्रीने लेखनास प्रारंभ केला होता. नाटककार म्हणून सुरू झालेला साहित्यप्रवास कवयित्री म्हणून विस्तारित पावला.

‘प्रीतिपथावर’, ‘निहार’, ‘स्वप्नजा’, ‘आकाशवेडी’, ‘श्रावणमेघ’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘नीहार’ नि ‘स्वप्नजा’ या काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet padma gole nashik)

पद्मावती विष्णू उपाख्य पद्मा गोळे (१९१३ ते १९९८) यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तासगावच्या पटवर्धन राजघराण्यातील होता. त्यांचे वडील विनायकराव पटवर्धन यांचे कवयित्रीच्या दहाव्या वर्षी निधन झाले.

त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. त्यामुळे कवयित्रीचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. शालेय जीवनापासूनच कवयित्रीने लेखनास प्रारंभ केला होता. नाटककार म्हणून त्यांचा सुरू झालेला साहित्यप्रवास कवयित्री म्हणून विस्तारित पावला.

‘प्रीतिपथावर’, ‘निहार’, ‘स्वप्नजा’, ‘आकाशवेडी’, ‘श्रावणमेघ’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘निहार’ नि ‘स्वप्नजा’ या काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. कवयित्रीच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या बालनाट्यांच्या पुस्तकालाही राज्य शासनाचे पारितोषिक मिळालेले आहे.

राजघराण्यात जन्मलेल्या या कवयित्रीला घराण्याच्या प्रतिष्ठेची जाणीव आहे. ती व्यक्तविताना ‘आम्ही कुलीनांच्या कन्या’ कवितेत ती लिहिते,

आम्ही कुलीनांच्या कन्या चाफेकळ्या पानांआड

मूळी मांडूं ना आरास मुग्धपणे लावू वेड !

आम्ही कुलवती कन्या वाद फुकाचा ना घालू

शब्द चतुर मोजके हिरे-माणकांशी तोलू

कुलीन कन्यकांची रीतीच कवयित्री सुबक शब्दांत व्यक्तविते. या कुलीन कन्या स्वतःच्या सुख-दुःखांचे प्रदर्शन मांडत नाहीत, फुकाचा वाद घालत नाहीत, पानांआड दडलेल्या मुग्ध चाफेकळ्यांप्रमाणे वेड लावतात.

यांचे बोलणे इतके तोलूनमापून असते की ज्यांची तुलना हिरे-माणकांशीच व्हावी. त्या त्यांची प्रीतही सांगत नाहीत. ती त्यांच्यासमान कुलीन असणाऱ्यांनाच केवळ डोळ्यांतूनच उमगते.

त्यांचे सारे व्यक्तित्त्व त्यांच्या घराण्यात विलीन झालेले असते. कवयित्री कथन करीत असलेला हा खानदानीपणा नि सुसंस्कृतपणा तिच्या संपूर्ण व्यक्तित्त्वावर उमटलेला असून, त्याला किंचितही ढळ न लागू देता आपल्या भावविश्वात खोलवर डोकावत कवयित्रीची कविता अवतरते. याचेच प्रतिबिंब कवयित्रीच्या प्रीतिपथावर काव्यसंग्रहाच्या अर्पण पत्रिकेत दिसते,

तूच लाविलेस, भव्य-दिव्य पाहाया ।

तूच मला शिकविलेस हसत जगाया ।

तूच कवी, तूच काव्य, तूच प्रेम रे ।

तूच प्रेय, तूच श्रेय, तूच ध्येय रे ।

या पंक्ती तिच्या प्रीतिपथाची सुस्पष्ट कल्पना देतात. प्रेयस नि श्रेयस हे दोन्ही परस्परांहून भिन्नच नाहीत, तर विरोधीही असतात; पण येथे प्रेयस नि श्रेयस एकाच ठायी एकवटलेले दिसतात. ही अद्वैतता कठीणच. पण, ती कवयित्रीने प्रेमात साधलेली आहे.

म्हणूनच ‘पद्माताईंच्या प्रेमकवितेचा अतीव सुंदर विशेष म्हणजे तिला पार्थितेचा स्पर्शही झालेला नाही. तिच्यातून प्रत्ययाला येते विशुद्ध, गाढ, भावना!’ अशी दाद मालतीबाई किर्लोस्करांना द्यावीशी वाटली; तर कवी अनिलांना तिची कविता समीक्षताना जाणवले, की कवयित्रीचा प्रीतिपथ ध्यासजन्य, ध्येयासक्त प्रेमाचा आहे.

ती ध्यासजन्य प्रेममूर्ती स्पर्शाविण कुरवाळते, शब्दांविण बोलते. स्थूलाकडून सूक्ष्माकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे चाललेला हा प्रवास आकाशवेडी करीत आहे. हीच बाब व्यक्तविताना कवयित्री लिहिते,

मी एक पक्षीण आकाशवेडी ।

किती उंच जाईन, पोचेन किंवा ।

संपेल हे आयु अर्ध्यावरी ।

आकाशयात्रीस ना खेद त्याचा ।

निळी जाहली जी सबाह्यांतरी ।

जेथे सूक्ष्म नि अमूर्ताची ओढ येते, तेथेच आकाशयात्रेचा प्रारंभ होतो. ही आकाशयात्रा स्थूल नि बाह्य आकाशाकडील नसून, आंतरिक आकाशाकडील आहे. त्यामुळेच प्रवास कोठे संपेल, याची चिंता नाही, खेद नाही, खंत नाही. त्यामुळेच नियतीचे भय नाही. याचे अधिक स्पष्ट चित्र चितारताना कवयित्री लिहिते,

नियतीने करायला लावले ते मी निमूट केले

नियतीने करू नको म्हटले तेही धृष्टपणे केले

नियतीच्या डाव्या पायाची ठोकर खात

मी उजव्या पायाने तिला ठोकरून दिले

आता समोरासमोर उभ्या आहोत दोघी

आधी कुणाचा हात येतो पुढे

हस्तांदोलनासाठी ते आजमावीत !

नियतीपुढे न झुकता, तिच्या नजरेला नजर देत उभे राहण्याची कवयित्रीची ही वृत्ती तिच्यातील स्वत्त्वशीलताच दाखविते. हीच स्वत्त्वशीलता तिच्या स्त्रीविषयक विचारांतूनही पाझरते. ‘मी माणूस’ कवितेत ती जग स्त्रीला ‘देवी’, ‘सखी’ म्हणते;

ते सगळं-सगळं खोटं असल्याचे उच्चरवाने सांगत, जगाच्या दृष्टीने ‘स्त्री म्हणजे नुसती कुंडी, स्त्री म्हणजे केवळ मांस’ आहे, असे म्हणते. ते तिला मान्य नाही. स्त्री ही माणूसच असल्याचे कथन करीत ती गर्जून सांगते,

नाही हो मी नुसती नार

पेजेसाठी लाचार !

शेजेसाठी आसुसणार !

नाही मी नुसती मादी !

मी माणूस ---माणूस आधी

माणूस म्हणून जगणार !

Padma Gole
संसदांच्या संसदेची वारी

पण, स्त्री नुसती माणूसच नाही, तर कर्तृत्ववान माणूस असल्याची तिची खात्री आहे. चूल, मूल नि संसारात अडकलेली स्त्री प्रेम नि प्रीतीला सर्वस्व मानते. जर हे सर्व त्यागून तिने मनात आणले तर विश्वविजेती ठरली असती, असे तिचे निरीक्षण आहे. ‘अभिलाषेच्या पोटी’ कवितेत ती म्हणते,

‘त्याच क्षणाच्या तेजावरती

जीवन कंठी आमुचे स्त्रीपण

नातरि दिसल्या असत्या जगती

विश्वयोषिता घराघरांतून’

घरंदाज नि सुसंस्कृत असलेल्या कवयित्रीचे मनही तसेच सुसंस्कृत नि घरंदाज आहे. त्याचे दर्शन कवयित्रीच्या ‘माझे मन’ कवितेतून घडते,

खळखळत्या लाटांचे

हरित सजल काठांचे

सोनेरी वाटांचे

मन माझे

या पंक्ती वाचताना मनाची समृद्धीच खळाळत्या लाटांतून, सजल हिरव्या काठातून नि सोनेरी वाटातून उधळीत जातेसे वाटते.

ते कधी धृवता-यासारखे स्थिर, तर कधी पाऱ्यासारखे अतिचंचल आहे. कधी ते राधेसारखा प्रणयराग लावते, तर कधी सीतेसारखी चीर तगमग व्यक्तवित जाते. आपल्या मनाची जाती सांगताना ती

मुलखाचे हे हटेल

मद्यपीच अन् छटेल

क्षण विटेल क्षण नटेल

मन माझे

अशा विविध छटा चितारून जाते. ही कविता वाचताना रसिकाला कवयित्री बहिणाबाईंची मनावरील कविता आठवेल. कुणाकुणाला याच सदरांतर्गत सुमारे दोन वर्षांपूर्वी केलेले त्या कवितेचे रसग्रहणही कदाचित स्मरेल.

दोघीही उच्च दर्जाच्या कवयित्री आहेत, दोघीही सुसंस्कारी आहेत, दोघींनी केलेले मनाचे रेघाटन वास्तविक आहे, उपमांची निवडही सरस आहे. पार्श्वभूमीचा भेद हा, की पद्माताई प्रतिथयश राजघराण्यातील, आधुनिक शिक्षणाने मंडीत होत्या; तर बहिणाबाई सामान्यातील नि लौकिक शिक्षणापासून दूर होत्या, दुःख नि दारिद्र्याने पोळलेल्या होत्या.

याचे प्रत्यंतर दोघींच्या मांडणीत चटकन दिसते. दुसरे हे, की पद्माताई मनाला ‘माझे’चे बंधन घालून घेतात; तर बहिणाबाई ‘मन वढाय वढाय’ म्हणत त्याला मुक्त ठेवतात. भोळवट बहिणाबाईला ‘देवाने मन असं कसं दिलं’चा प्रश्न पडतो; तर नास्तिक शतशंका बाळगणाऱ्या पद्माताईंना ‘मन असेच असते’ची जाणीव आहे, असो !

पद्माताईंची निसर्ग कविताही स्वतःचे वेगळेपण जपत जन्मते ‘अवखळ ये पोरीसमान’ कवितेत ती

अवखळ ये पोरीसमान आज सकाळ

तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ

नादात वाजवित रुमझुम अपुले चाळ

घरट्यांतुनि उडवी खगांस हीच खट्याळ

Padma Gole
रोमँटिक व्हेनिस

रसिका ! सकाळला दिलेली अवखळ नि खट्याळ पोरीची उपमा कोणाचेही हृदय जिंकून घेईल. तिचे वर्णन करता-करता कवयित्री इतकी हरखून जाते, की सकाळशी तद्रूप होऊन जाते नि तिच्या मुखातून शब्द उमटतात,

सुमनापरी निर्मळ हसुनी जगा हसवावे

अन् विहंग बनुनी आकाशी विहरावे

या लीन तृणाला दंव बनुनी नटवावे

अन् माझ्यांतुनि मी निसटुनि सकाळ व्हावे

किती अपूर्व कल्पना आहे ही ! सकाळचे वर्णन करताना कवयित्री फूल, पक्षी, दंव बनू इच्छिते. बरे हे बनणे स्वानंदासाठी नसून, इतरांसाठी आहे.

फूल बनून ती जगाला हसवू इच्छिते, दव बनून पायंदळी तुडविल्या जाणाऱ्या गवताला नटवू इच्छिते आणि सर्वांत विस्मयाची बाब म्हणजे स्वतःतून निसटून ती सर्वांना सुखविणारी, फुलविणारी सकाळ स्वयमेव बनू पाहते.

कवयित्रीची ही भावना तिच्यातील स्त्रीत्वच प्रकट करून जाते. मनमोहक नि आल्हादक निसर्गवर्णन कोणीही एखादा बालकवी, गोविंदाग्रज, दत्तकवी करू शकतो; पण त्यात निसर्ग नि कवी असे द्वैत शिल्लक राहतेच.

पण, या कवितेत सकाळशी अद्वैत साधीत पद्मा आपले घरंदाज स्त्रीत्व झळकावून जाते. म्हणूनच तिची प्रतिभा पार्थिवाचा स्पर्श न झालेली दैवी वाटते.

कवयित्रीच्या अनेक कविता मनाला खुणावतात, मोह घालतात. पण, आता तिकडे न वळता तिच्या काही आशयसंपन्न, चित्ताला प्रसन्न करणाऱ्या कवितांकडे आपण वळूत. सुखाच्या हव्यासापायी माणसं वाटेल ते करताना दिसतात.

सुख मिळविणे म्हणजे दुःखापासून दूर जाणे होय. पण, कवयित्रीचा सुख-दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळातच वेगळा आहे. ( पूर्वार्ध)

Padma Gole
लांबचे आणि जवळचे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com