अमृतातेही पैजा जिंके : एका कवीचे मृत्युपत्र! नव्हे; मृत्योपरांत काव्यपत्र!

Marathi Poet V R Kant
Marathi Poet V R Kantesakal

वा रा कांतांच्या मेजावर एक तसबीर टांगलेली असायची तीत लिहिलेले होते,

शब्द माझा धर्म
शब्द माझे कर्म
शब्द हेच वर्म
ईश्वराचे...
 

कवीला शब्दाचे वाटत असलेले महत्त्व या ओळींतून स्पष्टपणे व्यक्त होते. पाणिनि सांगायचा केवळ एक शब्द, एका शब्दाचा सम्यक अर्थ कळाला तरी मोक्ष मिळतो. त्या प्रकाशात कवीच्या या पंक्ती पाहिल्या तर त्याची महती लक्षात येते.

शब्द धर्म अन् कर्म आहे म्हणजे कर्तव्यरूप नि कार्यरूप आहे. तो मूळ आत्मा आहे, म्हणूनच वर्म आहे आणि तोच परमधाम आहे. विश्राम आहे म्हणून ईश्वर आहे असे कवीचे मनोगत आहे. याच तंद्रीत कवी काव्यपथावर विचरण करीत होता, तो मृत्यू येऊन ऊभा ठाकला. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet v r kant nashik news)

Marathi Poet V R Kant
‘स्त्री’ नदीसारखी असते... ‘प्रवाही’

कवी मृत्यूला कधीच घाबरला नाही, उलट 'मरण: प्रकृति: शरीराणां' हे कविकुलगुरू कालिदासाने प्रतिपादन केलेले सूत्र ओळखून तो म्हणतो,

आणिले उधार मरणा मागून
दोनचार क्षण जीवनाचे...
 

काय खोटं आहे यात? निसर्गतः मरण हे शाश्वत सत्य आहे. तो येईतो मिळणारे दोनचार क्षण तेच माणसाचे जीवन होय. ते लाभणे मरणाचेच उपकार आहे. म्हणून कवी म्हणतो,

शतजन्म मृत्यो ऋणात राहीन
असा एक क्षण देई पुन्हा 

जन्म-मृत्यू-जन्म असे जीवनचक्र आहे. जन्म हे मरणाला क्षणभर फसविणे आहे. त्या जन्माच्या आधारावर कवी मरणाचे ऋण फेडतो आहे. गंमत म्हणजे मृत्यूचे ऋण फेडण्यासाठी पुन्हा त्या मृत्यूकडूनच तो क्षण उधार घ्यायचा आहे.

कवीला जाणवलेले जीवन तत्त्वज्ञान जन्म-मृत्यूचे अद्वैत साधणारे आहे. कवीच्या काव्यात वारंवार डोकावणारे मरणाचे हे दर्शन तात्विक असल्याने मरणाचे दारात त्याला मृत्युपत्र सूचते. कवीने त्याचे हे काव्यपूर्ण मृत्युपत्र २६ एप्रिल १९८८ रोजी लिहिले. त्यात कवी लिहितो,

अंतकाळी मजजवळ नसावी आप्तजनांची छाया
नकोत कोणी मित्र सखेही शोकाश्रू ढाळाया...
 

सामान्यतः माणसाची इच्छा असते; त्याचे मरणसमयी त्याचे जिवलग त्याच्याजवळ असावे. त्यांच्या मायेच्या छायेत मरणाकडे जावे. पण कवीला वाटते मरणसमयी कोणीही जवळ नसावे. कारण त्यांचे शोकाश्रू त्याला नकोत. कदाचित आपल्यामुळे त्यांना होणारे नि पर्यायाने त्यांच्या दुःखाने आपल्याला होणारे दुःख त्याला नकोय.

Marathi Poet V R Kant
पुरुषसत्तेची चित्रकथा

त्यामुळे त्याचा अंतःकाळ गढूळ होईल असे त्याला वाटत असावे. यातील पहिली पंक्ती  

मरणो भलो बिदेस को
जहां न पुछे कोय
माटी खाय जनावरामहामहोत्सव होय
 

या संत वचनाची सत्यप्रत वाटते. पण दुसऱ्या ओळीतील स्पष्टीकरणामुळे कवी यापासून दूर सरकत आपला राजमार्ग तयार करत जातो. त्याच तंद्रीत मरण समयी आपल्या जवळ काय काय असावे याची यादी देत कवि सांगतो,

फुले साजिरी समोर असू द्या खिडकीमधि हसणारी
उन्हे येऊ द्या सदने, वदने, गगने उजळविणारी

अर्थ साफ आहे, मरणाचे स्वागत करताना शोकार्त वातावरण त्याला नकोय तर हसणारी फुले असावीत असे त्याला वाटते. ही फुले कोणती असावीत, याबाबत कवी काही सांगत नाही. पण ती साजिरी म्हणजे प्रसन्न करणारी असावीत एवढी त्याची माफक अपेक्षा आहे.

त्या फुलांच्या संगतीत घर, मुख नि आसंमत उजळवून निघायला हवा, असे कविला वाटते. मृत्युसमयी हे तिन्ही उजळून निघावेसे वाटत असेल तर जीवनांत आत्मतृप्ती नि कार्यसिध्दी हवी असते.

सामान्य माणसाच्या जीवनातील कार्यसिध्दी पिकलेल्या पानातून व्यक्त होत असते, तीच कविला अपेक्षित असावी. दुसऱ्या पंक्तीत कविने योजलेली ‘सदने, वदने नि गगने’ ची संगती आल्हादक वाटते.

पुढे कवी सांगतो की, ‘घर, वदन नि गगन उजळलेले असताना किरणांच्या पालखीत बसून मी दिगंतात जाईल. तिथे सूर्याच्या महातेजास सावलीप्रमाणे वंदन करील. ’सूर्याची सावली ही कल्पनाच अद्भूत आहे.

सूर्य हे महातेज का ? तर त्याची सावलीच पडत नाही म्हणून ! पण कवी त्याच्याशी सावलीप्रमाणे म्हणजे कायमचे जोडून घेऊ पाहतो. ही सावली भौतिक नसून दिव्य प्रतिभेचे प्रतीक आहे. त्याचवेळी नभात उठणारे वारे, वावटळ, भोवरे कवीला दिसू लागतात. त्यातून प्रफुल्लीत होऊन आपले तन-मन उंचचउंच उड्डाण करायला लागेल, असे कवीला वाटते.

याठिकाणी कविने वापरलेल्या तनकाड्या, मनमाड्या नि सनकाड्यासारखा शब्दप्रयोग कवी शब्दांना देत असलेला धर्म-कर्म-वर्माचा दर्जा त्याच्यालेखी किती सार्थक होता तेच दाखवून जातात. या अशा समागमातून आकाशात जसा शब्द उमटतो, तशा कविता उमटायला लागतील, असे कवीला वाटते.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Marathi Poet V R Kant
भेदाभेद-भ्रम अमंगळ

मूलतः शब्द म्हणजे ‘आवाज’ आकाशामुळे जन्म घेतो. येथे कवी त्याला काव्यरुप देत अधिक रंगतदार करताना दिसतो. मात्र हे सुख कवीस स्वतःसाठी नकोय तर ते रसिकांना वाटायसाठी हवे आहे. म्हणून तो सांगतो,

पैल पृथ्वीच्या जाता जाता अर्पिन मी तुम्हास

कवीला मृत्यूलोक पैलतीरासारखा वाटतो. तेथे जाता जाता येणारा नवा अनुभव काव्यबध्द करुन पाठविण्याची इच्छा कवी करतो. खरेतर ही इच्छाच मूळी मरणकळेवर केलेली जीवेषणेची मात आहे. त्यामुळेच कवीला शाश्वती आहे, की पैलतीरावर गेल्यावर, शब्द सूरांचे तीर ओलांडल्यावर स्वर्गंगेच्या तीरांवर सुध्दा रसिकांची नि त्याची नाळ तुटणार नाही. नक्षत्रांच्या कोणत्याही दूर देशांत गेल्यावरही

‘तरुवेली’ परी जपेन अंतरी बहर शुष्क शाखांत
फुलेल कधितरी कविता फिरुनी तप्त दग्ध हृदयात
आत्म्याचा कधि वसंत येता फुलावया गाण्यात….

कवीला तिथेही कवितेचा बहर येण्याचा विश्वास वाटतो. कवीने ही कविता अर्धीच सोडली की काय असे क्षणभर वाटून जाते. तसे ते खरेही आहे ! कवीची ही शेवटची कविता, तीवर पुन्हा हात फिरवायला त्याला सवडच मिळाली नाही आणि पैलतीराकडे जाता जाता केलेली ही विनवणी आहे. हे लक्षात घेतले तर हा शेवट समर्पक वाटतो.

रसिका, मृत्युपत्र नावाची सावरकरांची कविता विख्यात आहे. पण ती त्यांनी अगदी युवावस्थेत केलेली आहे. तीत आत्महवनाची सिध्दता आहे. ते परतंत्र जनतेसाठी आत्महवनाचा वारसा सोडून जाताहेत.

कवी गोविंदांनी पण मरणावर कविता केली तीत पुढील जन्मात येणाऱ्या अव्यंग शरीराची अतूट आंस आहे. पण कांतांच्या कवितेत केवळ नि केवळ काव्याची ओढ आहे. कवी जरी तिला मृत्यूपत्र म्हणत असला तरी त्यात तो निरोप घेत नाही.

तर तो फक्त रसिकांना काव्यरस वाटण्याची आंस बाळगून जातोय. इतकेच नाही तर त्या नक्षत्रापलिकडील दूर देशातून ही हा स्वदेश त्याला खुणावत रहातो अन् तो ही खुणावण्याची आंस बाळगून बसतो.

खरेतर हे मृत्युपत्र मृत्योपरांत जीवन व्यापणारे काव्यपत्र आहे, असेच म्हणावे लागेल. ही संगती लावली तरच काव्याची अर्थसंगती लावणे सोपे होऊन जाते. अंतिमतः काव्यच त्याचे जीवन नि शब्दच त्याचे ईश्वर आहे. त्यामुळेच ते मृत्यूच्या ऐल नि पैल दोन्ही तटावर तसेच व्यापून उरणारे आहे

(लेखक प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ आहेत.)

Marathi Poet V R Kant
भारत-पाकमधील शांततेचा सेतू फैज़ फेस्टिवल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com