आजीचे घड्याळ : बालमनाची गूढ कल्पना

Acharya P K Atre
Acharya P K Atreesakal

आचार्य अत्रे यांची ‘आजीचे घड्याळ’ ही कविता किशोरवयीनांच्या मनातील आजीची प्रतिमा हुबेहूब चितारणारी आहे. मुलाच्या मनांत असणारी आजीविषयीची अकृत्रिम ओढ, आजी म्हणजे सर्वज्ञ, जिला सर्वकाही येतेची भावना नि नकळत तिला येणारा गूढत्वाचा स्पर्श व्यक्तवून जाणारी आहे. ज्यांनी ज्यांनी आजीची निर्मळ ममता अनुभवली, आजीसोबत राहिले, केवळ त्यांना नि त्यांनाच ही कविता पुनःप्रचीतीचा अनुभव देणारी आहे. (Saptarang Latest Marathi Article by Dr Neeraj Dev on marathi poetry of Acharya Atre Nashik New)

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (१८९८ ते १९६९) ‘केशवकुमार’ या नावाने काव्यरचना करीत. कवीने केशवकुमार नाव धारण करण्यामागील मुख्य प्रेरणा केशवसूत आहेत, केशवसूत नि केशवकुमार दोहोंचा अर्थ ‘केशवचा मुलगा’ हाच होतो. आचार्य अत्रे अष्टपैलू साहित्यिक होते, तसेच कृतिशील समाजकारणी व राजकारणीही होते.

त्यामुळेच त्यांचे ‘कऱ्हेचे पाणी’ हे पाच खंडातील आत्मचरित्र केवळ साहित्यिकदृष्ट्याच नव्हे, तर तत्कालीन महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासण्यासाठी उपयुक्त ठरते. आचार्य अत्रे झुंजार पत्रकार म्हणूनही ओळखले जात. त्यांच्या लेखणीचा धाक भल्याभल्या राजकारण्यांना नि लेखकांनासुद्धा वाटत असे. आचार्य अत्र्यांनी प्रहार केला नाही, असा एकही साहित्यिक, समाजसुधारक, राजकारणी त्याकाळात आढळणार नाही.

कित्येकदा अनेक साहित्यिक नि राजकारणी यांची अत्र्यांशी खंडाजंगी होई, वाद जुंपे. आचार्य अत्रे नि बाळासाहेब ठाकरे यांचा वाद सर्वांनाच ठाऊक असावा. यातील सर्वांत गाजलेला वाद म्हणजे आचार्य अत्रे नि पु. भा. भावे या दोन महान साहित्यिकांचा. यात अत्र्यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र इतर वादांत अत्रेच जिंकत, असा इतिहासाचा दाखला आहे. आचार्य अत्र्यांचा स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महापुरुषांसोबतच राम गणेश गडकऱ्यांसारख्या उच्च कोटीच्या साहित्यिकासमवेत निकटचा संबंध होता.

आचार्य अत्र्यांचे सर्वांत मोठे काम म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी बजावलेली बिनीच्या नेत्याची भूमिका. अत्रे म्हणजे या लढ्यातील महाराष्ट्राचे सर्वांत प्रखर, धारदार नि उग्र हत्यार होते. त्यांच्या शब्दशरांनी नि उपहासात्मक टीकेने अवघा महाराष्ट्र आंदोलनासाठी पेटून उठला होता. संघटनेशिवाय एखादा पत्रकार किती टोकाचा नि मोठा लढा देऊ शकतो, याचे ते जिवंत उदाहरण होते, यात शंकाच नाही.

असे असले तरी महाराष्ट्राला अत्र्यांची ओळख विनोदी लेखक नि वक्ता म्हणूनच अधिक आहे ते कवीही होते हे क्वचितच कोणाला ठाऊक असेल. विनोद नि विडंबन अंगातच असल्याने असेल त्यांनी अनेक कवींच्या प्रसिद्ध काव्याचे विडंबन केले आहे.

त्यात केशवसूतांसारख्या काव्याच्या आधुनिक जनकालाही त्यांनी सोडले नाही. त्यांच्या विडंबन रचना ‘झेंडूची फुले’ या काव्यसंग्रहात समाविष्ट आहेत. विडंबन काव्याशिवाय अत्र्यांनी काही मौलिक रचनाही केल्या आहेत त्यातीलच एक ‘आजीचे घड्याळ’ ही कविता आज आपण पाहणार आहोत.

मानवी जीवनात आई इतकेच गोड नाते आजीचे असते, किंबहुना आजी इतके मायाळू नाते आईचेही नसते. आई अभ्यासासाठी तरी मागे लागते, शिक्षा करते; पण आजी मधाळपणे मध्यस्थी करत नातवाला वाचवते. आईला मुलाकडून अपेक्षा असते, ती त्याला म्हातारपणची काठी म्हणते.

पण आजीला नातवाकडून काहीच अपेक्षा नसते, ती केवळ निरलसपणे देत जाते, त्यामुळे नातवांसाठी ती जिव्हाळ्याचे नाते ठरते. ती जर सूज्ञ नि चतुर असेल, तर कुमार वयांतील नातवासाठी आजीचे बोलणे ब्रह्मवाक्य ठरते. अशाच एका प्रेमळ नि चतुर आजीचे वर्णन तिचा कुमार वयातील नातू करताना प्रस्तुत कवितेत सापडतो तो स्वतःलाच विचारतो,

आजीच्या जवळी घड्याळ कसलें आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठें अजुनि हें नाहीं कुणा ठाउक;
त्याची टिक् टिक् चालते न कधिंही, आहे मुकें वाटतें;
किल्ली देइ न त्यास ती कधिं, तरी तें सारखें चालतें !

नातू वर्णन करतो त्या काळात किल्ली दिल्याशिवाय घड्याळ चालत नसे, त्याची टिक् टिक् सारखी चालायची, पण त्याला आश्चर्य वाटते, की आजी घड्याळाला किल्ली देत नाही तरी ते सारखे चालते. शिवाय ते टिक् टिक् न करता चालते, म्हणून त्याला ते मुके वाटते. ते आजीने कोठे ठेवले, असा प्रश्न त्याच्या बालमनाला पडतो. त्यामुळेच त्याला ते चमत्कारिक वाटते. तो म्हणतो, की जर आजीला पहाटे अभ्यासाला उठव म्हणून सांगितले, तर ती न चुकता बरोबर साडेपाचला हाक मारून सांगते,

‘’बाळा झांजर जाहलें, अरवला तो कोंबडा, ऊठ कीं!’’

पहाटे पहाटे उठल्यावर, अभ्यास सरल्यावर ताईशी गंमत-जंमत करताना नि लहान भावासमवेत भांडताना वेळ कसा सरतो तेच कळत नाही, पण त्याचवेळी आजी आठवण करून देते, की

‘’आलीं ओटिवरी उन्हें बघ ! म्हणे आजी,’’ दहा वाजले !
जा जा लौकर !’’ कानिं तो घणघणा घंटाध्वनी आदळे

‘दहा वाजलेत, लवकर शाळेत जा’ असे आजी सांगतेन् सांगते तोच शाळेची घंटा ऐकू येई. कवीने केलेले हे वर्णन वाचताना शाळेची घंटा ऐकू येईल, इतक्या जवळ असलेले घर ही कल्पना नव्या पिढीला नवखीच वाटेल. त्यांच्यासाठी शाळा म्हणजे कोसोदूर असलेले क्षेत्र होय. मुलांसोबत खेळताना कळीकाळाचे भान हरपून जायचो, बरे खेळायला काय, तर चिंध्यांचा चेंडू नि काडीची बॅट पण चाले, विटी-दांडूसाठी तर कोणतेही साधन चाले बरे लपाछपीसाठी सारी गल्ली आपली, असे गल्लीतील कोणाच्याही घरात मुलांना मज्जाव नसायचा.

Acharya P K Atre
सोनेरी स्वप्नं : रिकामटेकडा लेखक

घराचे घरपण शाबूत होते, अशा त्या काळात खेळात हरपून गेलेल्या कवीला हाक मारून आजी सांगायची, चला दिवेलागण झाली ओटीवर ओळीने बसून परवचा म्हणा, आजच्या मोबाईल नि तथाकथित सोशल मीडियाच्या जमान्यात राहणाऱ्या मुलांना या नीरस कल्पनाच वाटतील.

याशिवाय आजी म्हटली, की गोष्टी आल्याच बरे त्याही अशातशा नाही तर भूताखेतांच्या, त्या ऐकताना मजा तर वाटायची पण भीती? ती तर खूपच वाटायची, मग आजीलाच बिलगून बसून त्या गोष्टी ऐकायच्या. आजीच्या तोंडून त्या गोष्टी ऐकताना वाटायचे, रात्र सरूच नये, पण एकदम आजी सांगायची, ‘चला झोपा, अर्धी रात्रं उलटली’ ती असे सांगतेन् सांगते तोच मध्यरात्रीचा चौघडा धिडधांग करत वाजायचा.

कवी सांगतो, ‘आजी केवळ वेळाच नाही तर तिथी, वार ही त्या घड्याळातून सांगायची. इतकेच नाही थंडी, पाऊस, ऊनही तिला त्याच घड्याळातून कळायचे. ‘कवीची प्रतिभा कशी असते पाहा, कवी ज्याकाळी ही कविता लिहित होता, त्याकाळात घड्याळ चावी दिल्याशिवाय चालतच नव्हते नि त्यातून केवळ वेळच कळायची तीही तास मिनिटांत! त्या वेळी कवी ही कल्पना नकळत मांडत होता आणि विज्ञानाची भरारी पाहा, कवीची प्रतिभा तिने व्यापून घेतली. सारे कळू शकणारे घड्याळ प्रत्येकाच्या हातात आले. पण त्यात आजीच्या घड्याळासारखी चमत्कारिकता

नाही, मौज तर मुळीच नाही म्हणूनच कवी सांगतो,
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे, फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

कवीच्या या ओळीतील गाठोडे, फडताळ ज्यांना ठाऊकच नाही, त्यांना या कवितेतील गोडी काय कळणार?

कवीची ही कविता किशोरवयीन बालकाच्या मनातील आजीची प्रतिमा हुबेहूब चितारणारी आहे. मुलाच्या मनात असणारी आजीविषयीची अकृत्रिम ओढ, आजी म्हणजे सर्वज्ञ, जिला सर्वकाही येतेची भावना नि नकळत तिला येणारा गूढत्वाचा स्पर्श व्यक्तवून जाणारी आहे. ज्यांनी ज्यांनी आजीची निर्मळ ममता अनुभवली, आजीसोबत राहिले, केवळ त्यांना नि त्यांनाच ही कविता पुनःप्रचीतीचा अनुभव देणारी आहे.

गंमत म्हणजे कवी आजीचे गूढ घड्याळ ‘कोंबडा आरवणे ‘ म्हणजे पहाट, ‘ओटीवर उन्हे येणे‘ म्हणजे दहाची वेळ, ‘दिवे लागण’ म्हणजे संध्याकाळ असे मुलाच्याच मुखातून वदवत जातो. पण ते शेवटपर्यंत कुठेही स्पष्ट करत नाही.

कारण बालकांच्या मनातील ते कुतूहल, जिज्ञासा नि निरागसता त्याला जशीच्या तशीच रेखाटायची आहे, या बाबी कवीची बालमानसशास्त्राविषयी असलेली जाणच दाखविते. त्यामुळेच असेल श्यामची आईसारखी उत्कट, रम्य नि देखणी कलाकृती तो चित्रपटगृहात आणू शकला, असे वाटून जाते. कळत-नकळत कवीच्या अष्टपैलू प्रतिभेला दाद देऊन वाचक मनोमन म्हणतो ‘अत्रे म्हणजे अत्रेच!’

Acharya P K Atre
दुनियादारी : देखावे ते नवलच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com