

लेखक : राजाराम पानगव्हाणे
सोशल मीडिया हा आज जणू परवलीचा शब्द झाला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मने आज जग मानवाच्या मुठीत आले आहे, हे तेवढेच खरे आहे. मानवी जीवनच आज या मीडियाने व्यापून टाकले आहे. मनुष्य आज सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेला आहे, की तो जणू काही त्यावाचून जगूच शकत नाही.
माहितीच्या महाजालाने मानवी जीवन काही प्रमाणात समृद्ध केले असले, तरी त्यातील खोट्या, बनावट माहितीलाही तो खरे मानू लागला आहे, त्यामुळे अनेक बिकट प्रसंगही निर्माण होत आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशा त्या सोशल मीडियालाही आहेत, हे प्रकर्षाने ध्यानात घेण्याची गरज आहे.
सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अभिनव, अविभाज्य घटक झालेला आहे, असे अनेकांना वाटते. यात तरुण पिढी सोशल मीडियाचा अधिक वापर करते. अनेकांना सोशल मीडिया म्हणजेच सर्व काही आहे, असे वाटू लागलेले आहे. (saptarang latest marathi article by rajaram pangavhane social media advantage and disadvantage)
प्रत्येक गोष्टीत नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यातील कोणती चांगली आणि कोणती वाईट हे आपण समजून घेतले पाहिजे. कुठल्या गोष्टीच्या किती आहारी जायचे, हे आपणच ठरविले पाहिजे. आपण सोशल मीडियाला आपणास जसे दाखवितो, त्यापेक्षा कदाचित आपण अधिक चांगले असतो; पण आपण इतरांचे अनुकरण करतो आणि आपली स्वतःची इमेज त्यातून नष्ट होते.
सोशल मीडियासाठी आपण आहोत की आपल्यासाठी सोशल मीडिया हे स्वतः ओळखले पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःला हरवत चाललो आहोत. सोशल मीडिया आपलं अस्तित्व ठरवत नाही. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आता सोशल डायटची अधिक गरज आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
संपूर्ण जगाला जोडून ठेवते...
सोशल मीडिया हे माध्यम आहे, जे इतर सर्व माध्यमांपेक्षा जरा वेगळे आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि समांतर माध्यम. सोशल मीडिया इंटरनेटद्वारे एक आभासी जग तयार करतो. ज्यात वापरकर्ता म्हणजेच युजर्स कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम वापरून प्रवेश करू शकतो.
सोशल मीडिया हे अपारंपरिक माध्यम आहे. एक आभासी जग तयार करते, ते एक प्रचंड नेटवर्क आहे, जे संपूर्ण जगाला जोडून ठेवते. संवादाचे खूप चांगले माध्यम आहे. यात जलद गतीने माहितीची देवाणघेवाण होते. ज्यात प्रत्येक क्षेत्रातील बातम्यांचा समावेश होतो.
दररोज किमान २० तास सक्रिय
कोणतीही व्यक्ती, संस्था, समूह आणि देश आदींना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या समृद्ध करण्यात सोशल मीडियाची सकारात्मक भूमिका असते. अनेक विकासकामे सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आहेत. ज्यामुळे लोकशाही समृद्ध होण्यास मदत झाली आहे. सोशल मीडियाचा प्रभाव आजकाल आपल्या समाजात इतका वाढला आहे, की त्याने जीवनाची सर्वच अंगे व्यापून टाकली आहेत.
सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. सोशल मीडिया कोण वापरत नाही? सोशल मीडियाचा वापर जवळपास सगळेच करतात. युवा पिढी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. कदाचित ते दररोज सुमारे २० तास सोशल मीडियावर ऑनलाइन असू शकतात. पण, सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट परिणाम आहेत.
कौशल्य सादर करण्याचे माध्यम
सोशल मीडियाच्या वापरात तरुण पिढी इतर वयोगटांपेक्षा अग्रेसर आहे. बदलते तंत्रज्ञान जगातील विविध माहिती ही सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत असल्याने तरुणाईचा कल त्याकडे अधिक आहे. तरुणांनी सोशल मीडियाला आव्हान म्हणूनच स्वीकारले आहे. त्या माध्यमातून अनेक तरुण मंडळी रोजगार मिळविताना दिसत आहे. बदलत्या काळानुसार तरुण बदलले आणि रोजगार उभा करीत आहे.
असंख्य युवा पिढीने सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून रोजगारच नाही, तर प्रसिद्धीही मिळवली. आपल्यातील असलेले गुण आपल्याला अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकविल्या जातात. आजच्या युगात अशी अनेक उदाहरणे देता येतील, की ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करून आपले कौशल्य सादर करून मनोरंजन व रोजगार तर मिळविलाच; पण जगाच्या पाठीवर ते लोकप्रिय झालेले आहेत.
खोटी माहिती अन अफवाही...
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, आपण कोणत्या बाजूकडे लक्ष केंद्रित करतो. त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. सध्याची तरुणाई सोशल मीडियावर जगताना दिसते; पण याच माध्यमातून होणाऱ्या गैरसमजांचेही प्रमाण जास्त आहे.
खोट्या माहितीचा आधार घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा वापर केला जातो आणि असंख्य अशा सामाजिक भेद निर्माण करणाऱ्या अफवा पसरविल्या जातात. यातून अनेक गैरप्रकार व मोठी संकटेही आलेली आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, त्यामुळे आपण सोशल मीडियाच्या आहारी किती गेले पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे.
सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ
सोशल मीडियाचे महत्त्व लॉकडाउनच्या काळात आपल्याला अधोरेखित झाल्याचे दिसून येते. सोशल मीडियाचे काम आता फक्त लोकांना जोडणे एवढे राहिले नसून, तर माहितीचे भांडार, व्यापारवृद्धीचे प्रमुख साधन म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो.
सोशल मीडियाबाबत तरुण पिढीने अधिक सजग व्हावे, या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे गुन्ह्यांची उत्पत्ती झाली व सायबर गुन्हे होण्याचे प्रचंड प्रमाण वाढलेले आहे. या माध्यमातून फसवणुकीचे व ब्लॅकमेलिंगचे अनेक प्रकार वाढले आहेत. सध्या सोशल मीडियावर आपण रोज विविध प्रकारच्या फसवणुकीची अनेक प्रकरणे पाहतो.
अतिरेकानंतर बंदीचे पाऊल
सोशल मीडिया सकारात्मक भूमिका बजावत असताना काही लोक त्याचा गैरवापरही करतात. सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून, असे लोक दुष्प्रवृत्ती पसरवून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारी आणि नकारात्मक माहिती शेअर केली जाते, ज्याचा जनतेवर विपरीत परिणाम होतो. बऱ्याचदा परिस्थिती इतकी विकोपाला जाते की सरकार सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत कठोर निर्णय घेऊ शकते.
जम्मू-काश्मीरसारख्या राज्यात सरकारला सोशल मीडियावर बंदी घालावी लागते, हे आपण पाहिले आहे. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी कोणतीही मोठी घटना घडू नये म्हणून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनादरम्यान सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली होती. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे सोशल मीडियालाही दोन बाजू असतात, त्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन प्रकारात मोडतात.
जीवनात सोशल मीडियाचा प्रभाव
• हे अतिशय जलद संवादाचे माध्यम आहे
• हे एकाच ठिकाणी माहिती गोळा करते
• बातम्या सहज पुरविते
• सर्व वर्गांसाठी आहे, मग तो शिक्षित वर्ग असो वा अशिक्षित वर्ग
• येथे कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारे कोणत्याही सामग्रीचा मालक नाही
• फोटो, व्हिडिओ, माहिती, दस्तावेज आदी सहज शेअर करता येतात
सोशल मीडियाचे दुष्परिणाम
• ती बरीच माहिती पुरविते, ज्यापैकी बरीचशी दिशाभूल करणारी आहे
• माहिती कोणत्याही प्रकारे विकृत केली जाऊ शकते
• कोणतीही माहिती उत्तेजक बनविण्यासाठी बदलली जाऊ शकते, ज्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही
• सामग्रीचा मालक नसल्याने कोणताही मूळ स्रोत नाही
• गोपनीयतेचा पूर्णपणे भंग झाला आहे
• फोटो किंवा व्हिडिओ संपादित करून संभ्रम पसरविला जाऊ शकतो, ज्यामुळे कधी-कधी दंगलीची भीतीही निर्माण होते
• सायबर गुन्हे ही सोशल मीडियाशी संबंधित सर्वांत मोठी समस्या आहे.
( लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रुप आॅफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.