दृष्टिकोन : आयुष्य सुंदर जगण्यासाठी अध्यात्म आवश्यक

Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal

लेखक : राजाराम पानगव्हाणे

आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो.

मनात निर्माण होणाऱ्या चिंता, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वांचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो. आत्तापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून हे समोर आलेले आहे. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on Spirituality essential to live beautiful life nashik)

अध्यात्माचा उपयोग कालही होता, आजही आहे आणि उद्याही निश्चितपणाने असेल. आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना अंतर्मुख करणे म्हणजे अध्यात्म आहे. या क्षेत्राच्या अभ्यासातून एका वेगळ्या विश्वाचा शोध आपण घेऊ शकतो.

जोपर्यंत आपण स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत दुसऱ्याला समजून घेण्यात अडचणी येतात. अगदी आपल्या आई-वडिलांना समजून घ्यायचे असेल तर आधी स्वतःला ओळखणे आवश्यक ठरते. स्वतःबद्दल प्रामाणिक दृष्टिकोन अध्यात्मातून विकसित होऊ शकतो. 

आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तीसाठी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे सर्व काळ सारखे आहेत. त्यामुळे या मार्गाचा उपयोग होतो की नाही? हा प्रश्न उपस्थित होत नाही.

एखाद्या प्रसंग, घटनेविषयी काही लोक निराश होतात तर काही सकारात्मक विचार जोपासून नवीन शिकण्यास इच्छुक असतात. जर आपण वेळेचा चांगला उपयोग, ध्यानाचा अभ्यास शिकण्यात खर्च केला तर तुमच्या मन आणि शरीराला निश्चितपणे त्याचा लाभ होईल. 

प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते, असे शास्त्र देखील सांगते. अध्यात्म देखील एक प्रकारचे शास्त्र आहे. त्यामुळे आपण जे कर्म करतो ते सव्याज आपणास परत मिळते, मग ते चांगले असो अथवा वाईट. 

अ म्हणजे ओंकार, ध्या म्हणजे ध्यान, त्म म्हणजे आत्मतत्त्व असे हे अध्यात्म माणसाला सुंदर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे. त्यासंबंधित विचार गुरूकडून ज्ञान प्राप्त करून अथवा स्वतःच आत्म्याच्या सुखाचा शोध घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे.

Rajaram Pangavane
जातीयतेविरोधात लढाईची स्मृतिस्थळे

दिशाहीन आयुष्यात अध्यात्म निश्चितपणाने दिशादर्शक आहे. केवळ अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी जगणे पशुवत आहे. पशुवत जीवनासाठी बुद्धीची गरज नसते. आयुष्यात वरचा स्तर गाठायचा असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही.

शांती, समाधान, सुख, आनंद अनुभवण्यास वैराग्याची जोड असायला हवी. वैराग्य म्हणजे सगळ्याचा तिटकारा नाही, तर कुठे थांबले पाहिजे, कशाला नाही म्हटले पाहिजे याचे ज्ञान संपादन करून अर्थपूर्ण जीवन व्यतीत करणे होय. 

काळाप्रमाणे माणूस बदलत असला तरी इतर प्राणीमात्रात बदल होत नाही. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुःखाची सुरुवात सुखातून भौतिक मार्गातून होत असते.

आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी माणसाचा जन्म आहे. सैरावैरा बाहेर धावणारी इंद्रिये, मन यांना काबूत ठेवण्यासाठीच अध्यात्म महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अध्यात्म मार्ग कोणी स्वीकारावा कोणी नाकारावा हे सर्वस्वी वैयक्तिक पातळीवर अवलंबून आहे.

अध्यात्म केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी उपयोगी पडणे देखील अपेक्षित आहे. त्यामुळे ज्ञानात भर पडण्यासाठी सत्संग, बैठक, प्रवचन, कथावाचन करुन सामुदायिक आरती, मंत्रपठणासारख्या उपक्रमांचे अलीकडच्या काळात महत्त्व वाढलेले दिसून येते. 

अशावेळी जे लोक तेथे उपस्थित राहू शकत नाहीत ते सगळे सरसकट नास्तिक आहेत, असे म्हणता येणार नाही. याच्या अगदी विरुद्ध म्हणजे जे लोक तेथे हजेरी लावतात ते सर्वच धार्मिक आहेत, असेही म्हणता येणार नाही. 

अध्यात्माची सुरुवात करणे सोपे आहे. पण त्याचा सखोल अभ्यास करणे सर्वांनाच जमतेच असे नाही. ज्यांना अध्यात्माचा गूढ रहस्याचा गाभा कळला त्यांनी लोकांना अनुग्रह दिला व स्वतः चिरशांती घेत विजय मिळवला. तेव्हा ज्यास जे जमेल त्याने ते करावे पण दुसऱ्यास नास्तिक म्हणून घोषित करू नये.

अध्यात्म-म्हणजे ‘अधि आत्म’ म्हणजे स्वतकडे पाहणे. अर्थातच स्वतःकडे पाहण्यात आत्मपरीक्षण येते. त्यातूनच आपल्या जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ काय, याचा विचार सुरू होतो. मग एक‘पूर्णत्वा’ची आस निर्माण होते.

आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे, त्याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय, कार्य काय, हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता असेही म्हणता येईल. 

Rajaram Pangavane
महिलांच्या आत्मशक्तीचा हुंकार

अध्यात्म आणि धर्म या गोष्टी समान नाहीत. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव, अशी शक्ती किंवा असे ‘कोणीतरी’ असते हे आध्यात्मिक माणूस मानतो अथवा नाही मानत.

आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन, निरूपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभाग घेणे, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनशक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी ‘स्व’ चा शोध घेतला जातो.

एखादे संकट आले की परिस्थितीला दोष देत बसले की मन निराश होते. पण ‘देवाला बहुधा या प्रसंगातून मला काही तरी शिकवायचे आहे’ किंवा ‘देव जे करतो ते भल्याकरताच’ असे म्हणणाऱ्या व्यक्तीला पटकन निराशा येत नाही.

अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्यात बदल होतात. अंत:स्राव करणाऱ्या संस्था आणि प्रतिकारशक्ती यामध्ये अनुकूल बदल घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून शारीरिक आणि मानसिक संरक्षण होते.

ताणतणावामुळे बिघडलेली मानसिक स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो.

आपत्तीनंतरच्या काळात आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या उपदेश- प्रवचनांचा अतिशय सकारात्मक उपयोग होतो, असे अलीकडच्या काळात बघावयास मिळते. मानसिक उपचारांमध्येदेखील आध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे.

देऊळ, देवळातले वातावरण, भजन-कीर्तन, नामस्मरण, चर्च-मशिदीतील वातावरण या सगळ्याचा आध्यात्मिकता वाढण्यासाठी उपयोग होतो.

योग, प्राणायाम आणि ध्यान केल्यामुळे चिंता, उदासपणा, हृदयरोग, अतिरक्तदाब अशा अनेक विकारांमध्ये उपयोग होतो. स्वतःकडे ‘बघण्याची’ सवय होते. लक्ष केंद्रित करता येते. वर्तमानात जगण्याची शिकवण मिळते.

अशा गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते. आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते.

नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कालाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. निसर्गाच्या सान्निध्यातही एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते.

(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

Rajaram Pangavane
मासेपियन्स!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com