हिवाळ्यातली हिरवळ (माधव गवाणकर)

madhav gawankar
madhav gawankar
Updated on

आठवणींची साठवण हा साठीनंतरचा केवढा दिलासा आहे! जुना काळच आपल्याला पुन्हा धीर देत असतो. भूतकाळ हा आपला मित्रच असतो की! प्रेमळ भूत आरामखुर्चीत येऊन बसावं तसा तो भासतो.

स्किझोफ्रेनियाचा त्रास असलेल्या मित्राशी गप्पा करायला मी सावकाशपणे चालत निघालो होतो. उगाच कशाला धावतील
ज्येष्ठ नागरिक! आम्हाला कुणाशी रेस लावायची आहे? त्यात मी एकटवाणा माणूस. मात्र, ‘सिंगल स्टेटस’ अभिमानानं टिकवताना इतरांसाठी सतत काहीतरी चांगलं करण्यात माझ्या आयुष्याचा हा हिवाळा सार्थकी लागतो आहे. कानटोपी घातली की चालला गडी उपक्रमासाठी! रोजच्या दिनक्रमात उपक्रम हवाच; पण माझ्या बाबतीत हे उपक्रम, कार्यक्रम धार्मिक नसतात, मार्मिक मात्र असतात. नव्या, उमद्या कलाकारांनी अरुण दाते यांची आठवण काढत त्यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित झालेली गाणी पुन्हा म्हणून दाखवण्याचा कार्यक्रम ठेवलेला असतो, मग जा तिकडे...! तरणाबांड ओंकार म्हणतो: ‘‘आमच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला याल का? या वेळी लेखकाला बोलावून गप्पा मारायच्या आहेत. मग तिकडे एखादी फेरी मार...सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, वेड्यात जमा असलेला मित्र सुधारल्यानंतर आज त्याला बरोबर घेऊन मॉर्निंग वॉकला निघालो होतो...म्हणजे थोडक्‍यात, निवृत्त जीवन सत्प्रवृत्त होऊन आपण जगलो तरच म्हातारपण नावाच्या निष्पर्ण मोसमात परत हिरवळ दिसेल. नाव नसलेली रंगीत फुलंसुद्धा फुलतील!

स्किझोफ्रेनिक दोस्त मला म्हणाला : ‘‘गवण्या, मला मरणाची फार भीती वाटते रे. मी सारखा धास्तावलेला असतो. तुला लेका अनुभव नाही, माझी बायको सारखी कटकट, वटवट करते की, ‘असे उदास का बसून राहता? किती भकास दिसता...स्मोकिंगवर तुमचा किती खर्च होतो ते एकदा काढा! अशी कितीशी पेन्शन बसलीय तुम्हाला!’
मी मुलाकडे साधा स्वेटर मागितला तर तो म्हणाला, ‘जुना आहे तोच वापरा.’
नवी मफलरसुद्धा देत नाहीत मला. खरं सांगू गवणू, ताज्या दुधाची चव दुधाच्या पावडरला नाही; पण हे आमच्या घरचे लोक पावडरच वापरतात. म्हणतात, रोज २७ रुपयांची पिशवी कशी परवडणार?’’ संसारातली सापशिडी अशी माणसाला कधी चढवते, कधी रडवते. परिस्थिती जिभल्या चाटत येते व माणसाला गिळते. काळजात कळा उठतात. या धास्तीमुळे माणूस खचतो व लवकर मरतो. मी परिचारिकांना मानसशास्त्र शिकवायचो तेव्हा हेच सांगायचो, की पेशंटला चिंतामुक्त करा. त्याला खचू देऊ नका. आपली मुलगी किंवा सूनच आपली सेवा करतेय, मनापासून करतेय असा फील म्हाताऱ्याला किंवा म्हातारीला यायला हवा!

जगात देव आहे की नाही मला माहीत नाही. जगण्याच्या एकूण भोवऱ्यात तसा प्रत्यय काही येत नाही; पण पानगळीच्या पायवाटेवर माणूस माणसासाठी खूप काही करू शकतो. कर्मकांडाच्या कैफात, गोंगाटाच्या ‘शोरशराब्या’त नेमकं तेच आपण विसरत चाललो आहोत. ३१ डिसेंबरच्या रात्री तरुण पिढी जे काही वागते त्याची चिंता, खेद कुणालाच दिसत नाही. म्हणजे, देशाची ही अनमोल संपत्ती आपण अक्षरशः वाऱ्यावर सोडली आहे. मला या वाट चुकलेल्या नव्या दमाच्या प्रवाशांसाठी समुपदेशन करावंच लागतं व आनंदाची बाब अशी, की काही मुलं माझं ऐकतात, मी सांगितल्यानुसार वागतात.
हिवाळा दरवर्षी अधिक तीव्र वाटतो. मात्र, खरं तर आपणच अधिक थकलेले असतो. निसर्गापुढं वाकलेले असतो; पण सुगम संगीत मला ऊर्जा देतं. तरंगत फुलपाखरं यावीत तशी ती जुनी गाणी मी आकाशवाणी या माझ्या आवडत्या माध्यमातूनच ऐकतो.

पुणे नभोवाणी इकडे आमच्या कोकणात स्पष्ट ऐकू येते. ‘गगनी उगवला सायंतारा’ ऐकताना मी लहानपणी अनुभवलेलं पुणं आठवतो. काका मला पुण्यातले नामवंत कलावंत-विचारवंत येता जाता दाखवत. मी पाहुणा म्हणून आलो की, ‘पुणे बघणे’ असा एक कार्यक्रम असायचा. शिवाजीनगरला गेलो की, ‘तू जो ‘बालोद्यान’ कार्यक्रम ऐकतोस ना तो इथून सादर करतात बरं का!’ असं म्हणत वडील मला ‘आकाशवाणी’ची इमारत दाखवत. नभोवाणी शेतकरी मंडळ सुरू झालं तेव्हा वडील स्वतः सरकारच्या संशोधन विभागात काम करत होते व मंडळाच्या कार्यक्रमाचे सर्वेक्षण अहवालही त्यांना दाखल करावे लागत. व्यंकटेश माडगूळकर, ज्योत्स्ना देवधर, पुरुषोत्तम जोशी, रजनी मुथा, गोपीनाथ तळवळकर, नेमिनाथ उपाध्ये, सई परांजपे...अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांची स्वरावली आठवत राहते. आठवणींची साठवण हा साठीनंतरचा केवढा दिलासा आहे! जुना काळच आपल्याला पुन्हा धीर देत असतो. भूतकाळ हा आपला मित्रच असतो की! प्रेमळ भूत आरामखुर्चीत येऊन बसावं तसा तो भासतो.

सोनेरी दुपार तिचे परीसारखे पंख पसरते तेव्हा तीन चिमुकली फुलं माझ्या घरट्यात इंग्लिशचं व्याकरण व थोडंबहुत संभाषण शिकायला म्हणून येतात. हे बाबा (कोकणात आजोबांना बाबा म्हणतात व वडिलांना पप्पा म्हणतात) एकटे कसे काय राहतात, असं मनात येऊन त्या बाळांना माझ्या ‘वन पर्सन फॅमिली’चं जरा नवलच वाटत असतं. अभ्यास झाल्यावर त्यांना एखादी छोटीशी मजेदार गोष्ट सांगणं माझ्यासाठी ‘कम्पलसरी’ असतं. पुण्यातून प्रकाशित झालेलं माझं ‘झकास गावच्या गोष्टी’ हे पुस्तक मला या कामी उपयोगी ठरतं. ऋतू कितीही बदलले तरी छोट्या मुलांना ‘स्टोरी’ ही लागणारच, मग माध्यम कोणतंही असो आणि अशा ज्या अक्षय्य बाबी आहेत त्यांतूनच जगण्याची खरी शाश्‍वती आपल्याला लाभते. मला माझं पान झाडावरून गळण्याआधी हे सांगायचं आहे, की नुसता श्‍वास सुरू आहे म्हणजे आपण जगतो असं नाही, तर पोटासाठीची दगदग, धावपळ संपून व शांत-निवांतपणे जगण्याचा जो काही अल्प-स्वल्प वा दीर्घ-प्रदीर्घ काळ आपल्या वाट्याला येईल त्या काळात जगताना आपण कसं बहरायचं याचं नियोजन करायला हवं. पटतंय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com