साफल्य (महादेव बी. बुरुटे)

mahadev burute
mahadev burute

संपतरावांचं मन दहा-बारा वर्षं मागं गेलं..दिवस पावसाळी होता. श्रावण-भाद्रपदचे दिवस होते. रात्रीचं जेवण करून ते गच्चीवर शतपावली करत होते. नर्मदाबाई आत आवराआवर करत होत्या. मफलर घेण्यासाठी म्हणून संपतराव हॉलमध्ये आले आणि तेवढ्यात दरवाजा धाडकन बंद झाला. एक वीस-बावीस वर्षं वयाचा तरुण वेगानं आत आला. त्याचा अवतार बघून संपतराव खूपच घाबरले. दाराचा आवाज ऐकून नर्मदाबाईही आत आल्या. हा प्रकार बघून त्या जवळपास किंचाळल्याच, पण घडलं उलटंच...

‘‘अहो, ऐकलंत का? ’’ नर्मदाबाई किचनच्या दरवाजातून ओरडल्या; पण काहीच उत्तर किंवा हालचाल जाणवली नाही, तशा त्या पुन्हा जरा बाहेर येत म्हणाल्या,
‘‘अहो, ही अमेरिका नाही म्हटलं. बघा, सूर्यनारायण थेट आत आलाय. मावशीनं निम्मं अर्धं घरकाम आवरत आणलंय. उठा लवकर, नाहीतर चहा मिळणार नाही, बरं का.. ’’
हे ऐकताच अंथरुणावर पडलेले संपतराव उठून बसत म्हणाले, ‘‘ एक वेळ संजीवनी नाही दिली तर चालेल; पण चहा तर हवाच. हे बघ आवरतोच लगेच.’’
संपतराव किचनमध्ये आले. डायनिंग टेबलवर पोह्याच्या डिश ठेवलेल्या होत्या. एका डिशजवळ ते बसले. नर्मदाबाई आधीच तिथं बसलेल्या होत्या. इतक्यात मावशी चहाचा ट्रे घेऊन आली. सोबत पार्ले बिस्किटं होतीच. दोघांनीही चहा घेतला. संपतरावांनी बिस्किटंही घेतली. मावशीलाही आग्रह करून चहा घ्यायला लावला. ती अंग चोरून बसल्यागत एका बाजूला जरा दूर खुर्चीवर बसून चहा प्यायला लागली. संपतराव पोह्याची बशी घेत मिश्किलपणे म्हणाले, ‘‘ अरे बापरे, शेंगदाणे जरा जास्तच सांडलेत वाटतं पोह्यांत.. ’’
‘‘एवढे काय नको बरं टोकायला. जणू काय तुम्हाला नकोच असतील.’’
‘‘आवरा जरा लवकर.’’ ‘‘ आज काय प्रोग्रॅम आखलाय?’’
‘‘जरा माझ्या त्या चुलत बहिणीस भेटून येऊया.’’
‘‘अहो, अमेरिकेतून येऊन आता कुठे पंधरा दिवस होतील, तोपर्यंत पंचवीसभर आप्तेष्टांना भेटलोय आपण. दोन-चार दिवस विश्रांती घेऊ जरा... ’’
‘‘होय हो, पण अजयनं लवकरच परत बोलावलं म्हणजे जावं लागेल. नातवंड आहे लहान. ते दोघंही ड्युटीवर जातात. ’’
‘‘पाच-सहा नोकर आहेत तिथं. कशाला उगाच काळजी.. ’’ नर्मदाबाई म्हणाल्या.
‘‘मायेच्या माणसांची सर नोकरांना येणार नाही.. ठीक आहे. असू द्या अन् व्हा तयार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.. हेच खरं,’’ असं म्हणत संपतराव हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. जराशानं हॉलमधला फोन वाजू लागला. त्यांनी रिसीव्हर घेतला.
‘‘हॅलो, बोला... काय? कोण?.... कोण बंडू?.. बरं. हो का... हो हो तू होय... घसा बसलाय का.. अरे तुझा आवाज जरा वेगळा आला.. हो का.. आम्ही?.. ... हो घरी आहोत आहोत... ये ये नक्की ये... काय?.... हो का....खूप खूप छान... ये ये.. आनंदच होईल.. ये ये...’’ संपतरावांनी रिसिव्हर फोनवर ठेवला. दरम्यान हा संवाद ऐकून नर्मदाबाईंनी विचारलं,‘‘कुणाचा फोन?’’
‘‘अगं तो आपला बंडू. ’’
‘‘आपला बंडू? हा आणि कोण बाई? ’’
‘‘अगं आपला मानलेला मुलगा...’’
‘‘हो हो.. एवढं काय सांगायची तसदी घेऊ नका हं. काय म्हणतोय तो? आणि मला न बोलताच फोन ठेवला? विसरला वाटतं... कान पकडते त्याचा, येऊ द्या तर नुसता.. ’’
‘‘तुला विसरतोय तो? कधीच नाही. तो येतोय दुपारी आपल्याला भेटायला. हो आणि बायकोला व मुलींनाही घेऊन इकडेच जेवायला येणार आहे..’’
‘‘हो ना. थांबा हं. जास्ती कणीक भिजवायला सांगते मावशीला.. ’’
‘‘अगं नको, तो तिकडूनच जेवण घेऊन येणार आहे. त्यात तुझ्या आवडीचा गोड दहीभात व माझे पालकाचे पराठे आणणार आहे.’’
‘‘हो.. ध्यानात ठेवलंय गुलामानं...’’ म्हणत स्वयंपाक करु नको म्हणून सांगायला नर्मदाबाई किचनमध्ये गेल्या...
...संपतरावांचं मन दहा-बारा वर्षं मागं गेलं..दिवस पावसाळी होता. श्रावण-भाद्रपदचे दिवस होते. रात्रीचं जेवण करून ते गच्चीवर शतपावली करत होते. नर्मदाबाई आत आवराआवर करत होत्या. आभाळ भरून आलं होतं. चंद्र होता,पण ढगाळ वातावरणामुळे जास्त उजेड पडला नव्हता. अधूनमधून वीज चमकत होती. गार वाराही सुटला होता. मफलर घेण्यासाठी म्हणून संपतराव हॉलमध्ये आले आणि तेवढ्यात काय झालं कुणास ठाऊक, पण दरवाजा धाडकन बंद झाला. एक वीस-बावीस वर्षं वयाचा तरुण वेगानं आत आला. वाढलेली दाढी, केस, मळकट फाटके कपडे, एकूण त्याचा तो अवतार बघून संपतराव खूपच घाबरले. दाराचा आवाज ऐकून नर्मदाबाईही आत आल्या. हा प्रकार बघून त्या जवळपास किंचाळल्याच, पण घडलं उलटंच, कारण तो तरुण त्यांच्यापुढे हात जोडून ‘‘मला वाचवा...पोलिस पाठलाग करत आहेत माझा.. इथं नाही म्हणून सांगा.. लपवा मला... ’’ अशी आर्त विनवणी करत होता. इतक्यात दारावर टकटक झाली. तो जास्तच भेदरला. ‘‘मी नक्की मदत करीन, पण तू खरं काय ते सांगायला हवं... ’’ असं संपतरावांनी म्हणताच त्यानं मानेनंच ‘हो’ अशी खूण केली. पुन्हा दरवाजा खटखटला. संपतरावानी तो उघडला. पोलिस होते. ते आत आले. बंडूला पाहताच ‘अरेस्ट हिम’ अशी ऑर्डर सुटली. दोन पोलिस पुढे होऊ लागताच ‘थांबा, मलाही कायदा मान्य आहे. मी तुमच्या हवाली त्यास करणारच आहे,’ असं म्हणत त्यांनी बंडूला त्याचा गुन्हा विचारला. तो किरकोळ होता. त्यानं भूक लागली म्हणून एका दुकानदाराचा डोळा चुकवून गल्ल्यातले काही पैसे चोरले होते. संपतरावानी त्याला ‘काळजी करू नको. मी तुला सकाळी जामीन देऊन सोडवून आणतो,’’ असं म्हणत पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिस त्यास घेऊन गेल्यावर नर्मदाबाई म्हणाल्या, ‘‘बरं झालं बाई. ब्याद टळली. जामीनबिमीन काय होऊ नका तुम्ही.’’

‘‘अगं, तो खरोखर तसा गुन्हेगार वाटत नाही. आपल्या थोड्याशा मदतीनं एखाद्याचं जीवन सुधारलं तर सुधारलं.’’ यावर नर्मदाबाई काहीच बोलल्या नाहीत.
दुसऱ्या दिवशी त्यांनी बंडूला सोडवलं आणि त्याला एका खानावळीत पोटभर जेवू घातलं. जेवताना त्यानं जे सांगितलं, ते ऐकून संपतराव विचारमग्न झाले.... धारावीच्या झोपडपट्टीत त्याचा जन्म झाला होता. आई-बाप किरकोळ कामं करून गुजराण करीत. बाप व्यसनी होता, यात नवल नव्हतं. तो गुन्हेगारी जगताच्या नादी लागला आणि कुठंतरी मारला गेल्याचं आईनं सांगितल्याचं त्याला पुसटसं आठवत होतं. तो चार-पाच वर्षांचा असताना आईवरही अत्याचार झाले. तिची मानसिक स्थिती बिघडली. अशीच एकदा ती भटकत असताना कोणीतरी नजर ठेवून त्याला पळवून नेलं आणि दोन-तीन दिवसांनी एका हॉटेलसमोर त्याला उभं करून तो पळवून नेणारा आत गेला. तिथं हा भरकटला आणि चुकामूक होऊन सैरभैर झाला. पोटासाठी कुणी दारात उभा करेना. खरी माहिती नसल्यानं उगाच ब्याद नको या भावनेनं त्याला कुठं थारा मिळेना. असाच भटकत तो ठाण्यात आला. कुठं काम मिळायचं, कधी नाही असं करत करत लहानसहान गुन्हेगारी त्याच्या अंगात मुरली. बऱ्याचदा पोलीस विनाकारणच संशयित म्हणून पकडून न्यायचे. पाच-दहा दिवस ठेवून सोडून द्यायचे. त्या दिवशीही असंच करता जरा मोठी चोरी केली होती..
संपतरावांना त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा जाणवत होता. संधी मिळाली तर सुधारण्याची शक्यता जाणवत होती. त्याला सुधारून रांकेला लावण्याचं त्यानी मनोमन ठरवलं.

‘‘आमच्या घरी काम करशील का?’’ असं संपतरावांनी म्हणताच त्यानं आनंदानं होकार दिला आणि संपतरावांच्या त्या ‘श्रमसाफल्य’ या बंगल्यात किरकोळ कामांसाठी तो येऊ लागला. लवकरच त्याच्यात सुधारणा दिसू लागली आणि त्याचा प्रामाणिकपणाही जाणवू लागला. तो बंगल्याची उत्तम निगा राखू लागला आणि संपतराव व नर्मदाबाई समाधानी झाले. लवकरच त्यांनी त्याला एक खोली घेऊन दिली. ओळखीनं एका कंपनीत नोकरीही लावून दिली. खोलीचं कर्ज फेडण्याची सोय झाली. स्वतः जबाबदारी घेऊन निराधार संस्थेतल्या एका मुलीशी त्याचा विवाहही लावून दिला आणि संसारालाही लावलं. चार-सहा वर्षांत संसारवेलीवर दोन कळ्याही उमलल्या आणि एक कदाचित वाया जाणारं जीवन सुमार्गी लागलं. संपतराव आणि नर्मदाबाई यांना मनस्वी समाधान झालं. तोही यांना आई-वडिलांच्या ठिकाणी मानू लागला. दरम्यान, हे दोघं अमेरिकेत नोकरीनिमित्त असलेल्या अजयकडे वर्षातला बराच कालावधी राहू लागले आणि बंडूच त्यांच्या घराची देखभाल करू लागला. ते वर्षातले काही महिने फक्त काही कामानिमित्त भारतात येत. तसेच याही वेळी आले होते आणि आता त्यांना भेटण्यासाठीच बंडू सहकुटुंब येणार होता....

संपतरावांचा पेपर वाचण्यात आणि नर्मदाबाईंची इकडची तिकडची उठाठेव होईपर्यंत दुपारचे बारा-साडेबारा झाले आणि बंडू सहकुटुंब आला. त्याच्या लहान मुलींनी ‘आजी’ म्हणत नर्मदाबाईंच्या गळ्यात मिठी मारली. त्यांनीही प्रेमानं त्यांच्या डोक्यावरून, तोंडावरून हात फिरवला. ‘‘थांबा हं.. तुम्हाला गंमत देते.. ’’ म्हणत नर्मदाबाईंनी कपाटातून खास त्यांच्यासाठी आठवणीनं आणलेल्या बार्बी डॉल त्या दोघींना दिल्या. मुली जाम खूश होऊन पाखरागत भिरभिरू लागल्या. सर्वांनाच कौतुक वाटलं. बंडू आणि वंदनानं नर्मदाबाई आणि संपतरावांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत सर्वांनी आवडीचं जेवण केलं आणि सारे पुन्हा हॉलमध्ये येऊन बसले. बोलताबोलता नर्मदाबाईंना बंडूला आईविषयी काळजीनं विचारलं, ‘‘आईचा काय पत्ता लागला का..’’

‘‘नाही ना.’’ एकदम हळवा होत बंडू सांगू लागला, ‘‘खूप शोधलं, पण कुठंच नाही सापडली अजून. असेल तर कुठं वणवण भटकत असेल कुणास ठाऊक ... ’’ त्याच्या डोळ्यांतून आसवं टपकली. हे पाहून नर्मदाबाई म्हणाल्या, ‘‘अरे नक्कीच सापडेल. चिंता करू नको..’’
संपतरावांनीही मायेनं त्याच्या पाठीवर हात ठेवला.
‘‘केवळ तुमच्यामुळे आज मी स्वप्नातही नसलेलं जीवन जगतोय. हे बघून त्या माऊलीस नक्कीच आनंद होत असणार. तुम्हीच माझे आई-वडील आहात, बाबा.’’ भावविवश होत बंडू म्हणाला.
‘‘हो, तुला परका मानतच नाही आम्ही. जसा आमचा अजय, तसाच तूही आमचा मुलगाच,’’ नर्मदाबाईंनीही दुजोरा दिला.
त्यांच्या गप्पागोष्टींत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. शेवटी तो दोघांनीही त्याच्या खोलीवर एकदा येण्याचं वचन घेऊन परत निघाला. त्या सर्वांना निरोप देण्यासाठी संपतराव आणि नर्मदाबाई गेटपर्यंत गेले, तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर साफल्याचं समाधान विलसलं होतं....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com