अबोल संवाद साधणारी कलाकृती (महेश काळे)

mahesh kale
mahesh kale

‘अनरीड’(unread) ही शॉर्टफिल्म तुम्हाला बालपणात घेऊन जाईल, एक छानसा फेरफटका मारून आणेल, आणि हो, दीर्घकाळाकरता तुमच्या काळजात घरही करून बसेल. फिल्मचा कालावधी पंधरा मिनिटांचा आहे; पण तो कुठंही अपुरा किंवा ताणलेला वाटत नाही. अत्यंत चपखलपणे सर्व प्रसंगांची मांडणी करताना, त्यांना व्यवस्थितपणे फुलवताना दिग्दर्शकानं त्याचं कौशल्य पणाला लावलंय. यात प्रत्यक्ष संवाद नाहीत; पण सीन्सनंतर येणाऱ्या टायटल्स आणि वाक्यांच्या रूपात ही फिल्म तुमच्याशी संवाद साधू पाहते.

काही कलाकृती कळत नकळत आपल्या नजरेआड होतात. फार गवगवा होत नाही त्यांचा; पण जेव्हा कधी या कलाकृती आपल्या बघण्यात येतात, तेव्हा आपल्याला कळून चुकतं, की आपण इतकी वर्ष काय मिस् केलंय. साधारण पाचेक वर्षांपूर्वी आलेली ‘अनरीड’(unread) नामक शॉर्टफिल्म याच सदरात मोडणारी आहे. ‘अनरीड’ ही शॉर्टफिल्म ‘सायलेंट मूव्ही’ या प्रकारात मोडणारी आहे. ती तुम्हाला बालपणात घेऊन जाईल, एक छानसा फेरफटका मारून आणेल, आणि हो, दीर्घकाळाकरता तुमच्या काळजात घरही करून बसेल. फिल्मचा कालावधी पंधरा मिनिटांचा आहे; पण तो कुठंही अपुरा किंवा ताणलेला वाटत नाही. अत्यंत चपखलपणे सर्व प्रसंगांची मांडणी करताना, त्यांना व्यवस्थितपणे फुलवताना दिग्दर्शकानं त्याचं कौशल्य पणाला लावलंय.
ही फिल्म तुम्हाला चार्ली चॅप्लिन युगाची आठवण करून देते. यात प्रत्यक्ष संवाद नाहीत; पण सीन्सनंतर येणाऱ्या टायटल्स आणि वाक्यांच्या रूपात ही फिल्म तुमच्याशी संवाद साधू पाहते. ‘चार्ली चॅप्लिन’ यांच्या फिल्म्सचं एक वैशिष्ट्य असायचं. त्या आपल्याला हसवायच्या; पण त्याचबरोबर कुठंतरी अंतर्मुखही करायला लावायच्या आणि हसता हसता हलकेच कधी आपल्या डोळ्यातून पाणी यायचं हे आपल्याला कळायचंदेखील नाही. तद्वत सहज सुंदर आणि मनाच्या हळुवार कोपऱ्यात जाऊन बसणारी अशी ही शॉर्टफिल्म आहे.

मुंबईसारख्या किंवा त्यासदृश्य शहरामध्ये याचं कथाबीज पेरलेलं आहे. या अवाढव्य शहरात हजारो अनाथ मुलं रस्त्यावरच आपलं आयुष्य कंठतात. दिवसभर काबाडकष्ट करायचं, मिळेल ते काम करायचं आणि रात्रीला रस्त्याकडेलाच पथारी टाकून झोपायचं. मोकळं आभाळ हेच त्यांचं छत आणि इथले रस्ते, गल्लीबोळ हेच त्यांचे आयुष्य आणि तेच त्यांचं विश्व. त्यांच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं फार मोठी नाहीत; पण ती स्वप्न पाहतानादेखील समाजातली आजूबाजूची गिधाडं त्यांच्यावर टपलेलीच असतात. एका सर्वेक्षणानुसार अशा मुलांची संख्या देशात नऊ-दहा लाखांच्या आसपास आहे.
आपल्या फिल्मचा नायकही या अशा मुलांपैकीच एक आहे. गरिबीचा आणि परिस्थितीचा बळी ठरलेला. ही भूमिका साकारली आहे ‘मणी’ या गुणी बालकलाकारानं. कथेत आणखी एक महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे पोलीस हवालदाराचं. हा रोल साकारला आहे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक टिनू आनंद यांनी. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले टिनू आनंद यांनी या हवालदारातला बेरकीपणा, त्याचे हावभाव आणि विशिष्ट शैली या सगळ्या गोष्टींना परिपूर्ण न्याय दिला आहे. हा रोल पाहताना प्रसंगी मराठीतल्या पांडू हवालदारचीही आठवण येते. रस्त्यावरच्या या अनाथ मुलांकडून रस्त्यावर राहण्याच्या बदल्यात तो पैसे गोळा करत असतो. आपल्या नायकाची तरी यातून कशी सुटका होणार?

हा अनाथ मुलगा सिग्नलवर थांबणाऱ्या कार्सच्या काचा पुसून, साफ करून, त्यातून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करायचा प्रयत्न करतोय. अर्थात या पैशांवर बाकी गुंड प्रवृत्तीच्या मुलांचादेखील डोळा आहेच की. अशाच एका प्रसंगी त्याची भेट त्याच्याच वयाच्या एका गोड, निष्पाप चेहऱ्याच्या मुलीशी होते. ही गोड चेहऱ्याची मुलगी म्हणजेच या फिल्ममधलं तिसरं महत्त्वाचं पात्र. ती साकारली आहे रोशनी वालियानं. ही मुलगी त्याला हवालदाराच्या तावडीतून सुटण्यासाठी इशारा करून मदत करण्याचा प्रयत्नदेखील करते. हा प्रसंग खूपच छान जमून आला आहे. त्या दोघांनीही या सीनमध्ये डोळ्यातून जे काही भाव दाखवले आहेत, त्याला खरंच तोड नाही. त्या दोघांच्याही डोळ्यातली चमक, अलगदपणे आपल्या मनाला स्पर्शून जाते.

पुढच्या भेटीत या दोघांचीही चुकामुक होते. रस्त्यावरच वाढलेली इतर काही टारगट मुलं, त्यांचा ग्रुप या अनाथ मुलाला धाक दाखवून मारपीट करतो. नंतर ती मुलगी आपल्या नायकाला एक चिठ्ठी देते; पण लिहितावाचता येत नसल्यामुळे त्याची पंचाईत होते. त्यावेळची हतबलता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवते. चिठ्ठीत काय लिहिलंय याची उत्सुकता असतानाच, हवालदाराच्या हातून कळत-नकळतपणे ती चिठ्ठी फाडली जाते आणि तिचे तुकडे होतात; पण आपला नायक जिद्द सोडत नाही. हे फाटलेले तुकडे तो पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो. अशातच टारगट मुलांचा पाठलाग चुकवण्याच्या नादात तो ती चिठ्ठी पुन्हा गमावून बसतो. मात्र, सुदैवानं ही चिठ्ठी पुन्हा पोलिस हवालदाराच्या हाताला लागते. आपल्याकडून अनवधानानं झालेली चूक सुधारण्यासाठी आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावरती पुन्हा हसू आणण्यासाठी तो ती चिठ्ठी एकसंध करून त्या अनाथ मुलाच्या हातात देतो. त्याची अडचण ओळखून त्याला ती वाचूनही दाखवतो. हा हवालदार हा काही मूळचा वाईट नाही. खरंतर पूर्णपणे चांगलं किंवा पूर्णपणे वाईट कोणीच नसतं. आपल्या प्रत्येकातच षडरिपु दडलेले असतात. त्याच्याही काही वैयक्तिक अडचणी असतील. तोही एखाद्या व्यवस्थेचा बळी ठरलेला असेल; पण या सगळ्यातून सरतेशेवटी तो स्वतःतली माणुसकी जागवतो आणि एका लहान मुलाच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी का होईना, खुशी आणण्याचा प्रयत्न करतो.

या फिल्मचा नायक आपल्याला वेगवेगळ्या रूपात भेटतो. ही वेगवेगळी रूपं म्हणजे त्याची स्वभाववैशिष्ट्यं नसून, निरागस- निर्मळ प्रेम, समाधान, इच्छा-आकांक्षा, आशा, स्वप्न यांची प्रातिनिधिक स्वरूपातली उदाहरणंच आहेत. उदाहरणार्थ, रात्रीच्या आकाशात चंद्राकडे बघणारा एक आशावादी मुलगा, भिंतीवर स्मायली काढणारा एक हसतमुख मुलगा, चिठ्ठीतला मेसेज समजण्यासाठी आसुसलेला आणि तो कळताच हर्षभरित होणारा किंवा फाडलेली चिट्ठी एकत्र करण्यासाठी झगडणारा एक प्रयत्नवादी आणि समाधानी जीव.

‘सायलेंट मुव्ही’ प्रकारात भावनांचा, चेहऱ्यावरच्या भावांचा एका विशिष्ट पद्धतीनं वापर केला जातो. किंबहुना तोच तर त्याचा मूलभूत गाभा असतो. या भावनांना भाषेची, देशाची, जाती-धर्माची कुठलीच बंधनं लागू होत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक चक्री टोलेटी यांनी एक उच्च दर्जाचं, अप्रतिम असं सादरीकरण करून, प्रेक्षकांच्या मनाला साद घालण्याचा जो प्रयत्न केलाय तो निश्चितच कौतुकास्पद आहे. संकलनाची बाजूही त्यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. तीन-चार प्रसंगांमध्ये स्लो मोशन तंत्रज्ञानाचा त्यांनी खुबीनं वापर केला आहे. खास उल्लेख करावा लागेल तो सिनेमॅटोग्राफर पी. राजसुंदर यांचा. प्रत्येक फ्रेममध्ये, प्रत्येक अँगलमध्ये त्यांनी कमाल केली आहे. प्रत्येक प्रसंगात त्यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. शंकर टकर यांचं संगीतही फिल्मच्या प्रकाराला साजेसं आहे. ते फिल्मला पुढे घेऊन जाण्यास आणि दृश्यांची परिणामकारकता वाढवण्यास सहायक ठरतं. आपल्या आजूबाजूलाच हे प्रसंग घडत आहेत आणि आपण त्यांचे साक्षीदार आहोत असं वाटण्याइतपत सर्व टीमनं समरसून काम केलंय.

कमी बजेट, साधा सोपा विषय घेऊनही एक अप्रतिम कलाकृती सादर केली जाऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारी ही फिल्म आहे. यात भव्यदिव्यता नसेल, चकचकीतपणा नसेल; पण प्रेक्षकांना एक तरल अनुभूती देण्यात ती शंभर टक्के यशस्वी ठरते. तुम्ही-आम्ही जरा काही मनाविरुद्ध झालं की खट्टू होतो, निराश होतो. असं असताना, ही फिल्म आपल्याला ‘अगेन्स्ट ऑल ऑड्स’ लढण्याचा आणि छोट्याछोट्या गोष्टींत आनंद मानण्याचा, समाधानी राहण्याचा संदेशही देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com