निवडणुकांचे दिवस : २ (महेश झगडे)

mahesh zagade
mahesh zagade

ज्या देशाच्या लोकशाहीसाठी ऐतिहासिक आंदोलन झालं त्याच देशात लोकशाहीचा गळा घोटून सर्वसामान्यांना आपलं शासन निवडण्यापासून वंचित ठेवण्याचा तो प्रकार काही अपवादात्मकच असेल असं नाही. एक मात्र खरं की नेभळट प्रशासकीय व्यवस्था असेल तर देशाचं अंतर्गत स्वातंत्र्यदेखील हिरावून घेतलं जाण्याचा धोका असतो हे निश्र्चित.

मी त्या वृद्ध गृहस्थांना त्यांचं काम विचारलं. त्यांनी इकडे तिकडे बघून अगदी जवळ येऊन कुजबुजण्याच्या स्वरात सांगितलं : ‘‘शंभर टक्के मतदान का होतं हे कुणीच सांगणार नाही. कारण, इथं मनगटशाहीचा जोर आहे.’’
हे सगळं हिंदीत सांगताना त्यांनी ‘बाहुबली’ हा शब्द वापरला होता.
‘बाहुबली’ हा शब्द याच नावाच्या सिनेमामुळे गेल्या काही दिवसांत इतर भाषांमध्ये आता रूढ झाला असला तरी त्या वेळी उत्तर प्रदेशात हा शब्द ‘गुंड’ किंवा ‘मनगटशाही करणारा’ या अर्थानं वापरला जायचा. त्या वृद्धानं जे सांगितलं ते आश्चर्यकारक होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदानकेंद्रावर कोणताही मतदार जात नाही. शेवटच्या टप्प्यात ‘ते’ बाहुबली मतदानकेंद्रावर येऊन सर्व मतदारांच्या वतीनं बटण दाबतात आणि मतदान ‘शंभर टक्के’ करतात!’
याचाच अर्थ मतदारांच्या दृष्टीनं ते मतदान शून्य टक्के असतं; पण प्रत्यक्षात ते शंभर टक्के झालं असल्याचं भासवलं जातं! या प्रकाराला मतदानकेंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारीदेखील काहीही करू शकत नव्हते. मी महाराष्ट्रातील लोकसभेच्या, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका, तसंच जिल्हा परिषदेच्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका अनेक वेळा हाताळल्या होत्या; पण असा प्रकार इतरत्र कुठं अस्तित्वात असल्याची कल्पनादेखील करणं शक्‍य नव्हतं. तिथून निघून मी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. कोणत्याही अधिकाऱ्याप्रमाणे त्यांचं उत्तर साचेबंद होतं : ‘पूर्वी असे प्रकार होत असावेत; पण माझ्या कारकीर्दीत ते शक्‍य नाही.’
ज्या देशाच्या लोकशाहीसाठी ऐतिहासिक आंदोलन झालं त्याच देशात लोकशाहीचा गळा घोटून सर्वसामान्यांना आपलं शासन निवडण्यापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार काही अपवादात्मकच असेल असं नाही. एक मात्र खरं की नेभळट प्रशासकीय व्यवस्था असेल तर देशाचं अंतर्गत स्वातंत्र्यदेखील हिरावून घेतलं जाण्याचा धोका असतो हे निश्र्चित.

मी माझे दौरे पुढं सुरू ठेवले. विशेषतः आता त्या मतदारसंघातील दुर्गम खेड्यांकडे मी जास्त लक्ष देण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे त्या आठवड्याच्या दौऱ्याची आखणी मी केली. अर्थात, निवडणूकनिरीक्षक काय करत असतात याची रोजची इत्थंभूत माहिती त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना असतेच. संध्याकाळी उशिरा जिल्हाधिकारी मला गेस्ट हाऊसवर भेटायला आले. जाताना त्यांनी माझ्या दौऱ्याचा विषय काढला व ‘तुम्ही काही विशिष्ट भागांत जाऊ नये. कारण, वातावरण तितकंसं चांगलं नसून तो भाग प्रशासकीय यंत्रणेसाठी संवेदनशील आहे,’ असं मला सांगितलं. खरं तर या मतदारसंघात नक्षलवादी वगैरे नव्हते. तसं मी त्यांना बोलून दाखवलं. त्यावर त्यांचं विश्लेषण होतं : ‘हा मतदारसंघ जरी चंबळ खोऱ्यात मोडत नसला तरी त्या खोऱ्याची सुरुवात इथूनच होते. कारण, उंच-सखल घळी असलेल्या भौगोलिक रचनेची सुरुवात इथूनच होते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर त्या परिसरात जास्त आहे. अशा घळींमुळे गुन्हेगार शोधणं पोलिसांना जिकिरीचं होऊन बसतं.’

मी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं व त्या तथाकथित चंबळ खोऱ्याची सुरुवात जिथून होते त्या भागात जायला दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो.
त्या भागात खरोखरच मोठमोठ्या घळी होत्या आणि रस्त्यांचं जाळं (नेटवर्क) अजिबात चांगलं नव्हतं हे थोडा प्रवास केल्यानंतर जाणवू लागलं. त्या भागातली रस्त्यांबाबतची स्थिती जरी चांगली नसली तरी वीजवाहक खांब मात्र परिसरात दिसून आल्यानं ही एक चांगली बाब आहे असं मला वाटलं आणि गाडीत शेजारी बसलेल्या संपर्क-अधिकाऱ्याला मी तसं बोलून दाखवलं. अर्थात्, विजेचं जाळं उभारण्याचं काम अलीकडेच सुरू झालं असावं हे स्पष्ट दिसत होतं. कारण, अद्याप तारांची जोडणी झालेली दिसत नव्हती. ‘या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात विजेचं भारनियमन (लोडशेडिंग) अजिबात नाही,’ असं या मतदारसंघाविषयीच्या टिपणात मी वाचलं असल्याचं मला या वेळी स्मरलं.
महाराष्ट्रात त्या वेळी भारनियमनाचा प्रश्‍न मोठा होता. मात्र, उत्तर प्रदेशात तसं काही नसल्याचं वाचून मला बरं वाटलं होतं. हा विचार सुरू असतानाच संपर्क-अधिकाऱ्यानं जरा संकोचूनच माहिती दिली ती अशी : ‘या भागात विजेचं जाळं तयार करण्याच्या कामाची सुरुवात अलीकडेच झालेली नसून हे जाळं खूप जुनं आहे.’
त्यांनी दिलेली ही माहिती ऐकून मी संभ्रमात पडलो. मला प्रश्न पडला की विजेचं जाळं जुनं होतं तर मग केवळ खांबच का आणि त्यांवर अद्याप तारा का दिसत नव्हत्या? हा काय प्रकार आहे?
त्या अधिकाऱ्याला मी हे विचारल्यानंतर त्यानं जे सांगितलं ते विश्र्वास बसण्यापलीकडचं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार, ‘त्या विजेच्या तारा स्थानिक गुंडांनी (म्हणजे चोरांनी) राजरोसपणे चोरून त्यांची विक्री केलेली होती. प्रशासनानं पुन्हा तारा बसवल्या तरी त्यांची वारंवार विक्री होते. त्यामुळे प्रशासन तरी तारा किती वेळा बसवणार?’
विजेचे खांब आहेत; पण तारा नाहीत आणि स्वाभाविकच त्यामुळे विजेचा वापरच नाही आणि त्यामुळे भारनियमनाचाही प्रश्‍नच नाही! भारनियमनाचा प्रश्‍न असा निकालात निघाला होता हा ‘प्रकाश’ माझ्या डोक्‍यात पडला! हा परिसर याच महान देशाचा भाग होता, जिथं विजेच्या तारांची चोरी वारंवार होत होती आणि प्रशासन काहीही करू शकत नव्हतं!

आमचा ताफा वेगवेगळ्या खेड्यांमधल्या मतदानकेंद्रांची तपासणी करत पुढं जात असताना अचानक तो मध्येच थांबला. सुरक्षेसाठीचं वाहन का थांबलं याची चौकशी मी शरीररक्षकाला करायला सांगितली. तोपर्यंत काही पोलिस रस्त्यालगतच्या, त्यातल्या त्यात उंच अशा झाडाकडे जाताना दिसले. झाडाच्या शेंड्यावर एक व्यक्ती होती. हे काय चाललं असावं याची मला उत्सुकता होती. काही वेळानं ती झाडावरची व्यक्ती खाली उतरली. पोलिसांशी तिची काही चर्चा झाली आणि त्यानंतर पोलिस माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं : ‘यापुढील दौरा रद्द करून आपण परत जात आहोत.’
मला आश्र्चर्य वाटलं. कारण, दौरा माझा आणि त्याबाबतचा निर्णय मी घेण्याऐवजी पोलिस घेत होते! मी त्यांना कारण विचारलं. त्यांनी मोघम सांगितलं : ‘पुढील काही गावांत ‘बंद’ पुकारण्यात आला असून, वातावरण अत्यंत तंग आहे, त्यामुळे तिकडे जाता येणार नाही.’ मला हे नवीन होतं. माझ्यातील निवडणूक-आयोगाचा प्रतिनिधी जरा जास्तच जागा झाला आणि मी पोलिसांना सांगितलं : ‘काहीही झालं तरी दौरा होणारच.’ त्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी पुढं दौऱ्यात येण्यास नकार दिला. संरक्षणयंत्रणाच बरोबर येत नसल्यानं दौरा आपोआपच रद्द होणार होता व त्यामुळे ‘संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत मी निवडणूक आयोगाला कळवीन,’ असं सांगितल्यावर आमच्यातलंच वातावरण तंग झालं! पोलिसांचं त्यांच्या वरिष्ठांशी वायरलेसवरून सतत काहीतरी संभाषण सुरू होतं. त्यांनी माझं संभाषण त्यांच्या पोलिस अधीक्षकांशी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधीक्षकांनी मला वायरलेसवर सांगितलं : ‘परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते म्हणून तुम्ही दौरा रद्द करून परत यावं.’

मी त्याचं कारण विचारलं असता ‘ते वायरलेसवर सांगणं योग्य नाही’ असं मला सांगण्यात आलं आणि एक पोलिस अधिकारी ते कारण मला समोरासमोर सांगेल असं ठरलं.
मी गाडीतून उतरलो व जो अधिकारी मला कारण सांगणार होता त्या अधिकाऱ्याला बरोबर घेऊन इतरांपासून जरा दूर जात मी त्याला कारण विचारलं. त्या अधिकाऱ्यानं सांगितल्यानुसार, त्या परिसरात गुंडांच्या दोन टोळ्या खूपच सक्रिय होत्या आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं वितुष्ट विकोपाला गेलेलं होतं. मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्यात ‘समझोता’ होऊन त्यांनी त्या परिसराची विभागणी करून गावं आपापसात विभागून घेतली होती. त्या ‘समझोत्या’नुसार, त्यांच्या वाट्याला आलेल्या गावांमध्येच अपहरण, खंडणी किंवा तत्सम प्रकार करून ते त्याच ‘कार्यक्षेत्रा’त राहतील व दुसऱ्या टोळीच्या ‘कार्यक्षेत्रा’त अजिबात ‘हस्तक्षेप’ करणार नाहीत. काही काळ हे सगळं ‘समझोत्या’नुसार सुरू होतं; पण माझ्या दौऱ्याच्या दोन-तीन दिवस अगोदर अपहरणाचं एक प्रकरण घडलं होतं आणि अपहृत व्यक्तीचा व अपहरणकर्त्यांचा शोध घेत असतानाच त्या दोन टोळ्यांपैकी एका टोळीच्या प्रमुखाचा खून झाला होता. तो खून दुसऱ्या टोळीनं केला होता. कारण, ‘समझोत्या’चा भंग करून ज्या गुंडानं दुसऱ्या टोळीच्या हद्दीत जाऊन अपहरण केलेलं होतं त्याचा खून झाला होता. या खुनामुळे त्या सर्व परिसरात अतिशय तंग वातावरण होतं आणि गाव बंद करण्यात आलेली होती. मी ज्या वेळी हे सगळं ऐकलं तेव्हा हे बी ग्रेड हिंदी सिनेमापेक्षा काही वेगळं आहे असं मला वाटलं नाही!
महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ही घटना न पटणारी होती; पण ते सत्य नाकारून चालणार नव्हतं. ‘तिथला तणाव निवळल्यानंतर तुम्ही दौऱ्यावर जावं,’ असा सल्ला मला देण्यात आला आणि त्यानुसार मला नाइलाजानं दौरा अर्धवट टाकून परतावं लागलं. अर्थात्, अपहरणाच्या आणि खंडणीच्या प्रकारांसाठी भारतासारख्या देशात एकविसाव्या शतकात गुंडांकडून गावं विभागून घेतली जातात ही बाब प्रचंड अस्वस्थ करणारी होती. अशा सामाजिक परिस्थितीत आपण निवडणुका कितीही कडक केल्या तरी त्यापेक्षा ‘ग्राऊंड लेव्हल’ला याच देशातील काही भागांतील नागरिकांना अशा व्यवस्थेत जीवन जगावं लागत होतं...स्वातंत्र्याची फलनिष्पत्ती ती हीच का असाही प्रश्‍न सहजच निर्माण होतो आणि मन अस्वस्थ होत राहतं.

या घटनेनंतर चार-पाच दिवसांनी एके रात्री तीनच्या सुमारास माझ्या पोटात भयानक वेदना सुरू झाल्या. पित्ताशयात तीन सेंटीमीटरचा खडा असल्याचं निदान झालं. तातडीची बाब म्हणून मला महाराष्ट्रात परतून शस्त्रक्रिया करून घेणं क्रमप्राप्त असल्यानं निवडणूक-निरीक्षकाची कामगिरी अर्ध्यातच सोडून मला परतावं लागलं. त्यामुळे तो गुंडगिरीग्रस्त भाग आणि चंबळ खोऱ्याची जिथून सुरुवात होते अशी ज्याची ‘ख्याती’ होती तो परिसर पाहण्याचं आणि स्थानिक समाजजीवनाचा मागोवा घेण्याचं राहून गेलं...
(उत्तरार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com